एस. मुथुपेची शांतपणे त्यांच्यापुढच्या समस्यांचा पाढा वाचतात. चरितार्थासाठी त्या करगट्टम हा पारंपरिक कलाप्रकार साद करतात. रात्रभर नाचत ही कला सादर केली जाते आणि त्यासाठी कौशल्यासोबत दमसासही लागतो. तरीही या कलाकारांसोबत दुजाभाव केला जातो, त्यांना कलंकाचा सामना करावा लागतो आणि सामाजिक सुरक्षा फारशी काही नाहीच. ४४ वर्षांच्या मुथुपेचींनी या सगळ्यावर मात केली आहे.

त्यांचे पती १० वर्षांपूर्वी वारले. त्यानंतर त्यांनी एकटीने घर चालवलं, आपल्या कमाईतूनच दोन्गी मुलींची लग्नं लावून दिली. आणि अचानक कोविड-१९ चा घाला बसला.

करोना विषाणूबद्दल बोलताना त्यांच्या आवाजाला संतापाची आणि यातनांची धार चढते. “पाळ पोण करोना [हा दुष्ट करोना],” या आजाराला शिव्याशाप देत त्या म्हणतात. “कमाईच नाहीये कारण आमचे कार्यक्रमच थांबलेत. मला माझ्या मुलींपुढे हात पसरायला लागतायत.”

“गेल्या वर्षी शासनाने २,००० रुपये मदत जाहीर केली,” मुथुपेची सांगतात. “पण आम्हाला आमच्या हातात १,००० रुपयेच मिळाले. या वर्षी आम्ही मदुराईच्या कलेक्टरला विनंती केलीये, पण आजवर तरी काही मिळालेलं नाही.” २०२० च्या एप्रिल-मे मध्ये तमिळ नाडू शासनाने राज्याच्या लोककलावंत कल्याणकारी मंडळाकडे नोंद असलेल्या कलाकारांसाठी १,००० रुपयांची विशेष मदत दोन वेळा जाहीर केली होती.

महासाथ आली आणि तेव्हापासून मदुराई जिल्ह्यातले सुमारे १,२०० कलाकार हलाखीत गेले आहेत असं मदुराई गोविंदराज सांगतात. ते नावाजलेले कलावंत आहेत आणि लोककलांचे शिक्षक. करगट्टम सादर करणारे जवळपास १२० कलाकार अवनीपुरम शहरात, आंबेडकर नगर वस्तीत राहतात. मे महिन्यात मी तिथेच मुथुपेची आणि इतर काही जणांना भेटलो.

करगट्टम हा तसा गावाकडचा नृत्य प्रकार आहे. धार्मिक उत्सवांमध्ये तो मंदिरांमध्ये सादर केला जातो, सांस्कृतिक उत्सवांमध्ये, लग्न किंवा इतर कार्यक्रमांमध्ये आणि मयतीला देखील. हे कलाकार आदि द्रविड जातीचे दलित आहेत. या कलेवर त्यांचं पोट अवलंबून आहे.

करगट्टम हा समूहाने सादर केला जाणारा नाच प्रकार आहे. यात खूप सजवलेलं एक मडकं, करगम, डोक्यावर घेऊन स्त्रिया आणि पुरुष ही कला सादर करतात. रात्री १० ते पहाटे ३ असा हा नाच चालतो.

PHOTO • M. Palani Kumar

करगट्टम कलाकार ए मुथुलक्ष्मी (डावीकडे) अवनीपुरममधल्या आपल्या घराच्या बाहेरच स्वयंपाक करतायत कारण स्टोव्ह ठेवण्यापुरती जागा घरामध्ये नाही

त्यांची बरीचशी कमाई देवळांमध्ये होणाऱ्या उत्सवांमधून होते आणि यातले बहुतेक उत्सव फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात होतात. या कमाईवरच ते अख्खं वर्ष काढतात आणि गरजेला कर्जं काढतात.

महासाथीमुळे त्यांच्या तुटपुंज्या कमाईचा स्रोतही हिरावून घेतला आहे. दागिने आणि खरं तर घरातलं मौल्यवान असं जे काही आहे ते गहाण टाकलंय आणि आता मात्र त्यांच्या जिवाला घोर लागला आहे.

“मला फक्त करगट्टमच येतं,” ३० वर्षांची एम. नल्लुथई म्हणते. एकटीने आपल्या मुलांना वाढवणारी नल्लुथई गेल्या १५ वर्षांपासून ही कला सादर करतीये. “सध्या तरी मी आणि माझी दोन मुलं रेशनचा तांदूळ आणि कडधान्यं खाऊन दिवस काढतोय. पण हे असं किती दिवस चालेल मी सांगू शकत नाही. मला दर महिन्याला १० दिवस तरी काम हवंय. तरच मी घरच्यांना चार घास खाऊ घालू शकते, मुलांच्या शाळेची फी भरू शकते.”

नलुल्थई वर्षाला ४०,००० रुपये शाळेची फी भरते. तिची दोन्ही मुलं खाजगी शाळेत जातात. तिने आपलं हे काम सोडावं असं त्यांना वाटतं. त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तर त्यांच्यापुढे इतरही पर्याय खुले असतील अशी तिला आशा होती. पण हे सगळं महासाथ येऊन धडकायच्या आधी.

करगट्टम कलाकार सणात त्यांचा नाच यादर करतात तेव्हा त्यांना प्रत्येकी रु. १,५०० ते ३,००० इतकी बिदागी मिळते. मयतीच्या वेळी मात्र ही रक्कम कमी असते – रु. ५०० ते रु. ८००. मयतीला शोकगीतं गातात.

महासाथीच्या काळात मयतींमधूनच त्यांची मुख्य कमाई होत असल्याचं २३ वर्षीय मुथुलक्ष्मी सांगते. आंबेडकरनगरमधल्या आपल्या ८ बाय ८ फुटी खोलीत ती आपल्या आई-वडलांसोबत राहते. दोघंही बांधकाम मजूर आहेत. टाळेबंदीत दोघांचीही कमाई आटलीच आहे. निर्बंध शिथिल झाल्यावर जरा बरी परिस्थिती होती पण करगट्टम कलावंताना दिले जाणारे पैसे देखील तसेच आटलेत. काही देवळांमध्ये सण साजरे झाले पण या कलावंतांना त्यांच्या एरवीच्या कमाईच्या चौथा हिस्सा देण्यात आला.

५७ वर्षीय आर. ग्नानम्मल ज्येष्ठ कलावंत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे त्या फार निराश झाल्या आहेत. “मला इतकं नैराश्य आलंय,” त्या म्हणतात. “कधी कधी वाटतं, जीव द्यावा...”

PHOTO • M. Palani Kumar

पाच नातवंडांची आजी आणि ज्येष्ठ कलावंत असलेल्या आर. ग्नानम्मल यांनी अनेक तरुण करगट्टम कलावंत घडवलेत

ग्नानम्मल यांची दोन्ही मुलं आता जगात नाहीत. आता त्यांच्या दोन्ही सुनाच हे घर चालवतात. त्यांची पाच नातवंडं आहेत. आपल्या धाकट्या सुनेसोबत त्या आजही करगट्टम सादर करतात. मोठी सून शिवणकाम करते आणि त्यांच्या अनुपस्थितीत घर सांभाळते.

आधी जेव्हा उत्सव आणि सोहळे सुरू होते तेव्हा त्यांना चार घास खायला देखील वेळ मिळायचा नाही, ३५ वर्षीय एम. अळगुपण्डी सांगते. “वर्षाचे १२०-१५० दिवस काम असायचं.”

अळगुपण्डीला शिक्षण घेता आलं नसलं तरी तिच्या मुलांना मात्र शिकण्याची आस आहे, ती सांगते. “माझी मुलगी कॉलेजमध्ये आहे. ती कम्प्यूटर सायन्समध्ये बीएससी करतीये.” ऑनलाइन वर्ग डोईजड आहेत, ती पुढे म्हणते. “इथे आमची पैशासाठी मारामार सुरू आहे आणि त्यांनी पूर्ण शुल्क भरायला सांगितलंय.”

३३ वर्षांच्या टी. नागज्योतीने आपल्या आत्यामुळे करगट्टम सादर करायला सुरुवात केली. तिची आत्या सुप्रसिद्ध कलाकार आहे. नागज्योतीला मोठं कोडं पडलं आहे. तिचा नवरा सहा वर्षांपूर्वी वारला. तेव्हापासून ती स्वतःच्या कमाईतूनच घर चालवत आहे. “माझी मुलं इयत्ता ९ वी आणि १० वी मध्ये आहेत. त्यांना चार घास खायला घालणंसुद्धा मला जड जातंय,” ती म्हणते.

उत्सवाच्या काळात नागज्योती २० दिवस सलग करगट्टम सादर करू शकते. अगदी आजारी जरी पडली तरी गोळ्या-औषधं घेते पण थांबत नाही. “काहीही होऊ दे, मी नाचायची थांबणार नाही. करगट्टम मला फार आवडतं,” ती म्हणते.

महासाथीमुळे या करगट्टम कलावंतांच्या आयुष्यात मोठीच उलथापालथ झालीये. संगीताची, तात्पुरत्या उभारलेल्या मंचांची त्यांना आस लागलीये. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आवश्यक पैशाची देखील.

“हे काम सोडा म्हणून आमची मुलं आमच्या मागे लागलीयेत,” अळगुपण्डी सांगतात. “आम्ही सोडू. पण ती चांगली शिकली, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्यानंतरच.”

PHOTO • M. Palani Kumar

एम. अळगुपण्डी करगम घेऊन उभ्या आहेत. हा सजवलेला घट डोक्यावर तोलून करगट्टम कलाकार नाचतात. आपल्या मुलांनी हेच काम करावं अशी त्यांची इच्छा नाही

PHOTO • M. Palani Kumar

६४ वर्षीय एन. जयरामन करगट्टम सुरू असताना थविल हा ढोल वाजवतात

PHOTO • M. Palani Kumar

ए. उमा आणि तिचे पती नल्लूरामन दोघंही कलाकार आहेत. ती करगट्टम सादर करते आणि ते पराई हे डफासारखं वाद्य वाजवतात

PHOTO • M. Palani Kumar

या कलाकारांची वाद्यं त्यांच्या घरी पडून आहेत, त्यावरूनच समजून येतं की या मंडळींना अनेक महिने काम मिळालेलं नाही

PHOTO • M. Palani Kumar

काम नसल्यामुळे एम. नल्लूथईंवर कर्जाचा बोजा वाढलाय. त्यांना काळजी लागून राहिलीये की ही महासाथ अशीच सुरू राहिली तर तिच्या मुलांना शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागेल

PHOTO • M. Palani Kumar

एस. मुथुपेची म्हणतात की करगट्टमप्रती असणारा आदर आता कमी होत चाललाय आणि ही कला सादर करणाऱ्या कलाकरांना मान दिला जात नाही. कधी कधी तर त्यांना कपडे बदलण्यासाठी खोलीसुद्धा दिली जात नाही

PHOTO • M. Palani Kumar

टी. नागज्योती १२ वर्षांची होती तेव्हापासून करगट्टम सादर करतीये. करगट्टम कलाकाराच्या पोषाखाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे करगम हा सजवलेला घडा

PHOTO • M. Palani Kumar

२९ वर्षीय एम. सुरियादेवी करगट्टम सादर करते आणि तिचा नवरा, व्ही. महालिंगम पराई वाजवतो. या महासाथीच्या काळात त्यांना कुठेही आपली कला सादर करता आली नाही. काही महिन्यांसाठी सुरियादेवीला आपल्या मुलांना आईपाशी पाठवावं लागलं होतं. सध्या एका स्थानिक संस्थेच्या मदतीवर हे कुटुंब कसंबसं भागवतंय

PHOTO • M. Palani Kumar

एन. मुथुपण्डी आपला पोषाख परिधान करून उभे आहेत. पन्नाशी गाठलेले मुथुपण्डी नाटकांमध्ये विदूषकाची भूमिका करतात. ही महासाथ अशीच राहिली तर त्यांचा व्यवसायच संपुष्टात येईल अशी भीती त्यांना वाटतीये

PHOTO • M. Palani Kumar

३३ वर्षीय एस. देवी अवनीपुरममधल्या आंबेडकर नगर वस्तीत आपल्या घराबाहेर उभी आहे. अगदी लहानपणापासून ती करगट्टम सादर करत आहे

या कहाणीचा मजकूर लेखकासोबत अपर्णा कार्तिकेयन यांनी लिहिला आहे.

M. Palani Kumar

M. Palani Kumar is a 2019 PARI Fellow, and a photographer who documents the lives of the marginalised. He was the cinematographer for ‘Kakoos’, a documentary on manual scavengers in Tamil Nadu by filmmaker Divya Bharathi.

Other stories by M. Palani Kumar
Text : Aparna Karthikeyan

Aparna Karthikeyan is an independent multimedia journalist. She documents the vanishing livelihoods of rural Tamil Nadu and volunteers with the People's Archive of Rural India.

Other stories by Aparna Karthikeyan
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale