एस. रामसामी माझी त्यांच्या एका फार जुन्या सवंगड्याशी ओळख करून देतात. त्यांच्या या मित्राला भेटायला खूप सारे लोक येतात. वर्तमानपत्रातले, टीव्ही वाहिन्यांवरचे, अगदी प्रशासकीय सेवेतले भाप्रसे, भापोसे... चिक्कार. रामसामी कुठलेही तपशील सांगायला विसरत नाहीत. आता ते एका व्हीआयपी, सेलेब्रिटीबद्दल सांगतायत म्हणजे तुम्हीच समजून घ्या जरा.

आणि त्यांचा हा सवंगडी आहे २०० वर्षांचा जुना वृक्ष - मलिगमपट्टुचा थोर ‘आयिरमकाची’.

आयिरमकाची हा फणसाचा वृक्ष आहे. रुंद, उंच आणि फळांनी लगडलेला. त्याचा बुंधा इतका रुंद आहे की त्याला फेर घालायचा तर २५ सेकंद लागतात. त्याच्या या पुरातन खोडावर किमान शंभर काटेरी फणस लागलेत. या वृक्षासमोर उभं राहणं मानाचं आहे. त्याला फेर घालणं अगदी खास. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून रामसामी हसतात. त्यांना झालेला आनंद आणि या वृक्षाबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांच्या डोळ्याच्या कडांना टेकणाऱ्या त्यांच्या भरगच्च मिश्या खुलतात. गेल्या ७१ वर्षांमध्ये माझ्यासारखे किती तरी या वृक्षाने भारून गेलेले त्यांनी पाहिलेत. ते सांगू लागतात...

“तर, आपण कडलुर जिल्ह्याच्या पानरुती तालुक्यात, मलिगमपट्टु पाड्यावर आहोत,” फणसवृक्षासमोर उभे असलेले, पिवळ्या छटेचं धोतर नेसलेले, काटक चणीचे, खांद्यावर पंचा टाकून उभे असलेले रामसामी सांगू लागतात. “माझ्या पूर्वजांनी, पाच पिढ्या आधी हे झाड लावलं. आम्ही त्याला म्हणतो, ‘आयिरमकाची’, हजार फळांचा राजा. आता खरं तर त्याला दर वर्षी २०० ते ३०० फळ लागतं. आणि अगदी ८-१० दिवसात फणस पिकतात. गरे चवीला अगदी गोड, न्याऱ्या रंगाचे. कच्च्या फणसाची बिर्याणी पण होते.” अगदी अर्ध्या मिनिटात ते या फणसाचे गुण सांगतात. या वृक्षाप्रमाणे त्यांचं बोलणंही काळाच्या ओघात अगदी आखीव रेखीव झालंय.

PHOTO • M. Palani Kumar

एस. रामसामी आणि त्यांचा लाडका सवंगडी थोर आयिरमकाची, त्यांच्या वाडीतला २०० वर्षांचा फणस वृक्ष

२०२२ च्या एप्रिल महिन्यात आम्ही पहिल्यांदा पानरुती तालुक्यात फणसाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना भेटायला गेलो होतो. संपूर्ण राज्यामध्ये या गावात सगळ्यात जास्त फणस पिकतात. आणि खास करुन फणसाच्या हंगामात, फेब्रुवारी ते जुलै या काळात इथे टनावारी फणस रांगेत विक्रीसाठी ठेवलेले असतात. पथाऱ्या मांडून आणि रस्त्यांवरच्या सिग्नलपाशी फेरीवाले फोडलेले फणस आणि गरे विकताना दिसतात. पानरुतीमध्ये किमान २ डझन दुकानांमध्ये मंडईसारखा ठोक धंदा सुरू असतो. दररोज आसपासच्या गावातनं ट्रक भरभरून फणस येतात आणि चेन्नई, मदुरई, सेलम ते थेट आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या मुंबईच्या ठोक खरेदीदारांना माल विकला जातो.

आर. विजयकुमार यांच्या अशाच एका मंडीमध्ये मला रामसामी आणि या थोर फणसवृक्षाबद्दल समजलं. “जा. त्यांना भेटा. ते तुम्हाला सगळं काही सांगतील,” विजयकुमार अगदी मनापासून म्हणाले. टपरीवरचा एक चहाही मला पाजला. “सोबत त्यांनाही घेऊन जाल,” पलिकडच्या बाकावर बसलेल्या एका म्हाताऱ्या शेतकऱ्याकडे बोट दाखवून ते म्हणाले.

मलिगमपट्टु इथून पाच किलोमीटरवर होतं. गाडीने जायला आम्हाला फक्त १० मिनिटं लागली. सोबतच्या शेतकरी काकांनी अगदी बरोबर रस्ता दाखवला. “उजवीकडे वळा, आता तिथून सरळ चला. हां. थांबा इथे. आलं रामसामीचं घर,” ते म्हणाले. एका मोठ्या घरासमोर आम्ही उतरलो. दारात एक देखणा काळा-पांढरा कुत्रा राखणीला बसलेला होता. पडवीत एक झोपाळा, काही खुर्च्या. सुंदर कोरीव काम केलेला दरवाजा आणि तिथेच शेतातला माल भरून ठेवलेली अनेक पोती. भिंतीवर अनेक तसबिरी, फोटो, काही काही शोभेच्या वस्तू आणि कॅलेंडर.

रामसामींना काही आम्ही येणार हे माहित नव्हतं. पण त्यांनी आमचं स्वागत केलं. बसा असं सांगून बरीचशी पुस्तकं आणि फोटो आणायला ते आत गेले. फणसाचे तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या रामसामींना उत्सुक, माहिती घेण्यासाठी आतुर असलेल्या आगंतुकांची सवय आहे. एप्रिल महिन्यातल्या त्या दुपारी प्लास्टिकच्या एका खुर्चीत  रामसामी बसले होते. बाजूला दोघी बाया करुवाडु (सुकट) विकत होत्या. आणि मग रामसामींनी मला फणसाविषयी एक नाही दहा गोष्टी शिकवल्या.

*****

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • M. Palani Kumar

तमिळ नाडूच्या कडलुर जिल्ह्यातल्या पानरुती तालुक्यात मलुगमपट्टु पाड्यावरती रामसामी फणस पिकवतात. हे जगातलं सर्वात मोठं फळ मानलं जातं. आयिरमकाची हा सर्वात जुना वृक्ष पाच पिढ्यांपूर्वी त्यांच्या पूर्वजांपैकी कुणी तरी लावला

जगातल्या सर्वात मोठ्या फळांमध्ये गणला जाणारा फणस हा दक्षिण भारताच्या पश्चिम घाटांमधलं देशी फळ आहे. त्याला इंग्रजीत जॅक फ्रूट म्हटलं जातं. याचा उगम पोर्तुगीज जाकामध्ये आहे. आणि जाकाचं मूळ आहे मल्याळम चक्का . फणसाचं शास्त्रीय नाव जरासं क्लिष्ट आहेः Artocarpus heterophyllus – आर्टोकार्पस हेटेरोफायलस.

पण जगभरातल्या लोकांचं लक्ष या काटेरी, काहीशा ओंगळ दिसणाऱ्या फळाकडं गेलं त्या आधी कित्येक वर्षं तमिळ कवींना मात्र फणस माहित होता. तमिळमध्ये याला पाल पाळम म्हणतात आणि २,००० वर्षांपूर्वीच्या काही प्रेमकवितांमध्ये त्याचा मजेशीर उल्लेख सापडतो.

तुझ्या मोठ्या, शीतल डोळ्यांमध्ये अश्रू भरून आलेत
आणि तो मात्र त्याच्या विख्यात देशी परत गेलाय
जिथे डोंगरदऱ्यांमध्ये आहेत फणसाचे वृक्ष
आणि त्यांची सुगंधी, जाडसर गरे
पिकून पडतात खालच्या घळीत
आणि तिथलं मधाचं पोळं फुटून जातं

ऐनकुरुनूरु– २१४ , संगम काव्य

आणखी एका पद्यात पिकू लागलेल्या मोठाल्या फणसाची तुलना प्रेमाशी केलेली आहे. कवितेचे अनुवादक चेंथिल नाथन यांच्या मते हे पद्य म्हणजे ‘कपिलार यांची उत्कट कविता’ आहे.

छोट्याशा देठाला लटकतंय भलं मोठं फळ
तसंच तिचं आयुष्यही आहे, चिवट आणि प्रेम अगाध!

कुरुंथुकोई– १८ , संगम काव्य

सुमारे इस पूर्व ४०० च्या आसपास रचलेल्या बौद्ध आणि जैन साहित्यामध्ये देखील फणसाचा उल्लेख येतो. सोबत केळी, द्राक्षं आणि इतर लिंबूवर्गीय फळांबद्दलही वाचायला मिळतं असं के. टी. अचया आपल्या इंडियन फूडः ए हिस्टॉरिकल कम्पॅनियन या पुस्तकात नमूद करतात.

PHOTO • M. Palani Kumar

वाडीमध्ये ऊन सावलीच्या खेळ सुरू असतो, रामसामींची नजर मात्र झाडांच्या पल्याडच्या जगाचा वेध घेत असते

अगदी आता आता, १६ व्या शतकात (“उत्तम नोंदी ठेवणारा”) सम्राट बाबर हिंदुस्तानातल्या फळांचं अगदी “अचूक वर्णन” करतो असं अचया लिहितात. बाबराला फणसाची फार काही आवड नसावी. या फळाची तुलना तो “मेंढीच्या पोटात मसाला भरून त्याचा गिपा [एक प्रकारचं पुडिंग]” करावा त्याच्याशी करतो आणि फणस “अजीर्ण गोड” असल्याचंही तो म्हणतो.

तमिळ नाडूमध्ये मात्र हे फळ अजूनही लोकांचं लाडकं आहे. तमिळ भाषेमध्ये आजही या झाडाचं गुणगान गाणारी कोडी आणि म्हणी प्रसिद्ध आहेत. कारण हे झाड मुक्कनी म्हणजेच तमिळ प्रांतातल्या तीन लोकप्रिय झाडांपैकी एक आहे. ती आहेत. मा, पाल आणि वाळइ (आंबा, फणस, केळं). इरा. पंचवर्णम फणसाची साद्यंत माहिती देणाऱ्या 'पाल मारमः फळांचा राजा' या आपल्या पुस्तकात अशा अनेक म्हणींबद्दल लिहितात. एक अगदी सुंदर ओळ आहेः

मुल्लुकुल्लेय मुथुकुलैयम. आधु एण्ण? पालपाळम.
(काट्यांच्या आत मोत्यांचा घोस. सांगा बरं काय? फणस.)

या फळाबद्दल सध्या बरंच काही लिहूनही येत आहे. २०१९ साली इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स या मासिकातील एका शोधनिबंधात आर. ए. एस. एन. रणसिंघे लिहितात, “फणसाच्या झाडाचे विविध भाग, फळं, पानं आणि साल पारंपरिक औषधांमध्ये वापरले जातात. कॅन्सरविरोधी, जंतुनाशक, बुरशीनाशक, दाहविरोधी, जखमा बरं करण्याचे आणि रक्तातली साखर कमी करण्याचे गुण या वृक्षामध्ये आहेत.” तरीही “ज्या भागात फणस वाढतो तिथे त्याचा व्यापारी स्तरावर वापर फारच कमी केला जात आहे.”

*****

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः रामसामींच्या वाडीतलं फणसाचं लहानसं रोप. उजवीकडेः हिरवी गार काटेरी फळं झाडाच्या फांद्यांवरून लटकू लागतात आणि मग या जुन्या जाणत्या झाडाचं खोड फणसांनी लगडून जातं

कडलुर जिल्ह्याचा पानरुती तालुका तमिळ नाडूची फणस राजधानी आहे. फणस आणि त्याचा सगळा इतिहास-भूगोल याबद्दल रामसामींकडे ज्ञानाचं भंडार आहे.  फणसाचा वृक्ष सगळ्यात चांगला कुठे वाढतो हे ते समजावून सांगतात. जिथे जमिनीखालची पाण्याची पातळी पन्नास फुटाहून जास्त वाढत नाही, तिथे. जर पाण्याची पातळी वाढली तर त्याचं सोटमूळ सडतं. “काजू आणि आंब्याला जास्त पाणी चालतं. पण फणसाचं तसं नाही,” ते सांगतात. पाणी साचून राहिलं तर झाड “संपणार.” मरणार.

त्यांच्या अंदाजानुसार, त्यांच्या मलिगमपट्टु पाड्याच्या सभोवताली २० किलोमीटरच्या परिघातल्या एकूण एक चतुर्थांश भागावर फणसाची लागवड केली आहे. तमिळ नाडू सरकारच्या २०२२-२३ वर्षासाठीच्या कृषी धोरणासंबंधीच्या टिपणात म्हटलं आहे की राज्यात ३,१८० हेक्टर क्षेत्रावर फणस आहे. त्यातले ७१८ हेक्टर कडलुरमध्ये आहेत.

२०२०-२१ साली भारतभरात १,९१,००० हेक्टर क्षेत्रावर फणसाची लागवड होती. यामध्ये कडलुरचं क्षेत्र फार मोठं नसलं तरी या प्रदेशामध्ये फणस हे महत्त्वाचं पीक आहे. तमिळ नाडूत पिकणाऱ्या प्रत्येक चार फणसांतला एक इथे पिकतोय.

पाल मारमचं आर्थिक मूल्य किती आहे? रामसामी काही बाबी समजावून सांगतात. पंधरा ते वीस वर्षांच्या झाडासाठी वर्षाला १२,५०० रुपये भाडं पडतं, ते म्हणतात. “पाच वर्षांच्या झाडाला इतके पैसे कुणी देत नाही. त्यांना जास्तीत जास्त तीन-चार फळं लागतात. पण झाड चाळीस वर्षांहून मोठं असेल तर त्याला ५० पेक्षा जास्त फळ लागतं.”

झाडाचं वय वाढत जातं तसं त्याला फळही जास्त लागतं.

प्रत्येक झाडामागे किती कमाई होते याचा हिशेब करणं तसं जरा गुंतागुंतीचं आहे. आणि त्यातून खरी माहिती मिळतच नाही. त्या दिवशी पानरुतीच्या बाजारातले फणसाचं पीक घेणारे शेतकरी हिशेब करू लागले आणि त्यांनी सांगितलं की दर १०० झाडांमागे त्यांना २ ते २.५ लाख रुपयांचं उत्पन्न येतं. त्यामध्ये खतं, औषधं, कीटकनाशकं, मजुरी, फळाची वाहतूक, आडत असा सगळा मिळून ५०,००० ते ७०,००० रुपयांचा खर्च समाविष्ट आहे.

रामसामींकडच्या फोटोंच्या संग्रहातले मलिगमपट्टुच्या २०० वर्षांच्या आयिरमकाचीचे फोटो

अर्थात हा आकडा देखील फारसा पक्का नाही. एका झाडाला किती फळ लागतं, एकेका फळाला मिळणारी किंमत, टनावारी मिळणारा भाव अशा कशाचाच पक्का अंदाज बांधता येत नाही. आता बघा, एका फळाला १५० रुपये ते ५०० रुपये मिळू शकतात. फळाचा हंगाम सुरू झालाय, का अगदी भरावर आहे त्यावर हा भाव ठरतो. शिवाय फणसाच्या आकारावर. पानरुतीमध्ये फणस साधारणपणे ८ ते १५ किलोंचा असतो. काही काही ५० तर काहींचं वजन अगदी ८० किलोंपर्यंत जातं. एप्रिल २०२२ मध्ये एक टन फणसाला ३०,००० रुपये भाव होता. आणि साधारणपणे एका टनात १०० फळ बसतं. अर्थात यात कमी जास्त होतंच.

आणि या झाडाचं लाकूड तर बहुमूल्य आहे. रामसामी सांगतात की ४० वर्षांचं झाड “लाकडासाठी विकलं तर त्याचे ४०,००० रुपये मिळू शकतात.” फणसाचं लाकूड सर्वात चांगलं असतं. टणक आणि पाण्याने खराब होत नाही, “सागापेक्षाही भारी.” चांगलं लाकूड कोणतं? झाड सहा फुटांहून उंच, जाडजूड (हाताने किमान दोन फुटांचं अंतर दाखवत) आणि कसला दोष नको. झाड पाहिल्यानंतरच झाडाचा भाव ठरतो. जर खिडकीच्या चौकटी तयार करता येतील अशा चांगल्या फांद्या असल्या तर, असं म्हणत रामसामी त्यांच्यामागच्या खिडकीकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, “या अशा”, तर मग झाडाचं मूल्य आणखी वाढतं.

त्यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या घराचा दरवाजा फणसाच्या लाकडाचा होता. आणि त्यांच्या आताच्या राहत्या नव्या घराचा कोरीव काम केलेला दरवाजा त्यांच्याच वाडीतल्या सागाचा आहे. “जुना दरवाजा आत आहे,” ते सांगतात. नंतर मला तो दरवाजा दाखवतात. जीर्ण झालेल्या, खडबडीत, ओरखडे पडलेल्या दोन मजबूत चौकटी आता घराच्या परसदारी ठेवलेल्या आहेत. “१७५ वर्षं जुनी चौकट आहे ही,” ते काहीशा अभिमानाने सांगतात.

त्यानंतर ते मला एक जुनी खंजिरी दाखवतात. तीही फणसाच्या लाकडापासून तयार केलेली आहे. मध्यभागी बारीक झांजा. निमुळत्या तोंडाच्या एका बाजूला उदुम्बु थोळ म्हणजेच घोरपडीचं कातडं बसवलंय. संगीतवाद्यांमध्ये, खास करून वीणा आणि मृदंगासाठी फणसाचं लाकूड वापरलं जातं. “ही जुनी माझ्या वडलांची आहे,” असं सांगत ते हातातली खंजिरी मला दाखवतात. त्यातल्या झांजा हलकेच वाजतात, निनादतात.

झाडं, रोपं याबद्दल रामसामींचं ज्ञान अगाध आहे. पण त्याशिवाय ते एक नाणीतज्ज्ञही आहेत. ते नाणी गोळा करतात. वर्षवार आणि किती दुर्मिळ यानुसार त्यांनी आपल्या संग्रहातली नाणी वह्यांमध्ये चिकटवून ठेवली आहेत. त्यांच्याकडची काही नाणी ते मला दाखवतात. या नाण्यांसाठी काही जण त्यांना अगदी ६५,००० ते ८५,००० रुपये देऊ करायला तयार आहेत. “पण मी ती नाणी विकली नाहीत,” ते हसून सांगतात. मी कौतुकाने नाणी बघत असतानाच त्यांच्या पत्नी माझ्यासाठी काही तरी खायला घेऊन आल्या. मसाला काजू आणि बोरं. एकदम चविष्ट, तुरट आणि खारट. रामसामींना भेटून जे समाधान वाटलं तेच हा खाऊ खाऊनसुद्धा.

*****

PHOTO • M. Palani Kumar

फणस काढणं म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. झाडाच्या शेंड्याकडे लागलेला फणस काढायचा तर शेतातला गडी वर फांदीवर चढतो

PHOTO • M. Palani Kumar

शेंड्यापाशी लागलेले मोठे फणस उतरवताना त्याचं देठ कापून रस्सी बांधून ते सावकाश खाली सोडले जातात

आयिरमकाची रामसामींच्या ओळखीच्या एकांना भाड्याने दिलेला आहे. “त्याचं काही फळ आम्ही आमच्यासाठी ठेवलं तरी त्यांची काही हरकत नसते. अगदी सगळं फळ ठेवलं तरीही,” ते हसतात. जरी याचं नाव आयिरमकाची असलं, म्हणजे हजार फळांचा राजा, तरी प्रत्यक्षात त्याला ३०० ते ५०० फळ लागतं. पण हा अगदी सुप्रसिद्ध वृक्ष आहे आणि त्याच्या फळाला कायमच मागणी असते. मध्यम आकाराच्या फणसात २०० गरे तरी असतात. “चवीला तर भारीच आहे पण स्वयंपाकासाठीही चांगला आहे,” रामसामी अगदी खुलून सांगतात.

शक्यतो झाड जितकं जुनं, बुंधा जितका जाड तितकी जास्त फळं त्याला लागतात, रामसामी सांगतात. “जे लोक झाडं जोपासतात त्यांना बरोबर माहित असतं की झाडावर किती फळ राहू द्यायचं. एखाद्या कमी वयाच्या झाडाला खूप जास्त फळं लागली तर त्याची वाढ खुंटते,” हाताने एखाद्या नारळाची रुंदी दाखवत ते सांगतात. शेतकरी फणस पिकवण्यासाठी काही ना काही रसायनं वापरतात. त्याशिवाय फणसाची शेती करणं अशक्य नाही पण अगदी १०० टक्के नैसर्गिक रित्या फणस पिकवणं तसं अवघडच आहे, रामसामी सांगतात.

“आपण झाडावर मोजकीच फळं ठेवली ना तर प्रत्येक फणस चांगला मोठा आणि वजनदार होऊ शकतो. अर्थात यात एक जोखीमही आहे. कीड पडते, पावसाने कधी कधी नुकसान होतं किंवा वादळ आलं तर फळ गळतं. पण आमची भूकही फार मोठी नाहीये, म्हणा,” ते हसत सांगतात.

फणसांवरचं एक पुस्तक उघडून ते मला त्यातली चित्रं दाखवू लागतात. “मोठी फळं कशी जोपासतात ते पहा... फळाला संरक्षण मिळावं यासाठी एक जाळी करतात आणि मग फळाभोवती जाळी गुंडाळून ती दोरीने वरच्या फांदीला बांधतात. फळाला आधार मिळतो आणि ते खाली पडत नाही. काढायची वेळ आली की दोरीच्या सहाय्याने सावकाश खाली उतरवतात. आणि मग अगदी जपून दुसरीकडे नेतात,” असं म्हणत ते एका फोटोवर बोट ठेवतात. पुरुषभर आकाराचा एक फणस दोन माणसं खांद्यावरून उचलून नेत होते. रामसामी रोज आपल्या झाडांवर नजर टाकतात आणि कुठला फणस खराब झाला नाहीये ना ते पाहतात. “जरा जरी शंका आली तर आम्ही लगेच एक जाळी तयार करतो आणि फळाखाली बांधतो.”

कधी कधी सगळी काळजी घेऊनसुद्धा फळं पडतात आणि फुटतात. मग अशी फळं गायीगुरांना खायला देतात. “ते तिथले फणस पाहताय ना? ते खाली पडलेत. आता विकता यायचे नाहीत. माझ्या गायी आणि शेरडं अगदी मिटक्या मारत ते खाऊन टाकतील.” करुवाडु (सुकट) विकणाऱ्या बायांचं काम झालंय. लोखंडी तराजूत सुकटीचं वजन करून ती स्वयंपाकघरात पोचलीये. विकणाऱ्या बायांना दोसे खायला दिलेत. खाता खाता त्या आमच्या गप्पा ऐकतायत. मध्येच स्वतः भागही घेतात. “एखादा फणस द्या की दादा. आमची पोरांना खावासा वाटतोय,” त्या रामसामींना सांगतात. “पुढच्या महिन्यात येऊन घेऊन जा,” ते म्हणतात.

PHOTO • Aparna Karthikeyan

रामसामींच्या वाडीत जाण्याच्या रस्त्यावर शेजारच्या एका शेतकऱ्याने आपले फणस रांगेत मांडून ठेवलेत

एकदा फणस उतरवले की ते मंडीतल्या दलालाकडे पाठवले जातात, रामसामी सांगतात. “गिऱ्हाईक आलं की ते आम्हाला फोन करतात आणि मिळणारा भाव आम्हाला ठीक वाटतोय का ते पाहतात. आम्हाला पटला तर ते माल विकतात आणि आम्हाला पैसा देतात. दर १,००० रुपयांच्या विक्रीमागे ते ५० ते १०० रुपये त्यांची दलाली घेतात,” ते सांगतात, “तेही दोन्ही पार्टींकडून.” रामसामी ही पाच ते दहा टक्के दलाली द्यायला तयार असतात. “शेतकऱ्याची मोठी डोकेदुखी वाचते. आम्हाला गिऱ्हाइकाची वाट पाहत ताटकळत बसावं लागत नाही. कधी कधी तर अख्खा दिवस जाऊ शकतो. आम्हाला बाकी कामं पण असतात. आम्ही काय तिथे पानरुतीत जाऊन बसून रहायचं का?”

वीसेक वर्षांपूर्वी या जिल्ह्यात बाकी बऱ्याच प्रकारची पिकं होत होती, रामसामी सांगतात. “आम्ही टॅपिओका आणि भुईमूग करत होतो. काजूचे एका मागोमाग एक कारखाने सुरू झाले आणि मजुरांचा तुटवडा जाणवायला लागला. त्यावर उपाय म्हणून लोक फणसाकडे वळले.” फणसाच्या पिकाला फार दिवस मजूर लागत नाहीत. आणि मजूरही “बाहेरगावाहून येतात” असं म्हणत रामसामी सुकट विकायला आलेल्या बायांकडे निर्देश करतात.

पण शेतकरी आता फणस सोडून इतर पिकांकडे वळायला लागले आहेत, ते सांगतात. रामसामींची पाच एकरात १५० झाडं आहेत. त्याच जमिनीत मधेमधे आंबा, काजू आणि चिंच देखील लावलीये. “फणस आणि काजू व्यापाऱ्याला दिलेत. आंबा आणि चिंच आम्ही स्वतः उतरवतो,” ते सांगतात. फणसाची झाडं आता कमी करण्याचा त्यांचा विचार आहे. “वादळांमुळे, दुसरं काय. थेन वादळ आलं तेव्हा माझी जवळपास २०० झाडं गेली. काढावी लागली. या इथेच किती तरी पडली होती. आता आम्ही फणसाच्या जागी काजू लावतोय.”

अर्थात काजू किंवा इतर पिकं काही वादळाचा सामना करू शकत नाहीत. पण, “पहिल्या वर्षापासूनच फळ सुरू होतं. आणि काजूला फार काही निगा देखील घ्यावी लागत नाही. कडलुर जिल्ह्याला वादळाचा धोका आहे आणि दर दहा वर्षांनी एखादं तरी मोठं वादळ येतंच. पंधरा वर्षांहून मोठी, जास्त फळ देणारी झाडं सगळ्यात आधी पडतात. फार दुःख होतं,” मान हलवत रामसामी सांगतात. त्यांच्या हातांच्या हालचाली पाहून त्यांचं किती नुकसान होतं हे आपसून समजतं.

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः गेल्या अनेक वर्षांत रामसामींनी फणसाविषयी किती तरी पुस्तकं गोळा केली आहेत. त्यातली काही बरीच दुर्मिळ आहेत. उजवीकडेः नाण्यांचे तज्ज्ञ असणाऱ्या रामसामींकडे नाण्यांचा मोठा संग्रह आहे

कडलुर जिल्ह्याच्या सद्यस्थिती अहवालात म्हटलंयः मोठा सागरकिनारा असल्याने या जिल्ह्याला “चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा, त्यातून पाऊस आणि पूर येण्याचा धोका आहे.”

थेन वादळामुळे किती नुकसान झालं ते २०१२ सालच्या वर्तमनापत्रातल्या बातम्यांमधून समजू शकतं. ११ डिसेंबर २०११ रोजी थेन वादळाचा कडलुरला तडाखा बसला. बिझनेस लाइनमधल्या एका बातमीत लिहिलंय की “फणस, आंबा, केळी, नारळ आणि काजूची दोन कोटींहून जास्त झाडं उन्मळून पडली.” रामसामी सांगतात की तेव्हा कुणाला लाकूड हवं असेल तर घेऊन जा असं ते सांगत होते. “आमच्याकडे पैसा नव्हता. पडलेली झाडं पाहवत नव्हती... किती तरी लोकांनी ते लाकूड वापरून आपली मोडून पडलेली घरं परत उभी केली.”

*****

फणसाची ही वाडी रामसामींच्या घरापासून जवळच आहे. शेजारचे एक शेतकरी फळ उतरवून ओळीने मांडून ठेवतायत. लहान मुलांच्या खेळातल्या आगगाडीचे डबे असावेत तसे हे फणस दिसतात. एका मागोमाग एक. ट्रकमध्ये बसून बाजारात जाण्याची वाट बघत असणारे फणस. फणसाच्या वाडीत शिरलं की हवा एकदम गार होते. बाहेरच्या हवेपेक्षा किती तरी अंश गार.

रामसामी चालत चालत बोलत राहतातः झाडांबद्दल, रोपांबद्दल आणि फळांबद्दल. त्यांच्या वाडीची ही रपेट किती तरी शिकवून जाते. शिकवता शिकवता सहलीला आल्याचा अनुभवही देते. वाटेत ते आम्हाला किती तरी प्रकारचा मेवा खायला देतात, रसाळ काजूगर, काठोकाठ साखर भरलेली हनी ॲपल, आंबट गोड रसरशीत चिंचसुद्धा. सगळं एकापाठोपाठ एक.

त्यानंतर ते तमालपत्राची पानं तोडून आम्हाला वास घ्यायला सांगतात. पाण्याची चव घ्यायची आहे का, हा त्यांचा पुढचा प्रश्न. आम्ही काही उत्तर देण्याआधीच ते कोपऱ्यातली मोटर सुरू करून येतात. पाईपमधून पाणी फेसाळत बाहेर येतं. दुपारच्या सूर्यकिरणांमध्ये मोत्यांसारखे चमकणारे पाण्याचे थेंब. ओंजळीने ते पाणी आम्ही प्यालो. गोड नाही पण खरंच अगदी चवदार पाणी. शहरातल्या नळातून येणाऱ्या क्लोरिनयुक्त पाण्याची आम्हाला सवय. निव्वळ मचूळ. तोंडभर हसून ते मोटर बंद करतात. आमची रपेट पुढे सुरूच राहते.

PHOTO • M. Palani Kumar

रामसामी मलिगमपट्टु पाड्यावरच्या आपल्या घरी

आम्ही पुन्ही एकदा आयिरमकाचीपाशी येतो. या जिल्ह्यातला हा सर्वात पुरातन वृक्ष आहे. त्याचा पर्णसंभार एकदम मोठा आणि दाट आहे. खोडावर, बुंध्यावर मात्र वयाच्या खाणाखुणा दिसू लागल्या आहेत. काही ठिकाणी वठलंय, कुठे पोकळ झालंय. पण जमिनीपासच्या बुंध्यावर मात्र परकर नेसावा तसे सगळ्या बाजूंनी फणस लगडलेत. “पुढच्या महिन्यात बघा, इतका देखणा दिसेल हा.”

या वाडीत असे अनेक देखणे आणि शाही वृक्ष आहेत. “त्या तिकडे एक फणस आहे, ४३ टक्के ‘ग्लुकोज फणस’. मी तपासून घेतलंय ना,” वाडीच्या एका कोपऱ्यात असलेल्या वृक्षाकडे बोट दाखवत ते तिथे निघतात. खाली जमिनीवर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतो. फांद्याची, पानांची सळसळ सुरू असते. आणि पक्ष्यांची किलबिल. असं वाटतं एखाद्या झाडाखाली छान ताणून द्यावी आणि आजूबाजूला काय चालू आहे ते नुसतं पाहत रहावं. पण रामसामी मात्र फणसाच्या वेगवेगळ्या जातींविषयी बोलायला लागतात. आंब्याच्या वेगवेगळ्या जाती, उदा. नीलम आणि बेंगळुरा चवीला एकदम वेगळ्या असतात आणि त्याची रोपं करणं सोपं असतं. पण फणसाचं तसं नाही.

एका अगदी गोडमिट्ट फणसाकडे बोट दाखवत रामसामी म्हणतात, “समजा, मला या झाडाचं रोप तयार करायचं असलं तरी फक्त बीच्या भरोशावर राहून चालत नाही. कारण एका फळात भले १०० बिया असतात, त्यातली कुठलीही एक अगदी आपल्या मूळ झाडासारखी असेल याची खात्री देता येत नाही! कारण काय असेल? परागीभवन होतं तेव्हा दुसऱ्याच वृक्षाच्या परागकणांचा संयोग होऊ शकतो आणि फणसाच्या जातीत गडबड होते.”

“आम्ही हंगामातलं पहिलं किंवा शेवटचं फळ घेतो. २०० फुटांच्या परिघात दुसरा कुठलाही फणस नाही याची खातरजमा केल्यानंतर आम्ही हे फळ केवळ बियांसाठी वापरतो,” ते सांगतात. नाही तर शेतकरी फणसाचे विशिष्ट गुणधर्म हवे असतील, म्हणजे गरा गिळगिळीत नको असेल, गोड हवा असेल तर तशा झाडांची कलमं करतात.

फणसाबद्दल आणखी एक गंमत आहे. फणस कधी काढतो (४५, ५५ किंवा ७० दिवसांनंतर) त्यावर त्याची चव अवलंबून असते. फणस पिकाला मजुरी फार लागत नाही पण हे फळ जास्त दिवस राहत नसल्याने ते तितकं सोपं नाहीये. “आम्हाला शीतगृहाची गरज आहे.” फणस पिकवणारे शेतकरी आणि व्यापारी दोघांच्याही तोंडी हेच पालुपद असतं. “तीन किंवा पाच दिवस. बास्स. त्यानंतर फळ खराबच होतं,” रामसामी सांगतात. “आता कसंय, काजू मी वर्षभर ठेवून नंतर विकू शकतो. आणि हा मात्र आठवडाभरही टिकत नाही!”

आयिरमकाची मनात अचंबित झाला असणार. तो तर चांगला २०० वर्षं पाय रोवून टिकून आहे की...

PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः रामसामींच्या संग्रहातलं आयिरमकाचीचं एक जुनं छायाचित्र. उजवीकडेः २०२२ साली रामसामींच्या वाडीत ताठ उभा असलेला आयिरमकाची

या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्रामअंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

शीर्षक छायाचित्रः एम. पलानी कुमार

अनुवादः मेधा काळे

Aparna Karthikeyan

Aparna Karthikeyan is an independent journalist, author and Senior Fellow, PARI. Her non-fiction book 'Nine Rupees an Hour' documents the disappearing livelihoods of Tamil Nadu. She has written five books for children. Aparna lives in Chennai with her family and dogs.

Other stories by Aparna Karthikeyan
Photographs : M. Palani Kumar

M. Palani Kumar is Staff Photographer at People's Archive of Rural India. He is interested in documenting the lives of working-class women and marginalised people. Palani has received the Amplify grant in 2021, and Samyak Drishti and Photo South Asia Grant in 2020. He received the first Dayanita Singh-PARI Documentary Photography Award in 2022. Palani was also the cinematographer of ‘Kakoos' (Toilet), a Tamil-language documentary exposing the practice of manual scavenging in Tamil Nadu.

Other stories by M. Palani Kumar

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath