हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

रोज त्या पहाटे ३ वाजता उठतात. त्यांना ५ वाजेपर्यंत कामावर जायचं असतं. त्या आधी घरातली सगळी कामं. त्यांचं कामाचं ठिकाण, अथांग आणि ओलं, अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. नुसतं घरातून निघायचं, चार पावलात समुद्र गाठायचा आणि – डुबकी मारायची.

कधी कधी त्या नावा घेऊन जवळपासच्या बेटांवर जातात – आणि तिथेही डुबक्या मारतात. पुढचे ७ ते १० तास त्यांचं हेच काम चालू असतं. दर वेळी त्या पाण्याच्या वर येतात त्या वेळी त्यांच्या मुठीत समुद्री शैवालाची जुडी घट्ट पकडलेली असते, जणू काही त्यांचा जीवच त्या मुठीत सामावलेला असतो – आणि खरं तर तसंच आहे. पाण्यामध्ये डुबकी घ्यायची आणि समुद्री शेवाळ आणि काही वनस्पती गोळा करायच्या हाच तमिळ नाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातल्या भारतीनगर या कोळीवाड्यातल्या बायांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.

कामाचा दिवस असला की त्या सोबत ‘संरक्षक साहित्य’, काही कपडे आणि जाळं घेऊन निघतात. नावाडी त्यांना समुद्री वनस्पतींनी समृद्ध अशा बेटांपर्यंत सोडतात, बाया साडीचा काष्टा घालून, कंबरेला जाळं अडकवतात आणि साडीवरून टी शर्ट घालतात. त्यांचं ‘संरक्षक साहित्य’ म्हणजे डोळ्यांसाठी गॉगल्स, बोटांना गुंडाळण्यासाठी चिंध्या, काहींकडे हातमोजे आणि पायाला कपारीने कापू नये म्हणून रबरी स्लिपर. समुद्र किनाऱ्यालगत किंवा बेटांपाशी हेच सगळं त्या वापरतात.

या भागात समुद्री शेवाळ गोळा करण्याचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या आईकडून मुलीकडे येतो. एकल आणि निराधार बायांसाठी उत्पन्नाचा हा एकमेव स्रोत आहे.

मात्र हेच उत्पन्न दिवसेंदिवस घटत चाललं आहे. तापमान वाढ, समुद्राची वाढती पातळी, बदलतं हवामान आणि वातावरण आणि या संसाधनाचा बेमाप उपसा याचा हा परिणाम.

“समुद्री शेवाळाची वाढच झपाट्याने कमी होतीये,” ४२ वर्षीय पी. रक्कम्मा सांगतात. ही वनस्पती गोळा करणाऱ्या इतर स्त्रियांप्रमाणेच त्याही थिरुपुल्लनी तालुक्यातल्या मायाकुलम गावाजवळच्या भारतीनगरच्या रहिवासी आहेत. “आम्हाला पूर्वी जेवढा माल गावायचा, तेवढा आता मिळत नाही. हल्ली तर आम्हाला महिन्याला १० दिवसांपुरतंच काम असतं.” ही वनस्पती पद्धतशीरपणे गोळा करण्यासाठी वर्षाकाठी केवळ पाच महिनेच असतात हे लक्षात घेता हा मोठाच फटका आहे. रक्कम्मांना जाणवतंय की “लाटा खूप उसळू लागल्या आहेत आणि (डिसेंबर २००४ च्या) त्सुनामीनंतर समुद्राची पातळीदेखील वाढलीये.”

PHOTO • M. Palani Kumar

या भागात समुद्री शेवाळ गोळा करण्याचा व्यवसाय परंपरेने आईकडून मुलीकडे येतो. इथे, यू. पंचावरम पाण्याखालच्या खडकांवरून समुद्री शेवाळ गोळा करतायत

ए. मूकुपोरींसारख्यांना या बदलांच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्या वयाच्या आठव्या वर्षापासून समुद्री शेवाळ गोळा करतायत. त्या अगदी लहान असतानाच त्यांचे आई वडील वारले आणि त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचं एका दारुड्याशी लग्न लावून दिलं. आता पस्तिशी गाठलेल्या मूकुपोरींना तीन मुली आहेत आणि आजही त्या त्यांच्या नवऱ्यासोबत संसार करतायत. मात्र काही कमवावं, कुटुंबाला हातभार लावावा अशा स्थितीत तो नाही.

घरच्या एकमेव कमावत्या असणाऱ्या मूकुपोरी सांगतात की “समुद्री शेवाळापासून होणारी कमाई” आता त्यांच्या तिन्ही मुलींच्या पुढच्या शिक्षणासाठी “पुरेशी नाही.” त्यांची थोरली मुलगी बीकॉम करण्यासाठी धडपडतीये आणि दुसरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची वाट पाहतीये. सर्वात धाकटी सहावीत आहे. इतक्यात काही “सगळं सुधारणार नाहीये” याचंच मूकुपोरींना भय आहे.

त्या आणि त्यांच्या सोबतिणी मुथुरइयार समाजाच्या आहेत ज्यांची नोंद तमिळ नाडूमध्ये सर्वात मागास वर्गामध्ये केली जाते. रामनाथपुरम मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष ए. पलसामी यांच्या अंदाजानुसार, तमिळ नाडूच्या ९४० किलोमीटर सागर किनाऱ्यावर मिळून समुद्री शेवाळ गोळा करणाऱ्या अशा ६०० तरी स्त्रिया आहेत. पण त्या जे काम करतात त्याचा फायदा मात्र फक्त राज्यातच नाही तर राज्याबाहेरच्या मोठ्या लोकसंख्येला होतो.

“आम्ही जे शेवाळ गोळा करतो,” ४२ वर्षांच्या पी. राणीअम्मा सांगतात, “त्यापासून अगार बनवतात.” पदार्थाला दाटपणा आणण्यासाठी वापरण्यात येणारा हा जेलीसारखा पदार्थ आहे.

इथल्या समुद्री शेवाळाचा उपयोग अन्न उद्योग, काही खतांमध्ये, औषधी मिश्रणांसाठी औषध उद्योगात आणि इतरही काही कारणांसाठी केला जातो. या बाया शेवाळ गोळा करतात, सुकवतात आणि पुढच्या प्रक्रियेसाठी ते मदुराई जिल्ह्यातल्या कारखान्यांमध्ये पाठवलं जातं. या प्रदेशात दोन महत्त्वाच्या प्रजाती मिळतात – मट्टकोरइ (gracilaria) आणि मरिकोळुन्थु (gelidium amansii). जेलिडियम कधी कधी सलाद, पुडिंग किंवा जॅममध्ये वापरलं जातं. मट्टकोरइ कापड रंगवण्यासाठी आणि इतर काही औद्योगिक कारणांसाठी वापरलं जातं.

मात्र इतक्या सगळ्या उद्योगांमध्ये समुद्री शैवालाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याचा बेमाप उपसा करण्यात येत आहे. केंद्रीय क्षार व समुद्री रसायन संशोधन संस्थेनुसार (मंडपम कँप, रामनाथपुरम) हे शेवाळ अनिर्बंध पद्धतीने गोळा केलं जात असल्यामुळे त्याच्या उपलब्धतेत लक्षणीय घट झाली आहे.

PHOTO • M. Palani Kumar

पी. राणीअम्मा, हातात गोळा केलेलं मरिकोळुन्थु, एक खाद्य शेवाळ

किती शेवाळ गोळा होतंय त्यातून हे दिसूनच येतं. “पाच वर्षांपूर्वी आम्ही सात तासात किमान १० किलो मरिकोळुन्थु गोळा करायचो,” ४५ वर्षीय एस. अमृतम म्हणतात. “पण आता, एका दिवसात ३ ते ४ किलोपेक्षा जास्त नाही. त्यात शैवालाचा आकार पण गेल्या काही वर्षांत कमी झालाय.”

या वनस्पतीवर आधारित उद्योगांमध्ये देखील घट झाली आहे. २०१४ सालापर्यंत मदुराईमध्ये अगार बनवणारे ३७ उद्योग होते असं ए. बोस सांगतात. जिल्ह्यात त्यांच्या मालकीचा समुद्री शेवाळ प्रकिया उद्योग आहे. आज, ते सांगतात असे केवळ सात कारखाने आहेत – आणि तेही आपल्या क्षमतेच्या ४० टक्केच उत्पादन करतायत. बोस अखिल भारतीय अगार व अल्गिनेट निर्माता कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष होते – मात्र गेल्या दोन वर्षांत सभासदांची संख्या रोडावल्यामुळे हे मंडळ बंद पडल्यात जमा आहे.

“आमचे कामाचे दिवस कमी झालेत,” ५५ वर्षीय एम. मरिअम्मा सांगतात. त्या गेली चाळीस वर्षं समुद्री शेवाळ गोळा करण्यासाठी समुद्राचा तळ गाठतायत. “हंगाम नसतो तेव्हा आमच्याकडे रोजगाराच्या दुसऱ्या कोणत्याही संधी उपलब्ध नसतात.”

१९६४ साली जेव्हा मरिअम्मांचा जन्म झाला तेव्हा मायाकुलम गावी वर्षाकाठी असे १७९ दिवस होते जेव्हा तापमान ३८ अंश किंवा जास्त असे. २०१९ साली हाच आकडा २७१ दिवस इतका आहे. म्हणजेच जवळपास दीडपट वाढ. पुढच्या २५ वर्षांमध्ये या भागात अशा उष्ण दिवसांची संख्या २८६ ते ३२४ इतकी जास्त असू शकते असा अंदाज या वर्षी जुलै महिन्यात प्रसिद्ध झालेल्या न्यू यॉर्क टाइम्सच्या वातावरण आणि जागतिक तापमान वाढीबद्दलच्या एका संवादी पोर्टलवर बांधला आहे. आणि समुद्राचं तापमान वाढतंय याबद्दल तर शंकेला फार काही वाव नाही.

आणि या सगळ्याचा परिणाम भारतीनगरच्या मच्छिमारी करणाऱ्या या बायांपलिकडे होतोय. वातावरण बदलांसंबंधी आंतरशासकीय तज्ज्ञगटाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये अशा काही अभ्यासांचा उल्लेख (गटाने त्यांचा पुरस्कार केलेला नाही) आहे ज्यामध्ये वातावरणीय तणावाचा मुकाबला करण्याची समुद्री शैवालाची क्षमता अधोरेखित करण्यात आली आहे. या अहवालाचाही असा निष्कर्ष आहे कीः “समुद्री शैवालाच्या जलशेतीबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.”

कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठाच्या सागरशास्त्र विभागाचे प्रा. तुहीन घोष या अहवालाच्या मुख्य लेखकांपैकी एक आहेत. त्यांची निरीक्षणं या वनस्पतींचं प्रमाण घटत असल्याच्या मच्छिमार बायांच्या म्हणण्याला पुष्टी देणारी आहेत. “फक्त समुद्री शेवाळच नाही तर इतरही अनेक प्रक्रिया आहेत ज्या घटतायत किंवा वेग धरतायत [जसं की स्थलांतर],” त्यांनी पारीशी फोनवरून संवाद साधत सांगितलं. “आणि हे मासळी , कोळंबीचं बीज तसंच समुद्र आणि भूमीशी संबंधित अनेक घटकांबाबत घडतंय. मग खेकडे असोत किंला मध गोळा करणं, स्थलांतर ( जसं सुंदरबनमध्ये होतंय ) आणि इतरही अनेक गोष्टी घडतायत.”

PHOTO • M. Palani Kumar

कधी कधी इथून या बाया नावेने जवळपासच्या बेटांवर जाऊन तिथे डुबक्या मारतात

मच्छीमार समाज जे सांगतोय त्यात तथ्य आहे असं प्रा. घोष म्हणतात. “मात्र मासळीच्या बाबतीत प्रश्न फक्त वातावरणातल्या बदलांचा नाहीये – तर ट्रॉलर्स आणि व्यापारी तत्त्वावर केली जाणारी बेसुमार मासेमारी कारणीभूत आहे. या घटकांमुळे एरवी ज्या प्रवाहांमध्ये पारंपरिक मच्छिमारी करणाऱ्यांना मासळी घावायची ती मिळेनाशी झालीये.”

आता समुद्री शैवालावर ट्रॉलर्सचा परिणाम होत नसला तरी व्यापारी तत्त्वांवर केला जाणारा उपसा निश्चितच कारणीभूत आहे. भारतीनगरच्या या स्त्रिया आणि त्यांच्या सोबत या वनस्पती गोळा करणाऱ्यांनी आपला या सगळ्यात काय वाटा आहे, छोटा का असेना, याच्यावर विचार केलाय असं दिसतंय. त्यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते आणि संशोधकांचं म्हणणं आहे की दिवसेंदिवस कमी होत चाललेलं शैवालाचं प्रमाण पाहून त्यांनी त्यांच्या बैठकी बोलावल्या आणि जुलै महिन्यापासून केवळ पाच महिनेच पद्धतशीरपणे शेवाळ गोळा करायचं अशी मर्यादा घालून घ्यायचं ठरवलं. त्यानंतर तीन महिने त्या समुद्रात जात नाहीत – ज्यामुळे शेवाळ वाढायला वाव मिळतो. मग मार्च ते जून त्या समुद्रात जातात, मात्र महिन्यातले अगदी मोजके दिवस. थोडक्यात काय तर या स्त्रियांनी स्वतःच स्वतःवर काही बंधनं घालून घेतली आहेत.

हा विचार खरंच शहाणपणाचा आहे – मात्र त्या बदल्यात त्यांना त्यांच्याच उत्पन्नावर पाणी सोडावं लागतंय. “मच्छीमार बायांना मनरेगावर काम मिळत नाही,” मरिअम्मा सांगतात. “अगदी शेवाळ गोळा करायच्या काळातही आम्हाला दिवसाला १०० ते १५० रुपयेच कमाई होते.” हंगाम असतो तेव्हा प्रत्येक बाई दररोज २५ किलोपर्यंत समुद्री शेवाळ गोळा करू शकते, पण त्यांना मिळणारा भाव (तोही घसरतोय) त्यांना कोणत्या प्रकारची वनस्पती गावलीये त्यावर अवलंबून असतो.

कायदे आणि नियमावलीतल्या बदलांमुळेही गोष्टी जास्त क्लिष्ट झाल्या आहेत. १९८० पर्यंत त्या नल्लथीवु, चल्ली, उप्पुथन्नी अशा दूरवरच्या बेटांवर जाऊ शकायच्या – यातल्या काहींपर्यंत नावेने पोचायला दोन दिवससुद्धा लागू शकतात. त्या आठवडाभर तिथेच मुक्काम करून शेवाळ गोळा करून आणायच्या. मात्र त्याच वर्षी त्या जात असलेली २१ बेटं मन्नार आखात समुद्री राष्ट्रीय उद्यानात समाविष्ट झाली आणि वन खात्याच्या अखत्यारीत आली. वनखात्याने त्यांना तिथे मुक्काम करण्यास मज्जाव केला आणि त्यानंतर या बेटांपर्यंत पोचणं आता अधिकाधिक अवघड होत चाललं आहे. त्या बंदीच्या विरोधात केलेल्या निदर्शनांना शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. रु. ८,००० ते रु. १०,००० इतका दंड होण्याच्या भीतीने त्या आता या बेटांवर फारशा जातच नाहीत.

PHOTO • M. Palani Kumar

समुद्री शेवाळ गोळा करण्यासाठी या बाया वापरत असलेली जाळी. या सगळ्या कामादरम्यान त्यांना कापतं, रक्त येतं, पण भरलेलं जाळं म्हणजे कुटुंबाला आधार

त्यामुळे कमाई आणखीनच घटली आहे. “आम्ही त्या बेटांवर मुक्काम करायचो तेव्हा किमान दीड ते दोन हजारांची कमाई व्हायची,” एस. अमृतम सांगतात. त्या वयाच्या १२ व्या वर्षापासून हे काम करतायत. “आम्हाला मट्टकोरइ आणि मरिकोळुन्थु, दोन्ही मिळायच्या. आता मात्र आठवड्याला १००० रुपये कमवायचे तरी नाकी नऊ येतायत.”

या सगळ्या बायांना वातावरण बदलाबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या माहित नसतील मात्र त्यांनी त्या बदलांचा अनुभव घेतलाय आणि त्यांचे परिणामही त्या जाणून आहेत. त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या व्यवसायामध्ये अनेक बदल घडत आहेत हे त्यांना समजून चुकलंय. समुद्राचा बदललेला स्वभाव तसंच तापमान, हवामान आणि वातावरणातले बदल त्यांना जाणवतायत. आणि यातल्या अनेक बदलांमध्ये मानवी हस्तक्षेप (त्यांचा स्वतःचाही) कसा भर घालतोय हेही त्यांना कळतंय. आणि हे सगळं होत असताना या सगळ्या क्लिष्ट प्रक्रियेमध्ये, त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत मात्र अडकलाय. आता, त्यांना हेही माहिती आहे की त्यांच्यापाशी कोणतेही पर्याय नाहीत – मनरेगावर त्यांना काम दिलं जात नाही या मरिअम्मांच्या सांगण्यातच सर्व काही आलं.

दुपारनंतर पाण्याला उधाण यायला लागतं, त्यामुळे त्यांचं दिवसभराचं काम त्या उरकू लागतात. एक दोन तासात त्या त्यांना घावलेला माल जाळ्यांमध्ये भरून होडीतून किनाऱ्यावर आणतात.

त्यांचं काम सोपंही नाही आणि निर्धोकही. समुद्र दिवसेंदिवस खवळत चाललाय, काही आठवड्यांमागे या भागातले चार मच्छिमार वादळात मरण पावले. तिघांचेच मृतदेह हाती लागले आणि स्थानिकांची अशी भावना आहे की चौथा मृतदेह मिळाल्यानंतरच वारं शांत होईल आणि समुद्र निवळेल.

स्थानिक म्हणतात तसं वाऱ्याची साथ नसेल तर दर्यावरचं कोणतंही काम सोपं नसतं. व्यापक स्तरावर वातावरण बदलत असल्यामुळे अनेक दिवस असे असतात की निश्चित अंदाज बांधता येत नाही. असं असलं तरी या बाया खवळलेल्या समुद्रात जातात ते त्यांच्या उत्पन्नाच्या एकमेव स्रोतासाठी. आणि त्यांना पूर्णपणे कल्पना असते की शब्दशः आणि प्रतीकात्मकरित्या त्यांचा पाय खोल गर्तेत आहे.

PHOTO • M. Palani Kumar

समुद्री शेवाळ गोळा करण्यासाठी समुद्रात नाव नेतानाः वाऱ्याची साथ नसेल दर्यावरचं कोणतंही काम सोपं नाही. व्यापक स्तरावर वातावरणात बदल होत असल्यामुळे अनेक दिवस हवेचा अंदाजच बांधता येत नाही

PHOTO • M. Palani Kumar

समुद्री शेवाळ गोळा करणाऱ्या एक जण, हातात फाटका हातमोजा – खडक, कपारी आणि उसळत्या पाण्यापासून कुचकामी संरक्षण

PHOTO • M. Palani Kumar

डुबकीआधी जाळ्याची तयारीः या बायांचं संरक्षक साहित्य म्हणजे गॉगल्स, बोटाला गुंडाळायला चिंध्या किंवा हातमोजे आणि कपारींनी कापू नये म्हणून रबरी स्लिपर

PHOTO • M. Palani Kumar

एस. अमृतम उसळत्या लाटांना तोंड देत खडकांपर्यंत पोचतायत

PHOTO • M. Palani Kumar

एम. मरिअम्मा समुद्री शेवाळ गोळा करण्यासाठी वापरत असलेल्या जाळ्याची दोरी आवळताना

PHOTO • M. Palani Kumar

डुबकीसाठी तयार

PHOTO • M. Palani Kumar

आणि मग पाण्यात गोता, थेट समुद्राचा तळ गाठायचा

PHOTO • M. Palani Kumar

खोल पाण्यात – हेच यांचं कामाचं ठिकाण, मासळी आणि समुद्री जीवांची अपारदर्शी पाण्याखालची दुनिया

PHOTO • M. Palani Kumar

लांब पानांचं हे मट्टकोरइ शेवाळ, हे गोळा करून, सुकवून कापड रंगवण्यासाठी वापरतात

PHOTO • M. Palani Kumar

अनेक क्षण श्वास रोखून समुद्राच्या तळाशी असणारी मरिकोळुन्थु गोळा करून आणणाऱ्या रानीअम्मा

PHOTO • M. Palani Kumar

आणि मग उसळत्या पाण्यात, कष्टाने गोळा केलेलं शेवाळ हातात घेऊन पाण्याच्या वर

PHOTO • M. Palani Kumar

भरतीला सुरुवात होतीये, पण बाया सूर्य माथ्यावर येईपर्यंत काम करतात

PHOTO • M. Palani Kumar

डुबकी मारून आल्यानंतर आपल्याकडचं साहित्य स्वच्छ करणारी एक महिला

PHOTO • M. Palani Kumar

थकून भागून किनाऱ्याच्या वाटेवर

PHOTO • M. Palani Kumar

गोळा केलेलं शेवाळ ओढून किनाऱ्यावर आणताना

PHOTO • M. Palani Kumar

दिवसभरात गावलेला हिरवागार माल इतर काही जणी जाळ्यातून बाहेर काढतायत

PHOTO • M. Palani Kumar

समुद्री शेवाळ लादलेली एक छोटी नाव किनाऱ्यावर येतीये, एक बाई गळ कुठे टाकायचा ते सांगतीये

PHOTO • M. Palani Kumar

गोळा केलेलं शेवाळ खाली उतरवणारा एक गट

PHOTO • M. Palani Kumar

दिवसभरात गोळा झालेल्या मालाचं वजन करताना

PHOTO • M. Palani Kumar

समुद्री शेवाळ सुकवण्याची तयारी

PHOTO • M. Palani Kumar

सुकायला किनाऱ्यावर अंथरलेलं शेवाळ आणि तिथूनच आपापला माल घेऊन चाललेल्या काही जणी

PHOTO • M. Palani Kumar

तासंतास दर्यावर, पाण्याखाली राहिल्यानंतर आता स्थिर जमिनीवर, आपापल्या घराच्या वाटेवर

शीर्षक छायाचित्रः ए. मूकुपोरी जाळं ओढून नेताना. आता पस्तिशीत असणाऱ्या मूकुपोरी आठ वर्षांच्या असल्यापासून समुद्री शेवाळ गोळा करतायत. (फोटोः एम. पलानी कुमार/पारी)

या लेखासाठी मोलाची मदत केल्याबद्दल सेन्थलिर एस. यांचे मनःपूर्वक आभार.

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : M. Palani Kumar

M. Palani Kumar is Staff Photographer at People's Archive of Rural India. He is interested in documenting the lives of working-class women and marginalised people. Palani has received the Amplify grant in 2021, and Samyak Drishti and Photo South Asia Grant in 2020. He received the first Dayanita Singh-PARI Documentary Photography Award in 2022. Palani was also the cinematographer of ‘Kakoos' (Toilet), a Tamil-language documentary exposing the practice of manual scavenging in Tamil Nadu.

Other stories by M. Palani Kumar

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale