हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

“सकाळचे ११.४० वाजून गेलेत, आणि आता वार्ता वाऱ्यांची,” कादल ओसई रेडिओ केंद्रावर ए. यशवंत घोषणा करतो. “गेल्या आठवड्यापासून, खरं तर महिन्यापासून कचान कातू [दक्षिणेकडचे वारे] वेगात वाहत होते. त्यांचा वेग [ताशी] ४०-६० [किमी] होता. आज, जणू काही मच्छिमारांच्या मदतीसाठी म्हणून तो मंदावून १५ [किमी, ताशी] झाला आहे.”

तमिळ नाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातल्या पाम्बन बेटावरच्या मच्छिमारांसाठी ही सुवार्ताच होती. “म्हणजे आता आम्ही बिनधास्त समुद्रात जाऊ शकतो, भीतीचं कारण नाही,” यशवंत म्हणतो. तो स्वतः मच्छिमार आहे. तो कादल ओसई (समुद्राची गाज) या कम्युनिटी रेडिओवर रेडिओ जॉकी आहे.

रक्तदानावरच्या एका खास कार्यक्रमाआधी यशवंत हवामानाचा अहवाल सांगतो, आणि शेवटचा संदेशः “तापमान ३२ अंश सेल्सियस आहे. त्यामुळे भरपूर द्रव पदार्थ घ्या, उन्हात जाऊ नका.”

आणि हा इशारा गरजेचा आहे कारण पाम्बनमध्ये आता उष्ण दिवसांची संख्या वाढत चाललीये. यशवंत जन्मला तेव्हा, १९९६ मध्ये या बेटावर ३२ अंशापेक्षा जास्त तापमान असणारे १६२ दिवस असायचे. त्याचे वडील, अँथनी सामी जन्मले तेव्हा, १९७३ मध्ये हाच आकडा १२५ इतका होता. आणि आज अशा उष्ण दिवसांची संख्या वर्षाकाठी १८० पर्यंत पोचली आहे. जुलै महिन्यात न्यू यॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वातावरण बदल व जागतिक तापमान वाढीसंदर्भातील एका संवादी पोर्टलवरती ही आकडेवारी मिळते.

त्यामुळेच यशवंत आणि त्याचे सहकारी आता फक्त हवामान नाही तर व्यापक पातळीवर वातावरणाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्याचे वडील, मच्छिमार सवंगडी आणि पाम्बन आणि रामेश्वरम या दोन मुख्य बेटांवरचे सुमारे ८३,००० मच्छिमार आता या बदलांचा अर्थ लावण्यासाठी त्यांच्याकडे कान लावून बसलेत.

PHOTO • A. Yashwanth
PHOTO • Kadal Osai

आरजे यशवंत, त्याचे वडील अँथनी सामी आणि त्यांची नाव (उडवीकडे): ‘पूर्वी आम्ही दर्यावर निघालो की वारं आणि हवामानाचा अंदाज बांधायचो. पण आजकाल आमचे कोणतेच अंदाज उपयोगाचे नाहीत’

“मी १० वर्षांचा असल्यापासून मासे धरतोय,” अँथनी सामी सांगतात. “[तेव्हापासून] दर्या फार बदललाय. पूर्वी आम्ही दर्यावर निघालो की वारं आणि हवामानाचा अंदाज बांधायचो. पण आजकाल आमचे कोणतेही अंदाज उपयोगाचे नाहीत. इतके प्रचंड बदल होतायत की आमच्या कळण्यापलिकडे आहे. पूर्वीपेक्षा उष्णताही चिक्कार वाढलीये. पूर्वी समुद्रावर जाताना इतकी गरमी कधीच नसायची. आजकाल उकाड्यामुळे सगळं फार अवघड होत चाललंय.”

आणि कधी कधी सामी सांगतात तसं, समुद्र शांत नसेल तर तो जीवघेणा ठरू शकतो. जसं यंदा ४ जुलैला झालं. यशवंत जेव्हा जमेल तेव्हा वडलांबरोबर मासे धरायला जातो. तो रात्री ९ वाजता परतला, तेच चार मच्छिमार बेपत्ता असल्याची बातमी घेऊन. कादल ओसाई तेव्हा बंद असतं – सकाळी ७ ते संध्या ६ अशीच प्रसारणाची वेळ असते. पण तरीही एका आरजेने रेडिओवरून संदेश द्यायला सुरुवात केली जेणेकरून संकटात सापडलेल्या मच्छिमारांचं लक्ष वेधता येईल. “आमच्या केंद्रावर कायम एक आरजे असतोच, कामकाजाची वेळ संपली असली तरी,” रेडिओ केंद्राच्या प्रमुख गायत्री उस्मान सांगतात. बाकीचे कर्मचारीही जवळच राहतात. “त्यामुळे अशी काही आणीबाणी आली तर आम्ही लगेच प्रसारण सुरू करू शकतो.” त्या दिवशी कादल ओसईच्या कर्मचाऱ्यांनी क्षणही वेळ न दवडता पोलिस, तटरक्षक, जनता आणि इतर मच्छिमारांना सावध करण्यासाठी कष्ट घेतले.

दोन तीन रात्री कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही. केवळ दोन जणांची सुटका करता आली. “ते एका मोड्या वल्लम [नाव] च्या आधारे तरंगत होते. बाकी दोघांनी मध्येच प्रयत्न सोडले, त्यांचे हात भरून आले,” गायत्री सांगतात. त्यांनी प्रयत्न थांबवले, आपल्या कुटुंबियांवर आपलं किती प्रेम आहे पण ते का तगून राहू शकले नाहीत ते त्यांना समजावून सांगा असं आपल्या सोबत्यांना सांगितलं. १० जुलै रोजी त्यांचे मृतदेह लाटांबरोबर किनाऱ्यावर वाहून आले.

“पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही,” ५४ वर्षांचे ए. के. सेसुराज किंवा ‘कॅप्टन राज’ म्हणतात. त्यांच्या होडीच्या नावावरून त्यांना ही उपाधी मिळालीये. ते ठामपणे सांगतात की वयाच्या नवव्या वर्षी जेव्हा ते दर्यावर जायला लागले तेव्हा “दर्या जास्त मैत्रीशील होता”. “जाळ्यात काय घावणार आणि हवा कशी असेल हे आम्हाला माहित असायचं. आजकाल दोन्हीचा भरवसा देता येत नाही.”

व्हिडिओ पहाः ‘कॅप्टन राज’ अंबा गीत सादर करतायत

‘पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही,’ ए. के. सेसुराज किंवा ‘कॅप्टन राज’ म्हणतात. ते ठामपणे सांगतात ‘दर्या जास्त मैत्रीशील होता... जाळ्यात काय घावणार आणि हवा कशी असेल हे आम्हाला माहित असायचं. आजकाल दोन्हीचा भरवसा देता येत नाही’

राज यांना या बदलांनी चक्रावून टाकलंय पण कादल ओसईकडे मात्र त्याची काही उत्तरं आहेत. १५ ऑगस्ट २०१६ रोजी नेसक्करंगल या सामाजिक संस्थेने हे केंद्र सुरू केलं आणि तेव्हापासूनच यावर समुद्र, हवामानाचे अंदाज आणि वातावरण बदलांबद्दल वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत.

“कादल ओसईवर रोज एक कार्यक्रम असतो ज्याचं नाव आहे समुद्रम पळगु (समुद्र समजून घ्या),” गायत्री सांगतात. “समुद्राचं संवर्धन ही त्यामागची संकल्पना आहे. आम्हाला माहित आहे की जे व्यापक मुद्दे आहेत त्यांचे या समुदायावर दूरगामी परिणाम होणार आहेत. समुद्रम पळगु हा वातावरणातल्या बदलांबाबत संवाद सुरू ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. समुद्रासाठी काही आपल्या काही रिती-सवयी घातक आहेत आणि त्यामुळे आपण त्या टाळल्या पाहिजेत [उदा. ट्रॉलर्सचा वापर करून अतिमासेमारी किंवा पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारं समुद्राचं प्रदूषण]. आमच्या कार्यक्रमात लोक स्वतःचे अनुभव सांगतात. कधी कधी त्यांच्याकडून होत असलेल्या चुकाही ते कबूल करतात- आणि त्या परत न करण्याचं वचनही देतात.”

“हे केंद्र सुरू झाल्यापासून कादल ओसईचा चमू आमच्या संपर्कात आहे,” ख्रिस्ती लीमा सांगतात. या केंद्राला सहाय्य करणाऱ्या चेन्नई येथील एम.एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रामध्ये ते संवाद व्यवस्थापक आहेत. “आमच्याकडच्या तज्ज्ञांचा ते त्यांच्या कार्यक्रमात समावेश करतात. पण मे महिन्यापासून आम्हीदेखील वातावरणातल्या बदलांविषयी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांची मदत घेतोय. कादल ओसईच्या माध्यमातून हे करणं जास्त सोपं आहे आणि पाम्बनमध्ये एक कम्युनिटी रेडिओ म्हणून ते आधीच लोकप्रिय आहेत.”

मे आणि जून महिन्यात या केंद्राने ‘कादल ओरु अतिसयम, अथई कापतु नाम अवसियम’ (समुद्र विलक्षण आहे, आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे) या शीर्षकाअंतर्गत वातावरणातल्या बदलांबाबत चार विशेष कार्यक्रम प्रसारित केले आहेत. स्वामीनाथन फौंडेशनच्या किनारी संस्था संशोधन केंद्रातील तज्ज्ञ तसेच केंद्राचे प्रमुख व्ही. सेल्वम या मालिकेत सहभागी झाले होते. “हे असे कार्यक्रम फार महत्त्वाचे आहेत कारण आपण जेव्हा वातावरणातल्या बदलांबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ तज्ज्ञांच्या पातळीवरच बोलत राहतो,” सेल्वम म्हणतात. “या मुद्द्यांची चर्चा अगदी जमिनी स्तरावर व्हायला पाहिजे, जे हे बदल अगदी रोजच्या रोज प्रत्यक्ष अनुभवतायत, त्यांच्या सोबत.”

PHOTO • Kavitha Muralidharan
PHOTO • Kadal Osai

डावीकडेः मच्छीबाजाराची वर्दळ असणाऱ्या रस्त्यावरची कादल ओसईची कचेरी. उजवीकडेः केंद्राच्या ११ कर्मचाऱ्यांपैकी एक, डी. रेडीमार जो अजूनही दर्यावर जातो

दहा मे रोजी प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात पाम्बन बेटावर होणारे मोठे बदल समजून घ्यायला लोकांना मदत झाली. अगदी वीस वर्षांपूर्वीपर्यंत किमान १०० कुटुंबं रामेश्वरम आणि भारताच्या भूमीला जोडणाऱ्या २,०६५ मीटर लांब पाम्बन पुलाजवळ राहत होती. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे या सगळ्यांना इथून वेगळीकडे रहायला जावं लागलं आहे. या कार्यक्रमात सेल्वम यांनी वातावरणातल्या बदलांमुळे अशा घटनांमध्ये कशी वाढ होते हे समजावून सांगितलं.

या कार्यक्रमांमध्ये येणारे तज्ज्ञ, मच्छिमार किंवा केंद्राचे वार्ताहर यांच्यापैकी कुणीही या बदलांचे साधे सरळ अर्थ लावण्याचा किंवा एखाद्या घटनेवरून अथवा एखाद्याच घटकाच्या आधारे घडणाऱ्या बदलांचा अर्थ लावत नाहीत. मात्र ते एक बाब निश्चित अधोरेखित करतात ती म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे या अरिष्टात भर पडत आहे. इथल्या समुदायाने उत्तरांच्या दिशेने किंवा शोधाच्या वाटेने जावं यासाठी कादल ओसई पहिलं पाऊल टाकायला प्रयत्न करत आहे.

“पाम्बन ही बेटाची परिसंस्था आहे आणि त्यामुळेच ती जास्त नाजूक, बिकट स्थितीत आहे,” सेल्वम सांगतात. “मात्र इथल्या वाळूच्या डोंगरांमुळे वातावरण बदलांपासून या बेटाचं थोडंफार संरक्षण झालं आहे. तसंच श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यामुळेही या बेटाचं वादळांपासून थोडं फार संरक्षण होतं,” ते सांगतात.

मात्र सागरी संपदा मात्र खरोखरच नाहिशी होत चालली आहे आणि त्यासाठी काही वातावरणाशी संबंधित तर काही संबंध नसणारे घटक जबाबदार आहेत, ते पुढे म्हणतात. जाळ्यात कमी मासळी येतीये कारण खूप जास्त मच्छिमारी, तीही मुख्यतः ट्रॉलर्सने केलेली. समुद्राचं तापमान वाढायला लागल्यामुळे माशांचे थवे ज्या रितीने प्रवास करतात त्यात अडथळे येतात.

PHOTO • Kadal Osai
PHOTO • Kavitha Muralidharan

डावीकडेः एम. सैलास पाम्बन बेटावरच्या तिच्यासारख्याच मच्छिमार समुदायातल्या इतर स्त्रियांच्या मुलाखती घेतीये. उजवीकडेः रेडिओ केंद्राच्या प्रमुख गायत्री उस्मान यांनी या कम्युनिटी केंद्राला निश्चित दिशा दिली आहे

“ऊरल, सिरा, वेळकम्बन... या जाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत,” २४ मे रोजी प्रसारित झालेल्या कार्यक्रमात कादल ओसई आरजे बी. मधुमिता सांगते. ती स्वतः मच्छिमार समुदायातली आहे. “पाल सुरा, कलवेती, कोम्बन सुरा अजूनही घावतात मात्र त्यांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे. विचित्र बाब म्हणजे, माथी मासा जो केरळमध्ये मुबलक मिळायचा तो आता आमच्या भागात भरपूर मिळायला लागलाय.”

आणखी एक प्रजात, मान्दईकळगु, जी आता इथे नाहिशी झालीये, ती वीस वर्षांपूर्वी मुबलक प्रमाणात मिळायची, याच कार्यक्रमात लीना (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या ज्येष्ठ नागरिक सांगतात. या माशाचं तोंड उघडून आतली गाबोळी काढून खाल्ली जायची त्याच्या आठवणी लीना सांगतात. ही कल्पनाच आता एम. सैलास सारख्या तरुण मुलींना समजणार नाही. एम.कॉम. पदवी घेतलेली सैलास खरं तर याच समुदायाची आहे (आणि कादल ओसईमध्ये सूत्रधार आणि निर्माती आहे) तरीही.

“१९८० पर्यंत आम्हाला कट्टई, सीला, कोम्बन सुरा आणि इतर प्रकारची मासळी टनाने घावायची,” लीना सांगतात. “आताशा हे मासे फक्त डिस्कव्हरी चॅनेलवर पहायचे. माझा आजा-आजी म्हणायचे [ते इंजिन नसलेली नाव वापरायचे], इंजिनाच्या आवाजाने मासे दूर पळून जातात. आणि पेट्रोल आणि डिझेलमुळे पाणी विषारी झालंय आणि माशाची चवच बदलून गेलीये.” तो असा काळ होता जेव्हा बाया किनाऱ्याजवळ समुद्रात चालत आत जायच्या आणि जाळं पसरून मासे धरायच्या. आता किनाऱ्याजवळ मासेच मिळेनासे झाल्यावर मासे धरणाऱ्या बायांची संख्या कमी कमी होत चाललीये.

१७ मे रोजी प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात मासेमारीच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि या दोन्हीच्या वापरातून सागरी जीवांचं संरक्षण कसं करता येईल यावर चर्चा झाली. “मच्छिमारांना समुद्राशेजारी पिंजरे लावून माशांचं प्रजनन करण्यास प्रोत्साहन दिलं जातंय. सरकार या ‘पिंजरा संस्कृती’ ला पाठिंबा देतंय कारण त्यातून घटत चाललेल्या सागरी संपदेबद्दल काही पाऊल उचललं जातंय,” गायत्री म्हणतात.

PHOTO • Kadal Osai

मच्छिमारांशी हितगुज

पाम्बनचा मच्छिमार, २८ वर्षीय अँटनी इनिगो हे करून पहायला उत्सुक आहे. “पूर्वी आम्ही जाळ्यात आलेला ड्यूगाँग परत कधीच पाण्यात सोडायचो नाही. मात्र कादल ओसईवरचा कार्यक्रम ऐकून आम्हाला समजलं की वातावरणातले बदल आणि माणसाच्या करणीमुळे हा मासा जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आमची महागाची जाळी तोडावी लागली तरी चालेल पण आम्ही त्याला सोडून द्यायला तयार आहोत. कासवांबाबतही तेच आहे.”

“जर वातावरण बदलांचा माशांवर कसा परिणाम होतोय हे आमचे तज्ज्ञ सांगत असले तर आमच्याकडे त्याचा दाखला देण्यासाठी मच्छिमारही असतात,” गायत्री सांगतात.

“नाहिशा होत चाललेल्या माशांसाठी आम्ही देव आणि निसर्गाला दोष देत होतो. आमच्या कार्यक्रमांमधून आमच्या लक्षात आलंय की बहुतेक सगळा दोष आमचा स्वतःचाच आहे,” सैलास म्हणते. तिच्याप्रमाणेच, कादल ओसईचे सगळे कर्मचारी मच्छिमार समुदायाचे आहेत, एकट्या गायत्री सोडून. त्या ध्वनी अभियंता आहेत आणि दीड वर्षांपूर्वी त्या इथे रुजू झाल्या. येताच त्यांनी या कम्युनिटी रेडिओ केंद्राला निश्चित दिशा आणि हेतू मिळवून दिला.

कादल ओसईची कचेरी पाम्बनच्या मच्छी बाजाराच्या वर्दळीत फारशी लक्षात येत नाही. निळ्या रंगात नाव लिहिलेल्या फलकावर त्यांचं घोषवाक्य नामथु मुन्नेत्रथुक्कन वानोळी (आपल्या विकासासाठी आकाशवाणी) रंगवलं आहे. आतमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान असलेलं एफएम केंद्र आहे. त्यांच्याकडे मुलं, महिला आणि मच्छिमारांसाठीचे कार्यक्रम असतात आणि मधल्या वेळात अम्बा गीतं – कोळी गीतं - सादर केली जातात. केंद्रावरच्या ११ कर्मचाऱ्यांपैकी केवळ यशवंत आणि डी. रेडिमर अजूनही दर्यावर जातात.

यशवंतचं कुटुंब अनेक वर्षांपूर्वी थूथुकोडीहून पाम्बनला रहायला आलं. “तिथे मासेमारीत फार काही पैसा नव्हता,” तो सांगतो. “माझ्या वडलांना पुरेसी मच्छीच घावायची नाही.” रामेश्वरममध्ये बरा धंदा होता, पण “गेल्या काही वर्षांत तिथेही मच्छी कमीच मिळायला लागलीये.” कादल ओसईमुळे त्याला समजलं की धंद्यात होणारं नुकसान “दुसऱ्या कुणाच्या ‘करणीमुळे’ नसून कदाचित आपणच निसर्गावर जी काळू जादू टाकलीये त्यामुळेच होतंय.”

नफेखोरी त्याला सतावते. “काही जुन्या लोकांना अजूनही असंच वाटतं की त्यांच्या पूर्वजांनी पुरेसे मासे धरले नाहीत म्हणून ते आज गरीब आहेत. मग ते जास्तीत जास्त नफा मिळवायच्या मागे लागतात, ज्यामुळे सागरी संपदेचा अनिर्बंध उपसा केला जातो. आमच्यासारख्या काही तरुणांना आता यातला धोका लक्षात आलाय त्यामुळे आम्ही या ‘काळ्या जादूचा’ प्रभाव उतरवायचा प्रयत्न करतोय.”

नफेखोरी त्याला सतावते. ‘काही जुन्या लोकांना अजूनही असंच वाटतं की त्यांच्या पूर्वजांनी पुरेसे मासे धरले नाहीत म्हणून ते आज गरीब आहेत...मग ते जास्तीत जास्त नफा मिळवायच्या मागे लागतात, ज्यामुळे सागरी संपदेचा अनिर्बंध उपसा केला जातो’

व्हिडिओ पहाः आरजे यशवंत पाम्बनचा हवामान अहवाल सांगतोय

असं असलं तरीही समाजाकडचं पारंपरिक ज्ञान हा आजही एक मोठा ठेवा आहे ज्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. “तज्ज्ञ मंडळी बरेचदा काय करतात,” मधुमिता म्हणते, “त्या ज्ञानाला पुष्टी देतात आणि आम्हाला दाखवून देतात की आम्ही त्याचा वापर केला पाहिजे. आमचं रेडिओ केंद्र या पारंपरिक ज्ञानाचा आदर करतं आणि त्यासाठी एक मंच निर्माण करून देतं. आणि त्या बदल्यात लोक आमच्या प्रसारणांमधून मिळणाऱ्या तज्ज्ञांकडच्या माहितीचा वापर करतात.”

पाम्बन नाविक संघटनेचे (Pamban Country Boats Fishermen’s Association) अध्यक्ष, एस. पी. रायप्पन याला दुजोरा देतात. “आम्ही कायमच अतिरिक्त मासेमारीबद्दल आणि त्यातल्या धोक्यांबद्दल बोलत आलोय. पण कादल ओसईवरच्या मच्छिमारांनी जास्त जोरकसपणे जाणीव जागृती केली आहे. आमची लोकं आजकाल एखाद्या ड्यूगाँग किंवा कासवाचा जीव वाचवण्यासाठी आपली महागडी जाळी तोडावी लागली तरी मागे पुढे पाहत नाहीत.” कोण जाणो, एक दिवस आपल्या रेडिओ केंद्राच्या प्रयत्नातून या बेटावर मांदईकळुगु परत मिळू लागेल अशी सैलास आणि मधुमिताला आशा आहे.

बहुतेक कम्युनिटी रेडियो केंद्रांप्रमाणे या केंद्रांचं प्रसारणही १५ किलोमीटरच्या कक्षेबाहेर होत नाही. पण पाम्बनच्या रहिवाशांनी कादल ओसईला आपलंसं केलं आहे – “आम्हाला आमच्या श्रोत्यांकडून दिवसाला १० तरी पत्रं येतात,” गायत्री सांगतात. “सुरुवातीला लोकांना प्रश्न पडला होता की आम्ही कोण आहोत आणि आम्ही नक्की कोणत्या ‘विकासा’च्या गप्पा करतोय. आज त्यांचा आमच्यावर विश्वास बसलाय.”

वातावरणच तेवढं विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही.

शीर्षक छायाचित्रः पाम्बनमध्ये ८ जून रोजी जागतिक महासागर दिन साजरी करणारी मुलं, हातातल्या फलकावर लिहिलंय कादल ओसई (फोटोः कादल ओसई)

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Kavitha Muralidharan

Kavitha Muralidharan is a Chennai-based independent journalist and translator. She was earlier the editor of 'India Today' (Tamil) and prior to that headed the reporting section of 'The Hindu' (Tamil). She is a PARI volunteer.

Other stories by Kavitha Muralidharan

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale