“आजही कुणी मला गाणी वाचून दाखवू द्या, मी गायला तयार आहे,” ७१ वर्षांचे दादू नाना साळवे सांगतात. अहमदनगरच्या गौतमनगरमध्ये दहा बाय दहाच्या त्यांच्या खोलीत आम्ही बोलत होतो. भीमगीतांसाठी, आंबेडकरी विचारासाठी आयुष्य अर्पण केलेला हा सत्तरी पार केलेला हा थोर संगीतकार आणि गायक आजही तळमळीने, कळकळीने आमच्याशी बोलत होता. भिंतीशी असलेल्या कपाटावर तबला, पेटी आणि ढोलकी आणि खाली दादू साळवेंचे गुरू वामनदादा कर्डक यांची तसबीर.

गेली जवळपास साठ वर्षं आपल्या गाण्यातून जनतेच्या चेतनेत समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय या मूल्यांची पेरणी करणाऱ्या भीमशाहिराची ही गोष्ट.

दादू साळवेंचा जन्म ९ जानेवारी १९५२ रोजी नालेगाव, ता. जि. अहमदनगर इथे झाला. वडील नाना यादव साळवे लष्करात होते. आई तुळसाबाई घरातील सगळे पाहून मजुरीला जायच्या.

In Dadu Salve's home in Ahmednagar is a framed photo of his guru, the legendary Bhim Shahir Wamandada Kardak , and his musical instruments: a harmonium, tabla and dholaki.
PHOTO • Amandeep Singh
Salve was born in Nalegaon in Ahmadnagar district of Maharashtra
PHOTO • Raitesh Ghate

डावीकडेः अहमदनगरच्या गौतमनगरमध्ये दादू साळवेंच्या घरी एका कपाटात दिसणारा शाहीर वमानदादा कर्डक यांचा फोटो, हार्मोनियम, तबला, ढोलकी ही वाद्यं. उजवीकडेः दादू साळवेंचा जन्म अहमदनगरच्या याच नालेगावमध्ये झाला

दलितांच्या पहिल्या पिढीत सामाजिक प्रबोधनाचा वारसा लष्करातील लोकांमुळे आला. ब्रिटिश लष्करातल्या नोकरीमुळे दलितांना रोजीरोटी तर मिळालीच पण इंग्रजी शिक्षणाने नवी दृष्टी पण मिळाली. समाजव्यवस्था समजू लागली. नवे आत्मभान आले. स्वतःची परिस्थिती बदलण्याचे, त्यासाठी संघर्ष करण्याचे नैतिक बळ मिळाले.

दादूंचे वडील नाना साळवे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर पोस्टात पोस्टमन म्हणून रुजू झाले. त्याशिवाय ते आंबेडकरी चळवळीतही सक्रिय होतेच. चळवळीने भारावून गेलेला तो काळ होता. वडलांमुळे ती चळवळ त्यांना जवळून अनुभवता आली.

या दोघांशिवाय दादूंच्या आयुष्यात आणखी एक विलक्षण माणूस होता. तो म्हणजे त्यांचा आजा, कडूबाबा.

१९६०-६५ च्या दरम्यानची गोष्ट. अहमदनगर जिल्ह्यातल्या एका गावी भली मोठी दाढी वाढवलेल्या एका गृहस्थाशी एक परदेशी अभ्यासक बोलत होती. “तुम्ही दाढी का वाढवली आहे?” हा प्रश्न ऐकून त्या माणसाच्या डोळ्यात आसवे गोळा झाली आणि ते ऐंशी वर्षाचे म्हातारबाबा ढसाढसा रडू लागले. जराशाने शांत झाल्यावर त्यांनी सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मी त्यांना विनंती केली, ‘पाच मिनिटांसाठी का होईना हरेगाव या आमच्या वस्तीला भेट द्या. तिथे मोठा समुदाय तुमच्या दर्शनासाठी ताटकळत उभा आहे.’ परंतु बाबासाहेबांना मुळीच वेळ नव्हता. त्यांनी मला समजावणीच्या सुरात सांगितलं की ‘पुढील वेळी हरेगावला नक्की येईन’. तेव्हाच मी निर्णय घेतला की बाबासाहेब जोपर्यंत आमच्या गावाला भेट देणार नाहीत तोपर्यंत मी दाढी करणार नाही.”

खूप वर्षे या दाढीला कुरवाळीत ते बाबासाहेबांची वाट पाहत राहिले. पुढे बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. “तेव्हापासून माझी ही दाढी तशीच आहे. मी आता या जगाचा निरोप घेईपर्यंत ती तशीच राहील,” त्यांनी सांगितलं. ते वृद्ध गृहस्थ म्हणजे दादूंचे आजोबा कडूबाबा आणि त्यांच्याशी बोलत असलेली परदेशी अभ्यासक म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या विख्यात अभ्यासक एलेनॉर झीलियट. आंबेडकरी विचाराशी निष्ठा ही अशी पक्की.

*****

अगदी लहानपणी, एक वर्षांचे असताना दादू यांची दृष्टी गेली. त्यामुळे त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही. अंधत्वामुळे दादूंचे जग घरापुरते सीमित झाले होते. आसपास एकतारीवर भजने गायली जायची तेव्हा त्या भजनांसोबत दादू दिमडी वाजवायचे.

“कुणी तरी येऊन सांगितलं, बाबासाहेब गेले म्हणून. आता मी तेव्हा असेन ५ वर्षांचा. आम्हाला काय माहित, बाबासाहेब कोण होते म्हणून? पण आजूबाजूला लोक रडत होते ते मला ऐकू येत होतं. म्हटलं हा कुणी तरी मोठा माणूस असणार,” दादू सांगतात.

‘मी पाच दिवसांचा होतो तेव्हाच माझे डोळे गेले’ - दादू साळवे आपल्या आयुष्याविषयी सांगतायत

त्या काळी बाळासाहेब दीक्षित यांचे नगरमध्ये दत्त गायन मंदिर विद्यालय चालायचे. त्यांच्या चुलत्यांनी त्यांना तिथे शिक्षणासाठी पाठवलं, पण त्याची फी भरून गाणे शिकावे अशी दादू साळवे यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. ही गोष्ट रिपब्लिकन पक्षाचे तत्कालीन आमदार आर. डी. पवार यांना समजली आणि त्यांनी दादू साळवे यांना संगीत विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. त्याशिवाय नवा कोरा हार्मोनियमही घेऊन दिला. अशा प्रकारे दादू साळवे यांचे संगीत शिक्षण सुरू झाले. पुढे १९७१ साली दादू साळवे यांनी ‘संगीत विशारद’ ही पदवी मिळवली.

नंतर ते प्रसिद्ध कव्वाल मेहमूद कव्वाल निझामी यांच्यासोबत गायनाचे कार्यक्रम करू लागले. त्यावेळी तेच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. पण त्यांचे मन त्यात जास्त दिवस रमले नाही. आंबेडकरी गाणे ऐकत लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांना चळवळीच्या गाण्यात रस होता. ते संगमनेरच्या कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या कलापथकात सामील झाले. त्यावेळी कॉम्रेड भास्कर जाधव यांनी ‘वासुदेवाचा दौरा’ हे नाटक बसवले होते. या नाटकासाठी दादू साळवे यांनी गाणी संगीतबद्ध केली. ते स्वतः ती गाणी गायचे.

लोककवी केशव सुखा आहेर यांनाही दादू साळवे यांनी ऐकले आहे. आहेर यांचं जन्मगाव निगुण, ता. संगमनेर. विद्यार्थी असतानाच आहेर यांचा आंबेडकरी चळवळीशी संबध आला होता. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी लोककवी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बालवीर स्काऊट नाशिक येथे मुक्कामाला आले होते. या मुक्कामात भीमराव कर्डकांचा जलसा लोककवी केशव सुखा आहेर यांनी पाहिला आणि त्यांच्या आतला कवी जागा झाला. नोकरीमुळे मुक्तपणे जलशाचे कार्यक्रम करता येत नाहीत म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ध्येयापोटी त्यांनी नोकरीची सुद्धा पर्वा केली नाही असे ते कलाकार होते.

स्वतंत्र मजूर पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ७ नोव्हेंबर १९३८ रोजी इंग्रज राजवटीने आणलेल्या कामगार विरोधी कायद्यांच्या विरोधात सार्वत्रिक संप पुकारला होता. लोककवी केशव सुखा आहेर यांचा यामध्ये सहभाग होता. या प्रसंगी ‘कामगाराचा संदेश’, ‘मालकांची दडपशाही अर्थात मजुरांचे हाल’ आणि ‘कोकणचा वाघ अर्थात सुभेदार सावकार’, ही पुस्तके प्रकाशित झाली. ‘काव्य पुष्पांजली’ आणि ‘डॉ. आंबेडकरांचा शोक गीत पोवाडा’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.

१९५२ साली डॉ. आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनतर्फे  निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या प्रचारासाठी लोककवी आहेर यांनी नव्या रचना व जलसे लिहिले. समाज जागृती जलसा मंडळ मोडकळीस आल्यामुळे नव्या सहकार्‍यांसह ‘नवभारत जलसा मंडळाची’ स्थापना करून अहोरात्र प्रचार कार्य केले. या नवभारत जलसा मंडळाचे कार्यक्रम दादू साळवे यांनी पाहिले, ऐकले होते.

अहमदनगर जिल्हा तेव्हा डाव्या चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. याबद्दल दादू साळवे असे मांडतात “त्या काळात दादासाहेब रुपवते, आर. डी. पवार ही मंडळी आंबेडकर चळवळीत सक्रिय होती. अहमदनगर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करत होती. माझे वडील त्यांच्यासोबत काम करायचे. या निमित्ताने अनेक पुढारी आमच्या घरी यायचे.”

Madhavrao Gaikwad and his wife Sumitra collect material around Wamandada Kardak. The couple  have collected more than 5,000 songs written by hand by Wamandada himself. Madhavrao is the one who took Dadu Salve to meet Wamandada
PHOTO • Amandeep Singh

माधवराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नी, सुमित्रा शाहीर वामनदादा कर्डकांचं संगीत, लेखन आणि इतर साहित्य संकलित करतात. दोघांनी मिळून आजवर वामनदादांची ५,००० हून जास्त गाणी लिपीबद्ध करून प्रकाशित केली आहेत. दादू साळवेंना सर्वप्रथम वामनदादांकडे घेऊन जाणारे माधवरावच होते

डॉ. आंबेडकरांनंतर चळवळीत बी. सी. कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांच्या सभा आपण ऐकल्या असल्याचं दादू सांगतात. दादासाहेब गायकवाड व बी. सी. कांबळे यांच्यात संघर्ष निर्माण होऊन आंबेडकरी चळवळीत दोन गट निर्माण झाले. तेव्हा त्याचे पडसाद गाण्यात उमटू लागले. “दोन्ही गटाच्या वतीने प्रचंड कलगी-तुरा चालायचा,” दादू सांगतात. बी. सी. कांबळे यांच्या गटाच्या वतीने दादासाहेब गायकवाड यांच्यावर टीका करण्यासाठी गाणे रचण्यात आलेः

नार म्हातारपणी फसली!

लालजीच्या घरात घुसली!!

दादासाहेब गायकवाड यांच्या वतीने त्याला उत्तर म्हणून पुढील गाणे लिहिलेः

तू पण असली कसली?
पिवळी टिकली लावून बसली!

“बी. सी. कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षात फूट पडल्यानंतर स्वतःच्या पक्ष्याच्या निळ्या झेंड्यावर मध्यभागी अशोक चक्राऐवजी पिवळा पूर्णचंद्र टाकला होता.” पिवळी टिकलीचा संदर्भ दादूंकडून समजतो.

बी.सी. कांबळे यांच्या पक्षात असलेले दादासाहेब रुपवते हे १९६५ साली  काँग्रेस पक्षात गेल्यावर

अशी होती एक नार गुलजार
अहमदनगर गाव तिचे मशहूर
टोप्या बदलण्याचा छंद तिला फार
काय वर्तमान घडलं म्होरं S....S....S
ध्यान देऊन ऐका सारं

असा हा गाण्यातून चालणारा आंबेडकरी चळवळीचा कलगीतुरा मी नगरच्या अनेक सभेत ऐकत मोठा  होत होतो,” दादू सांगतात.

Dadu Salve and his wife Devbai manage on the meagre pension given by the state government to folk artists. Despite these hardships, his commitment to the Ambedkarite movement and his music are still the same
PHOTO • Amandeep Singh
Dadu Salve and his wife Devbai manage on the meagre pension given by the state government to folk artists. Despite these hardships, his commitment to the Ambedkarite movement and his music are still the same
PHOTO • Labani Jangi

दादू साळवे आणि त्यांच्या पत्नी देवबाई शासनाकडून लोककलावंतांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर गुजराण करत आहेत. अनेक हाल अपेष्टा असतानाही आंबेडकरी विचार व चळवळ तसेच भीमगीतांप्रती असणारी दादूंची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही

*****

१९७० साली माधवराव गायकवाड यांनी त्यांची भेट वामनदादा यांचे सोबत घडवून आणली. वामनदादा कर्डक यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळीचा विचार आपल्या गाण्याद्वारे बुलंद आणि पहाडी आवाजात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचे कार्य अविरतपणे आयुष्याच्या शेवटापर्यंत केले.

अहमदनगरचे माधवराव गायकवाड, वय ७५ हे वामनदादा कर्डक यांच्या गीताचे संग्राहक. माधवराव आणि त्यांच्या पत्नी, सुमित्रा गायकवाड, वय ६१ यांनी वामनदादांच्या हस्ताक्षरातील पाच हजार गाणी संग्रहित केली आहेत. माधवराव सांगतात, “१९७० साली वामनदादा नगरला आले होते. ॲड. साठे यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. आपणही गायन पार्टी निर्माण करून आंबेडकरी चळवळीचं काम करावं असं वाटत होतं. नगर जिल्ह्यात दादू साळवे आंबेडकरी गीत गायन करायचे. परंतु दादू साळवे यांच्याकडे स्वतःची गाणी नव्हती. तेव्हा आम्ही वामनदादा यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘आम्हाला तुमची गाणी हवी आहेत.’

ते म्हणाले ‘मी कधी संग्रह केलाच नाही. मी लिहिलेली गाणी माझ्याकडेच नाहीत. मी लिहिली, गायली आणि नंतर तिथेच सोडून दिली.’ इतका प्रतिभावंत कलाकार. संपूर्ण आयुष्य आंबेडकर चळवळीला दिलेला. त्यांची गाणी अशी लयाला जावी, याचं मला वाईट वाटलं.”

त्यानंतर माधवराव वामनदादांचा नगर जिह्यात जिथे कार्यक्रम असायचा तिथे दादू साळवेंना घेऊन जाऊ लागले. “दादू वामनदादांसोबत हार्मोनियम वाजवायचे तर मी वामनदादा यांनी गायलेले गाणं लिपीबद्ध करायचो. वामनदादा यांची अशी पाच हजार गाणी मी लिपीबद्ध करून पाच खंडात प्रकाशित केली आहेत. वामनदादांच्या तीन हजार गाण्याचे हस्तलिखित अजूनही अप्रकाशित आहे. आर्थिक अडचणीमुळे मी ते अजून प्रकाशित करू शकलो नाही. वामनदादा आणि आंबेडकरी चळवळीची ही वैचारिक संपदा मी दादू साळवे यांच्यामुळे जतन करू शकलो,” माधवराव सांगतात.

दादू साळवे यांनी वामनदादांकडून प्रेरणा घेऊन नव्या पद्धतीने कलापथक बांधण्याचा निश्चय केला. शंकर तबाजी गायकवाड, संजय नाथा जाधव, राघू गंगाराम साळवे, मिलिंद शिंदे यांच्या सोबतीने त्यांनी ‘भीम संदेश गायन पार्टी’ सुरू केली. त्यांचे सारे गाणे ध्येयवादाने प्रेरित असल्यामुळे ते अत्यंत निर्मळ आहे. त्यावेळी रचलेले गाणे त्यांनी म्हणून दाखवले ते असे,

या व्हिडिओमध्ये दादूंच्या बोलण्यातून आणि गाण्यातून आपल्या गुरूप्रती असलेली त्यांची श्रद्धा आणि प्रेम व्यकत होते

उभ्या विश्वास ह्या सांगू तुझा संदेश भिमराया
तुझ्या तत्वाकडे वळवू आता हा देश भिमराया || धृ ||
जळूनी विश्व उजळीले असा तू भक्त भूमीचा
आम्ही चढवीला आता तुझा गणवेश भिमराया || १ ||
मनुने माणसाला माणसाचा द्वेष शिकविला
तयाचा ना ठेवू आता लवलेश भिमराया || २ ||
दिला तू मंत्र बुद्धाचा पवित्र बंधुप्रेमाचा
आणू समता हरू दीनांचे क्लेश भिमराया || ३ ||
कुणी होऊ इथे बघती पुन्हा सुलतान ह्या भूचे
तयासी झुंजते राहू आणुनी त्वेष भिमराया || ४ ||
कुणाच्या रागलोभाची आम्हाला ना तमा काही
खऱ्यास्तव आज पत्करला तयांचा रोष भिमराया || ५ ||
करील उत्कर्ष सर्वांचा अशा ह्या लोकशाहीचा
सदा कोटी मुखांनी ह्या करू जयघोष भिमराया || ६ ||
कुणाच्या कच्छपी लागून तुझा वामन खुळा होता
तयाला दाखवित राहू तयाचे दोष भिमराया || ७ ||

वामनदादा यांचे गाणे दादू साळवे गावोगाव जाऊन म्हणू लागले. लोक गाणं ऐकायला उत्सुक असायचे. बाळ जन्माला आले, घरात कोणी मृत्यू पावले, घरात काही धार्मिक कार्यक्रम असला तरी गाण्याचा कार्यक्रम केला जायचा. अशा ठिकाणी बिदागी म्हणून केवळ एक नारळ आणि कलाकार मंडळीला चहा मिळायचा. त्याकाळी गाण्यातून पैसा कमावणे हे कोणाचे ध्येय नव्हते. केवळ स्वतःच्या आनंदासाठी आणि आंबेडकरी चळवळीत काही करता यावं यासाठी अनेक माणसं अशी धडपडत असायची.

दादू साळवे सांगतात, “मला गाणं जमत होतं म्हणून मी आंबेडकरांचं गाणं गात चळवळीत मला जे करता आलं ते करत राहिलो. गाण्याचा हा वारसा मला वामनदादांकडून मिळाला आहे.”

*****

‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे समाजाचं परिवर्तन कसं झालं त्याचं हे सुंदर गीत

महाराष्ट्रात अनेक गायक वामनदादांचा वारसा सांगतात. दृष्टिहीन असलेल्या दादू साळवे यांनीसुद्धा तीच परंपरा चालवली. त्यांनी आयुष्यभर ती गाणी उराशी बाळगत जनतेपर्यंत पोहोचविली. वामनदादांचा संदेश महाराष्ट्रात सर्वदूर पोहचविला. दृष्टी नसल्याने वाचता येत नसलं तरी वामनदादा यांची कविता ते मनोमन जगत आहेत.

वामनदादा यांची दोन हजार पेक्षा अधिक गाणी त्यांना पाठ आहेत. आणि फक्त पाठ नाहीत तर ते गीत कधी लिहिले गेले, त्याची पार्श्वभूमी काय, मूळ चाल काय आहे, असा सर्व तपशील दादू यांना माहीत आहे. वामनदादांनी जे "जाति-विरोधी" गीत लिहिले त्याला संगीत देण्याचे काम दादू साळवे यांनी केले. त्यांना रागातील सर्व बारकावे, ताल अंतर्दृष्टीसह संगीत अवगत आहे.

वामनदादा गाणी लिहायचे आणि गायचे. परंतु गाण्याबाबत त्यांचे कोणतेही तांत्रिक शिक्षण झालेले नव्हते. दादू साळवे यांनी मात्र संगीतामध्ये पदवी मिळवली होती. त्यांना संगीताचे, गाण्यांच्या चालीचे आकलन होते. ताल, ठेका, लय, सूर यांचे व्याकरण त्यांनी आत्मसात केले होते. वामनदादांसोबत याबद्दल त्यांचे खूप बोलणे व्हायचे. अनेक गाण्यांना नंतर दादूंनी स्वतः चाली लावल्या. वामनदादांची मूळ चाल आणि दादूंनी लावलेली चाल त्यांनी आम्हाला गाऊन दाखविली.

भीमा तुझ्या मताचे जरी पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते

दादू आणि वामनदादांमध्ये इतके विश्वासाचे नाते होते की आपल्या मृत्यूबद्दलचे गाणे त्यांनी दादूंना दिले होते.

राहील विश्व सारे, जाईन मी उद्याला
निर्वाण गौतमाचे, पाहीन मी उद्याला

दादूंनी या गाण्याला अतिशय सुंदर चाल लावली आणि ते गीत ते जलशात गात असत.

*****

संगीत हा त्यांच्यासाठी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तसाच तो त्यांच्या चळवळीचाही भाग आहे!

दादू साळवे यांचा काळ म्हणजे सत्यशोधक आणि आंबेडकरी जलशांचा भर ओसरल्यानंतर आंबेडकरी लोकगीतांचा काळ सुरु झाला. भीमराव कर्डक, लोककवी अर्जुन हरी भालेराव, बुलढाण्याचे केदार बंधू, पुण्याचे, राजानंद गडपायले, श्रावण यशवंते, वामनदादा कर्डक हे अशा आंबेडकरी लोकगीतांचे शिरोमणी. यांची अनेक गाणी दादू साळवे यांनी खेड्यापाड्यात फिरून महाराष्ट्रभर  पोहचवली. अशा गाण्यातून आंबेडकरोत्तर काळात चळवळीत आलेली पिढी घडली. ती पिढी आज आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे. या आंबेडकरी पिढ्या घडवण्यात दादू साळवे यांनी आपल्या गाण्याने हातभार लावला आहे.

राबणारा शेतकरी, लढणारा दलित यांचा आवाज बनलेली गाणी अनेक कवींनी लिहली. त्यांच्या वेदना आणि संघर्ष त्यातून मांडला. त्या शब्दांना दादू साळवे यांनी आवाज दिला. शब्दांना पंख फुटले आणि ती लोकजीवनाचा भाग बनली. लोकात जाग आणणारी ही गाणी दादू साळवे यांनी आयुष्यभर गायली. त्यांच्या कलेची निष्ठा ही कायम परिवर्तनाशी राहिली आहे. आंबेडकर यांच्या विचाराशी आहे. चळवळीचे महानायक तथागत बुद्ध, संत कबीर, क्रांतीबा फुले, आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र आणि चारित्र्य नितळपणे गाण्याच्या माध्यमातून मांडण्याची एक प्रकारची चढाओढच आंबेडकरी कवी-गीतकारांमध्ये लागलेली दिसते. जे लोक वाचन, लेखन जाणत नव्हते त्यांच्यासाठी गाण्याच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर आणि त्यांचे विचार सर्वदूर महाराष्ट्रत पोहचवले. जनतेच्या मुक्तीसाठी उभ्या झालेल्या संघर्षात, सभेत, मोर्चात दादू साळवे आपला आवाज आणि हार्मोनियम घेऊन कायम उभे राहिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समाजक्रांतीचा विचार जनमानसात रुजवण्यात, खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यात पोहोचवण्याचं काम अखंडपणे दादू साळवे यांनी केलं. परिवर्तनाचं, व्यवस्था बदलाचं गाणं त्यांनी उत्साह आणि चळवळीच्या प्रतिबद्धतेने गायले. वामन दादा कर्डक, लक्ष्मण केदार, हरी अर्जुन भालेराव, विठ्ठल उमप, प्रतापसिंह बोदडे, प्रल्हाद शिंदे, दादू साळवेंसारख्या असंख्य आंबेडकरी शाहिरांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहचवली. दलितांची मानसिकता आणि धारणाच या शाहिरांनी बदलून टाकल्या. शाहिरांनी दिलेल्या संदेशाच्या परिणामस्वरूपी जातीव्यवस्था विरोधी आंदोलन खेड्यापाड्यात पोहचले. लोकांना त्यांच्या भाषेत समजले. डॉ. आंबेडकर यांच्या आंदोलनाची ही गाणी उर्जादायी प्रेरणा देऊन जातात. दादू साळवे या आंदोलनात स्वतःला भीमाचा शिपाई समजतात!

दलित व मार्क्सवादी साहित्याचे गाढे अभ्यासक मेहबूब शेख ‘दादूंचं गाणं आणि त्यांची दृष्टी’ याविषयी बोलतात

उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी कधीच आंबेडकरी गीताकडे पाहिले नाही. पण आज वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचा उदरनिर्वाहच अवघड होऊन बसला आहे. आता ते थकले आहेत. एकुलता एक मुलगा २००५ साली अपघातात मरण पावला. त्यावेळी सुनेसह तीन नातवंडांचा सांभाळ त्यांना करावा लागला. पुढे सुनेने वेगळा संसार मांडला. त्यांनी तिच्या स्वातंत्र्याचा आदर करत आपलं राहतं घर सोडून दुसरीकडे जागा शोधली. नगरपालिकेकडून मिळालेल्या दहा बाय दहाच्या घरात ते सध्या राहतात. लोककलावंत म्हणून जे अल्प मानधन मिळते त्यात वृद्ध आणि अपंग पत्नी ६५ वर्षीय देवबाई साळवे कसेबसे जीवन जीवन जगत आहेत. कितीही हाल अपेष्टा असल्या तरी आंबेडकरी चळवळ, भीमगीतं आणि संगीताप्रती असलेली त्यांची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही.

आज आंबेडकरी चळवळीत चळवळीला समांतर अशी नव्या प्रकारच्या गीतांची परंपरा निर्माण झालेली आहे. परंतु ती काहीशी बाजारू आणि उथळ बनली आहे. परंतु “अलिकडची लोक केवळ बिदागीसाठी, प्रसिद्धीसाठी या शाहिरीचा बाजार मांडतायत. ते पाहून काळजाला घरं पडतात,” दादू म्हणतात.

शाहीर दादू साळवेंना या गीतांबद्दल बोलताना पाहणे, तोंडपाठ असलेली गाणी त्यात प्रेमाने गाताना ऐकणे, बाबासाहेब आणि वामनदादांविषयी त्यांची श्रद्धा अनुभवणे हा मनाला उभारी देणारा अनुभव असतो.

दादू साळवे यांच्या आवाजातील भीमगीते उदासीनता आणि नैराश्यावर मात करण्याचे सामर्थ्य आपल्याला देतात. सामाजिक उदासीनतेवर भीमगीत सर्वात मोठे औषध आहे. हा इलाज आहे. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने जे नवे जागरण होऊ घातले होते त्या जागरणाचा उगवतीचा अविष्कार म्हणूनच दादू साळवे यांच्या शाहीरीचा विचार करणे अपरिहार्य आहे. जी दलित शाहीरी पुढे नव्या सामाजिक विचारांनी सिद्ध झाली. त्याची नोंद म्हणून दादू साळवे यांच्या योगदानाची, त्यांच्या रचनेची लक्षणीयता अटळ आहे. भीम गीतांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचे व जीवनाचे वर्णन करून त्यांना प्रोत्साहन देणारे, आपण विषम समाजव्यवस्थेपुढे हार मानणार नाही याची जाणीव करून देते. अजूनही काळ बदललेला नाही. आंबेडकरी शाहीर पैसा आणि वैयक्तिक वाढीसाठी काम करत नाहीत हेच दादू साळवे यांचे गाणे आपल्याला सांगत राहते.

मुलाखत संपत येते आणि दादू जरासे मागे रेलतात. काही नवीन गीतांबद्दल विषय काढताच ते अगदी उत्साहात म्हणतात, “आजही कुणी मला गाणी वाचून दाखवू द्या, मी गायला तयार आहे.”

आंबेडकरी चळवळीचा हा शिपाई आजही आपला आवाज आणि पेटी घेऊन न्याय, समानता आणि निर्णायक सामाजिक बदलासाठी काम करायला सज्ज आहे.

हा लेख आणि चित्रफिती 'Influential Shahirs, Narratives from Marathwada’ (मार्गदर्शक शाहीर, मराठवाड्याची गीते-कथने) या मालिकेतील असून इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स तर्फे राबवण्यात येणाऱ्या संग्रह व वस्तूसंग्रह कार्यक्रमाचा भाग आहेत. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पास गोइथ इन्स्टिट्यूट/मॅक्स मुलर भवन दिल्ली यांचे आंशिक अर्थसहाय्य लाभले आहे.

Keshav Waghmare

Keshav Waghmare is a writer and researcher based in Pune, Maharashtra. He is a founder member of the Dalit Adivasi Adhikar Andolan (DAAA), formed in 2012, and has been documenting the Marathwada communities for several years.

Other stories by Keshav Waghmare
Editor : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale
Illustration : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi