“ओ शब भोट-टोट छाडो. शोंध्या नामार आगे ओनेक काज गो [ते मत-बित सगळं राहू दे. संध्याकाळ व्हायच्या आत हजार कामं उरकायचीयेत].... इथे येऊन आमच्यात बसणार असलीस तर बस, वास सहन होत असेल तर,” आपल्या जवळ जमिनीकडे हात दाखवत म्हातारी मालती मावशी माल मला सांगते. कांद्याच्या एका मोठाल्या ढिगाभोवती ती आणि तिच्या बरोबरच्या अनेक जणी काम करत होत्या. तिथेच ती मला बोलावत होती. उकाडा आणि धुळीचं त्यांना काहीही वावडं नव्हतं. गेला आठवडाभर मी या गावात येत-जात होते. या बायांसोबत जायचं, त्यांना चालू असलेल्या निवडणुकीबद्दल विचारायचं असं काय काय सुरू होतं.

एप्रिल नुकताच सुरू झालाय. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये या प्रांतात पारा रोजच ४१ अंशाला जातो. माल पहाडियांच्या या झोपडीत संध्याकाळचे पाच वाजले तरी गरमा कमी झालेला नाही. आसपास काही झाडं आहेत पण एकही पान हलत नाहीये. हवेत फक्त ताज्या आणि तिखट कांद्यांचा दर्प भरून राहिलाय.

उपटून टाकलेल्या कांद्यांच्या ढिगाभोवती अर्धगोलात या बाया बसल्या आहेत. विळ्याने पात काढून टाकायची आणि कांदे बाजूला टाकायचे असं त्यांचं काम सुरू आहे. दुपारची उन्हाची काहिली, त्यात कच्च्या कांद्यातून येणाऱ्या वाफा अशा सगळ्यामुळे त्यांचे चेहरे उजळलेत. प्रचंड कष्ट करणाऱ्या श्रमिकाच्या चेहऱ्यावरच हे असं ‘तेज’ दिसून येतं.

“हा काही आमचा ‘देश’ [मूळ गाव] नाही. गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही इथे येतोय,” साठी पार केलेली मालती मावशी आजी सांगते. ती आणि तिच्या बरोबरच्या या बाया माल पहाडिया आदिवासी आहेत. त्यांची नोंद अनूसुचित जमात म्हणून केलेली असली तरी आदिवासींमध्येही हे लोक सर्वात वंचित आणि बिकट परिस्थितीत जगतायत.

“आमच्या गोआस कालिकापूर गावात कामच नाहीये,” ती सांगते. आणि त्यामुळेच मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या राणीनगर ब्लॉक १ मधल्या गोआस गावातली जवळपास ३० हून जास्त कुटुंबं इथे बिशुरपुकुर गावाच्या वेशीवर आपल्या झोपड्या बांधून इथल्या शेतांमध्ये कामाला आली आहेत.

७ मे रोजी त्यांच्या गावात मतदान होणार असल्याने त्यासाठी आपण गावी परत जाणार असल्याचं त्या मला सांगतात. बिशुरपुकुर पाड्यापासून गोआस कालिकापूर सुमारे ६० किलोमीटरवर आहे.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

आदिवासी माल पहाडिया आणि संथाल स्त्रिया आपापल्या पाड्यांमधून मुर्शिदाबादच्या बेलडांगा १ तालुक्यात कामाला येतात. मालती मावशी माल (उजवीकडे, उभी) तासंतास उकिडवं बसून काम केल्यानंतर दुखरे पाय ताणतीये

राणीनगर १ तालुक्यातून बेलडांगा १ तालुक्यात कामासाठी होणारं हे स्थलांतर जिल्ह्यातल्या रोजगाराची आणि त्यासाठी होणाऱ्या स्थलांतराची बिकट परिस्थिती आपल्याला दाखवतं.

पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये माल पहाडिया आदिवासींची वस्ती आहे. एकट्या मुर्शिदाबादमध्येच १४,०६४ माल पहाडिया राहतात. “आमचे पूर्वज राजमहल डोंगररांगाच्या आसपास रहायचे. तिथून मग काही जण झारखंड [राजमहल आज या राज्यात आहे] आणि पश्चिम बंगालला आले,” झारखंडच्या डुमका इथे राहणारे अभ्यासक आणि कार्यकर्ते रामजीवन अहारी सांगतात.

झारखंडमध्ये या आदिवासींची नोंद विशेष बिकट परिस्थितीत राहणारा आदिवासी समूह (पीव्हीटीजी) अशी केली आहे असं रामजीवन सांगतात. “एकाच समुदायाला दोन राज्यांत वेगवेगळा दर्जा दिला जातो यातून सरकारचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा वेगळा आहे ते दिसून येतं,” ते म्हणतात.

“इथल्या लोकांना त्यांच्या शेतात काम करण्यासाठी आमची गरज पडते,” मालती मावशी सांगते. आपल्या घरापासून दूर इथे येऊन राहण्याचं हे खरं कारण. “पेरणी आणि कापणीच्या वेळी आम्हाला दिवसाला २५० रुपये मजुरी मिळते.” त्यातही एखादा भल्या मनाचा शेतकरी असेल तर तो काढलेला मालही थोडा फार त्यांना देत असतो.

मुर्शिदाबादमधले स्थानिक रहिवासी कामाच्या शोधात जिल्ह्याच्या बाहेर जातात. त्यामुळे इथे शेतात कामासाठी मजूरच मिळत नाहीत. आदिवासी शेतकरी/शेतमजूर ती गरज थोडी फार तरी भागवतात. बेलडांगा १ तालुक्यातले शेतमजूर दिवसाला ६०० रुपये मजुरी घेतात पण दुसऱ्या तालुक्यातून आलेले आदिवासी मजूर, त्यातही स्त्रिया मात्र त्याच्या निम्म्या मजुरीत काम करतात.

“शेतातून काढलेला कांदा गावात आणला की आमचं त्याच्या पुढचं काम सुरू होतं,” अंजली माल सांगते. अंगकाठीने किरकोळ असलेली १९ वर्षांची अंजली कांदे कापणीचं काम करते.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः अंजली माल आपल्या झोपडीसमोर. आपल्याला कधी शाळेत जाता आलं नाही म्हणून मुलीने शिकावं अशी तिची फार इच्छा आहे. उजवीकडेः कांद्याची पोती ट्रकमध्ये लादली जातायत. इथून हा कांदा पश्चिम बंगालच्या आणि बाहेर राज्यातल्या बाजारपेठांमध्ये पोचेल

या सगळ्या जणी कांदे छाटून फाडियांना विकण्यासाठी पोती बांधतात. तिथून तो कांदा राज्यात आणि राज्याबाहेरच्या बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी तयार. “विळ्याने पात काढून टाकायची. सुटी सालं काढायची आणि माती न् मुळं झटकायची. त्यानंतर कांदा पोत्यात भरायचा,” अंजली सांगते. ४० किलोच्या पोत्याचे त्यांना २० रुपये मिळतात. “जितकं जास्त काम करू तितकी कमाई जास्त होते. त्यामुळे आम्ही सतत कामच करत राहतो. शेतातल्या कामाहून हे निराळं आहे,” कारण तिथे कामाच्या वेळा आणि तास निश्चित असतात.

सधन मोंडल, सुरेश मोंडल, धोनू मोंडल आणि राखोहोरी मोंडल हे सगळे मुर्शिदाबादमधले चाळिशीतले शेतकरी. ते आपल्या शेतात आदिवासींना कामावर घेतात. त्यांचं म्हणणं आहे की मजुरांना फार मोठी मागणी आहे. वर्षभर “अधून-मधून.” पिकं शेतात असतात तेव्हा तर जास्तच. या भागात प्रामुख्याने मामल पहाडिया आणि संथाल आदिवासी बाया शेतात मजुरीला येतात, हे शेतकरी आम्हाला सांगतात. आणि त्यांचं सगळ्यांचं एकमत होतं की “त्यांच्याशिवाय आम्हाला शेती करत राहणं शक्य होणार नाही.”

हे काम थकवणारं आहे. “स्वयंपाक करायला सुद्धा वेळ मिळत नाही...” कांदे छाटता छाटता मालती मावशी सांगते. “बेला होये जाय. कोनोमोते दुतो चाल फुटिये नी. खाबार-दाबारेर अनेक दाम गो. [फार वेळ होतो. मग कसं तरी करून थोडा भात रांधायचा. खाणं फार महाग झालंय].” दिवसभराचं शेतातलं काम झालं की या बायांपुढे घरच्या कामाचा ढीग पडलेला असतो. झाडलोट करा, कपडे धुवा, आंघोळ उरकून रात्रीच्या जेवणाची तयारी करा.

“सतत थकल्यासारखं वाटतं,” ती सांगते. का ते इतक्यात झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी सर्वे (एनएफएचएस - ५) मधून आपल्याला समजतं. या जिल्ह्यातल्या स्त्रिया आणि बालकांमध्ये रक्तक्षयाचं म्हणजेच अनीमियाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतं. ५ वर्षांखालच्या ४० टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे.

त्यांना रेशनवर धान्य मिळत नाही?

“नाही ना. आमची रेशन कार्डं आमच्या गावातली आहेत. घरचे लोक घेतात त्यावर रेशन. आम्ही घरी जातो तेव्हा थोडं फार धान्य इकडे घेऊन येतो,” मालती मावशी संगते.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

बिसुरपुकुरची माल पहडिया वस्ती. इथे स्थलांतरित शेतमजुरांची तीसेक घरं आहेत

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ सारखी योजना आहे आणि त्यांच्यासारख्या जिल्हांतर्गत स्थलांतर करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो हे ऐकून त्यांना मनापासून आश्चर्य वाटतं. “आम्हाला कुणी कधी काही सांगितलंच नाही. आम्ही काय शिकलेलो नाही. कसं कळणार?” काकी विचारते.

“मी कधीच शाळेत गेले नाही,” अंजली सांगते. “पाच वर्षांची होते तेव्हा आई गेली. बाबा आम्हाला सोडून गेले. तिघी बहिणी. शेजाऱ्यांनीच आम्हाला मोठं केलं,” ती सांगते. अगदी लहान वयात या तिघी मुलींना शेतात काम करायला सुरुवात केली आणि वयात आल्या आल्या त्यांची लग्नं देखील झाली. १९ वर्षांच्या अंजलीला तीन वर्षांची मुलगी आहे. अंकिता तिचं नाव. “मी शिकू शकले नाही. नाम-सोइ (स्वाक्षरी) तेवढी कशी बशी येते,” ती सांगते. त्यांच्या समाजाच्या बहुतेक किशोरी मुलींची शाळा सुटल्याचं ती सांगते. तिच्या पिढीच्या किती तरी जणी निरक्षर आहेत.

“माझ्या मुलीची गत माझ्यासारखी नको व्हायलाय पुढच्या वर्षी तिला शाळेत घालावं अशी फार इच्छा आहे. नाही तर ती काहीच शिकू शकणार नाही,” ती म्हणते. तिच्या आवाजात मनातली चिंता स्पष्ट ऐकू येते.

कोणत्या शाळेत? बिशुरपुकुरच्या प्राथमिक शाळेत?

“नाही. आमची लेकरं इथल्या शाळेत नाही जात. अगदी लहानगीसुद्धा खिचुडी शाळेत [अंगणवाडीत] जात नाहीत,” ती म्हणते. या समाजाबद्दलचा लोकांच्या मनातला कलंक आणि भेदभाव हे त्यामागचं कारण. शिक्षण हक्क कायदा सुद्धा काही करू शकत नाही हेच अंजलीच्या बोलण्यातून व्यक्त होतं. “इथे तुम्हाला दिसतायत ना त्यातली बहुतेक मुलं शाळेत जात नाहीत. काही जण गोआस कालिकापूरच्या शाळेत जातात. पण मग आम्हाला मदत करायला इथे आले की त्यांची शाळा बुडते.”

२०२२ साली झालेल्या एका अभ्यासानुसार माल पहाडियांमध्ये साक्षरतेचं प्रमाण ४९.१० टक्के आणि त्यातही स्त्रियांमध्ये केवळ ३६.५० टक्के इतकं आहे. बंगालमध्ये आदिवासी पुरुषांमध्ये साक्षरता दर ६८.१७ टक्के तर स्त्रियांमध्ये केवळ ४७.७१ टक्के इतका आहे.

अगदी पाच-सहा वर्षांच्या मुली देखील आपल्या आईला किंवा आजीला कांदे उचलून वेताच्या टोपलीत टाकायला मदत करताना दिसत होत्या. दोन मुलं या टोपल्यांमधले कांदे प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरत होते. मुला-मुलींची, वयामुसार आणि शक्तीनुसार कामाची विभागणी झालेली दिसत होती. “जोतो होत, तोतो बोश्ता, तोतो टांका [जितके हात, तितकी पोती, तितका पैसा],” अंजली अगदी सहज सांगते.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

इथल्या वस्तीतली मुलं शाळेत जात नाहीत. आपल्या गावी जाणारी काही जण इथे मदत करायला येतात आणि त्यांची शाळा बुडते

या वेळी अंजली पहिल्यांदाच मत देणार आहे. लोकसभा निवडणुकांचं मतदान येऊन ठेपलंय. “मी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत मत दिलंय. पण मोठ्या निवडणुकीला पहिलीच वेळ आहे!” ती हसत सांगते. “मी जाणारे. आमच्या वस्तीतले आम्ही सगळेच गावी जाऊन मत देणार आहोत. नाही तर आम्ही आहोत हेच ते विसरून जातील.”

तुमच्या मुलांसाठी शिक्षणाची मागणी करणार का?

“कुणाला मागायचं?” अंजली म्हणते आणि काही क्षण थांबून स्वतःच या प्रश्नाचं उत्तर देते. “आमचं मतदान इथे [बिशुरपुकुर] नाही. त्यामुळे इथे कुणाला आमची फिकीर नाही. आणि आम्ही वर्षभर तिथे [गोआस] मध्ये नसतो त्यामुळे तिथेदेखील आम्हाला फार काही बोलता येत नाही. आमरा ना एखानेर, ना ओखानेर [आम्ही ना धड इथले, ना तिथले].”

निवडणुकीला उभं राहिलेल्या उमेदवारांकडून नक्की काय अपेक्षा ठेवायची हेच आपल्याला कळत नाही असं तिचं म्हणणं. “अंकिता पाच वर्षांची झाली की तिला शाळेत घालायचंय इतकंच मला माहीत आहे. आणि मला तिला घेऊन गावात रहायचंय. परत इथे यायचं नाहीये. पण कुणास ठाऊक काय होईल?” असं म्हणत ती उसासा टाकते.

“काम केलं नाही तर जगायचं कसं?” मधुमिता माल विचारते. १९ वर्षांची मधुमिताही आई आहे. “शाळेत घातलं नाही तर आमची लेकरंसुद्धा आमच्यासारखीच राहतील.” भविष्यात काय वाढून ठेवलंय याची खात्रीच तिच्या आवाजात असते. आश्रम होस्टेल, शिक्षाश्री अशांसारख्या राज्य सरकारच्या योजनाच या तरुण आयांना माहित नाहीयेत. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी केंद्रातर्फे चालवण्यात येणारी एकलव्य मॉडेल डे बोर्डिंग स्कूल ही योजनाही त्यांना माहीत नाही.

बिशुरपुकुर गाव बेहरामपूर मतदारसंघाचा भाग आहे. १९९९ पासून इथे काँग्रेसची सत्ता होती. त्यांनीही आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी फार काही केलेलं नाही. २०२४ च्या आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी प्रत्येक तालुक्यात गरीब विद्यार्थ्यांसाठी, त्यातही खास करून दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करणार असल्याचं वचन दिलं आहे. पण या बायांना यातलं काहीही माहीत नाही.

“आम्हाला कुणी काही सांगितलंच नाही तर आम्हाला कधीच हे सगळं कळणार नाही,” मधुमिता म्हणते.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः आपल्या झोपडीत बसलेली मधुमिता माल आणि तिचा मुलगा अविजित माल. उजवीकडेः मधुमिताच्या घरातले कांदे

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः शोनामोनी माल आपल्या मुलासोबत झोपडीच्या बाहेर बसलीये. उजवीकडेः शोनामोनीची मुलं झोपडीच्या आत. माल पहाडियांच्या या वस्तीत एक गोष्ट अगद मुबलक पहायला मिळते. कांदे. जमिनीवर पसरलेले, छताला अडकवलेले

“दीदी, आमच्याकडे सगळी कार्डं आहेत – मतदार कार्ड, आधार कार्ड, जॉब कार्ड, स्वास्थ्य साथी विमा कार्ड, रेशन कार्ड,” १९ वर्षांची शोनामोनी माल सांगते. आपल्या दोन मुलांना शाळेत टाकायची तिची धडपड सुरू आहे. “मी मत दिलं असतं. पण या वेळी माझं नावच यादीत नाहीये.”

“भोट दिये आबार की लाभ होबे? [मत देऊन तुम्हाला काय मिळणारे?] मी किती तरी वर्षं मत देतीये,” सत्तरीच्या साबित्री माल म्हणतात. त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांमध्ये एकच हशा पिकतो.

“मला फक्त म्हातारपणीचं १,००० रुपये पेन्शन मिळतं. बाकी काहीसुद्धा नाही. गावात कामं नाहीत, तरी आम्हाला तिथेच मत द्यायचंय,” साबित्री काकी सांगतात. “तीन वर्षं झाली त्यांनी आम्हाला आमच्या गावात ‘एकशो दिनेर काज’ दिलं नाहीये,” त्या त्यांची तक्रार सांगतात. मनरेगामध्ये मिळणाऱ्या १०० दिवस रोजगाराबद्दल त्या बोलत असतात.

“सरकारने माझ्या घरच्यांना घर दिलंय, पण तिथे राहता येत नाहीय कारण कामच नाही. एकशो दिनेर काज मिळालं असतं तर मी इथे आलेच नसते,” अंजली सांगते. प्रधान मंत्री आवास योजनेखाली तिच्या कुटुंबाला घर मिळालं आहे.

जगण्यासाठी लागणारी कामं किंवा इतर पर्यायच उपलब्ध नसल्याने इथल्या बहुतेक भूमीहीन कुटुंबांना कामाच्या शोधात दूर दूर स्थलांतर करून जावं लागतं. साबित्री काकी सांगतात की गोआस कालिकापूरचे बहुतेक तरुण कामाच्या शोधात पार बंगळुरू किंवा केरळला गेलेत. थोडं वय झालेल्या पुरुषांना आपल्या गावाच्या जवळ राहून काम करायचं असतं पण इथे रोजगार, नोकऱ्या काहीच नाही. अनेक जण राणीनगर १ तालुक्यातल्या वीटभट्ट्यांवर कामाला जातात.

“बायांना आपली लहान लेकरं घेऊन वीटभट्ट्यांवर किंवा इतर गावात कामाला जायचं नसतं,” काकी सांगतात. “आज या वयात मी भाटा [वीटभट्टी] वर कामाला जाऊ शकत नाही. पण पोटात चार घास घालायचे म्हणून मी इथे येते. माझ्यासारख्या आणखी काही म्हाताऱ्या आहेत इथे. आमच्याकडे शेरडं आहेत. मी त्यांना चारायला घेऊन जाते,” त्या सांगतात. त्यांच्यापैकी ज्याला जमेल ते “गोआसला जातात आणि धान्य वगैरे घेऊन येतात. आम्ही गरीब आहोत. काहीही विकत घेणं शक्य नाही.”

कांद्याचा हंगाम संपल्यावर कसं? गोआसला परत जाणार?

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

रानातनं कांदे काढले की शेतमजूर ते साफ करतात, त्याची प्रतवारी करून पोत्यात भरतात आणि आता ते बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः दुपारी शेताच्याच जवळ या सगळ्या कामगार महिला जेवणासाठी थोडा वेळ सुटी घेतात. उजवीकडेः मालती मावशी, त्यांची शेळी आणि त्यांनी भरलेली कांद्याची पोती

“कांदा काढून भरून झाला की तीळ, ताग आणि उन्हाळी साळीची लागवड केली जाते,” अंजली सांगते. एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत शेतातलं काम वाढतं त्यामुळे तसंच “झटपट पैसा मिळावा म्हणून अजूनही किती तरी आदिवासी आणि त्यांची लहान लेकरं आता इथे यायला लागतील,” ती सांगते.

दोन पिकांच्या मध्ये फारसं काम नसतं तेव्हा शेतात फार कमी दिवस रोजगार मिळतो असं ही तरुण शेतमजूर सांगते. पण फिरत्या स्थलांतरितांसारखे ते परत जात नाहीत. इथेच राहतात. “आम्ही जोगारेर काज, ठिके काज [गवंड्याच्या हाताखाली, ठेक्याची कामं] करतो. जे काही जमेल ते काम करायचं. आम्ही या झोपड्या इथे बांधल्या आहेत आणि आम्ही इथेच राहतो. प्रत्येक झोपडीमागे आम्ही जमीनमालकाला २५० रुपये देतो,” अंजली सांगते.

“इथे आमच्याकडे बघायला कुणीही येत नाही. ना नेते मंडळी, ना कुणीच नाही... जा. तू स्वतः जाऊन बघ,” साबित्री काकी म्हणते.

एका कच्च्या चिंचोळ्या गल्लीतून मी त्या झोपड्यांच्या वस्तीत शिरते. १४ वर्षांची सोनाली मला वाट दाखवायला सोबत येते. ती तिच्या घरी २० लिटर पाण्याची बादली घेऊन चाललीये. “मी तळ्यावर आंघोळ करून आले आणि येताना बादली पण भरून आणली. आमच्या बस्तीत नळ नाही. तळं फार घाण झालंय. पण करणार काय?” ती सांगतीये ते तळं इथून २०० मीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात इथेच ताग भिजत घालतात आणि त्याचे धागे काढले जातात. या पाण्यात जीवाणु तर आहेतच पण माणसासाठी घातक असलेली रसायनं देखील या पाण्यात आहेत.

“हे आमचं घर. मी आणि बाबा इथे राहतो,” असं सांगत ती कपडे बदलण्यासाठी घरात जाते. मी बाहेर थांबते. बांबूच्या काठ्या आणि तागाच्या काड्या एकमेकीत विणून त्याला शेणामातीचा गिलावा केलेल्या भिंती. बांबूच्या खांबांवर बांबूच्याच फळ्या आणि पेंढा अंथरलेलं छत आणि त्यावर ताडपत्री.

“तुला आत यायचंय?” केस विंचरता विंचरता सोनाली विचारते. घराच्या भिंतींतून तिन्ही सांजेचा प्रकाश आत येत होता. १० बाय १० च्या त्या घरात आत काय काय आहे ते दिसत होतं. “मा माझ्या भावा-बहिणीबरोबर गोआसला राहते,” ती सांगते. राणीनगर १ तालुक्यातल्य एका वीटभट्टीवर तिची आई कामाला जाते.

“मला घराची फार आठवण येते. माझी मावशीसुद्धा आपल्या मुलांना घेऊन इथे आलीये. रात्री झोपायला मी तिच्याकडेच जाते,” सोनाली सांगते. शेतात कामाला जावं लागतं म्हणून आठवीत असताना तिची शाळा बंद झाली.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः आपल्या घराच्या बाहेर फोटोसाठी अगदी खुशीत उभी असलेली सोनाली माल. उजवीकडेः तिच्या झोपडीतलं सामान. इथे कष्ट म्हणजे यशाची गुरुकिल्ली नाही हे नक्की

सोनाली तळ्यावर धुऊन आणलेले कपडे वाळत घालायला जाते आणि मी तिच्या घरावर नजर टाकते. एका कोपऱ्यात एका बाकड्यावर थोडी भांडी, आजूबाजूच्या उंदरांपासून भात आणि इतर धान्य वगैरे सुरक्षित रहावं म्हणून ते ठेवण्यासाठी एक घट्ट झाकण असलेली एक प्लास्टिकची बादली, वेगवेगळ्या आकाराचे अनेक प्लास्टिकचे कॅन, डबे. खाली जमिनीत रोवलेली मातीची चूल हे इथलं स्वयंपाकघर.

काही कपडे लटकवलेले होते, दुसऱ्या कोपऱ्यात भिंतीलाच अडकवलेला एक आरसा आणि कंगवा. गुंडाळी केलेली प्लास्टिकची चटई, मच्छरदाणी आणि एक जुनं पांघरूण सगळं काही आतल्या आडूवर लटकवलेलं. इथे कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली नाही हे नक्की. एका बापलेकीच्या प्रचंड कष्टाची एक खूण मात्र इथे अगदी मुबलक पहायला मिळेल. कांदे. जमिनीवर टाकलेले आणि छताला लटकवलेले भरपूर कांदे.

“आमचा संडास दाखवते, ये,” सोनाली घरात येता येता मला म्हणते. मी तिच्या मागे जाते. काही झोपड्या पार करून गेल्यावर आम्ही त्यांच्या वस्तीच्या कडेला पोचतो. तिथे एक ३२ फुट मोकळी जागा आहे. आणि तिथेच ४ बाय ४ फूट जागेला पोत्याची चवाळ बांधून एक संडास तयार केलाय. “लघवीला आम्ही इथे जातो आणि इथून थोडं लांब शौचाला,” ती सांगते. मी जरा एक पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात ती मला थांबवते. चुकून मैल्यात माझा पाय पडेल म्हणून.

या बस्तीवर शौचाची, स्वच्छतेच्या सोयींची पूर्ण वानवा. पण माल पहाडियांच्या याच बस्तीकडे येताना दिसलेले मिशन निर्मल बांग्लाचे रंगीबेरंगी संदेश मला आता नीट आठवायला लागले. त्या पोस्टरवरची राज्य सरकारच्या स्वच्छता प्रकल्पाची भलामण होतीच पण मड्डाची ग्राम पंचायत कशी हागणदारीमुक्त झालीये त्याबद्दलही स्तुती केलेली होती.

“पाळी आली की फार त्रास होतो. किती तरी वेळा संसर्ग होतो. पाणीच नाही तर कसं काय सगळं करणार? तळ्यातल्या पाण्यात नुसती घाण आणि चिखल आहे,” सोनाली सांगते. लाज, संकोच काहीही न बाळगता मोकळेपणाने ती आपली अडचण सांगते.

पिण्याचं पाणी कुठून येतं?

“आम्ही [खाजगी] पाणीवाल्यांकडून विकत घेतो. २० लिटरच्या जारला १० रुपये. संध्याकाळी येतो आणि मुख्य रस्त्यावर थांबतो. ते मोठमोठे जार आम्हालाच आमच्या झोपडीपर्यंत आणावे लागतात.”

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः वस्तीतली संडास म्हणून वापरली जाणारी जागा. उजवीकडेः बिशुरपुकुर पाड्यावरचे मिशन निर्मल बांग्लाचे रंगीत संदेश ज्यात मड्डाच्या हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीची स्तुती करण्यात आली आहे

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः आंघोळ, धुणी-भांडी अशा सगळ्यासाठी माल पहाडिया मजूर याच प्रदूषित तळ्याचा वापर करतात. उजवीकडेः पिण्याचं पाणी खाजगी पाणीवाल्यांकडून विकत घ्यावं लागतं

“तुला माझ्या मैत्रिणीला भेटायचंय?” एकदम उत्साहात येऊन ती मला विचारते. “ही पायल. ती माझ्यापेक्षा जरा मोठी आहे. पण आम्ही मैत्रिणी आहोत.” सोनाली मला तिच्या नुकतंच लग्न झालेल्या मैत्रिणीची ओळख करून देते. १८ वर्षांची पायल तिच्या झोपडीत रात्रीचा स्वयंपाक करत होती. पायल मालचा नवरा बंगळुरूमध्ये बांधकामावर काम करतो.

“माझं येणं-जाणं सुरू असतं. माझी सासू इथेच राहते,” पायल सांगते. “गोआसमध्ये फार एकटं एकटं वाटतं, म्हणून मी इथे येऊन तिच्याजवळ राहते. माझा नवरा कामासाठी गेला त्याला फार दिवस झालेत. कधी परत येईल काहीच माहित नाही. निवडणुकांना येईल कदाचित,” ती म्हणते.

इथे औषधगोळ्या मिळतात का?

“हो, आशा दीदीकडून लोहाच्या गोळ्या मिळतात,” ती सांगते. “माझी सासू मला [अंगणवाडी] केंद्रात घेऊन गेली होती. तिथे त्यांनी मला थोडी औषधं दिली. माझे पाय बऱ्याचदा सुजतात आणि दुखतात. इथे तपासणी वगैरे करायला कुणीच नाही. हे कांद्याचं काम उरकलं की मी गोआसला परत जाणारे.”

तब्येतीचं अचानक काही झालं तर इथल्या बायांना बेलडांगाला जावं लागतं. इथून ३ किलोमीटरवर. दुकानातनं नुसत्या गोळ्या किंवा मलमपट्टी करायला काही आणायचं तर त्या इथून एक किलोमीटरवर असलेल्या मरकमपूर बाजारात जातात. पायल आणि सोनालीच्या कुटुंबाकडे स्वास्थ्य साथी कार्ड आहेत. पण त्या सांगतात की अचानक काही झालं तर उपचार मिळणं फार फार अवघड आहे.

आम्ही बोलत होतो आणि वस्तीतली चिल्लीपिल्ली आमच्याभोवती पळत होती. अंकिता आणि मिलोन दोघंही तीन वर्षाचे आहेत. ते आणि ६ वर्षांचा देबराज मला त्यांची खेळणी दाखवतात. जुगाड खेळणी. या तल्लख आणि कल्पक डोक्यातून आलेली आणि जादूच्या हातांनी तयार केलेली. “आमच्याकडे इथे टीव्ही नाही. मी माझ्या बाबाच्या फोनवर अधूनमधून गेम खेळतो. पण कार्टूनची फार आठवण येते.” निळी-पांढरी पट्टेरी अर्जेंटिना जर्सी घातलेला देबराज आपली तक्रार सांगतो.

या वस्तीतली सगळी मुलं कुपोषित वाटतात. “त्यांना सारखाच ताप आणि पोटाचं काही तरी होत असतं,” पायल सांगते. “डासही आहेतच ना,” सोनाली म्हणते. “एकदा मच्छरदाणीत शिरल्यावर आभाळ फाटलं तरी आम्ही बाहेर येत नाही.” असं म्हणत दोघी मैत्रिणी हसायला लागतात. मधुमिता पण त्यांच्याबरोबर हसू लागते.

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः पायल आणि सोनाली माल (उजवीकडे) दिवसभऱाच्या कामानंतर जरा निवांत बसून मजा करतायत. उजवीकडेः पायल नुकतीच १८ वर्षांची झालीये. तिने अजून मतदार म्हणून नोंदणी केलेली नाही

PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः भानू माल कामाच्या ठिकाणी. ‘थोडी हाडिया [भात आंबवून केलेली पारंपरिक दारू] आणि तळलेलं काही तरी आण. मी तुला पहाडिया गाणं म्हणून दाखवते,’ भानू काकी म्हणते. उजीवकडेः वस्तीतली मुलं आपल्या कल्पक डोक्यातल्या भन्नाट कल्पना वापरून भारी खेळणी तयार करतात

मी पुन्हा एकदा त्यांना निवडणुकींबद्दल काही विचारायचा प्रयत्न करते. “आम्ही जाऊ ना. पण खरं सांगू, इथे आम्हाला भेटायला कुणीही येत नाही. आम्ही जाऊ कारण आमच्या घरच्या मोठ्यांना वाटतं की मतदान महत्त्वाचं आहे.” मधुमिता अगदी प्रामाणिकपणे सांगते. ती पहिल्यांदाच मतदान करणार आहे. पायल आताच १८ वर्षांची झालीये त्यामुळे तिचं नाव काही अजून यादीत आलेलं नाही. “चार वर्षांनी मी पण त्यांच्यासारखी होणार,” सोनाली म्हणते. “मी पण मग मत देणार. पण त्यांच्यासरखं लग्न काही करणार नाही,” असं म्हणत परत सगळ्या जणी हसू लागतात.

मी वस्तीतून बाहेर पडते. त्या तरुण मुलींचं खळखळून हसणं, चिल्ल्यापिल्ल्यांचा किलबिलाट माहे पडतो. कांदे कापणाऱ्या बायांचे आवाज कानात घुसतात. त्यांचं दिवसभराचं काम संपलंय.

“या वस्तीत माल पहाडिया भाषेत बोलणारं कुणी आहे का?” मी विचारते.

“थोडी हाडिया [भात आंबवून बनवलेली पारंपरिक दारू] आणि तळलेलं काही तरी आण. मीच तुला पहाडिया गाणं म्हणून दाखवते,” भानू माल म्हणते. ६५ वर्षांची भानू काकी विधवा आहे. आपल्या भाषेत काही ओळी गायल्यानंतर ती मला अगदी प्रेमाने म्हणते, “तू गोआसला ये. तिथे तुला आमची भाषा ऐकायला मिळेल.”

“तू पण बोलतेस?” मी अंजलीला विचारते. तिच्या भाषेबद्दलचा हा प्रश्न ऐकून ती जराशी भांबावतेच. “आमची भाषा? गोआसला फक्त म्हातारी माणसं आमच्या भाषेत बोलतात. इथे लोक हसतात. आम्ही विसरून गेलोय. आम्ही फक्त बांग्ला बोलतो.”

अंजली तिच्या मैत्रिणींबरोबर वस्तीच्या दिशेने जायला लागते आणि म्हणते, “आमचं घर आणि सगळंच गोआसमध्ये आहे. इथे आहे काम. आगे भात...भोट, भाषा तार पोरे [आधी भात, मत, भाषा वगैरे सगळं काही नंतरची बात].”

Smita Khator

Smita Khator is the Chief Translations Editor, PARIBhasha, the Indian languages programme of People's Archive of Rural India, (PARI). Translation, language and archives have been her areas of work. She writes on women's issues and labour.

Other stories by Smita Khator
Editor : Pratishtha Pandya

Pratishtha Pandya is a Senior Editor at PARI where she leads PARI's creative writing section. She is also a member of the PARIBhasha team and translates and edits stories in Gujarati. Pratishtha is a published poet working in Gujarati and English.

Other stories by Pratishtha Pandya
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale