"आम्ही तंबूत बसलो होतो, त्यांनी येऊन तंबूच फाडून टाकला. आम्ही काही हललो नाही," म्हातारे बाजी, स्वातंत्र्य सैनिक बाजी आम्हाला सांगत होते. "मग त्यांनी जमिनीवर आणि आमच्यावर पाणी फेकायला सुरुवात केली. जेणेकरून जमीन ओली होईल आणि आम्ही तिथे बसू शकणार नाही. पण आम्ही तिथेच बसून राहिलो. नंतर जेव्हा मी पाणी प्यायला उठलो आणि खाली वाकलो, तितक्यात त्यांनी माझं डोकं जोरात आपटलं. माझं डोकं फुटलं. मला लगेच दवाखान्यात न्यायला लागलं."

बाजी मोहम्मद – आज हयात असणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातल्या देशभरात नावाजलेल्या चार-पाच स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. त्यांनी सांगितलेली कहाणी १९४२ मध्ये इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांची नाहीये. (अर्थात त्याबद्दल सांगण्यासारखंही त्यांच्याकडे पुष्कळ काही आहे) ते सांगतायत तो हल्ला पन्नास वर्षांनंतर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतरचा आहे. मी १०० जणांच्या शांतता गटाचा सदस्य म्हणून तिथे गेलो होतो. पण त्या गटाला कसलीच शांती लाभली नाही. तेव्हा जवळ जवळ सत्तरीत असणाऱ्या गांधीवादी बाजींना त्यानंतर १० दिवस हॉस्पिटलमध्ये आणि नंतरचा एक महिना डोक्याची जखम बरी होईपर्यंत वाराणसीच्या एका आश्रमात रहावं लागलं.

हा सगळा प्रसंग सांगताना त्यांच्या आवाजात संतापाचा लवलेशही नव्हता. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा बजरंग दलाविषयी आवाजात कसलाही द्वेष नव्हता. बाजी म्हणजे गोड हसणारे एक म्हातारबाबा आहेत. आणि हाडाचे गांधी भक्त. नबरंगपूरमध्ये गो हत्या बंदीची चळवळ पुढे नेणारे मुस्लिम नेते. "त्या हल्ल्यानंतर बिजू पटनायक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला झापलंच. मी त्या वयातही शांततापूर्ण आंदोलनांमध्ये सहभाग घेत होतो याची त्यांना काळजी वाटत होती. तब्बल १२ वर्षं मी त्यांचं स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन नाकारलं होतं. तेव्हाही ते येऊन मला रागावले होते."

अस्तंगत होऊ घातलेल्या एका पिढीची झगमगती झालर म्हणजे बाजी मोहम्मद. खेड्यापाड्यातल्या असंख्य भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे शिलेदार आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. जे हयात आहेत ते ८०-९० च्या उंबरठ्यावर आहेत. बाजी स्वतः नव्वदीला टेकले आहेत.

"मी तीस साली शाळेत होतो. पण मॅट्रिकच्या पलिकडे काही जमलं नाही. सदाशिव त्रिपाठी माझे गुरू. ते पुढे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. मी काँग्रेसमध्ये गेलो आणि नबरंगपूर शाखेचा अध्यक्ष झालो. (तेव्हा नबरंगपूर कोरापुटमध्ये होतं) मी २०,००० जणांना काँग्रेसचं सदस्य करून घेतलं. या सगळ्या भागात इतक्या घडामोडी घडत होत्या. तो सगळा जोश अखेर सत्याग्रहादरम्यान बाहेर पडला."

कोरापुटच्या दिशेने शेकडो सत्याग्रहींचा मोर्चा निघाला असताना बाजी मात्र वेगळ्याच दिशेने वाटचाल करत होते. "मी गांधीजींकडे गेलो. मला त्यांना पाहायचंच होतं. मग काय एक सायकल घेतली. मी आणि माझा मित्र लक्ष्मण साहू, जवळ छदाम नाही, इथनं रायपूरला गेलो. अंतर तब्बल ३५० किलोमीटर. सगळा डोंगरदऱ्यांचा रस्ता. तिथून आम्ही रेल्वेने वर्ध्याला गेलो आणि मग तिथनं सेवाग्रामला. तिथे आश्रमात खूप दिग्गज मंडळी होती. आम्ही बावरून गेलो आणि जरा काळजीतच पडलो. आम्ही त्यांना भेटू तरी शकणार का? लोक आम्हाला म्हणायचे, 'महादेव देसाई त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांना विचारा'."

"देसाईंनी आम्हाला सल्ला दिला. 'गांधीजी संध्याकाळी ५ वाजता पायी फेरी मारतात. तेव्हा त्यांच्याशी बोला'. 'हे बरं झालं, जरा आरामात भेटता येईल!' मी मनात विचार करत होतो. पण काय भरभर चालायचे ते, विचारू नका. त्यांना गाठणं काही आम्हाला जमेना. अखेर मी त्यांना म्हणालो, 'कृपा करून जरा थांबा. मी पार ओडिशाहून केवळ तुमचं दर्शन घेण्याकरता आलो आहे'."

"त्यांनी खोचकपणे मला विचारलं, 'मग काय पाहिलं तुम्ही? मी पण एक मनुष्य प्राणीच आहे, दोन हात, दोन पाय, दोन डोळे... तुम्ही ओडिशामधले सत्याग्रही आहात का?' 'माझा तसा निश्चय आहे.' मी उत्तरलो."

"'मग जा,' गांधी म्हणाले. 'जा. लाठ्या खा. देशासाठी बलिदान द्या.' सात दिवसांनी आम्ही जेव्हा परत आलो, त्यांच्या शब्दाला जागत आम्ही तेच केलं." बाजींनी नबरंगपूर मशिदीबाहेर युद्धविरोधी आंदोलनाचा भाग म्हणून सत्याग्रह सुरू केला. "मला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि ५० रु. दंड ठोठावला गेला. त्या काळात ही काही मामुली रक्कम नव्हती."

"आणि मग हे नित्याचंच झालं. एकदा, तुरुंगामध्ये लोक पोलिसांवर हल्ला करायला आले. मी मध्ये पडलो आणि त्यांना थांबवलं. मरेंगे लेकिन मारेंगे नहीं . मी म्हणालो."

PHOTO • P. Sainath

"तुरुंगातून सुटून आल्यावर मी गांधींना पत्रातून विचारलं, 'आता पुढे काय?' त्यांचं उत्तर आलं, 'परत तुरुंगात जा.' आणि मीही त्यांचा शब्द पाळला. यावेळी चार महिने कैद. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी आम्हाला अटक केली नाही. मग मी परत गांधींना विचारलं, 'आता?' आणि ते म्हणाले, 'त्याच घोषणा घेऊन लोकांमध्ये जा.' मग आम्ही २०-३० जणांना घेऊन गावोगावी फिरायला सुरुवात केली. दर वेळी ६० किलोमीटर पायी चालायचो आम्ही. नंतर चले जाव चळवळ सुरू झाली. मग काय सगळं चित्रच पालटलं."

"२५ ऑगस्ट १९४२ रोजी आम्हाला सगळ्यांना पकडून कैदेत टाकलं होतलं. नबरंगपूरमधल्या पापरांडीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात १९ जण जागीच मरण पावले. जखमी झालेले इतर अनेक त्यानंतर बळी पडले. ३००हून अधिक जण जखमी झाले होते. कोरापुट जिल्ह्यात सुमारे १००० जणांना तुरुंगात टाकलं होतं. अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या. कोरापुटमध्ये १००हून अधिक जण शहीद झाले. इंग्रजांना न जुमानणारा कडवा आदिवासी नेता वीर लखन नायक, त्याला फासावर लटकवण्यात आलं."

आंदोलकांवर झालेल्या अत्याचारामध्ये बाजींच्या खांद्याच्या चिरफाळ्या झाल्या. "त्यानंतर मी पाच वर्षं कोरापुटच्या तुरुंगात होतो. मी तिथे लखन नायकला पाहिलं. नंतर त्याला बरहमपूरला हलवलं. तो माझ्यासमोरच्या कोठडीत होता. त्याच्या फाशीची ऑर्डर आली तेव्हा मी त्याच्यासोबतच होतो. 'तुझ्या घरच्यांना मी काय सांगू,' मी त्याला विचारलं. 'त्यांना सांग, मला कसलीही चिंता नाहीये. दुःख एकाचंच गोष्टीचं आहे की ज्यासाठी लढलो ते स्वातंत्र्य काही पहायला मिळणार नाही'."

बाजींना मात्र ते भाग्य लाभलं. स्वातंत्र्यदिनाच्या आधीच त्यांची सुटका करण्यात आली. "नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात मी प्रवेश करणार होतो." त्यांचे अनेक सहकारी, भावी मुख्यमंत्री सदाशिव त्रिपाठी, सगळे १९५२ ची स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक लढले आणि आमदार झाले. बाजी मात्र ना कधी निवडणुकीला उभे राहिले ना त्यांनी लग्न केलं.

"मला सत्ता किंवा पदाचा मोह नव्हता," ते सांगतात. "मी इतर मार्गांनीही माझं योगदान देऊ शकतो हे मला पुरेपूर माहित होतं. गांधींच्या मनात होतं तसं." पुढची अनेक वर्षं ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. "पण आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी आता न-पक्ष आहे," बाजी स्पष्ट करतात.

पण असं असलं तरी जनहिताच्या कोणत्याही कामामध्ये भाग घेणं त्यांनी थांबवलं नाही. "१९५६ मध्ये विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत मी भाग घेतला." जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनांनाही त्यांचा सक्रीय पाठिंबा होता. "१९५० च्या सुमारास दोनदा ते इथे मुक्कामी आले होते." काँग्रेसने दोन वेळा त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली. "मी सत्ता दलापेक्षा सेवा दलात रमणारा कार्यकर्ता होतो."

"गांधीजींची भेट हेच माझ्या लढ्याचं सर्वात मोठं बक्षीस. अजून काय पाहिजे हो?" स्वातंत्र्य सैनिक बाजी मोहम्मद सांगतात. गांधीजींच्या काही प्रसिद्ध आंदोलनांमधले त्यांचे फोटो आम्हाला दाखवताना त्यांचे डोळे पाणावतात. भूदान चळवळीत आपली १४ एकर जमीन दान केल्यानंतर ह्या स्मृती हीच त्यांची खरी संपत्ती आहे. स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या काही विशेष आवडत्या, मनाच्या जवळच्या आठवणी कोणत्या असं विचारताच ते म्हणतात, "अगदी प्रत्येक प्रसंग. पण महात्म्याला भेटणं, त्यांचा आवाज ऐकणं... तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. एक राष्ट्र म्हणून आपण कसं असावं हे त्यांचं स्वप्न मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही याची सल मात्र कायम आहे."

बाजी मोहम्मद. गोड हसणारे एक म्हातारबाबा. वार्धक्याने वाकलेल्या खांद्यांवर सहजी विराजमान झालाय त्यांचा त्याग आणि समर्पण.

छायाचित्रं – पी. साईनाथ

पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, २३ ऑगस्ट २००७

या लेखमालेतील इतर लेखः

इंग्रज सरकारला अंगावर घेणारी ‘सलिहान’

पाणिमाराचं पायदळ – भाग १

पाणिमाराचं पायदळ – भाग २

लक्ष्मी पांडांचा अखेरचा लढा

शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची

गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत

सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला

कल्लियसेरीः सुमुखनच्या शोधात

कल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale