‘इथे साप वगैरे काही असतात का?’ मी इलयाराजाला विचारलं.

संध्याकाळची वेळ, खूप उशीर झाला होता, तमिळनडूच्या सिवगंगा जिल्ह्याच्या मेलाकडू गावातल्या एका शेताजवळ आम्ही उभं होतो. मी तिथे विहिरी खोदणाऱ्यांची भेट घ्यायला गेले होते – हा सगळा प्रदेश शुष्क, धूळभरला होता आणि सिंचनासाठी पाणी शोधणं हेच एक मोठं काम होतं. इलायाराजा तिथे राहायचा. तो एका खाजगी मालकीच्या शेतात अर्धवेळ आणि त्याच्या आई-वडलांच्य रानात बाकी वेळ, म्हणजेच तो दोन पाळ्यांमध्ये काम करत असे. आणि त्याचं वय आहे फक्त २३ वर्षं.

माझ्या आवाजातली चिंता जाणवली आणि इलायाराजाला हसू फुटलं. तो म्हणाला, अगदी काही दिवसांआधी, इथे ‘नागराजा’ने दर्शन दिलं होतं. इथला फेरफटका टाळावा का अशा विचारात मी उभी होते तेवढ्यात एक विजेरी घेऊन तो हजर झाला.  

‘मी येतो तुमच्यासोबत,’ त्याने मदतीचा हात पुढे केला मग आम्ही मग आम्ही चालत निघालो. विजेरीच्या प्रकाशझोतात पावलं आणि रात्रीचा गारव्यामध्ये मस्तकं. 

आमच्या त्या फेरीला पावसाचा सुवास होता. दिवसभराच्या उकाड्यानंतर पाऊस बरसला होता आणि बेडूक किंवा नाकतोडे वगळता मला फक्त इलायाराजाच्या श्वासाचा काय तो आवाज येत होता. ‘मला दम्याचा त्रास आहे,’ तो सांगतो, चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत. तो स्थलांतरित आहे – त्याच्या घरचे तो अगदी तान्हा असताना सेलमहून इथे आले – पण त्याला सिवगंगा हातावरच्या रेषांप्रमाणे नीट माहित आहे. सगळी वळणं, खाचखळगे, मोटरसायकली आणि त्या चालवणारे लोकही. ‘२३ वर्षांपूर्वी इथे जमिनी खूप स्वस्त होत्या. माझ्या आई-वडलांनी सेलममधला आमचा जमीन जुमला विकला आणि माझ्या वडलांनी आणि चुलत्यांनी इथे पन्नास हजारात १० एकर जमीन विकत घेतली. तुम्हाला माहितीये, आता इथे एकराला ३ ते ४ लाख भाव चाललाय?’ तो चालता चालता उजवीकडे-डावीकडे निर्देश करत होता तसं उसाच्या आणि आरारोटच्या शेतात विजेरीचे गोल झोत पडत होते.

PHOTO • Aparna Karthikeyan

‘कधी काळी इथे नुसतं झुडपांचं रान माजलं होतं. माझ्या घरच्यांनी स्वतःच्या हातांनी ते सगळं साफसुफ केलं. तुम्हाला तिथे ती विहीर दिसतीये, त्या दिव्याखाली?’ ती माझ्या चितप्पांची (चुलत्यांची) आहे. आणि त्याच्या मागचं ते घर दिसतंय? त्या माडांमागे लपलेलं? ते माझं घर!’

तो ‘माझं घर’ असं इतक्या अभिमानाने म्हटला. पक्कं बांधकाम केलेलं घर होतं ते, ९ वर्षांपूर्वी वीजजोडणी आलेलं. सोबतच झपाट्याने आधुनिकता घेऊन आलेलं. ‘आता तुम्हाला मनात आलं तरी कुठे बैल आणि लाकडी फाळ दिसायचा नाही. आणि लँडलाइन तर विसराच, फक्त मोबाइल फोन,’ हसत त्याने त्याच्या खिशावर चापटी मारली.

या सगळ्यामुळे गावाचा ‘निवांतपणा’ गेला असला – शहरी लोकांना ज्याची आस असते असा – तरी इलायाराजाला मात्र हे आधुनिकतेचं वारं आवडलंय. त्यामुळे जगणं किती सोपं झालंय. ‘पूर्वी आम्ही विळ्याने ऊस तोडत होतो. आता एक मशीन तोडणी करतं आणि दुसरं गोळा करून नेतं. चुटकीसरशी होतं सगळं काम!’ वाचणारा वेळ आणि मानवी श्रम या दोन्हीचं त्याला कौतुक आहे, कारण अगदी लहान वयातच त्याने दोन्हीही भरपूर खर्च केलेत.

PHOTO • Aparna Karthikeyan

अर्थात आताही रोज सकाळी तो आरामखुर्चीत बसून हातात कॉफीचा पेला घेऊन वर्तमानपत्र चाळतोय अशी काही स्थिती नाहीये. तो रानात गुडघाभर चिखलात ओणवा उभा राहून कामं करतोय. भाजीपाला, फुलं वेचतोय, प्रतवारी करतोय. त्यांच्या घरी भात, भाज्या आणि फुलांची शेती आहे. ‘भेंडी आणि वांगी दोन्हीही रोज हातानेच तोडावी लागतात. वांगं एक वेळ एक दोन दिवस झाडावर राहिलं तर चालतं पण भेंडीचं तसं नाही... ती लगेच जून होते,’ तो हसला आणि मीही त्याच्या हसण्यात सामील झाले. भाजी विकणाऱ्यांना राग येणारी पण गिऱ्हाइकांच्या आवडीची अशी भेंडी कोवळी आहे का ते पाहण्यासाठी तिचा शेंडा मोडून पाहण्याची सवय चटकन् मला आठवली.

त्यानंतर दोन्ही भाज्यांचा मिळून काही किलो माल विकायला जातो. ‘रोज माझे वडील त्यांच्या दुचाकीवर आईला बाजारात घेऊन जातात. ते तिला तिथे सोडतात आणि मग रानात जातात. ती सगळा भाजीपाला विकून शेअर रिक्षाने घरी परत येते.’ तोपर्यंत इलायाराजाची कामाची पहिली पाळी संपलेली असते – बाहेरची काही आणि इतर सटरफटर कामं. संध्याकाळी ६ वाजेतोवर तो परत येतो, तोपर्यंत जनावरांचं काम झालेलं असतं, गायी दोहलेल्या असतात.  

इथले बहुतेक लोक गायी, बकऱ्या आणि कोंबड्या पाळतात. आणि इथल्या भागात तुम्हाला जर्सी किंवा संकरातून जन्मलेल्या गायीच दिसतील कारण त्या जास्त दूध देतात जर त्यांना चांगला आहार मिळाला, जसं की हिरवा चारा आणि पेंड. अर्थात हे काही नेहमीच शक्य होत नाही.

PHOTO • Aparna Karthikeyan

पाऊस अनेकदा हुलकावणी देतो. ‘इथली माती फार चांगली आहे, सगळं चांगलं पिकतं इथे. पण पाण्याची पंचाइत आहे. तुम्हीच पहा, माझ्या चुलत्यांच्या ६० फूट विहिरीत फक्त चार फूट पाणी आहे. म्हणून आम्ही तिचा वापर फक्त पाणी साठवायला करतो. बोअरमधून पंपाने पाणी उपसून घेतो. इथे काही बोअर तर थेट ८०० किंवा १००० फूट खोल गेल्या आहेत...’ इलायाराजा समजावून सांगतो. मी या सगळ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करत होतेः पण ते मुश्किल होतं.

त्याहून अवघड होतं रिकामी रानं पाहणं. काही वर्षांपूर्वी पाऊस चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर भाताचं पीक घेतलं गेलं होतं, जोमदार पीक आलं होतं आणि इथल्या लोकांना भाताची कमीच नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांत इतका पाऊस कमी झालाय आणि जमिनीखालची पाण्याची पातळीदेखील खालावत चालल्याने रान मोकळीच ठेवलीयेत. आणि तरीही, ठिबक सिंचनावर ऊस पिकवला जातोय. ही खेदाची आणि चर्चेची बाब इलायाराजाने ‘मी-काय-करू-शकतो’ असा भाव आणून उडवून लावली.

आता रात्र अवतरली होती, आकाशात चांदण्या चमकत होत्या आणि सगळ्या मोटरसायकली आपापल्या घरी गेल्या होत्या. आम्ही परत फिरलो, ऊस, आरारोटाच्या शेतीजवळनं आणि त्याच्या चुलत्यांच्या विहिरीवरनं चालत येऊ लागलो. हवेत गारवा होता आणि मस्त सुवास पसरला होता. ‘हं...’ मी उरात श्वास भरून घेतला आणि त्याच्याकडे वळत अगदी विजयी मुद्रेने त्याला विचारलं की आपण हळदीच्या रानाजवळनं चाललोय का ते. ‘हा हा हा,’ तो जोरात हसू लागला आणि विजेरीने रस्त्यात वेड्या वाकड्या रेषा तयार करत म्हणाला, ‘कीटकनाशकाचा वास आहे तो. आज सकाळीच मारलंय आम्ही!’

PHOTO • Aparna Karthikeyan

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Aparna Karthikeyan

अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.

Other stories by Aparna Karthikeyan