नखाहून फार मोठी नसलेली फिक्या पांढऱ्या रंगाची आणि सुंदर अशी कळी. बागेत फुललेल्या फुलांच्या चांदण्या. त्यांच्या मोहक सुगंधाने धुंदी चढावी. मोगऱ्याचं फूल म्हणजे आपल्याला मिळालेलं लेणं आहे. मातीने, काटक रोपाने आणि पांढऱ्या ढगांनी सजलेल्या आकाशाने दिलेली एक भेट म्हणा ना.

इथे मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे मात्र या फुलांचं वर्णन करायला, त्याच्या सौंदर्यात रमायला बिलकुल वेळ नाही. त्यांना हा मल्ली म्हणजेच मोगरा फुलण्याच्या आधी पूकडई म्हणजेच फूलबाजारात पोचवायला हवा. विनायक चतुर्थीला चारच दिवस राहिलेत. फुलांना बरा भाव मिळण्याची शक्यता आहे.

अंगठा आणि तर्जनीचा वापर करत बाया आणि गडी झपाझप कळ्या खुडत असतात. ओंजळ भरली की साडीच्या किंवा धोतराच्या ओच्यात टाकायची आणि नंतर पिशव्यांमध्ये. सगळं काम कसं काटेकोर सुरू आहे. फांदी हलवायची, त्यानंतर कळ्या खुडायच्या, मग पुढच्या झाडाकडे. झाड केवढं तर तीन वर्षांच्या लेकराइतकं. पुन्हा तेच. आणखी थोड्या कळ्या खुडायच्या. गप्पा सुरूच. काम करता करता रेडिओवर तमिळ गाणी वाजतायत. पूर्वेकडे सूर्य वर येऊ लागलाय...

थोड्याच वेळात पुलं मदुरई शहरातल्या मथ्थुवनी बाजारात पोचलेली असतील आणि तिथून तमिळ नाडूतल्या बाकी शहरांमध्ये. आणि कधी कधी तर परदेशातही.

पारीने २०२१, २०२२ आणि २०२३ अशी तीन सलग वर्षं मदुरईच्या तिरुमंगलम आणि उसिलमपट्टी तालुक्यांना भेटी दिल्या. मोगऱ्याचे हे मळे मीनाक्षी अम्मन मंदीर आणि आपल्या फूलबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या मदुरई शहरापासून फार तर एका तासाच्या अंतरावर आहेत. इथेच मोगरा विकला जातो, ओंजळभर असो किंवा ढिगाने.

PHOTO • M. Palani Kumar

मदुरईच्या तिरुमंगलम तालुक्यातल्या मेलउप्पिलिंगुडु पाड्यावर आपल्या शेतामध्ये उभे असलेले गणपती. मोगऱ्याचा बहार नुकताच संपलाय आणि आता रोज केवळ किलोभर फुलं निघतायत

PHOTO • M. Palani Kumar

मोहक सुगंध असणारी मोगऱ्याची ओंजळभर फुलं

पी. गणपती, वय ५१ मदुरईच्या तिरुमंगलम तालुक्याच्या मेलउप्पिलिंगुडु पाड्यावर राहतात. मदुरईच्या प्रांताची ओळख बनलेल्या या फुलाचं विश्व ते माझ्यापुढे उलगडू लागतात. “हा भाग इथल्या सुगंधी मोगऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण माहिती आहे? अर्धी वाटी फुलं जरी घरात ठेवलीत ना, आठवडाभर त्याचा दरवळ जात नाही!”

शुभ्र पांढरा सदरा, खिशात काही नोटा, निळी लुंगी नेसलेले गणपती म्हणजे हसरं व्यक्तिमत्व. मदुरई ढंगाची तमिळ झरझर बोलतात. “वर्षभराचं होईपर्यंत हे रोप एखाद्या कुकुल्या बाळासारखं असतं,” ते सांगतात. “अगदी डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घ्यावी लागते.” त्यांच्या मालकीची अडीच एकर जमीन आहे. त्यात त्यांनी मोगरा फुलवलाय.

साधारणपणे सहा महिन्याचं झाल्यावर रोपाला कळ्या लागायला सुरुवात होते. पण कधी किती याचा काही ताळमेळ नसतो. एक किलो मोगऱ्याच्या भावात जसे चढउतार होतात, तसंच. कधी कधी अख्ख्या एकरात एखादा किलो फूल निघतं आणि दोनेक आठवड्यानंतर त्याच एकरात पन्नास किलो मोगरा मिळतो. “लगीनसराई आणि उत्सवांच्या काळात भाव फार चांगला मिळतो, एक हजार, दोन हजार, तीन हजार...फक्त एका किलोला बरं. पण जेव्हा मळा फुलांनी लखडलेला असतो – अगदी बहरात आलेला असतो – तेव्हा मात्र भाव पडलेले असतात.” शेतीत कशाचाच भरोसा नाही. एका गोष्टीची मात्र खात्री असते. खर्चाची.

आणि अर्थातच, मेहनतीची. कधी कधी ते आणि गणपतींच्या भाषेत वीटुकारम्मा म्हणजे त्यांच्या पत्नी पिचइयम्मा आठ किलो फुलं खुडतात. “पाठ भरून येते,” ते म्हणतात, “प्रचंड त्रास होतो.” आणि खरं तर जास्त त्रास कशाचा होत असेल तर तो वाढत चाललेल्या खर्चाचा. खतं, कीटकनाशकं, मजुरी आणि इंधन सगळ्याचा खर्च वाढत चाललाय. “थोडासुद्धा नफा कसा व्हावा?” हे आमचं बोलणं सुरू होतं सप्टेंबर २०२१ मध्ये.

मोगरा हा इथल्या रोजच्या जगण्याचं अविभाज्य अंग आहे. कुठल्याही कोपऱ्यावर तुम्हाला तो भेटतो. तमिळ संस्कृतीचं चिन्ह म्हणा हवं तर. मल्ली, एका शहराचं नाव जणू, किंवा एखादी इडली, भाताचं वाण, तसंच. प्रत्येक मंदिरात दरवळणारा, लग्नमंडपात बाजारात ज्याचा सुगंध भरून राहिलेला असतो, गर्दी असो किंवा घराचं माजघर, सगळीकडे असतो हा मोगरा. पण त्याची लागवड मात्र सोपी नाही...

*****

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

गणपती यांच्या शेतातली मोगऱ्याची नवी रोपं आणि कळ्या (उजवीकडे)

PHOTO • M. Palani Kumar

पिचइयम्मा मोगऱ्याच्या शेतात मजुरांबरोबर सफाईचं काम करतायत

२०२२ साली ऑगस्ट महिन्यात आम्ही पुन्हा एकदा गणपतींच्या शेतात गेलो. एकरभर जमिनीत मोगऱ्याची नवी रोपं दिसत होती. रोपाची उंची कोपराएवढी असं हातवाऱ्यांनीच ते सांगतात. रोपं रामनाथपुरम जिल्ह्याच्या रामेश्वरमजवळच्या तंगाचिमादममधल्या रोपवाटिकांमध्ये चार रुपयाला एक रोप मिळतं. ते स्वतः जाऊन निरखून एकेक रोप घेऊन येतात. चांगलं काटक आणि वाढ होईल असं रोप निवडावं लागतं. रान चांगलं असेल, म्हणजे माती भारी आणि लाल असली तर “तुम्ही चार फुटावर एक रोप लावू शकता. रोप चांगलं वाढणार,” पुन्हा एकदा हातानेच रोप किती मोठं होतं त्याचा गोल आकार करत गणपती सांगतात. “पण इथली माती विटा बनवायच्या लायकीची आहे.” म्हणजे चिकण माती.

मोगऱ्याच्या लागवडीसाठी एकरभर रान तयार करायचं तर त्यासाठी ५०,००० रुपये खर्च येतो. “नीट मशागत करायची तर पैसा लागतोच की नाही.” उन्हाळ्यामध्ये त्यांचं रान फुलांनी लखडलेलं असतं. तमिळमध्ये ते म्हणतात, “पलिचिन्नु पूकम.” एक दिवस त्यांनी १० किलो फुलं खुडल्याचं सांगत असताना त्यांचे डोळे लुकलुकतात, आवाज एकदम उत्तेजित होतो, चेहऱ्यावरच्या हास्यामध्ये पुन्हा अशी संधी कधी येईल, लवकरच येईल का याची आतुरता जाणवते. एका झाडाला १०० ग्रॅम, तर दुसऱ्याला चक्क २०० ग्रॅम ते खुशीत येऊन सांगतात.

गणपतींचा दिवस सकाळी तांबडं फुटायच्या वेळी सुरू होतो. पूर्वी त्या आधी एक दोन तास. पण आजकाल “कामगार उशीरा येतात,” ते सांगतात. कळ्या खुडण्यासाठी त्यांनी मजूर लावलेत. तासाला ५० रुपये मजुरी किंवा “डब्बा” भर फुलांमागे ३५ ते ५० रुपये अशी मजुरी द्यावी लागते. डब्ब्याचं माप म्हणजे एक किलो फुलं भरतात.

पारीने त्यांची भेट घेऊन १२ महिने उलटून गेलेत. मधल्या काळात फुलांचे भाव तेजीत आलेत. किमान भाव ‘सेंट’चे कारखाने ठरवतात. बाजारात प्रचंड आवक असते तेव्हा हे कारखाने मोठ्या प्रमाणावर फुलं खरेदी करतात. किलोमागे १२० ते २२० रुपये भाव देतात. किलोमागे २०० च्या आसपास भाव मिळाला तर तोटा होत नसल्याचं गणपती यांचं म्हणणं आहे.

जेव्हा मागणी जास्त असते आणि आवक कमी तेव्हा मात्र किलोभर मोगऱ्याला याच्या किती तर पट भाव मिळतो. सणाच्या काळात तर फुलांना अगदी १,००० रुपये किलोहूनही जास्त भाव मिळाला आहे. पण झाडांना थोडी सणवार कळतात. किंवा त्यांना ‘मुहूर्त नाल’ म्हणजे शुभ दिवस आणि ‘कारि नाल’ म्हणजे अशुभ दिवसही समजत नाहीत ना.

त्यांना फक्त निसर्गाची लय कळते. स्वच्छ ऊन आणि त्यानंतर चांगला पाऊस झाला की रानात फक्त फुलंच फुलं. “कुठेही नजर टाका, फक्त मोगरा. आता झाडांना फुलण्यापासून कुणी रोखावं. जमेल का?” हसत गणपती मला विचारतात.

PHOTO • M. Palani Kumar

गणपती आमच्यासाठी झाडावरचे ताजे पेरू तोडून आणतात

त्यांच्या भाषेत मृगाचा बहार आला की मदुरईच्या बाजारात पहावं तिथे मोगराच मोगरा. “टनावारी मोगरा येतो. पाच टन, सहा टन, सात टन. एक दिवस तर दहा टन माल आला!” यातला बहुतेक माल अत्तरांच्या कारखान्यांनी उचलला.

हार किंवा माळांसाठी फुलांना ३०० रुपये किलोहून जास्त भाव मिळतो. “पण फुलांचा बहार असला की आम्हाला कशीबशी किलोभर फुलं मिळतात. आवक मंदावते आणि भाव वाढतात. मागणी जोरावर असली आणि माझ्याकडे फक्त १० किलो फूल असेल तर मला एका दिवसात १५,००० रुपये मिळतात. आता ही भारीच कमाई म्हणायची की नाही?” ते खेदाने हसतात. मिचमिचे डोळे, तोंडभर हसू. म्हणतात, “मग काय, नुसत्या खुर्च्या मांडायच्या. भरपेट जेवायचं आणि नुसतं एका जागी बसून तुम्हाला मुलाखती द्यायला मी मोकळा!”

खरी परिस्थिती अशी आहे की यातलं काहीही ते करू शकत नाही. तेही नाहीत आणि त्यांची पत्नीही नाही. कारण त्यांच्यापुढे कामाचा डोंगर उभा असतो. ही सुगंधी फुलं पदरात पडावी यासाठी धरणीमाईला खूश ठेवावं लागतं. दीड एकरात गणपतींची पेरूची बाग आहे. “आज सकाळीच मी पन्नास किलो पेरू बाजारात नेलाय. २० रुपये किलोने खरेदी करतायत. जायचा यायचा खर्च वगळला तर ८०० रुपये हातात आलेत. या भागात पूर्वी पेरू इतका काही मिळायचा नाही तेव्हा व्यापारी इथे बागेत येऊन पेरू तोडून घेऊन जायचे. किलोला २५ रुपये भाव होता. ते दिवस आता गेले...”

रोपं आणि एकरभर रानाची मशागत करण्यासाठी गणपती यांना लाखभराची गुंतवणूक करावी लागते. इतकं भांडवल घातल्यावर त्यांना रोपांपासून पुढची किमान दहा वर्षं फुलं मिळतात. दर वर्षी मोगऱ्याचा बहार आठ महिने असतो, शक्यतो मार्च ते नोव्हेंबरदरम्यान. आणि ते सांगतात त्याप्रमाणे यातही चांगले दिवस असतात, भारी दिवस असतात आणि अर्थातच असाही काळ येतोच जेव्हा बिलकुल कळ्या नसतात. सरासरी पाहिलं तर फुलाच्या हंगामात एका एकरातून अंदाजे तीस हजाराचा नफा मिळू शकतो.

हे बोलणं ऐकलं तर जरा जास्तच सुस्थितीत असल्यासारखं वाटू शकतं. कारण बहुतेक शेतकऱ्यांप्रमाणे ते देखील घरच्यांच्या – त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या कष्टाची गणना लागवडीच्या खर्चात करतच नाहीत. तो खर्च मोजला तर मग मजुरीवरचा खर्च किती वाढेल? “माझे दिवसाचे धरा ५०० रुपये आणि माझ्या पत्नीचे ३००.” आता याप्रमाणे हिशोब केला तर त्यांचा ३०,००० रुपये नफा थेट ६,००० रुपयांपर्यंत खाली येतो.

आणि त्यासाठी सुद्धा “तुम्हाला नशिबाची साथ हवी,” ते म्हणतात. शेतातल्या मोटरीच्या शेडमध्ये आम्ही जातो तेव्हा समजतं, नशीब तर आहेच सोबत थोडी रसायनंही हवीत.

*****

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

गणपती यांच्या शेतातली मोटरीची शेड. (उजवीकडे) जमिनीवर कीटकनाशकांच्या बाटल्या आणि कॅन विखुरलेले दिसतायत

मोटरीची ही शेड म्हणजे गणपती यांच्या कुत्र्यांची दुपारी ताणून द्यायची जागा. कोपऱ्यात काही कोंबड्यासुद्धा आहेत. गेल्या गेल्या आम्हाला पहिलं काय दिसावं तर एक अंडं. गणपती खुदकन हसतात आणि हलकेच आपल्या ओंजळीत उचलून घेतात. जमिनीवर कीटकनाशकांच्या बाटल्या आणि कॅन इतस्ततः विखुरलेले आहेत. वापरलेल्या रसायनांचा कारखाना म्हणा ना. झाडाला फुलं लागावीत यासाठी हे सगळं गरजेचं आहे, गणपती शांतपणे उकलून सांगतात. “पालिचु,” मोगऱ्याच्या कळ्या जोमदार, भरघोस आणि देठ जाड व्हायचं तर नक्कीच.

“इंग्लिशमध्ये काय लिहिलंय सांगा तर,” काही कॅन माझ्यासमोर धरत गणपती मला विचारतात. मी एकेकाची नावं वाचून सांगते. “हे लाल उवा मारतं, ते अळ्यांसाठी. आणि याने तर सगळीच कीड मरते. मोगऱ्यावर इतकी कीड येते काय सांगायचं,” तक्रारीच्या स्वरात ते म्हणतात.

गणपती यांचा मुलगा त्यांचा सल्लागार आहे. “तो एका ‘मारुंदु कडइ’ म्हणजे कीटकनाशकांच्या दुकानात कामाला आहे,” ते म्हणतात आणि मोगऱ्यासारख्या लख्ख उन्हात बाहेर पडतात. कुत्र्याचं एक पिल्लू चिखलात लोळत असतं. पांढरे केस हळू हळू लाल होऊन जातात. शेडच्या आसपास एक विटकरी कुत्रं भिरभिरत असतं. “काय म्हणता त्यांना,” मी विचारते. “कारुप्पु म्हटलं की सगळे धावत येतात,” ते हसत सांगतात. तमिळमध्ये कारुप्पु म्हणजे काळा. कुत्री काळी नाहीत, मी म्हणते.

“तरीही ते येतात,” असं म्हणत गणपती परत एका मोठ्या शेडमध्ये शिरतात. तिथे नारळांचा ढीग रचलेला दिसतो आणि एका बादलीत पिक्के पेरू. “गायीला घातले की खाईल ती. आता रानात सोडलंय चरायला.” तिथेच काही गावठी कोंबड्या दाणे वेचतयात आणि पळापळी करतायत.

त्यानंतर ते मला खतं दाखवतात. मोठ्याशा पांढऱ्या बादलीतली दुकानातून विकत आणलेली ८०० रुपयांची ‘सॉइल कंडिशनर्स’, शिवाय दाणेदार स्फुरद आणि काही जैविक खतं. “मला कार्तिगइ मासम म्हणजे कार्तिक महिन्यात [१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर] फुलं यायला हवी आहेत. तेव्हा लगीन सराई असते त्यामुळे फुलांना भाव चांगला मिळतो.” घराबाहेरच्या ग्रॅनाइटच्या खांबाला रेलून हसत ते मला चांगल्या शेतीचं गुपित सांगतात, “तुम्ही त्या झाडाचा आदर करायला हवा. मग तेही तुमचा आदर करतं.”

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

गणपती आणि अंगणातली त्यांची दोन कुत्री – दोघांनाही कारुप्पुच म्हणतात. उजवीकडेः अन्न चिवडणारी कोंबडी

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः खताचा कॅन. उजवीकडेः मोगऱ्याच्या झाडावर कीड कुठे येते ते गणपती दाखवतायत

गणपती उत्तम कथनकार आहेत. त्यांचं शेत म्हणजे जणू काही रोज नव्या नाटकाचा प्रयोग. “काल रात्री ९.४५ वाजले होते, तिकडून चार डुकरं आली. कारुप्पु इथेच होता. त्याला ती डुकरं दिसली. पेरूच्या वासाने आली होती ती. त्याने तिघांना हुसकून लावलं आणि एक जण तिकडे त्या दिशेने पळून गेलं,” मला सांगता सांगता त्यांच्या हाताने ते मुख्य रस्ता, आणि सभोवताली असलेल्या माळाकडे निर्देश करतात. “काय करणार? पूर्वी शिकार करणारे कोल्हे होते इथे. आता नाहीत.”

डुकरांचा त्रास आहे तसाच किडीचाही आहे. मोगऱ्याच्या मळ्यात फिरत असताना नवा बहर आला की कीड कशी झपाट्याने त्याच्यावर हल्ला करते ते गणपतींकडून ऐकावं. त्यानंतर ते गोलात आणि चौकोनात लागवड कशी करायची तेही हातानेच समजावून सांगतात. काही मोत्यासारखी टपोरी फुलं मला देतात. त्यांचा वास घेत असतानाच ते अगदी ठामपणे म्हणतात, “मदुरई मल्लीचा सुगंध सर्वोत्तम आहे.”

खरंय. भरून राहतो, धुंद करतो तो वास. त्यांच्या शेतात, विटकरी रंगाच्या त्या मातीत, विहिरीपाशी, मातीतत करकर चपला वाजवत फिरणं, त्यांच्या शेतीविषयी बोलण्यातून पदोपदी जाणवणारं त्यांचं सखोल ज्ञान समजून घेणं, आपल्या पत्नीविषयी, पिचइयम्मांबद्दल त्यांच्या बोलण्यातला आदर पाहणं हे आपलं भाग्य असल्याची भावना दाटून येते. “आम्ही काही कुणी मोठे जमीनदार नाही. आम्ही चिन्न संसारी [छोटे शेतकरी] आहोत. नुसतं बसून लोकांना ऑर्डर सोडणारे आम्ही नाही. माझी बायको मजुरांसोबत स्वतः काम करते. आमचं जगणं असंय, कळलं?”

*****

या भूमीत मोगरा किमान २,००० वर्षं फुलतोय. त्याचा इतिहासही विलक्षण आहे. तमिळ इतिहासाशी त्याचं नातं माळेतल्या धाग्यासारखं गुंफलेलं आहे. संगम साहित्यात मुल्लईचा (मोगऱ्याचं त्या काळातलं नाव) किमान १०० वेळा तरी संदर्भ येतो. मोगऱ्यासोबत इतरही अनेक फुलांच्या जातींचा या साहित्यात उल्लेख असल्याचं हवाई स्थित तमिळ भाषातज्ज्ञ आणि अनुवादक असलेल्या वैदेही हर्बर्ट सांगतात. इ.स. पूर्व ३०० ते इ. स. २५० या संगम काळातल्या सर्व अठरा पुस्तकांचा त्यांनी इंग्रजी अनुवाद केला असून हे काम कुठल्याही शुल्काशिवाय ऑनलाइन सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.

आज मल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलाचं नाव पूर्वी मुल्लइ होतं आणि त्यानंतर मल्लिगई झालं. संगम काव्यामध्ये या प्रांतातल्या पाच आकम तिन्नइ म्हणजेच नैसर्गिक प्रदेशांपैकी एकाचं नाव आहे. मल्ली म्हणजे जंगल आणि भोवतीचा परिसर. इतर चारांची नावंही फुलं किंवा झाडांवरून पडलेली आहेत – कुरिंजी (डोंगर), मरुतम (शेत), नेयतल (समुद्रकिनारा) आणि पालइ (माळरान).

PHOTO • M. Palani Kumar

मदुरई जिल्ह्याच्या उसिलमपट्टी तालुक्यातल्या नादमुदलइकुलम पाड्यावरच्या पांडींच्या शेतातल्या मोगऱ्याच्या कळ्या आणि फुलं

आपल्या ब्लॉगमध्ये वैदेही म्हणतात की संगम काळातील लेखकांनी “काव्याचा प्रभाव वाढण्यासाठी आकम तिनईंचा वापर केलेला दिसतो.” त्या प्रतिमा आणि उपमा पाहिल्या तर लक्षात येतं की “त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातल्या आहेत. कवितांमधल्या पात्रांच्या भाव-भावना, स्वभाव, शारीरिक गुणांचं वर्णन करताना इथली झाडं-झुडुपं, प्राणी आणि निसर्गाचा पुरेपूर वापर केला आहे.” मुल्लई प्रदेशातल्या कविता पाहिल्या तर त्याच्या गाभ्याशी असलेली संकल्पना आहे “धीर धरून वाट पाहणे.” या कवितांमधल्या नायिका आपलं माणूस प्रवासाहून कधी परत येईल याची अगदी धीराने वाट पाहतायत.

२,००० वर्षांहून जास्त जुन्या या ऐनकुरुनूरु कवितेमध्ये एक पुरुषाला आपल्या प्रेयसीच्या देखणेपणाची आस लागलीये.

मोर तुझ्यासारखा नाचतो
आणि मोगरा सुगंधाने दरवळतो
तुझ्या भाळाचा सुवास
तुझ्यासारखा हलकेच नजर टाकणारा तो श्वान
तुझ्या विचारात गुंग मी घराची वाट धरतो
पावसाळी ढगाहूनही जलद, माझे राणी

संगम काळातील काव्याचे अनुवादक आणि OldTamilPoetry.com ही वेबसाइट चालवणारे चेंतिल नाथन मला आणखी काही ओळी शोधून देतात. संगम साहित्यात सात थोरांचा उल्लेख येतो. त्यातले एक म्हणजे परी. लोकस्मृतीवर त्यांचं नाव आजही कोरलेलं आहे. ही कविता खूप मोठी आहे, चेंतिल सांगतात. पण या चार ओळी फार सुंदर आहेत. आणि विषयाशी संबंधितसुद्धा.

दिगंतात कीर्ती पसरलेल्या परीने
घंटांनी सजलेला आपला रथ कुणा देऊ केला
कसला आधार न घेता फुलणाऱ्या एका मोगऱ्याच्या वेलाला
जो कधीच गाणार नाही स्तुतीगीतं परीची

पुरणानूरु २००, पंक्ती ९-१२

तमिळ नाडूमध्ये मोगऱ्याच्या ज्या वाणाची शेती होते त्याचं शास्त्रीय नाव आहे Jasminum sambac. खुडलेल्या फुलांच्या (फांदी आणि पानासकट तोडलेल्या नाही) उत्पादनात तमिळ नाडू पहिल्या क्रमांकावर आहे. मोगऱ्याचं उत्पादन लक्षात घेतलं तर तमिळ नाडूला दुसऱ्या कुठल्याच राज्याची स्पर्धा नाही. भारतातलं एकूण उत्पादन २ लाख ४० हजार टन असून त्यातला १ लाख ८० हजार टन मोगरा एकट्या तमिळ नाडूत फुलतो.

मदुरई मल्लीला भौगोलिक चिन्हांकन मिळालं आहे. आणि या फुलाची अनेक विशेष वैशिष्ट्यं आहेत. ‘मोहक सुगंध, जाड पाकळ्या, मोठं देठ, कळ्या उशीरा उमलणं, कळ्यांचा रंग जास्त दिवस टिकून राहणं,’ असे या फुलाचे गुण आहेत.

PHOTO • M. Palani Kumar

मोगऱ्याच्या फुलावर बसून मध चाखणारं फुलपाखरू

मोगऱ्याच्या इतर जातींची नावंही फार रंजक आहेत. गुंडु मल्ली, नम्म ऊरु मल्ली, अंबु मल्ली, रंबणम, मदनबाणम, इरुवच्ची, इरुवच्चीप्पू, कस्तुरी मल्ली, ऊसी मल्ली आणि सिंगल मोगरा.

मदुरई मल्लीच्या नावात मदुरई असलं तरी या फुलाची लागवड फक्त मदुरईपुरती नसून आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये ती होते. विरुधुनगर, तेनी, दिंडिगल आणि सिवगंगई. सगळ्या फूल लागवडीखालचं क्षेत्र पाहिलं तर ते तमिळ नाडूच्या पिकाखाली येणाऱ्या एकूण जमिनीच्या २.८ टक्के इतकं आहे. आणि यामध्ये ४० टक्के वाटा एकट्या मोगऱ्याचा आहे.

आता कागदावर हे सगळे आकडे एकदम भारी वाटत असले तरी प्रत्यक्षात भाव इतके वर खाली होतात की शेतकऱ्याचं कंबरडंच मोडावं. वर खाली म्हणजे वेड लागावं इतके. अगदी कमीत कमी म्हटलं तर निलकोट्टई बाजारात सेंटसाठी मिळणारा १२० रुपये किलो भाव एकीकडे तर मट्टुतवणी फूल बाजारात मिळालेला (सप्टेंबर २०२२ आणि डिसेंबर २०२१) ३,००० ते ४,००० रुपये किलो हा गगनचुंबी भाव दुसरीकडे. आता हा आकडाही अजब आणि अवचित मिळणाराच.

*****

फुलाची शेती म्हणजे नशिबाचा खेळ आहे. आणि वेळेचा. “सणाच्या काळात तुमच्या झाडांना फुलं असली तर तुमच्या हातात पैसा खुळखुळणार. नाही तर मग हा व्यवसाय चालू ठेवायचा का नाही याचा तुमची मुलं विचार करणार. खरंय की नाही? आई-बापाला फक्त त्रासच होताना पाहतायत ना ते?” गणपती आमच्या प्रतिसादाची फारशी वाट पाहत नाहीत. “एखादा छोटा शेतकरी बड्या शेतकऱ्याशी स्पर्धाच करू शकत नाही. एखाद्याचं मोठं रान आहे, त्याला ५० किलो फूल खुडायचंय तर ते मजुरांना १० रुपये जास्त देतात, आणायला वाहन पाठवतात आणि नाश्तासुद्धा देतात. आम्हाला जमणारे का ते?”

इतर छोट्या शेतकऱ्यांप्रमाणे गणपतींनाही बड्या व्यापाऱ्यांचाच आधार वाटतो. “जेव्हा फुलं एकदम बहरात असतात तेव्हा मी अगद सकाळ-दुपार-संध्याकाळ फुलांच्या गोण्या घेऊन बाजारात जात असतो. माझा माल विकायला मला व्यापारी पाहिजेत ना,” गणपती म्हणतात. एक रुपयाचा मोगरा विकला गेला तर त्यातले १० पैसे व्यापाऱ्याचं कमिशन असतं.

पाच वर्षांपूर्वी गणपती यांनी मदुरईचे एक फूल व्यापारी पूकडई रामचंद्रन यांच्याकडून काही लाखांचं कर्ज घेतलं होतं. रामचंद्रन मदुरई फ्लॉवर मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. फुलं विकूनच त्यांनी त्यांचे पैसे फेडले. अशा व्यवहारांमध्ये कमिशनचा दर जास्त असतो, १० ते १२.५ टक्के.

छोटे शेतकरी कीटकनाशकं वगैरे विकत घेण्यासाठीसुद्धा छोटी छोटी कर्जं घेत असतात. रोप आणि किडींचा झगडा तर कायमच सुरू असतो. कसंय अगदी नाचणीसारखं कीड न लागणारं काटक पीकसुद्धा हत्तीच्या पायदळी जाऊ शकतं. आणि मग नाचणी वाचवण्यासाठी शेतकरीच त्यांच्या सुपीक डोक्यातून नामी युक्त्या शोधून काढत असतात. दर वेळी त्यांना त्यात यश येतंच असं नाही. अनेक शेतकरी या कारणामुळेदेखील फूलशेतीकडे वळले आहेत. मदुरईसारख्या फूलशेतीच्या प्रदेशात लढाई असते अगदी छोट्या शत्रूंशी. कळ्यांवर येणाऱ्या अळ्या, माश्या, पानांवरच्या घरटे अळ्या आणि किडींमुळे फुलं फिकुटतात आणि लाल होतात, रोपांनर रोग येतो आणि शेतकऱ्यांच्या पदरी घाटा.

PHOTO • M. Palani Kumar

मदुरई जिल्ह्याच्या तिरुमल गावी चिन्नामा आपल्या मोगऱ्याच्या बागेत काम करतायत. सध्या खूप कीड आली आहे

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

फुलं खुडायचं काम सान थोर सगळेच करतात. उजवीकडेः तिरुमल गावी मोगऱ्यांच्या मळ्यांशेजारीच कबड्डीचा डाव रंगलाय

गणपतींच्या घरून गाडीवर थोडं अंतर गेल्यावर एक शेत दिसतं. किडीने पुरतं नुकसान झालं आहे. शेताचंच नाही तर स्वप्नांचंसुद्धा. हा मोगऱ्याचा मळा पन्नाशीच्या आर. चिन्नामा आणि त्यांचे पती रामार यांचा आहे. मळ्यातली दोन वर्षांची मोगऱ्याची झाडं फुलांनी लखडली आहेत. पण चिन्नामा म्हणतात, ही सगळी फुलं “खालच्या दर्जाची आहेत त्यामुळे त्याला भाव कमी मिळणार.” च्च च्च म्हणत मानेने नापसंती दाखवत त्या सांगतात की फुलांवर रोग आलाय. “ही फुलं फुलायची नाहीत. वाढणार पण नाहीत.”

असं असलं तरी कामातले कष्ट मात्र अविरत सुरू आहेत. म्हाताऱ्या बाया, लहानगी लेकरं, कॉलेजला जाणाऱ्या मुली सगळे जण फुलं खुडतायत. चिन्नामा आमच्याशी बोलत असताना हाताने फुलं खुडत राहतात. हलकेच फांदी हलवायची, कळ्या पाहून झटक्यात खुडायच्या आणि कंडंगी पद्धतीने नेसलेल्या साडीच्या ओच्यात टाकायच्या. त्यांचे पती रामार यांनी मळ्यात अनेक कीटकनाशकं वापरून पाहिली. “त्यांनी भारी भारी औषधं मारली. साधीसुधी नाही. लिटरला ४५० रुपये किंमत होती. पण काही फायदा नाही. इतकं झालं की शेवटी दुकानदारच त्यांना म्हणाला की आता सोडून द्या, कशाला पैसा वाया घालवताय!” शेवटी रामार चिन्नामांना म्हणाले, “रोपं टाका उपटून. दीड लाखाला बांबू बसलाय.”

म्हणूनच रामार मळ्यात नव्हते. चिन्नामा म्हणतात. “वायितेरिचाल,” त्या सांगतात. तमिळमध्ये याचा शब्दशः अर्थ पोटात आग पडणे असा आहे. त्यामध्ये कडवटपणा, हेवा अशा अर्थछटाही सापडतात. “इतर लोकांना किलोभर मोगऱ्याला ६०० रुपये मिळणार आणि आम्हाला १००.” त्यांचा राग मोगऱ्याच्या झाडावर मात्र नाही. कळ्या खुडत असताना त्या फांद्या हलक्या हाताने हलवतात आणि अगद थोड्या वाकवून खालच्या कळ्या खुडून घेतात. “चांगला बहर असला तर आम्हाला एका मोठ्या झाडाच्या कळ्या खुडायला किती तरी मिनिटं लागतात...” असं म्हणत त्या दुसऱ्या झाडाकडे वळतात.

किती फूल येणार हे अनेक घटकांवर अवलंबून असतं, गणपती सांगतात. हातातला पंचा खांद्यावर टाकत ते चिन्नामाच्या शेतात काम करू लागतात. “माती, झाडाची वाढ आणि शेतकऱ्याचं कौशल्य यावर सगळा खेळ आहे. छोट्या बाळाप्रमाणे रोपांना जपावं लागतं.”

बरेचसे रोग आणि किडी रसायनांची मिश्रणं वापरून ठीक होतात. नैसर्गिक किंवा जैविक पद्धतीने मोगऱ्याची लागवड करण्याचा विषय काढल्यावर त्यांचं जे उत्तर येतं ते म्हणजे सगळ्या छोट्या शेतकऱ्यांच्या मनातलं द्वंद्व आहे. “अर्थात करू शकता. पण त्यातही जोखीम आहेच. मी जैविक शेतीच्या प्रशिक्षणाला गेलो होतो,” गणपती म्हणतात. “पण त्याला जास्त भाव देणारे का कुणी?” त्यांचा एकदम तिखट सवाल येतो.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः मोगऱ्याचं एक वठलेलं झाड आणि त्याच्याभोवतीची चांगली रोपं. उजवीकडेः दुरडीत मोगऱ्याच्या कळ्या आणि प्रत्येकाने किती कळ्या खुडल्या हे मोजण्यासाठी वापरलं जाणारं पाडी हे मापटं. यावरूनच त्यांच्या मजुरीचा हिशोब केला जातो

PHOTO • M. Palani Kumar

मोगरा खुडणारे काही, यात जमीनमालकही आहेत आणि मजूरही. गप्पा मारत, गाणी ऐकत कळ्या फुलायच्या आत बाजारात कशा पोचतील यासाठी धडपड करतायत

“रासायनिक खतं वापरणं सोपं आहे, त्यातनं फुलं जास्त मिळतात. सोपं जातं. जैविक खतं वापरायची – तर सांडलवंड होते, काय काय वनस्पती भिजवा, अर्क तयार करा, फवारा. आणि इतकं सगळं करून बाजारात फुलं नेल्यावर भावात काही फरक पडतो का? शून्य! खरं तर नैसर्गिकरित्या वाढवलेला मोगरा टपोरा आणि पांढरा शुभ्र असतो. त्याला चांगला, खरं तर दुप्पट भाव मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर इतका वेळ घालणं, मेहनत करणं कामाचं नाही.”

ते घरच्यासाठी जैविक पद्धतीने भाजीपाला पिकवतात. “फक्त आमच्यासाठी आणि आमची लेक शेजारच्या गावात राहते, तिच्यासाठी. मलासुद्धा ही रसायनं वगैरे वापरणं कमी करायचंय. त्याचे खूप दुष्परिणाम आहेत असं म्हणतात. आता इतक्या उग्र कीटकनाशकांच्या सारखं संपर्कात आल्यावर तब्येतीवर तर परिणाम होणारच नाही. पण पर्याय काय आहे?”

*****

गणपतींच्या पत्नी पिचइयम्मा यांच्याकडेही दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. त्या दिवसभर राबत असतात. दररोज. आणि या सगळ्यावरचा त्यांचा उतारा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तरळत असणारं, कधीच न उतरणारं खुलं हसू. २०२२ साली ऑगस्ट महिना संपत आला होता. त्यांची भेट घेण्याची पारीची ही दुसरी वेळ. अंगणात लिंबाच्या गार सावलीत खाटेवर बसलेल्या पिचइयम्मा आम्हाला दिवसभरात त्या काय काय कामं करतात ते सांगतात.

“आड पाक, माड पाक, मल्लिगपु तोट्टम पाक, पूव पाक, समइक, पुल्लइगाल, अन्नपिविड [शेळ्या चारा, गुरांचं करा, मोगऱ्याच्या मळ्याकडे बघा, कळ्या खुडा, स्वयंपाक आणि पोरं शाळेला धाडा....].” एका श्वासात सांगता येणार नाही अशी मोठी यादीच असते ती.

आणि हे सगळे काबाडकष्ट कुणासाठी तर आपल्या लेकरांसाठी असल्याचं ४५ वर्षीय पिचइयम्मा सांगतात. “आमचा मुलगा आणि मुलगी दोघंही चांगले शिकलेत. दोघांनीही पदवी मिळवलीये.” त्या स्वतः कधीच शाळेत गेल्या नाहीयेत. अगदी लहानपणापासून त्यांनी आधी माहेरच्या शेतात आणि आता स्वतःच्या शेतात कष्टच केलेत. नाकात आणि कानात दागिने आणि गळ्यात हळदीने पिवळं केलेलं ताली म्हणजे मंगळसूत्र.

आम्ही ज्या दिवशी त्यांना भेटलो त्या दिवशी मोगऱ्याचं रान खुरपून काढत होत्या. हे काम म्हणजे शिक्षाच – पूर्ण वेळ खाली वाकायचं, उन्हाच्या कारात एकेक पाऊल पुढे सरकत खुरपायचं काम वाटतं तितकं सोपं नाही. पण आता त्यांच्या मनात एकच विचार आहे, तो म्हणजे त्यांच्या पाहुण्यांनी काही तरी खावं हा. “घ्या ना, काही तरी घ्या,” त्या म्हणतात. गणपती आमच्यासाठी एकदम ताजे आणि गोड पेरू घेऊन येतात. आणि शहाळ्याचं पाणी. या सगळ्याचा आस्वाद घेत असताना ते आम्हाला सांगतात शिकलेली तरुण मंडळी आता गावं सोडून शहरात गेलेली आहेत. इथल्या जमिनीला एकरी १० लाख भाव मिळतोय. मेन रोडला लागून असेल तर हाच भाव चौपट होतो. “मग काय घरांसाठी प्लॉट पाडून जमिनी विकल्या जातात.”

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

रानातल्या महिला मजुरासोबत खुरपणी करता करता तसंच इतर कामं सुरू असताना पिचइयम्मा मला त्यांचा दिवस कसा असतो ते सांगतात

ज्यांची स्वतःच्या मालकीची जमीन आहे त्यांनाही घरच्यांच्या ‘बिनमोल’ श्रमाशिवाय नफा मिळण्याची शाश्वती नसते. आणि यातही स्त्रियांच्या श्रमाचा वाटा सर्वाधिक असल्याचं गणपती कबूल करतात. हेच सगळं काम तुम्ही दुसऱ्याच्या शेतात केलं तर तुम्हाला किती मजुरी मिळेल, मी पिचइयम्मांना विचारते. “३०० रुपये,” त्या सांगतात. आणि यात अर्थातच घरचं, जनावरांचं काम धरलेलं नाही हे सांगायलाच नको.

“म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे किमान १५ हजार रुपये वाचवताय असं म्हटलं तर ते चुकीचं नाही ना?” मी विचारते आणि त्याही लगेच हो म्हणतात. गणपतींनाही हे मान्य आहे. आणि क्षणात मी म्हणून जाते की मग त्यांना तेवढे पैसे मिळायला हवेत. सगळे हसू लागतात. पिचइयम्मा सर्वात जास्त.

आणि मग हलके हसत माझ्याकडे रोखून पाहत त्या मला माझ्या मुलीबद्दल विचारतात आणि हेही की तिच्या लग्नात मला किती सोनं द्यावं लागेल. “आमच्या इथे आम्ही ५० सावरन (४० तोळे) देतो. आणि मग बाळ झालं की सोन्याची साखळी आणि चांदीचे पैंजण. कान टोचण्याच्या दिवशी बकरं असतं. सगळं आमच्या कमाईतूनच. आता असं असताना मी पगार घ्यायचा? शक्य आहे का?”

*****

मोगऱ्याची शेती करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याची त्या दिवशी संध्याकाळी भेट होते. त्याचं म्हणणं होतं की शेतीसोबत असा एक पगार मिळाला तर चांगलंच, खरं तर गरजेचंच आहे. सहा वर्षांपूर्वी मदुरईच्या उसिलमपट्टी तालुक्यातल्या नादमुदलइकुलममधल्या भातशेती करणाऱ्या जयबल आणि पोदुमणी या शेतकऱ्यांचंही अगदी हेच म्हणणं असल्याचं मला आठवतं. ऑगस्ट २०२२ मध्ये मी पुन्हा एकदा जयबल यांना भेटते. ते त्यांचे लहानपणापासूनचे मित्र आणि मोगऱ्याचे शेतकरी एम. पांडी यांच्याशी माझी गाठ घालून देतात. पांडींनी अर्थशास्त्रात एमए केलं असून तमिळ नाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (टास्मॅक) मध्ये पूर्णवेळ नोकरी करतात. भारतीय बनावटीची विदेशी दारू विकण्याचे हक्क राज्यात केवळ याच कंपनीकडे आहेत.

पांडी, वय ४० काही आधीपासून शेती करत नव्हते. गावापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या शेताकडे जाता जाता ते मला त्यांची कहाणी सांगतात. सभोवताली मैलोनमैल हिरवाई, तळी, ओढे आणि पांढरा शुभ्र मोगरा.

PHOTO • M. Palani Kumar

निसर्ग सौदर्याने नटलेल्या नादमुदलइकुलममधल्या आपल्या मोगऱ्याच्या शेतात उभे असलेले पांडी. इथे अनेक शेतकरी भातशेतीही करतात

“शिक्षण पूर्ण केल्यावर लगेच, १८ वर्षांपूर्वी मी टॅस्मॅकमध्ये रुजू झालो. आजही मी तिथे नोकरी करतो आणि सकाळी मोगऱ्याचं शेत पाहतो.” २०१६ साली अण्णा द्रमुकच्या प्रमुख आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी टॅस्मॅकमधली कामाची पाळी १२ तासांवरून १० तास केली. जयललितांविषयी बोलताना पांडी न चुकता ‘मांबुमिगु पुरच्ची तलैवी अम्मा अवरगल’ (थोर क्रांतीकारी नेत्या अम्मा) अशी उपाधी वापरतात. अम्मांचा उल्लेख करताना आदरभाव व्यक्त करणारी आणि अधिकृतरित्या वापरलं जाणारी ही उपाधी आहे. त्यांच्या या निर्णयाने पांडींना कामावर १२ वाजता पोचायचं असल्याने सकाळी थोडा मोकळा वेळ मिळू लागला. सकाळचे वाचलेले दोन तास पांडी आपल्या शेतात काम करण्यासाठी वापरू लागले.

पांडी या दोन्ही कामांबद्दल अतिशय स्पष्टपणे आणि ठामपणे बोलतात. बोलता बोलता मोगऱ्यावर कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. “कसंय, मी स्वतः एक कर्मचारी आहे आणि इथे माझ्या हाताखाली १० कामगार आहेत.” त्यांच्या आवाजाला संयत अभिमानाची किनार आहे. आणि वास्तवाचीही. “पण आजकाल तुमची स्वतःची जमीन असेल तरच तुम्ही शेती करू शकता. कीटकनाशकांच्या किंमती शेकड्यात, हजारात चालल्या आहेत. मला पगार मिळतो म्हणून मी सगळं काही करू शकतो. नाही तर शेती महा कठीण झालीये.”

मोगऱ्याची शेती तर आणखीच अवघड असल्याचं ते म्हणतात. शिवाय तुमचं सगळं आयुष्यच या झाडांच्या गतीप्रमाणे ठरत असतं. “सकाळी तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊच शकत नाही, कारण याच वेळात कळ्या खुडून बाजारात न्याव्या लागतात. शिवाय, आज काय तुम्हाला एक किलो फूल मिळालंय, पुढच्या आठवड्यात ५० किलो निघेल. सगळ्याची तयारी ठेवावी लागते!”

पांडी त्यांच्या एकरभर रानात मोगऱ्याची शेती करतात. एकेक करत त्यांनी रोपांची संख्या वाढवत नेली आहे. शेतकऱ्याचे किती तरी तास या मोगऱ्याच्या रोपांची काळजी घेण्यात जातात. ते म्हणतात, “मी कामावरून मध्यरात्री परत येतो. पहाटे पाच वाजता उठून शेतात यावंच लागतं. माझी बायको मुलांना शाळेत पाठवून इथे शेतात येते. आम्ही आळस करत अंथरुणात निजून राहिलो तर चालेल का? मला काही तरी यश मिळेल का? आणि मग मी या १० माणसांना काम देऊ शकेन का?”

जर अख्खा एकरभर मोगरा फुलला असेल तर, “तुम्हाला २०-३० मजूर लागतात,” पांडी सांगतात. सकाळी ६ ते १० असे चार तासाच्या कामाचे प्रत्येकाला १५० रुपये मिळतात. आणि बहार संपत आला असेल, किलोभरच फूल निघणार असेल तर पांडी, त्यांची बायको सिवगामी आणि दोन मुलंच कळ्या खुडतात. “इतर भागात मजुरी जरा कमी आहे. पण हा सगळा सुपीक भाग आहे. भाताची शेतीदेखील पुष्कळ आहे. त्यामुळे मजुरांना मोठी मागणी असते. त्यांना चांगली मजुरी द्यावी लागते. शिवाय चहा, वडइ...”

उन्हाळ्यात (एप्रिल आणि मे) मोगरा चांगलाच बहरात असतो. “अगदी ४०-५० किलो फूल मिळू शकतं. पूर्वी किंमती फारच कमी असायच्या. कधी कधी तर अगदी ७० रुपये किलो. पण आता भगवंताच्या कृपेने सेंटच्या कंपन्यांनी भाव वाढवलेत. २२० रुपये किलो दराने ते मोगरा घेतायत.” बाजारात टनाने फूल येतं तेव्हा याहून अधिक भाव मिळत नाही. आणि पांडींच्या मते, इतका भाव मिळाला तरी ठीक आहे. ना नफा, ना तोटा.

PHOTO • M. Palani Kumar

पांडी आपल्या शेतातल्या मोगऱ्यावर खतं आणि कीटकनाशकं फवारतायत

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

गणपती रोपांमधून चालत चाललेत. उजवीकडेः पिचइयम्मा आपल्या घरासमोर

ते आपला माल इथून ३० किलोमीटरवरच्या दिंडिगल जिल्ह्यातल्या नीलकोट्टई बाजारात घेऊन जातात. “मट्टतवनीमध्येही चांगलंच आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. इथे किलोवर फूल विकत घेतात. निलकोट्टईमध्ये गोणीवर माल जातो. शिवाय व्यापारी तिथे शेजारीच बसलेला असतो. त्याचं लक्ष असतं. कधी अचानक काही गरज लागली, खर्च आला, सण समारंभ आहे किंवा फुलावर औषध मारायचं असलं तर तो उसने पैसेसुद्धा देतो.”

फवारणी फार महत्त्वाची असल्याचं पांडी सांगतात. शेतातल्या शेडमध्ये कपडे बदलून आखूड विजार आणि पट्टयापट्ट्याचा टी शर्ट घालून येतात. मोगरा सगळ्यांनाच आवडतो. गणपतींचा मुलगा स्वतःच या विषयातला तज्ज्ञ आहे. पांडींना मात्र दुकानात जाऊन विशिष्ट औषधं, रसायनं आणावी लागतात. तिथे जमिनीवर रिकाम्या बाटल्या आणि कॅन पडलेले दिसतात. आणि मग शेडमधून ते एक फवारणी यंत्र आणि छोटी टाकी घेऊन येतात. रोगर (कीटकनाशक) आणि आस्था (खत) पाण्यात मिसळतात. एका वेळी एकरभर रान फवारायचं तर ५०० रुपये खर्च येतो. आणि तर ४-५ दिवसांनी अशी फवारणी करावी लागते. “फुलं अगदी बहरात असताना आणि नसतानाही फवारणी करावीच लागते. पर्याय नाही...”

पुढची किमान २५ मिनिटं ते तोंडावर फक्त एक कापडी मास्क बांधून ते झाडांवर कीटकनाशक आणि खताची फवारणी करतात. पाठीवर फावरणीची टाकी आणि फवारा हातात घेऊन दाट झाडांच्या रांगांमधून चालत चालत प्रत्येक झाडावर ते हे मिश्रण मारतात. प्रत्येक फांदी, पान आणि कळी त्या धुक्यात भिजते. त्यांची झाडं कंबरेपर्यंत येतात. आणि हा फवारा अगदी त्यांच्या तोंडापर्यंत पोचतो. फवारणी यंत्र चिक्कार आवाज करतं आणि रसायनांचा फवारा काही क्षण हवेत राहतो. पांडी शेतात चालत चालत फवारणी करत राहतात. औषध संपलं की टाकी भरायची आणि फवारणी परत सुरू.

काम झाल्यावर ते अंघोळ करून परत एकदा पांढरा सदरा आणि निळी लुंगी अशा वेषात येतात. तेव्हाच या रसायनांशी येणाऱ्या संपर्काबद्दल मी त्यांना विचारते. ते अगदी शांत स्वरात माझ्या प्रश्नाचं उत्तर देतात. “तुम्हाला जर मोगऱ्याची शेती करायची असेल तर मग जे लागेल ते सगळं करावंच लागतं. फवारणी वगैरे करायची नाही म्हटलात तर मग घरीच बसावं लागेल.”

आम्ही निघण्याच्या तयारीत असताना गणपतीदेखील अगदी हेच आम्हाला सांगतात. माझ्याकडच्या पिशवीत पेरू टाकत ते आम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा देतात आणि परत यायचं निमंत्रणही. “पुन्हा याल तेव्हा हे घर बांधून तयार झालं असेल,” मागच्या विटांचं काम पूर्ण झालेल्या, गिलावा बाकी असलेल्या घराकडे बोट दाखवत ते म्हणतात. “मग, इथेच बसून आपण मेजवानी करू.”

मोगऱ्याची शेती करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांप्रमाणे पांडी आणि गणपती यांच्या सगळ्या आशा मोगऱ्याच्या या सुंदरशा पिटुकल्या फुलावर अवलंबून आहेत. मादक, मनमोहक सुगंध असणाऱ्या या पुरातन फुलाचा धंदा जोरात पण लहरी. पाच मिनिटात अगदी हजारो रुपये आणि किती तरी किलो मदुरई मल्लीचा व्यवहार होत असतो.

ती गोष्ट पुन्हा कधी तरी.

या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्रामअंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

Aparna Karthikeyan

Aparna Karthikeyan is an independent journalist, author and Senior Fellow, PARI. Her non-fiction book 'Nine Rupees an Hour' documents the disappearing livelihoods of Tamil Nadu. She has written five books for children. Aparna lives in Chennai with her family and dogs.

Other stories by Aparna Karthikeyan
Photographs : M. Palani Kumar

M. Palani Kumar is Staff Photographer at People's Archive of Rural India. He is interested in documenting the lives of working-class women and marginalised people. Palani has received the Amplify grant in 2021, and Samyak Drishti and Photo South Asia Grant in 2020. He received the first Dayanita Singh-PARI Documentary Photography Award in 2022. Palani was also the cinematographer of ‘Kakoos' (Toilet), a Tamil-language documentary exposing the practice of manual scavenging in Tamil Nadu.

Other stories by M. Palani Kumar

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath