‘‘माझे अब्‍बू मजुरी करत असत, पण मासेमारी करायला खूप आवडायचं त्‍यांना. किलोभर तांदळासाठी पुरतील एवढेच पैसे ते जेमतेम दिवसभरात कमवायचे आणि मग… नंतरचा संपूर्ण दिवस ते आणि त्‍यांची मासेमारी!’’ बेलडांगामधल्‍या उत्तरपारा गावात राहाणारी कोहिनूर बेगम आपल्‍या घराच्‍या गच्‍चीवर बसून सांगत असतात. ‘‘माझी अम्‍मी मग घरातलं बाकीचं सगळं बघायची.’’

‘‘अब्‍बूंनी आणलेल्‍या त्‍या एक किलो तांदळात आम्ही किती जण जेवायचो? आम्ही चार मुलं, आमची दादी, अब्‍बू, अम्‍मी आणि आमची आत्‍या,’’ बोलता बोलता ती क्षणभर थांबते आणि म्हणते, ‘‘वर त्‍यातला थोडा तांदूळ अब्‍बू तिच्‍याकडून मागून न्यायचे, माशांना आमिष म्हणून. या माणसाचं काय करावं ते आम्हाला कळायचंच नाही!’’

बंगालमधल्‍या मुर्शिदाबाद जिल्ह्यात असलेल्‍या जानकी नगर प्राथमिक शाळेत ५५ वर्षांच्या कोहिनूर आपा मुलांसाठी मध्यान्‍ह भोजन बनवतात. हे काम करून उरलेल्‍या वेळात त्या विड्या वळतात आणि या कामात असलेल्‍या महिलांच्‍या हक्‍कांबद्दल लोकांमध्ये जागृती करतात. मुर्शिदाबादमध्ये अत्‍यंत हलाखीत जगणार्‍या बायका विड्या वळतात. प्रचंड थकवणारं काम आहे हे. लहान वयापासूनच सतत तंबाखूच्‍या संपर्कात आल्‍याने त्‍यांच्‍या आरोग्‍याला खूप मोठा धोका निर्माण होतो. (वाचा : विड्या वळता वळता वठलं आयुष्य आणि आरोग्‍य)

२०२१ साली डिसेंबर महिन्यातल्या एका सकाळी विडी कामगारांच्‍या एका आंदोलनात कोहिनूर आपा मला भेटल्या. नंतर, थोडी फुरसत मिळाल्‍यावर आपल्‍या बालपणाबद्दल बोलल्या, विडी कामगारांचं अत्‍यंत कष्टदायक काम आणि शोषण करणारी परिस्‍थिती सांगणारं स्‍वतः रचलेलं गाणंही गायल्या.

लहानपणी कोहिनूर आपाच्‍या घरची आर्थिक परिस्‍थिती खूपच वाईट होती आणि त्‍यामुळे घरात सतत काही ना काही कुरबुर चालू असायची. छोट्या कोहिनूरला ते सहनच व्‍हायचं नाही. ‘‘जेमतेम नऊ वर्षांची होते तेव्‍हा मी,’’ त्या सांगतात. ‘‘एक दिवस सकाळी मी पाहिलं, कोळसा, लाकूड आणि गोवर्‍या घालून चूल पेटवताना अम्‍मी रडतेय. ती चूल पेटवत होती खरी, पण शिजवायला घरात धान्‍यच नव्‍हतं आणि म्हणून ती रडत होती.’’

डावीकडे: आपल्‍या अम्‍मीसह कोहिनूर बेगम. अम्‍मीचा संघर्षानेच त्यांना समाजात आपल्‍या अस्‍तित्‍वाची लढाई लढण्‍याची प्रेरणा दिली. उजवीकडे: डिसेंबर २०२२ मध्ये मुर्शिदाबादमधल्‍या बरहमपूर गावात एका मोर्चाचं नेतृत्‍व करताना कोहिनूर. फोटो सौजन्यः नसीमा खातून

आईला रडताना पाहून कोहिनूरला एक कल्‍पना सुचली. ‘‘आमच्‍या गावात कोळशाचा मोठा डेपो होता. त्‍याच्‍या मालकाच्‍या बायकोला भेटायला मी धावतच गेले. ‘काकीमा, आमाके एक मोन कोरे कोयला देबे रोज? काकी, मला रोज एक मण कोळसा देशील?’ मी तिला विचारलं. मागेच लागले मी तिच्‍या. थोड्या प्रयत्‍नाने ती रोज कोळसा द्यायला तयार झाली. मी मग रिक्षाने रोज डेपोमधून कोळसा आणायला लागले. रोज २० पैसे लागायचे त्‍या वेळी,’’ ती सांगते.

असंच आयुष्य पुढे जात राहिलं. चौदा वर्षांची झाली तेव्‍हा कोहिनूर तिच्‍या उत्तरपारा आणि आसपासच्‍या गावांत स्‍क्रॅप कोळसा (कचर्‍यापासून तयार होणारा कोळसा) विकत होती. वीस किलो कोळसा ती आपल्‍या छोट्या खांद्यावर वाहून आणायची. ‘‘फार पैसे मिळायचे नाहीत यातून, पण निदान आमच्‍या घराचा जेवणाचा प्रश्‍न सुटत होता,’’ ती म्हणते.

आपल्‍या कुटुंबाला आपण मदत करतोय याचं तिला समाधान होतं, पण आयुष्याकडून मात्र आपण हरतोय, असं वाटत होतं. ‘‘रस्‍त्‍यावर कोळसा विकत असताना मला बॅगा खांद्याला लावून शाळा-कॉलेजात आणि ऑफिसमध्ये जाणार्‍या मुली आणि बायका दिसायच्‍या. त्‍यांच्‍याकडे पाहून मला खूप वाईट वाटायचं,’’ कोहिनूर आपा सांगतात. त्यांचा आवाज आता जड व्‍हायला लागतो, पण डोळ्यात दाटू पाहाणारे अश्रू निर्धाराने परतवून लावत म्‍हणतात, ‘‘मलाही बॅग खांद्याला लावून कुठेतरी जायचं होतं…’’

साधारण याच सुमाराला कोहिनूरच्‍या चुलत भावाने महापालिकेने चालवलेल्‍या महिलांच्‍या बचतगटाबद्ल तिला सांगितलं. ‘‘घरोघरी जाऊन कोळसा विकत असताना बर्‍याच महिलांशी माझी गाठ पडत असे, ओळख होत असे. त्‍यांचे कष्ट मला दिसत असत. मी महापालिकेकडे आग्रह धरला की त्‍यांनी मला बचतगटाचं संघटक म्हणून घ्यावं.’’

पण ते शक्‍य नाही, असं कोहिनूरच्‍या चुलत भावानेच तिला सांगितलं. आणि याचं कारण होतं, कोहिनूरकडे औपचारिक शिक्षण नव्‍हतं. बचतगट संघटक म्हणून व्‍यवस्‍थाफनाचं काम होतं, शिवाय अकाउंट्‌स ठेवण्‍याचंही काम करावं लागणार होतं.

‘‘मला मात्र ती मोठी समस्‍या वाटतच नव्‍हती,’’ कोहिनूर सांगते. ‘‘कोळसा विकताना मी हे सगळं करतच होते. अनुभवातून मोजायला, हिशेब करायला शिकले होते.’’ आपण एकही चूक करणार नाही, अशी खात्री तिथे महापालिकेला दिली, मात्र आपल्‍याला हे सगळं लिहून ठेवण्‍यासाठी चुलत भावाची मदत घेऊ देण्‍याची विनंतीही केली. ‘‘इतर सगळं मी व्‍यवस्‍थित केलं असतं,’’ मी म्हणते.

Kohinoor aapa interacting with beedi workers in her home.
PHOTO • Smita Khator
With beedi workers on the terrace of her home in Uttarpara village
PHOTO • Smita Khator

डावीकडे: आपल्‍या घरी विडी कामगारांशी संवाद साधताना कोहिनूर आपा. उजवीकडे : उत्तरपारा गावातल्‍या आपल्‍या घराच्‍या गच्‍चीवर विडी कामगारांसह कोहिनूर आपा

बोलल्‍याप्रमाणे तिने ते केलं. कोहिनूरला बचतगटाचं काम मिळालं. ते करत असताना रोज भेटणार्‍या बायांना अधिकाधिक समजून घेण्‍याची संधी तिला मिळाली. त्‍यापैकी बर्‍याच जणी विड्या वळण्‍याचं काम करत होत्‍या. कोहिनूर आता बचत कॉर्पस तयार करणं, त्‍यातून कर्ज घेणं आणि त्‍याची परतफेड करणं, हे सगळं शिकली.

तरीही पैसा मिळवण्‍यासाठी कोहिनूरला संघर्ष करावाच लागला, पण गावात, वस्‍त्‍यांमध्ये फिरून, माणसांना भेटून करण्‍याच्‍या या कामाचा अनुभव तिच्‍यासाठी ‘अनमोल अनुभव’ ठरला. ‘‘त्‍यामुळे मी राजकीय दृष्ट्या जागरूक झाले. काहीही चुकीचं घडताना पाहिलं की मी लोकांशी वाद घालायचे. आता कामगार संघटनांच्‍या कार्यकर्त्यांचं काम समजून घ्यायला आणि त्‍या कामात सामील व्‍हायला सुरुवात केली,’’ त्या सांगतात.

तिचं कुटुंब, नातेवाईक यांना मात्र हे पसंत पडलं नाही. आणि मग त्‍यांनी नेहमीचाच उपाय योजला… तिचं लग्‍न करून दिलं. वयाच्‍या सोळाव्‍या वर्षी कोहिनूरचं लग्‍न जमालुद्दीन शेख यांच्‍याशी झालं. त्‍यांना तीन मुलं आहेत.

सुदैवाने, कोहिनूरला जे काम आवडत होतं, ते लग्‍नानंतर तिला थांबवावं लागलं नाही. ‘‘माझ्‍या आजुबाजूला जे घडतंय, त्‍याचं मी सतत निरीक्षण करत असायचे. माझ्‍यासारख्या तळागाळात काम करणार्‍या स्‍त्रियांच्‍या अधिकारांवर काही संस्‍था काम करत होत्‍या, त्‍यांचं काम मला आवडत होतं. मी त्‍यांच्‍या कामात सामील व्‍हायला लागले.’’ जमालुद्दीन प्‍लास्‍टिक आणि कचरा वेचण्‍याचं काम करतात. आपा आपलं शाळेतल्‍या मुलांना जेवण बनवण्‍याचं काम करतात आणि मुर्शिदाबाद डिस्‍ट्रिक्‍ट बिडी मजदूर ॲण्‍ड पॅकर्स युनियनचंही काम पाहातात. तिथे ती विडी कामगारांच्‍या हक्‍कांबद्दल या कामगारांना जागरूक करतात. त्‍यांच्‍या हक्‍कांचं उल्‍लंघन होत असेल तिथे तत्‍परतेने आवाज उठवतात.

‘‘फक्‍त रविवारी सकाळी मला थोडासा वेळ मिळतो,’’ शेजारच्‍या बाटलीतलं खोबरेल तेल आपल्‍या तळव्‍यावर घेता घेता त्या म्‍हणतात. आपल्‍या दाट केसांना तेल लावून अगदी हळुवारपणे केस विंचरतात.

केस विंचरून झाल्‍यावर त्या डोक्‍यावर ओढणी घेतात आणि समोरच्‍या छोट्याशा आरशात आपलं रूप न्‍याहाळतात. ‘‘मला गावंसं वाटतंय आज. एकता बिडी बंधाई एर गान शोनाई… (विडी वळणार्‍यांवरचं गाणं ऐका…)’’

व्‍हिडीओ पाहा: कोहिनूर आपाचं कष्टांचं गाणं

বাংলা

একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

শ্রমিকরা দল গুছিয়ে
শ্রমিকরা দল গুছিয়ে
মিনশির কাছে বিড়ির পাতা আনতে যাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

পাতাটা আনার পরে
পাতাটা আনার পরে
কাটার পর্বে যাই রে যাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

বিড়িটা কাটার পরে
পাতাটা কাটার পরে
বাঁধার পর্বে যাই রে যাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
ওকি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

বিড়িটা বাঁধার পরে
বিড়িটা বাঁধার পরে
গাড্ডির পর্বে যাই রে যাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

গাড্ডিটা করার পরে
গাড্ডিটা করার পরে
ঝুড়ি সাজাই রে সাজাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

ঝুড়িটা সাজার পরে
ঝুড়িটা সাজার পরে
মিনশির কাছে দিতে যাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

মিনশির কাছে লিয়ে যেয়ে
মিনশির কাছে লিয়ে যেয়ে
গুনতি লাগাই রে লাগাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

বিড়িটা গোনার পরে
বিড়িটা গোনার পরে
ডাইরি সারাই রে সারাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই
একি ভাই রে ভাই
আমরা বিড়ির গান গাই

ডাইরিটা সারার পরে
ডাইরিটা সারার পরে
দুশো চুয়ান্ন টাকা মজুরি চাই
একি ভাই রে ভাই
দুশো চুয়ান্ন টাকা চাই
একি ভাই রে ভাই
দুশো চুয়ান্ন টাকা চাই
একি মিনশি ভাই
দুশো চুয়ান্ন টাকা চাই।

मराठी

ऐका हो दादा,
विडीचं गाणं
गातोय आम्ही,
विडीचं गाणं

कष्टकरी जमले,
कामकरी निघाले
मुन्‍शीकडून घेतली विडीची पानं
गातोय आम्ही,
विडीचं गाणं
ऐका हो ताई,
विडीचं गाणं

आणली पानं
कापली पानं
गोल पानांमधोमध तंबाखू ठासून
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो भाऊ
विडीचं गाणं

कापलेली पानं
भरलेल्‍या विड्या
वळायला तयार
जळलेले हात
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो मावशी
विडीचं गाणं

वळून विड्या
बांधल्‍या गड्ड्या
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो काका
विडीचं गाणं

गड्ड्या बांधल्‍या
गड्ड्या बांधल्‍या
हार्‍यात भरलं आमचं नशीब हारीनं
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो दीदी
विडीचं गाणं

डोक्‍यावर हारे
खांद्यावर हारे
मुन्‍शीच्‍या घराकडे निघालो बेगीनं
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो भाऊ
विडीचं गाणं

मुन्‍शीच्‍या घरी
पोचलो मुन्‍शीच्‍या घरी
हिसाब किताब झाले, झालं सुरू मोजणं
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो आजी
विडीचं गाणं

संपला हिशोब
आमची संपली मोजणी
वही आली बाहेर, केली त्‍यात लिखापढी
गातोय आम्ही
विडीचं गाणं
ऐका हो मामा
विडीचं गाणं

वही भरली, तिची पानं भरली
द्या हो मजुरी आणि ऐका हे गाणं
ऐका हो ऐका
आमचं मजुरीचं गाणं
दोन वेळा शंभर आणि चोपन्‍न सुटे
ऐका बरं मुन्‍शी, आणि द्या आता सारे
दोनशे चोपन्‍न रुपये, तेवढेच मागतोय आम्ही
ऐकाऽ ऐकाऽ ऐकाऽ आणि ऐकाच मुन्‍शी…
गातोय आम्ही
मजुरीचं गाणं

गीत सौजन्य

बंगाली गीत : कोहिनूर बेगम

इंग्रजी अनुवादः जोशुआ बोधिनेत्र

Smita Khator

Smita Khator, originally from Murshidabad district of West Bengal, is now based in Kolkata, and is Translations Editor at the People’s Archive of Rural India, as well as a Bengali translator.

Other stories by Smita Khator
Editor : Vishaka George

Vishaka George is a Bengaluru-based Senior Reporter at the People’s Archive of Rural India and PARI’s Social Media Editor. She is also a member of the PARI Education team which works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Vishaka George
Video Editing : Shreya Katyayini

Shreya Katyayini is a Video Coordinator at the People's Archive of Rural India, and a photographer and filmmaker. She completed a master's degree in Media and Cultural Studies from the Tata Institute of Social Sciences, Mumbai, in early 2016.

Other stories by Shreya Katyayini