“किटकिट, लट्टू आणि ताश खेला,” अहमद यादीच सांगतो.

क्षणातच दुरुस्त करतो. सांगतो, “मी नाही, पण हा अल्लरखा खेळतो, लंगडी वगैरे.”

आपण एक वर्षाने मोठे आहोत आणि जरा भारी खेळ खेळतो हे सिद्ध करत अहमद म्हणतो, “हे असले पोरींचे खेळ काही मला आवडत नाहीत. मी शाळेच्या मैदानात बॅट-बॉल खेळतो. शाळा बंद आहे सध्या पण आम्ही भिंतीवरून उड्या टाकून मैदानात जातो.”

ही दोघं भावंडं आश्रमपाडा भागातल्या बाणीपीठ प्राथमिक शाळेत शिकतात. अल्लारखा तिसरीत आणि अहमद चौथीत.

२०२१ साली डिसेंबर महिन्यात आम्ही पश्चिम बंगालच्या बेलडांगा – १ तालुक्यात विडी कामगार महिलांना भेटायला गेलो होतो.

एका एकुलत्या एक आंब्याच्या झाडापाशी आम्ही थांबलो होतो. एका जुन्या दफनभूमीतून जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेच्या कडेला हे झाड एकटंच उभं होतं. मागे लांब मोहरीची पिवळी शेतं डुलत होती. सगळं कसं चिडीचूप. दफनभूमीतल्या कबरींमध्ये मृतात्मे चिरनिद्रा घेत होते. आणि जणू काही त्यांच्यावर लक्ष ठेवत हा उंच आम्रवृक्ष एकटाच स्थिर उभा होता. चैत्रात फळं लागेपर्यंत पक्ष्यांनीही त्याच्याकडे मान फिरवली होती बहुधा.

आणि अचानक ती शांतता भंग पावते. अहमद आणि अल्लारखा पळत पळत त्या चित्रात येतात. उड्या मारत, दुडकत, दोन पायांनी उड्या मारत धमाल करत दोघं येतात. आम्ही तिथे आहोत याचं त्यांना भानस नाही.

Ahmad (left) and Allarakha (right) are cousins and students at the Banipith Primary School in Ashrampara
PHOTO • Smita Khator
Ahmad (left) and Allarakha (right) are cousins and students at the Banipith Primary School in Ashrampara
PHOTO • Smita Khator

अहमद (डावीकडे) आणि अल्लारखा (उजवीकडे) भावंडं आहेत आणि आश्रमपाडा भागातल्या बाणीपीठ प्राथमिक शाळेत शिकतात

Climbing up this mango tree is a favourite game and they come here every day
PHOTO • Smita Khator

ते दररोज इथे येतात. या आंब्यावर चढणं त्यांचा आवडता खेळ आहे

झाडापाशी आल्यावर बुडाला टेकून ते आधी त्यांची उंची मोजतात. झाडाच्या सालीवरच्या खुणा पाहून कळतंच की रोजच हा प्रयोग इथे होतो.

“मग, कालच्यापेक्षा आज [उंची] वाढलीये का?” मी दोघांना विचारते. लहाना अल्लारखा आपलं बोळकं उघडून मस्त हसतो. म्हणतो, “तरी काय झालं? आम्ही कदम ताकदवान आहोत!” आणि हे सिद्ध करण्यासाठी तो आपल्या पडलेल्या दाताची खिडकी दाखवतो आणि म्हणतो, “बघ की! उंदीरमामा माझा बाळदात घेऊन गेला. आता मला पण अहमदसारखे टणक दात येणार.”

त्याच्याहून एक उन्हाळा जास्त पाहिलेल्या अहमदचे मात्र सगळेच्या सगळे दात आलेत. तो सांगतो, “माझे सगळे दुधाचे दात पडून गेलेत. आता मी मोठ्ठा झालोय. पुढच्या वर्षी मी मोठ्ठ्या शाळेत जाणारे.”

आणि या मोठ्ठं होण्याचा पुरावा म्हणून की काय ते आंब्यावर तुरुतुरू चढतात. एखाद्या खारीसारखे. एका क्षणात ते झाडाच्या मधल्या फांद्यांवर जाऊन बसतात. हवेत पायांचे झोके सुरू होतात.

“हा आमचा आवडता खेळ आहे,” अहमद अगदी खूश होऊन सांगतो. “शाळा असली की आम्ही शाळा सुटल्यावर इथे येतो,” अल्लारखा सांगतो. दोघंही मुलं प्राथमिक शाळेत आहेत आणि त्यांची शाळा अजून सुरू झालेली नाही. कोविड-१९ ची महासाथ आली आणि २५ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागली. सगळ्या शाळा दीर्घकाळासाठी बंद करण्यात आल्या. आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी डिसेंबर २०२१ मध्ये फक्त माध्यमिक शाळाच उघडल्या होत्या.

“मला माझ्या मित्रांची फार आठवण येते,” अहमद सांगतो. “आम्ही झाडांवर चढायचो आणि कैऱ्या पळवायचो.” शाळा सुरू असताना त्यांना जेवणात सोयाबडी आणि अंडी मिळायची. त्या जेवणाचीही कमी जाणवतीये. आता त्यांच्या आया महिन्यातून एक दिवस शाळेत जातात आणि मध्यान्ह भोजन किट घरी घेऊन येतात, अल्लारखा सांगतो. त्यात तांदूळ, मसूर डाळ, बटाटे आणि साबण मिळतो.

The boys are collecting mango leaves for their 10 goats
PHOTO • Smita Khator

ही पोरं त्यांच्या १० शेरडांसाठी आंब्याची पानं गोळा करतायत

'You grown up people ask too many questions,' says Ahmad as they leave down the path they came
PHOTO • Smita Khator

‘तुम्ही मोठी माणसं किती प्रश्न विचारता,’ अहमद म्हणतो आणि आल्या वाटेने दोघं परत जातात

“आम्ही घरीच शिकतो. आई शिकवते. मी दिवसातून दोन वेळा काही तरी लिहितो आणि वाचतो,” अहमद सांगतो.

“पण तुझी आई तर सांगत होती की तू फार खोड्या काढतोस आणि तिचं काही ऐकत नाहीस म्हणून,” मी म्हणते.

“कसंय, आम्ही किती लहान आहोत. पण अम्मीला काही कळत नाही,” अल्लारखा म्हणतो. त्यांच्या आया पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत एका पाठोपाठ कामं करत असतात. विड्या वळून घर चालवतात. बाप बांधकामावर कामं करायला गाव सोडून दुसऱ्या राज्यात गेलेत. “अब्बा आले की मी त्यांचा मोबाइल घेतो आणि गेम्स खेळतो, मग अम्मी भडकते,” अल्लारखा सांगतो.

फोनवरच्या गेममध्ये नुसता धांगडधिंगा असतो. “फ्री-फायर. हाणामारी, गोळ्या घालायच्या.” आई रागावली की दोघं गच्चीवर किंवा घराबाहे कुठे तरी पळतात आणि फोनवर खेळत बसतात.

आमच्या गप्पा सुरू असतानाच ही दोघं झाडांच्या फांद्यांवर सरसर फिरत पानं गोळा करतात. एकही पान खाली पडू देत नाहीत. का ते आम्हाला लवकरच कळतं. अहमद सांगतो, “ही आमच्या शेरडांसाठी. दहा आहेत. त्यांना आंब्याची पानं फार आवडतात. अम्मी त्यांना चारायला घेऊन जाते.”

आणि झटक्यात ते झाडावरून सरसर उतरून बुंध्यापाशी येतात. हातातली पानं तशीच ठेवून खाली उडी टाकतात. “तुम्ही मोठी माणसं किती प्रश्न विचारता. आम्हाला उशीर व्हायला लागलाय,” अहमद जरासा घुश्शात म्हणतो. आणि ही दोघं परत एकदा चालत, पळत, उड्या मारत आल्या वाटेने माघारी जातात.

Smita Khator

Smita Khator is the Chief Translations Editor, PARIBhasha, the Indian languages programme of People's Archive of Rural India, (PARI). Translation, language and archives have been her areas of work. She writes on women's issues and labour.

Other stories by Smita Khator
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David