१५ फेब्रुवारी १८८५ साली महात्मा फुले यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवे या मुलीने महार-मांगांच्या दुःखाविषयी' हा निबंध  "ज्ञानोदय" या पाक्षिकात लिहिला आणि  धर्माच्या ठेकेदारांबरोबर वाद विवाद केला होता.  “ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होतील व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो."

मांग जातीमधील १५ वर्षीय मुक्ता साळवे या मुलीने तिच्या जातीला सहन कराव्या लागणाऱ्या छळाचे चित्रदर्शी वर्णन करणारा निबंध लिहिला तसाच काहीसा धार्मिक वाद-विवाद आधुनिक काळात कडूबाईने आळंदीच्या प्रांगणात अध्यात्माच्या ठेकेदारांसोबत केला होता. त्या आपल्या गाण्यातून रोजच्या जगण्यातली दुःख, संघर्ष आणि खोलवरचे अध्यात्म गातात. आणि जगण्याची खोलवरची समज सुद्धा! त्यांच्या गाण्यात सामान्य माणसाला कळणारे समतेचे तत्वज्ञान आहे तसेच आंबेडकर यांच्या प्रतीची कृतज्ञताही!

*****

काखेत पोरगं हातात झाडनं डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता, आरे, खरकटं भत्ता
फजिती होती माय मोठी

मह्या भीमानं, भीमानं माय, सोन्यानं भरली ओटी

मुडक्या झोपडीला होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याला होत्या माय सतरा गाठी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबिनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी

सांगू सांगू मी केले, केले माय भलते कष्ट
नव्हतं मिळत वं खरकटं आणि उष्टं
असाच घास दिला भीमानं
झकास वाटी ताटी

तवा सारंगचा मुळीच पत्ता नव्हता
पूर्वीच्या काळात असंच होतं
बात मायी नाय वं खोटी

मह्या भीमानं, मह्या बापानं,
भीमानं माय, सोन्यानं भरली ओटी

PHOTO • Courtesy: TISS Tuljapur
PHOTO • Courtesy: TISS Tuljapur

काही वर्षांपूर्वी टाटा समाजविज्ञान संस्था, तुळजापूर इथे आयोजित डॉ. आंबेडकर मेमोरियल लेक्चर कार्यक्रमात कडूबाई आणि त्यांची एकतारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी आजवर हजारो गाणी लिहिली आणि गायली आहेत. पण त्यापैकी काही मोजकीच गाणी जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. जनसामान्यांच्या ओठात रेंगाळत राहतात. अथवा कायमस्वरूपी सार्वजनिक स्मरणाचा भाग बनतात. जनसामान्यांच्या ओठात असलेलं असंच हे एक गाणं कडूबाई खरात यांच्या कंठातून, स्वरातून आंबेडकरी समूहाच्या घराघरात पोहोचलं आणि आज घराघरात ते ऐकलं जात आहे.

हे गाणं अनेक कारणांनी गाजलं... गाजत आहे. भावाला अनुरूप उत्तम शब्द, स्पष्ट उच्चार, निराळे नाद, वाद्यं आणि कडूबाई खरात यांचा खास खर्जातला आवाज. कलर टीव्ही आणि झी टीव्हीचा जलसा महाराष्ट्रचा या कार्यक्रमात साधी भोळी कडूबाई प्रथमच टी.व्ही.च्या झगमगाटात आली असली तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला करावा लागलेला अंधाराचा प्रवास महाराष्ट्राला फारसा माहित नाही. कडूबाईची कहाणी तिच्या नावाप्रमाणेच कडू जीवनानुभवांनी भरलेली आहे.

वडील तुकाराम कांबळे. घरी अठराविश्वे दारिद्र्य, वयाच्या १६व्या वर्षी लग्न झाल्यानंतर काही काळातच पती खरात यांचं हृदयविकाराने निधन झालं. पती निधनानंतर दोन मुलं आणि एक मुलगी यांच्यासह संसाराची जबाबदारी कडूबाईवर आली. कडूबाई वडलांची एकतारी घेऊन घरोघरी जाऊन पारंपरिक भजन कीर्तन करायच्या. प्राचीन काळी धर्माच्या ठेकेदारांबरोबर गार्गी व मैत्रेयी या विदुषींनी धार्मिक विषयावर वाद-विवाद केला होता तसाच काहीसा धार्मिक वाद-विवाद आधुनिक काळात कडूबाईने आळंदीच्या प्रांगणात अध्यात्माच्या ठेकेदारांसोबत केला होता. अनेक वर्षे अनेक प्रकारचं भजन कीर्तन करण्यात घालवली. परंतु या भजनातून दोन वेळच्या अन्नाशिवाय काही मिळायचे नाही. त्यामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातलं अव्हाना हे मूळ गाव सोडून त्या औरंगाबादला आल्या.

PHOTO • Imaad ul Hasan
PHOTO • Imaad ul Hasan

कडूबाईंनी औरंगाबाद-बीड बायपासजवळ गायरानात एक पत्र्याची झोपडी बांधली. आता बुद्ध धम्म स्वीकारलेल्या कडूबाई म्हणतात की बाबासाहेबांकडून मिळणारी ऊर्जा, प्रेरणा, प्रेम आणि करुणेच्या बळावर त्या जगाला सामोऱ्या गेल्या आहेत

परंतु औरंगाबादला राहायचे कुठे? औरंगाबाद शहराजवळ बीड बायपास रोडजवळ पाणी, लाईट अशा कुठलीच नागरी सुविधा नसलेल्यासरकारी गायरानात एक छोटी झोपडी बांधून त्या राहू लागल्या. आणि आजही तिथंच राहतात. सुरवातीचा काही काळ त्यांना मीरा उमप यांनी आपल्या कलासंचात काम दिलं. परंतु त्यातून आपल्यासह तीन मुलांचा सांभाळ करणं अवघड जात होतं. कडूबाई सांगतात, “पाण्याचे दिवस होते, झड लागलेली. घराबाहेरही पडता येत नव्हतं. घरात तीन लेकरं भुकेनं व्याकुळ झालेली. तसल्या पावसात रोदारी जाऊन गात असताना एका महिलेने ‘डॉ.आंबेडकरांचं गीत गा’ असं सांगितलं. मी ते गायले आणि माझ्या मुलांच्या भुकेबद्दलही सांगितलं. ती बाई आपल्या स्वयंपाकघरात गेली आणि मला महिनाभर पुरेल इतका आपल्या कुटुंबासाठी आणलेला सर्व किराणा माझ्या समोर ठेवला. तिला माझ्या लेकरांची भूक समजली होती."

“बाबासाहेबांच्या गाण्याने माझ्या लेकरांची भूक भागली होती. मग पुढचं सारं आयुष्यच बदललं. मी सगळं भजन कीर्तन सोडलं आणि डॉ. आंबेडकर यांनी दाखवलेला रस्ता निवडला... आयुष्यभर याच रस्त्याने चालण्याचा निर्धार केला. २०१६ साली हिंदू धर्म आणि मांतग जात सोडून दिली आणि बुद्धाचा धम्म स्वीकारला!” कडूबाई सांगतात.

वडील आणि नवऱ्याचे निधन झाल्यानंतर सर्व सुख दुःखात आणि जगण्याच्या लढाईत कडूबाईची खरी साथ सोबत केली ती या एकतारी आणि गोड गळ्याने!! वडील आणि पतीच्या निधनानंतर ती मोडून पडली नाही.

या जगण्याच्या संघर्षात तिच्यासोबत दोन गोष्टी होत्या. एक एकतारी आणि दुसरा तिचा अवाज! याच सोबतीने बाबासाहेबांचे प्रेम, करुणा, प्रेरणा आणि ऊर्जा यावरती ती उभी राहिली!

केवळ जगण्यासाठी दारोदारी जाऊन गाणे गाण्यापासून ते आजची महाराष्ट्रातील मोठी सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास केवळ अचंबित करणारा आहे. एकतारीने कडूबाईला ३० वर्षांपेक्षा अधिक काळ साथ दिली आहे.

व्हिडिओ पहाः ‘बाबासाहेबांची गाणी गाऊन मी पोरं मोठी केली’

*****

एकतारीचा पहिला ऐतिहासिक संदर्भ येतो तो अजंठा लेणीच्या गुंफा क्रमांक १७ मध्ये. या लेणीत एकतारीचे चित्र आहे.महाराष्ट्रात प्रत्येक जात समूहाची स्वतःची अशी संगीत वाद्य आहेत. ही वाद्यं त्यांच्या विधी/सांस्कृतिक जीवनात वापरली जातात. हलगी–मांग, किंगरी–डक्कलवार, गजी ढोल–धनगर, चोंडक - यल्लमाचे भक्त, डवरु–गोसावी, ढोलकी, तुणतुणे आणि एकतारी-महार अशी वाद्यांची विभागणी दिसते.

मुबंई विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉ.नारायण भोसले म्हणतात, "डवरु वाजवण्याच्या परंपरेमुळेच गोसावी ही जात ‘डवरू-गोसावी’ म्हणून ओळखली जाते. मातृसत्ताकतेचे भजन गाणारे ‘भाट’ हे गोंधळी आहेत. त्यांच्याकडे तुणतुणे आणि संबळ आहे.

एकतारी आणि तुणतुणे सारखीच आहेत. परंतु त्याचा टणत्कार, वाजवण्याचे प्रयोजन आणि बनवण्याची पद्धत वेगळी आहे. महार-मांगांमध्ये असलेली एकतारी भजनाची परंपरा सुधारित जातींमध्ये दिसत नाही. अथवा खूपच कमी आहे. आणि ही वाद्यं त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या सामाजिक धार्मिक आणि दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी ही वाद्यं वापरली जातात.

एकतारीबद्दल प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत म्हणतात,“एकतारी मध्ये जो आलाप-विलाप आहे याचे दुःखाशी खूप जवळचे नाते आहे. "डिंगनाग...डिंगनाग...हो"हा दुःखाचा विलाप त्यामधून आला आहे. हा विलाप भैरवीचा आहे. आणि भैरवी दुःख व्यक्त करणारा राग आहे. सगळी भैरवी ही एकतारीमध्ये आहे. एकतारीची सर्व भजने भैरवीमध्ये आहेत. आणि एकतारीवरचं भजन सुरवात ते अंतापर्यंत भैरवीमध्ये चालतं.

हिंदू भक्ती परंपरेत निर्गुण आणि सगुण अशा दोन परंपरा आहेत.सगुण परंपरेत मंदीर, देवाची मूर्तीपूजा मध्यवर्ती आहे. तर निर्गुण परंपरेत मंदिर, देवाच्या मूर्ती याला कुठलेही स्थान नाही. त्याऐवेजी ते फक्त लोकात जाऊन संगीताच्या आधारे गेय पद्धतीने भजनाद्वारे निर्गुणाचा संदेश पोहोचवत असत. बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यापूर्वी महार समाज ढगोजी-मेघोजी आणि कबीरपंथाचा अनुयायी होता. हे दोन्ही पंथ निर्गुण परंपरा मानणारे होते. ढगोजी-मेघोजी आणि कबीर पंथाकडून एकतारीची परंपरा महार समूहात आली असावी.

आकाश पांघरुनी
जग शांत झोपलेले
घेऊन एकतारी
गातो कबीर दोहे

कबिराची सर्व भजनं एकतारीवर म्हटली गेली. या एकतारी भजनात त्यांचे श्रम, आणि त्यांचे जीवनानुभव, तत्त्वज्ञानाची मांडणी, जीवनाबद्दलची मांडणी ही एकतारीच्या भजनांमध्ये दिसते.

व्हिडिओ पहाः ‘एकतारीवर तुम्ही कोणतंही गाणं गाऊ शकता’

शोषित, पिचलेल्या सर्वच जातसमूहांचा कबीर हा आध्यात्मिक व सांगीतिक हुंकार होता. आणि तो हुंकार इथल्या भटक्या शोषित जात समूहाने हातात एकतारी घेऊन भारतभर पोहोचविला. कबिराचे अभ्यासक पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या मते कबीर केवळ हिंदी भाषिक प्रांत आणि पंजाब येवढ्यापुरता मर्यादित नव्हता, तर ओडिया, तेलुगू भाषक प्रांतापासून ते गुजरात-महाराष्ट्रापर्यंत कबीर पोचला होता.

१९५६ पूर्वी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच्या परिघावरचा आंध्रा, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या भौगोलिक भागात महार आणि तत्सम अस्पृश्य जाती ह्या मोठ्या प्रमाणात कबीरपंथी होत्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रतील संत तुकारामांवरही कबिराचा प्रभाव होता. या कबीर आणि कबीरपंथाच्या परंपरेतून, प्रभावातून त्यांच्याकडे एकतारी आली असावी.

एकतारीची परंपरा आजही दलितांच्या आणि खास करून महार आणि अस्पृश्य समूहांच्या घरात दिसते आहे. आजही याच जात-समूहांत तिचा उपयोग केला जातो. मृत्यूनंतरच्या विधींमध्ये एकतारीवर भजन गायले जाते. जीवनाचं साफल्य, जीवनविश्वाची अभिव्यक्ती, चांगल्या कर्माचे महत्व, आणि शेवटी मृत्यूची अटळता हे कबीरपंथीय तत्वज्ञानाचे गूढ सांगणारी ही गाणी महार जातसमूहाकडून एकतारीवर गायली जायची. कडूबाईला आजही ही कबीर पंथाची, नाथ पंथाची, वारकरी पंथाची शेकडो गाणी येतात.

आग लगी बडी भारी, गगन मै हे कबीर भजन

किंवा तुकारामाचा हा अभंग

विठ्ठला तुझे धन अपार
करीन नामाचा या गजर !
धन चोरला दिसत नाही
डोळे असून ही शोधत राही !!

डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक न्यायासाठीच्या चळवळीनंतर हे कमी होत गेले तरी कडूबाईसारखे अनेक कलावंत अशी भजनं, गाणी गात आहेत.

कबीर भजन एकतारी घेऊन जगभर पोहोचवणारे मध्य प्रदेशातील प्रल्हाद सिंह टिपनिया हे बलई या जातसमूहाचे आहेत.मध्य प्रदेशातील हा जात समूह महाराष्ट्राच्या महार या जातसमूहासारखा आहे. महाराष्ट्राला लागून बऱ्हाणपूरपासून माळवा, खांडवा या भागात मोठ्या प्रमाणात बलाई जात समूह आहे. जातीनिर्मूलन या पुस्तकात डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्य समूहावर होणाऱ्या अन्यायाची अनेक उदाहरणे दिली आहेत. ती बलई या जातसमूहाची आहेत. शंभर वर्षांपूर्वीची महसूल कागदपत्रं तपासली असता महाराष्ट्राच्या गावगाड्यात गावाचे रक्षण करणे, जमिनीची मोजणी करणे, मरणाचा निरोप पोहचवणे हे "सामाजिक स्थान" महारांकडे होते. तेच मध्यप्रदेशात बलई या जातसमूहाचे होते. गावच्या चौकीदाराला सुरुवातीला बलई म्हटले जायचे. त्याच बलई जातसमूहाला  ब्रिटिश काळात महार बनवले गेले. हे परिवर्तन कसे घडले? त्या वेळच्या ब्रिटिश खांडवा बऱ्हाणपूर प्रशासनाच्या निरीक्षणानुसार मध्यप्रदेशातील बलई व महाराष्ट्रातील महार हे समान आहेत. त्यांच्या कामाचे स्वरूप, व्यवसाय आणि जगण्याची पद्धती, रूढी परंपरा देखील समान आहेत. आणि त्या आधारे सुरुवातीला महार असणाऱ्यांना बलई जाहीर करण्यात आलं. त्यानंतर १९४२-४३ सालानंतर अनेक बलई कागदोपत्री पुन्हा महार बनतात, असा बलाई जातसमूहाचा इतिहास आहे.

*****

PHOTO • Imaad ul Hasan

आज कडूबाई एक सेलेब्रिटी आहेत. गेली ३० वर्षं त्यांच्या एकतारीने त्यांची साथ दिली आहे

प्रल्हादसिंग टिपनिया, शबनम विरमणी [ द कबीर प्रोजेक्ट ] कबीर भजन गाण्यासाठी एकतारीचा उपयोग करतात.

एकतारी हे वाद्य देशभर आढळते. भजनी लोकांजवळ व भटक्या गायकाजवळ ते असते. त्याची लांबी सुमारे 100 - 110 सेंटिमीटर असते. एकतारी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कर्नाटकात एकतारी हे वाद्य ‘एकनाद’, पंजाबमध्ये ‘तंबी’, बंगालमध्ये ‘बाउल’, नागालँडमध्ये ‘ताती’ आणि तेलंगणा व आंध्रात ‘बुरा वीणा’ म्हणून ओळखलं जातं. ताती हा शब्द येणेही भाषेतील आहे.मही भाषा आज प्रमुख्याने नागालँडमधील अंगामी नागा बोलतात.

एकतारीच्या बुडाला घोषक म्हणून बहुदा चपटा भोपळा वापरतात. त्याच्या निरुंद बाजूला आरपार भोक पाडून त्यात वेळूचा दांडा बसवतात. दांड्याचे एक टोक खालच्या भोकातून थोडेसे बाहेर येते तिथे तार बांधतात. व ती भोपळ्याच्या तबकडीवरील घोडीवरून पुढे दांड्याच्या दुसऱ्या टोकाचा खुंटीला गुंडाळतात. तबकडी चामड्याची असते. खुंटीच्या बाजूला तार उचलून धरण्यास मेरू नसतो. दांडा एका हातात धरून त्याच हाताच्या तर्जनीने तार छेडतात.

एकतारी ही इतर संगीत वाद्याच्या तुलनेने बनवण्यास अत्यंत सोपी आहे. भोपळा, लाकूड आणि तार या सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक संसाधनातून ती बनवली जाते. आवाज घुमण्यासाठी भोपळा हे उत्तम साधन आहे. भोपळ्याचा वापर आफ्रिकेत अधिक दिसतो. एकतारीचा उपयोग मुख्यतः एक सूर पकडण्यासाठी असतो. एकतारी मध्ये लय आणि स्वर मिळतो. आणि त्या लयीवर ठेका पकडता येतो. बोटाने एकतारीवर स्ट्रोक मारल्यानंतर एक ठेका मिळतो. त्या ठेक्यावर आणि तारेच्या तरंगाच्या स्वरातून गायकाला बरोबर स्वतःचा सूर जुळवता येतो. त्यामुळे भजन आणि गाणे अधिकच श्रवणीय बनते. एकतारी हे आदिम संगीत वाद्य आहे. या एकतारीची सुरुवात धातूच्या तारेतून झालेली नाही, तर चामड्यातून झालेली आहे. प्राण्याच्या चामडीच्या आतल्या पापुद्र्यापासून पहिली एकतारी बनवली गेली! चामड्याची तार असलेली एकतारी आजही कर्नाटकात, खास करून यल्लमाच्या संगीतवाद्यात वापरली जात आहे. त्याला ‘झुंबरुक’ म्हणतात. झुंबरुकमध्ये वापरली जाणारी तार ही धातूची नसून चामड्याची असते. चामड्याला चामडे जोडून त्यापासून पहिला रिदम आणि स्वर तयार झाला. आणि हे पहिले संगीत वाद्य तयार झाले. शेती व्यवस्थेत लोखंडाचा शोध लागला तेव्हा धातूचा उपयोग करण्यात आला. जगात वेगवेगळ्या ठिकाणी तार वापरलेली एक-तारी वाद्यं अस्तित्वात आली. उपेक्षित वर्गाची वाद्ये त्यांच्या भटक्या जीवनशैलीला अनुरूप बनवली गेली.

भारतात एकतारी भक्ती चळवळीतून विकसित झाली असे म्हटले जाते. परंतु हे ऐतिहासिक तत्त्वाला धरून नाही. एकतारी संत कबीर, मीराबाई, आणि सुफी संतांमध्ये दिसत असली तरी महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत नामदेवांपासून तुकारामांपर्यंत संत हे एकतारी ऐवजी वीणा, चिपळ्या, टाळ आणि मृदंग वाजवायचे. महाराष्ट्रत बहुतेक संतांच्या गळ्यात विणा दाखवली आहे.

मराठी विश्वकोशानुसार "वीणा ही भारतीय संगीतातील एक प्राचीन तंतुवाद्य असून वैदिक मंत्राच्या स्वर-गणनेसाठी तिचा उपयोग केला जायचा.” संत नामदेवापासून तुकारामाच्या गळ्यात वीणा दाखवली जाते. परंतु तुकारामाच्या अभंगात वीणेचा कुठेही साधा उल्लेख सापडत नाही. याउलट श्रमिक समाजाची वाद्यं असलेल्या टाळ, चिपळ्या आणि मृदंगाचा उल्लेख अनेक अभंगात सापडतो.

तुकारामाच्या गळ्यातील वीणा ब्राह्मणी प्रतीक असलेले काल्पनिक चित्र असावे.

व्हिडिओ पहाः ‘वामनदादांचा हात कुणीच धरू शकत नाही’

कारण ज्या गोष्टी लोकांच्या जाणिवेचा भाग बनतात त्याला ब्राह्मणी विचारविश्वाने नेहमीच आपल्या अभिजात ब्राह्मणी परंपरेत सामावून घेतले आहे. त्याचा अपहार केला आहे, तिला ब्राह्मणी रुप दिले आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आणि पेशवाईच्या अस्तानंतर ब्राह्मणी सत्तेला जो राजकीय सत्तेत फटका बसला तो भरून काढण्यासाठी ब्राह्मणांनी सांस्कृतिक सत्ता उभारल्या आणि त्यामध्ये कष्टकरी श्रमिक समाजाच्या लोककलांचे संगीतवाद्यांचे ब्राह्मणीकरण अथवा अपहरण करण्यात आले.

आणि त्यानंतर श्रमिक कष्टकरी समूहाची मालकी आणि निगराणी नष्ट होऊन त्याचं अस्पृश्य वर्गाला संगीत आणि संगीत वाद्य यांच्या परंपरेतून वगळण्यात आले.

वारकरी परंपरेतील मृदंग हे चर्मवाद्य मूळ द्रविडियन वाद्य असून ते दक्षिणेकडच्या अस्पृश्य समूहाकडून वारकरी संप्रदयात आले आहे!तर वीणा हे तंतुवाद्य उत्तरेकडच्या भागवत धर्माकडून मूळच्या वारकरी संप्रदयात चिटकवले गेले असावे. एकतारी,संबळ,टिमकी, तुणतुणे, किंगरी ही शोषित समूहांची वाद्यं सोडली तर वीणा, संतूर आणि सारंगी ही अभिजात संगीत वाद्यं रेशीममार्गाद्वारे पर्शियामधून आलेली वाद्यं आहेत. आज ही सगळ्यात जास्त चांगले वीणा वादक हे पाकिस्तान मध्ये आहेत. शास्त्रीय संगीताची एक चांगली परंपरा पाकिस्तानमध्ये सांभाळली जात आहे. शिवाय वीणा, संतूरसारखी ब्राह्मणी-अभिजात संगीतात वापरत असलेली वाद्ये पाकिस्तानमधील क्वेटा येथे बनतात. तर भारतात मिरज, कानपूर, अजमेरमधल्या मुस्लिम धर्मीयांकडून बनवली जातात.

मूळ चर्म व तंतुवाद्य शूद्र, भटक्या अशा शोषित समूहांतून आलेली आहेत. आणि ही वाद्यं अस्पृश्य समूहाने ब्राह्मणी परंपरेला दिलेला एक सांस्कृतिक पर्याय होता. पेशवाईनंतर ब्राह्मणांची राजकीय सत्ता गेल्यानंतर ब्राह्मणांकडून सांस्कृतिक सत्ता अबाधित ठेवण्यासाठी अभिजात संगीताचा वापर करण्यात आला.

*****

कडूबाईच्या एकतारीवरील गाण्याला एक सौंदर्य बोध आहे. एकतारी तिच्या गाण्याला सहजता आणि हृदयाची सखोलता प्राप्त करून देते.

"एक कथा सुनो रे लोगो" म्हणत शाहीर विलास घोगरे, प्रल्हाद शिंदे, विष्णु शिंदे आणि कडूबाई खरात यासारख्या आंबेडकरी कलावंतांनी रस्त्यावर आणि दारोदारी भ्रमंती करून एकतारीवर आंबेडकरी गाणी गायली आहेत. एकतारी ही जगातल्या सर्व भटक्या समूहांचे वाद्य असल्याने एकतारी स्वतःमध्येच एक भ्रमंती आहे!

व्हिडिओ पहाः ‘मी सगळ्या अंधश्रद्धा सोडून दिल्या’

अस्पृश्यांच्या संपूर्ण संगीतामध्ये जसे एकतारीचे महत्त्वाचे योगदान आहे तसेच त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीमध्येही एकतारीचे खूप महत्त्व राहिले आहे. जसजसा विज्ञानाचा विकास होऊन नवीन संगीत वाद्यं येऊ लागली, या नवीन वाद्यसंगीताने अनेक लोक परंपरा आणि लोकवाद्यं संपवली. त्यामध्ये एकतारीही संपली जात आहे. एकतारी परंपरेत गाणारी कडूबाई ही कदाचित शेवटची कलाकार आणि गायक असेल! आपली पारंपरिक वाद्य सोडून अलीकडच्या काळात ब्राह्मणी आणि आधुनिक संगीताचा वापर आंबेडकरी गायकांमध्ये वाढू लागला आहे.

"वाट माझी बघतोय रिक्षावाला" यासारख्या गाण्यावर आंबेडकरी गीत गायले जात आहेत. आंबेडकरी गीत आणि संगीतात नवी संगीतवाद्यं अस्पृश्य नाहीत. परंतु आपली शैली या वाद्यातून जाते का? आपला संदेश आपली अर्थता त्यामधून पोहोचते का? आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचत आहे का? हा मुद्दा आहे. नवे वाद्य मानव समाजाने विकसित केले आहे आणि ते आपल्या संगीताचा विकास करण्यासाठी वापरले जावे. परंतु तद्दन सिनेमातल्या चाली, लोकप्रिय चालींमध्ये आंबेडकरी गीतं गायली जात आहेत. ती केवळ कर्कश्श बनली आहेत. या संगीतवाद्यांमध्ये आंबेडकर भक्ती आणि अस्मितेशिवाय आंबेडकर यांचे कुठलेच खोलवरचे तत्वज्ञान दिसत नाही. तत्वज्ञानाचे आकलन, भान आणि समजेशिवाय जे प्रयोग केले जातात ते केवळ लोकांना नाचवतात. ते दीर्घकाळ टिकत नाहीत. लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. लोकांच्या सामूहिक स्मरणाचा भाग बनत नाहीत.

कडूबाईच्या आवाजात हजारो वर्षाच्या गुलामीच्या विरुद्धचा आवाज आहे. अत्यंत दारिद्र्य आणि प्रतिकूलतेतून वर आलेली ही लोकांची गायिका आहे. कडूबाईच्या गाण्यातून जात, धर्म, अस्पृश्यता आणि गुलामी किती अमानुष आणि क्रूर होती आणि अजूनही आहे याची कल्पना येते. कडूबाईच्या एकतारीवरचा जातसमूह आणि वडिलांकडून आलेला वारसा समृद्ध आहे. एकतारीवरचे गाणे सहजपणे हृदयाला भिडणारे आहे.

मह्या भीमानं, भीमानं माय, सोन्यानं भरली ओटी
किंवा
माझ्या भीमाच्या नावाचं
कुंकू लाविलं रमानं

किंवा
अशी मधुर, मंजुळ वाणी

माझ्या रमाईची कहाणी

या गाण्यात सामान्य माणसाला कळणारे आंबेडकरी तत्वज्ञान, आंबेडकर यांच्या प्रतीची कृतज्ञता, रोजच्या जगण्यातली दुःखं, संघर्ष आणि खोलवरचे अध्यात्म आहे. आणि जगण्याची खोलवरची समज सुद्धा! भटकंती करून मोजक्याच लोकांनी व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष आपल्या आवाजातूनच सुरू ठेवला आहे. एका बाजूला व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष व दुसऱ्या बाजूला आपल्या इतिहासाची आठवण आपल्या  कंठातून आणि वाद्यांतून जिवंत ठेवली आहे. त्यापैकीच एक आहे कडूबाई!!

'Influential Shahirs, Narratives from Marathwada’  (मार्गदर्शक शाहीर, मराठवाड्यातील गीते-कथने) या चित्रफितींच्या संग्रहातील ही एक चित्रफीत असून इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स तर्फे त्यांच्या संग्रह व वस्तूसंग्रह कार्यक्रमांअतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा हा भाग आहे. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गोइथ इन्स्टिट्यूट/मॅक्स मुलर भवन दिल्ली यांचे आंशिक अर्थसहाय्य या प्रकल्पास लाभले आहे.

Keshav Waghmare

Keshav Waghmare is a writer and researcher based in Pune, Maharashtra. He is a founder member of the Dalit Adivasi Adhikar Andolan (DAAA), formed in 2012, and has been documenting the Marathwada communities for several years.

Other stories by Keshav Waghmare
Illustration : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi