कंबर आणि पाठ आखडली आणि दुखणं असह्य झालं तेव्हा तनुजा होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे गेल्या. “कॅल्शियम आणि लोहाचा प्रॉब्लेम आहे. जमिनीवर खाली बसू नका म्हणाला,” तनुजा सांगतात.

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या विडी कामगार असलेल्या तनुजा दिवसातले आठ तास जमिनीवर बसलेल्या असतात. विड्या वळत. “अंगात कणकण असते, थकल्यासारखं वाटतं. आणि पाठीत असली चमक मारते,” पन्नाशीला टेकलेल्या तनुजा सांगतात. “माझ्यासाठी एक खुर्ची आणि टेबल घेणं परवडलं असतं तर काय हवं होतं?” त्या म्हणतात.

नोव्हेंबर महिना संपत आलाय. हरेकनगर मोहल्ल्यातल्या त्यांच्या घरी कोबा केलेल्या सिमेंटच्या फरशीवर सांजवेळेची उन्हं उतरली आहेत. झापाच्या चटईवर बसलेल्या तनुजा एकामागोमाग एक विड्या वळतायत. मान एका बाजूला कललेली आहे, मांडीवर कोपरं टेकवून, खांदे जरासे उंचावत त्या तेंदूची पानं वळतायत. “बोटं इतकी सुन्न पडतात की कधी कधी ती आहेत का नाही प्रश्न पडतो,” त्या सखेद म्हणतात.

त्यांच्या आजूबाजूला विड्यांसाठी लागणारा सगळा कच्चा माल पसरलेला असतो. तेंदूची पानं, तंबाखूची पूड आणि दोऱ्याची रिळं. एक धारदार सुरी आणि कात्री. ही सगळी त्यांच्या धंद्याची उपकरणं.

तनुजा मध्येच थोडा वेळ बाहेर पडतील आणि लागेल तो किराणा घेऊन येतील. स्वयंपाक-पाई, घर आणि अंगणाची झाडलोट आणि इतर कामं उरकून घेतील. कामं सुरू असली तरी दिवसाला ५००-७०० विड्या वळून पूर्ण करायच्या हे मनाशी पक्कं असतं. नाही तर महिन्याला ३,००० रुपये येतात तेही येणार नाहीत.

Tanuja Bibi has been rolling beedis since she was a young girl in Beldanga. Even today she spends all her waking hours making beedis while managing her home
PHOTO • Smita Khator
Tanuja Bibi has been rolling beedis since she was a young girl in Beldanga. Even today she spends all her waking hours making beedis while managing her home
PHOTO • Smita Khator

तनुजा बीबी अगदी लहानपणी बेलडांगामध्ये होत्या तेव्हापासून विड्या वळतायत. आजही त्या घरचं सगळं बघत दिवसातला जागेपणीचा सगळ्यात जास्त काळ विड्याच वळत असतात

सूर्य उगवल्यापासून ते पार मध्यरात्रीपर्यंत त्यांचे हात सुरूच असतात. “पहिली अजान झाली की मी उठते. फझ्र अजान झाली की माझं काम सुरू होतं,” हातातल्या विडीवरची नजर बिलकुल न हलवता तनुजा सांगतात. त्यांना घड्याळ कळत नाही त्यामुळे त्यांचा सगळा दिवसच अजानप्रमाणे चालतो.

मगरिब (संध्याकाळची चौथी नमाज) आणि इशा (रात्रीची शेवटची पाचवी नमाज) या मधल्या वेळात त्या स्वयंपाक उरकतात. आणि दोनेक तास पानं कापून ठेवण्यात जातात. झोपायला पार मध्यरात्र होते.

“अंग मोडून काढणाऱ्या या कामातून सुटका होते ती फक्त नमाज पढताना. त्यानंतर थोडी विश्रांती आणि शांतता,” त्या म्हणतात. “लोक म्हणतात की विड्या ओढणारा माणूस आजारी पडतो. विड्या वळणाऱ्यांचं काय होतं ते त्यांना माहिती आहे का?” तनुजा विचारतात.

२०२० साली जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरकडे जायची सगळी तयारी तनुजांनी केली आणि अचानक टाळेबंदी लागली. कोविड होईल या भीतीने त्या गेल्याच नाहीत. त्या ऐवजी त्या होमिओपॅथीच्या डॉक्टरकडे गेल्या. नोंदणी नसतानाही दवाखाने चालवणाऱ्या आणि होमिओपॅथीची औषधं देणाऱ्या डॉक्टरांकडे गरीब कुटुंबांमधले लोक जास्त संख्येने जातात. बेलडांगा-१ तालुक्यातल्या विडी कामगारही. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी २०२०-२१ नुसार पश्चिम बंगालमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ५७८ डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ५८ टक्के पदं रिक्त आहेत. आणि म्हणूनच सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार स्वस्तात होत असले तरी तपासण्या आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी खूप जास्त वेळ जातो. दिवसाचा रोजगार बुडतो जो परवडण्यासारखा नाही. तनुजा सांगतात, “आम्हाला एवढा वेळ घालणं परवडतच नाही.”

होमिओपॅथीच्या औषधांनी काहीच उतार पडला नाही. मग तनुजांनी त्यांच्या नवऱ्याकडून ३०० रुपये घेतले, स्वतःच्या कमाईतले ३०० रुपये त्यात घातले आणि गावातल्या ॲलोपथीची औषधं देणाऱ्या डॉक्टरचा दवाखाना गाठला. “त्यांनी मला अजून थोड्या गोळ्या-औषधं दिली आणि छातीचा एक्स रे काढायला सांगितला. सीटी स्कॅन देखील काढा, म्हणाला. ते काही मी केलं नाही,” त्या सांगतात. कारण या तपासण्यांपुरते पैसेच त्यांच्याकडे नव्हते.

पश्चिम बंगालमध्ये २० लाख विडी कामगार असून आणि त्यात ७० टक्के तनुजासारख्या महिला कामगार आहेत. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना दिवसातले अनेक तास सलग एकाच स्थिती बसावं लागतं आणि त्यामुळे गोळे येणं, स्नायू आणि शिरा दुखणं तसंच श्वसनाचे त्रास अशा अनेक तक्रारी सुरू होतात. क्षयसुद्धा. या कामगार गरीब घरातल्या असल्याने सकस अन्नही मिळत नाही. त्यामुळे हे आजार बळावतात. एकूणच आरोग्यावर, त्यातही प्रजनन आरोग्यावर या कामाचे गंभीर परिणाम होतात.

In many parts of Murshidabad district, young girls start rolling to help their mothers
PHOTO • Smita Khator
Rahima Bibi and her husband, Ismail Sheikh rolled beedis for many decades before Ismail contracted TB and Rahima's spinal issues made it impossible for them to continue
PHOTO • Smita Khator

डावीकडेः मुर्शिदाबादच्या अनेक मोहल्ल्यांमध्ये अगदी लहान मुली देखील आपल्या आयांना मदत म्हणून विड्या वळायला लागतात. उजवीकडेः रहिमा बीबी आणि त्यांचे पती इस्माइल शेख गेल्या अनेक दशकांपासून विड्या वळतायत. पण इस्माइल यांना क्षयाची बाधा झाली आणि रहिमांना पाठीच्या कण्याचा त्रास सुरू झाल्यामुळे ते आता काम करू शकत नाहीयेत

मुर्शिदाबादमध्ये १५-४९ वयोगटातल्या स्त्रियांमध्ये ७७.६ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षय आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी हा आकडा ५८ टक्के होता. त्यात झालेली वाढ चिंताजनक आहे. रक्तक्षय असणाऱ्या आईच्या मुलांना देखील रक्तक्षय असण्याची शक्यता जास्त असते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ अहवालानुसार या जिल्ह्यात स्त्रिया आणि बालकांमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण वाढत आहे. तसंच जिल्ह्यातली ५ वर्षांखालची ४० टक्क्यांहून अधिक मुलांची वाढ खुंटली आहे. २०१५-१६ साली झालेला एनएफएचएस-४ आणि आताचा एनएफएचएस-५ या सर्वेक्षणांमध्ये हा आकडा बदललेला नाही ही गंभीर बाब आहे.

माठपारा मोहल्ल्यात राहणारा अहसान अली इथे औषधांचं एक दुकान चालवतो आणि तो सगळ्यांच्या चांगला परिचयाचा आहे. त्याने वैद्यकीय शिक्षण घेतलेलं नसलं तरी या समुदायाच्या आरोग्यांच्या तक्रारींवर सल्ला घेण्यासाठी लोक विश्वासाने त्याच्याकडे येतात कारण तो स्वतःदेखील विडी कामगार कुटुंबातला आहे. तीस वर्षीय अली सांगतो की विडी कामगार अंगदुखी थांबण्यासाठी गोळ्या आणि मलम मागण्यासाठी त्याच्याकडे येतात. “२५-२६ वर्षांचे होईपर्यंत त्यांना तब्येतीच्या किती तरी तक्रारी सुरू झालेल्या असतात. पायात गोळे, स्नायूंची कमजोरी, शिरा दुखणं आणि तीव्र डोकेदुखी,” तो सांगतो.

घरात सतत तंबाखूचा खकाणा असतो त्याचा लहान मुलींच्या तब्येतीवरही विपरित परिणाम होतो. शिवाय मुली काम उरकण्यासाठी आयांबरोबर विड्या वळू लागतात. माझपारा मोहल्ल्यात राहत असताना दहावं वर्षं लागलं नव्हतं तेव्हापासून तनुजा हे काम करतायत. “मी आईला विडीची टोकं दुमडायला आणि धागा बांधायला मदत करायचे,” त्या सांगतात. “आमच्या समाजात काय म्हणतात माहितीये? ‘जिला विड्या वळता येत नाहीत, तिला नवराही मिळत नाही’.”

वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचं रफिकुल इस्लाम यांच्याशी लग्न झालं. त्यांना चार मुली आणि एक मुलगा अशी अपत्यं झाली. एनएफएचएस-५ नुसार, या जिल्ह्यातल्या ५५ टक्के स्त्रियांचं वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याआधीच लग्न झालं  असल्याचं दिसतं. कमी वयात लग्न आणि त्यात कुपोषण याचा पुढच्या पिढीवर परिणाम होतो असं युनिसेफ चा अहवाल सांगतो.

“स्त्रियांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याचा त्यांच्या एकूण आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. शारीरिक आणि मानसिक – दोन्ही. तुम्हाला दोन्ही वेगवेगळं काढूच शकणार नाही,” आरोग्य पर्यवेक्षक असणाऱ्या हाशी चटर्जी सांगतात. बेलडांगा-१ तालुक्याच्या मुर्शिदाबाद पंचायतीचा कार्यभार त्यांच्याकडे असून गरजू लोकांपर्यंत आरोग्याच्या विविध योजना पोचतील याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं.

Julekha Khatun is in Class 9 and rolls beedis to support her studies.
PHOTO • Smita Khator
Ahsan Ali is a trusted medical advisor to women workers in Mathpara
PHOTO • Smita Khator

डावीकडेः जुलेखा खातून नववीत शिकते आणि शिक्षणासाठी चार पैसे कमवावेत म्हणून विड्या वळते. उजवीकडेः माठपारामध्ये आपल्या तब्येतीच्या तक्रारी महिला अहसान अलींना अगदी विश्वासाने सांगतात

तनुजाच्या आईनी जवळपास अख्खं आयुष्य विड्या वळल्या आहेत. सत्तरीला टेकलेल्या आपल्या आईची तब्येत इतकी खालावली आहे की आता तिला धड चालताही येत नसल्याचं तनुजा सांगतात. “तिची पाठ कामातून गेलीये. ती आता अंथरुणाला खिळून असते,” त्या सांगतात. हताश होत सुस्कारा टाकून म्हणतात, “माझ्या वाट्याला हेच भोग आहेत.”

या उद्योगात काम करणारे जवळपास सगळे कामगार गरीब कुटुंबातले आहेत आणि त्यांच्याकडे इतर कोणतंही कौशल्य नाही. या बाया विड्या वळत नसत्या तर ही कुटुंबं भुकेकंगाल झाली असती. तनुजांचे पती खूप आजारी होते, घराबाहेर पडून काम करणं त्यांना शक्य नव्हतं. तेव्हा तनुजाच्या विड्यांच्या कमाईवरच कुटुंबाचं सगळं भागलं. आपल्या तान्ह्या – चौथ्या मुलीला – कांथा कशिदा असलेल्या मऊ दुपट्यात गुंडाळून मांडीवर घेऊनच त्यांनी विड्या वळणं सुरू केलं होतं. कुटुंबाची हलाखीच इतकी की या तान्ह्या बाळालाही तंबाखूच्या धुरळ्यापासून सुटका मिळू शकली नव्हती.

“पूर्वी मी दिवसाला १,०००-१,२०० विड्या वळत होते,” तनुजा सांगतात. आता तब्येत इतकी खालावले की त्या दिवसाला ५००-७०० विड्या वळतात आणि त्याचे महिन्याला कसेबसे ३,००० रुपये मिळतात. तब्येतीचं काहीही होवो दिवसाची भरती करावीच लागते.

मुर्शिदा खातून देबकुंडा एसएआरएम गर्ल्स हाय मदरशाच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या सांगतात की या मदरशातल्या ८० टक्के मुली बेलडांगा-१ तालुक्यातल्या विडी कामगार कुटुंबातल्या असून आपल्या आईसोबत विड्या वळू लागतात. तसंच बहुतेक वेळा या मुलींचं दिवसाचं पहिलं जेवण म्हणजे शाळेता मिळणारा पोषण आहार – भात, वरण आणि भाजी. “बहुतेकींच्या घरी पुरुष माणसं नाहीत, त्यामुळे सकाळी चूलच पेटवली जात नाही,” त्या सांगतात.

मुर्शिदाबाद जिल्हा हा जवळपास संपूर्ण ग्रामीण जिल्हा आहे. जिल्ह्याची ८० टक्के लोकसंख्या इथल्या २,१६६ गावांमध्ये राहते. साक्षरता दर ६६ टक्के असून हाच आकडा राज्यासाठी ७६ टक्के इतका आहे (जनगणना, २०११). विडी उद्योगात बायांना काम जास्त मिळतं कारण एक तर त्यांची बोटं सराईतपणे काम करतात आणि त्या घरबसल्या हे काम करू शकतात असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात नमूद केलं आहे.

*****

शाहिनुर बीबी बोलताना एकही मिनिट दवडत नाहीत. कांदा मिरची चिरून त्या घुगनीसाठी मसाला तयार करतायत. बेलडांगा-१ मधल्या हरेकनगरच्या रहिवासी असणाऱ्या शाहिनुर पूर्वी विड्या वळायच्या. आता त्या घरीच पिवळ्या वाटाण्याची उसळ तयार करतात आणि संध्याकाळी विकतात.

Shahinur Bibi holds up her X-ray showing her lung ailments.
PHOTO • Smita Khator
PHOTO • Smita Khator

डावीकडेः शाहिनुर बीबींना फुफ्फुसाचा आजार असून आपला एक्स रे त्या दाखवतायत. उजवीकडेः बेलडांगा ग्रामीण हॉस्पिटलच्या क्षयरोग वॉर्डात लोक माहिती आणि वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी येतात

“आजारपण विडी वळणाऱ्याच्या पाचवीला पुजलेलं आहे,” ४५ वर्षीय बीबी सांगतात. काही महिन्यांपूर्वी त्या पाठदुखी आणि श्वासाच्या त्रासावर तपासणीसाठी बेलडांगा ग्रामीण हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी खाजगी दवाखान्यात जाऊन एक्सरेसुद्धा काढला. पण सध्या त्यांचा नवरा आजारी असल्यामुळे त्यांना दवाखान्यात परत जाताच आलं नाहीये. “माझ्या दोन्ही सुना मला विड्या वळू देत नाहीत. त्यांनी हे काम आता पूर्णपणे त्यांच्या अंगावर घेतलंय. पण त्यातूनही आमचं अगदी कसंबसं भागतं,” आपण घुगनी विकायला का सुरुवात केली ते बीबी सांगतात.

तालुका रुग्णालयात डॉ. सोलोमन मोंडल सांगतात की दर महिन्याला तिथे क्षयाची लागण झालेले किमान २०-२५ रुग्ण येतात. “विडी कामगारांना क्षयाची बाधा होण्याची मोठी जोखीम असते कारण त्यांच्या विषारी धुरळ्याशी सतत संपर्क येत असतो. त्यामुळे सतत सर्दी होते आणि फुफ्फुसं कमजोर होतात,” डॉ. मोंडल सांगतात. ते बेलडांगा-१ चे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत.

तिथूनच रस्ता पुढे दर्जीपारा मोहल्ल्यात जातो. तिथे सायरा बेवा सततचं पडसं आणि खोकल्याने हैराण झाल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचाही त्रास आहेच. साठीच्या सायरा गेल्या पन्नास वर्षांपासून विड्या वळतायत. त्यांची बोटं आणि नखं तंबाखूच्या भुकटीने कायमची माखलेली आहेत.

“विडीत भरायच्या मोसला [तंबाखूची बारीक पूड] मुळे संसर्ग होतो. या मसाल्याचे बारीक कण आणि धुरळा विड्या वळताना श्वासाद्वारे फुफ्फुसात जातात,” डॉ. मोंडल सांगतात. पश्चिम बंगालमध्ये दम्याचे रुग्ण पाहिले तर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा दुप्पट असल्याचं दिसतं – दर १,००,००० लोकसंख्येमागे ४,३८६ स्त्रियांना दमा आहे (एनएफएचएस-५).

डॉ. मोंडल आणखी एक बाब निदर्शनास आणून देतात. “टीबी आणि तंबाखूचा धुरळा यामध्ये थेट संबंध असूनही आपल्याकडे विशिष्ट व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांची क्षयासाठी तपासणी करण्याची कोणतीही व्यवस्था नाही.” या जिल्ह्यात सर्वात जास्त विडी कामगार आहेत. तरीही इथे अशा तपासण्यांची कमतरता मनाला डाचत राहते. सायरा यांना अलिकडे खोकल्यात रक्त पडतंय – क्षयाची सुरुवात झाल्याचं हे लक्षण आहे. “मी बेलडांगा ग्रामीण हॉस्पिटलला गेले. त्यांना काही तपासण्या केल्या आणि थोड्या गोळ्या दिल्या,” त्या सांगतात. त्यांनी बेडका तपासून घ्यायला सांगितलं. तंबाखूच्या धुळीशी संपर्क येऊ देऊ नका असा सल्लाही दिला. पण कुठल्याही प्रकारचं संरक्षक साहित्य मात्र देण्यात आलं नाही.

जिल्हाभरात पारीतर्फे आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो त्या कुणाकडेच मास्क किंवा हातमोजे नव्हते. खरं तर कामाशी संबंधित कागदपत्रं, सामाजिक सुरक्षा लाभ, रास्त वेतन, कल्याणकारी योजना, संरक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचाही त्यांच्याकडे अभावच होता. विडी तयार करणाऱ्या कंपन्या हे काम महाजन (दलाल) लोकांना देतात आणि कुठल्याही जबाबदारीपासून स्वतः नामानिराळे राहतात. महाजन लोक विड्या विकत घेतात पण या बाकी गोष्टींमध्ये कणभरही लक्ष घालत नाहीत.

Saira Bewa and her daughter-in-law Rehana Bibi (in pink) rolling beedis. After five decades spent rolling, Saira suffers from many occupation-related health issues
PHOTO • Smita Khator
Saira Bewa and her daughter-in-law Rehana Bibi (in pink) rolling beedis. After five decades spent rolling, Saira suffers from many occupation-related health issues
PHOTO • Smita Khator

सायरा बेवा आणि त्यांची सून रेहाना बीबी ( गुलाबी कपड्यात) विड्या वळतायत. पन्नास वर्षं सतत विड्या वळून सायरांना आता कामाशी संबंधित अनेक आजारांनी ग्रासलं आहे

Selina Khatun with her mother Tanjila Bibi rolling beedis in their home in Darjipara. Tanjila's husband abandoned the family; her son is a migrant labourer in Odisha. The 18-year-old Selina had to drop out of school during lockdown because of kidney complications. She is holding up the scans (right)
PHOTO • Smita Khator
Selina Khatun with her mother Tanjila Bibi rolling beedis in their home in Darjipara. Tanjila's husband abandoned the family; her son is a migrant labourer in Odisha. The 18-year-old Selina had to drop out of school during lockdown because of kidney complications. She is holding up the scans (right)
PHOTO • Smita Khator

सेलिना खातून आणि त्यांची आई तंजिला बीबी दर्जीपारामध्ये आपल्या घरी विड्या वळतायत. तंजिलाचे पती घरून निघून गेले आहेत आणि त्यांचा मुलगा कामासाठी ओडिशात स्थलांतरित झाला आहे. १८ वर्षांच्या सेलिनाला मूत्रपिंडाचा त्रास आहे आणि टाळेबंदीदरम्यान तिला शाळा सोडावी लागली. ती स्कॅन दाखवतीये

मुर्शिदाबाद जिल्ह्याची एक तृतीयांश लोकसंख्या मुस्लिम आहे आणि विडी कामगार महिलांपैकी जवळपास सगळ्याच मुस्लिम आहेत. रफिक-उल हसन गेल्या तीस वर्षांपासून विडी कामगारांसोबत काम करत आहेत. “विडी उद्योगाची सगळी मदार कमीत कमी पैशात काम करणाऱ्या कामगारांवर आहे. त्यांच्या कष्टावरच हा व्यवसाय विस्तारलाआहे. त्यामुळे यात काम करणाऱ्या जास्ती जास्त महिला आदिवासी आणि मुस्लिम आहेत,” ते सांगतात. ते बेलडांगाचे सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) चे तालुका सचिव आहेत.

पश्चिम बंगाल श्रम मंत्रालयाने कागदोपत्री देखील मान्य केलं आहे की असंघटित क्षेत्रामध्ये विडी कामगार हा सगळ्यात जास्त जोखीम असणारा गट आहे. या मंत्रालयाने जाहीर केलेलं रु. २६७.४४ इतकं किमान वेतनही या कामगारांना मिळत नाही. त्यांना १,००० विड्यांमागे फक्त १५० रुपये मिळतात. श्रम संहिता, २०१९ मध्ये नमूद असलेल्या राष्ट्रीय किमान वेतनाहूनही हा रोजगार कमी आहे.

“सगळ्यांनाच माहितीये. काम सारखं करूनही बायांना गड्यांपेक्षा कमी मजुरी मिळते,” सइदा बेवा सांगतात. त्या सीटूशी संलग्न मुर्शिदाबाद डिस्ट्रिक्ट बीडी मझदूर अँड पॅकर्स युनियनचं काम करतात. “महाजन लोक आम्हाला सरळ सरळ भेडवतात. म्हणतात, ‘तुम्हाला ही मजुरी पटत नाही ना, मग आमच्यापाशी काम करू नका’,” ५५ वर्षीय सइदा सांगतात. विडी कामगारांसाठी राज्य शासनाने विशेष योजना आणल्या पाहिजेत अशी मागणीही त्या करतात.

एकीकडे त्यांना मिळणाऱ्या मजुरीबाबत बाया कसलेच निर्णय घेऊ शकत नाहीत पण महाजन लोक त्यांना कच्चा माल देतात तोही सुमार दर्जाचा असतो. तयार विड्यांपैकी काही माल ते नाकारतात. “महाजन नाकारलेल्या विड्या त्यांच्यापाशीच ठेवतात, पण त्याचे पैसे मात्र देत नाहीत,” या सगळ्यात कसा अन्याय होतो ते सइदा सांगतात.

अगदी तुटपुंजा रोजगार, कसलीही सामाजिक सुरक्षा नाही त्यामुळे तनुजासारख्या कामगारांचं आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत ठरते. या जोडप्याने त्यांच्या तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं ते ३५,००० रुपये अजूनही त्यांना फेडायचे आहेत. “आमचं आयुष्य कर्ज आणि परतफेडीच्या दुष्टचक्रात अडकलंय,” आपल्या प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी घेतलेली कर्जं आणि ती फेडण्यासाठी नंतर उपसलेले कष्ट याबद्दल त्या सांगतात.

A mahajan settling accounts in Tanuja Bibi’s yard; Tanuja (in a yellow saree) waits in the queue.
PHOTO • Smita Khator
Saida Bewa at the door of the home of  beedi workers in Majhpara mohalla, Beldanga where she is speaking to them about their health
PHOTO • Smita Khator

डावीकडेः महाजन तनुजा बीबींच्या अंगणात हिशोब करतायत आणि तनुजा ( पिवळ्या साडीत) रांगेत वाट पाहतायत. उजवीकडेः सइदा बेवा बेलडांगाच्या माझपारा मोहल्ल्यात एका विडी कामगारांच्या घरी. त्या आरोग्याविषयी त्यांना माहिती देतायत

लग्न झालं तेव्हा तनुजा रफिकुलसोबत सासरच्यांबरोबर एकत्र राहत होत्या. पण मुलं झाली तसं या जोडप्याने कर्ज काढलं, जमीन घेतली आणि गवताने शाकारलेल्या एका खोलीचं स्वतःचं घर बांधलं. “आम्ही दोघंही तेव्हा तरुण होतो. आम्हाला वाटत होतं की कष्ट करून आम्ही तो पैसा फेडू शकू. पण तसं काही झालं नाही. आम्ही कशा ना कशासाठी कर्ज घेत राहिलो आणि बघा, अजूनही आमचं घर काही पूर्ण बांधून झालेलं नाही.” प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत घर मिळण्यास हे भूमीहीन कुटुंब पात्र आहे पण अजूनही त्यांना घर मिळालेलं नाही.

रफिकुल सध्या ग्राम पंचायतीसोबत डेंग्यू निर्मूलन कार्यक्रमामध्ये काम करतात. त्यांचा महिन्याचा पगार ५,००० रुपये आहे पण तो वेळेवर होईलच असं काही सांगता येत नाही. “सगळंच अनिश्चित असल्यामुळे त्याचा मला फार ताण येतो. कधी कधी तर सहा महिने पगार व्हायचा नाही,” असं म्हणत गावातल्या दुकानात त्यांची १५,००० रुपयांची उधारी झाल्याचं तनुजा सांगतात.

विडी कामगारांना बाळंतपणात किंवा आजारपणात रजा मिळत नाही. गरोदरपण आणि बाळंतपणसुद्धा विड्या वळत वळतच पार पडतं. जननी सुरक्षा योजना, अंगणवाडी आणि मोफत पोषण आहाराचा तरुण मुलींना आता थोडा तरी लाभ मिळतोय. “पण वृद्ध स्त्रियांच्या आरोग्यावर या कामाचे किती दुष्परिणाम झाले आहेत हे कुणीही आजवर मोजलेलं नाही,” उषा कार्यकर्ती सबिना यास्मिन सांगते. “पाळी जायच्या काळापर्यंत त्यांची तब्येत फारच खराब झालेली असते. कॅल्शियम आणि लोह हे स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे दोन्ही घटक त्यांच्या आहारात नसतात. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि रक्तक्षयही होतोच,” ती म्हणते. बेलडांगा टाउनच्या नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या १४ वॉर्डांची जबाबदारी तिच्यावर आहे. पण यास्मिनला एकाच गोष्टीची खंत वाटते की उषा म्हणून या बद्दल ती फार काही करू शकत नाही कारण तिचं काम जास्तकरून माता बाल आरोग्यासंबंधी आहे.

विडी उद्योग आणि शासन या दोन्हीही यंत्रणांनी वाऱ्यावर सोडल्यासारखी गत असल्याने विडी कामगार महिलांच्या आयुष्यात आशादायी असं फार काही नाहीच. कामगार म्हणून काही लाभ मिळतात का असं विचारल्यावर तनुजा वैतागल्या आणि म्हणाल्या, “आमची चौकशी करण्यासाठी कोणीही बाबू लोक इथे येत नाहीत. खूप वर्षं झाली बीडीओच्या ऑफिसमधून आम्हाला सांगितलं गेलं की डॉक्टर येतील आणि आम्हाला तपासून जातील. आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला या एवढाल्या बिनकामी गोळ्या दिल्या. काही उपयोग झाला नाही,” त्या सांगतात. त्यानंतर या बायांची तब्येत कशी आहे ते पहायला देखील कुणी परत आलं नाही.

त्या गोळ्या माणसांसाठी तरी होत्या का, तनुजांना शंका येते. “मला तर वाटतं गायीगुरांच्याच असतील.”

पारी आणि काउंटर मीडिया ट्रस्‍ट यांच्‍यातर्फे ग्रामीण भारतातल्‍या किशोरवयीन आणि तरुण मुली यांना केंद्रस्‍थानी ठेवून केल्‍या जाणार्‍या पत्रकारितेचा हा देशव्‍यापी प्रकल्‍प आहे. ‘पॉप्‍युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्‍या सहकार्याने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. सामान्‍य माणसांचा आवाज आणि त्‍यांचं आयुष्य यांचा अनुभव घेत या महत्त्वाच्‍या, पण उपेक्षित समाजगटाची परिस्‍थिती, त्‍यांचं जगणं सर्वांसमोर आणणं हा त्‍याचा उद्देश आहे.

हा लेख प्रकाशित करायचा आहे? [email protected] या पत्त्यावर ईमेल करा आणि [email protected] ला सीसी करा.

Smita Khator

Smita Khator is the Translations Editor at People's Archive of Rural India (PARI). A Bangla translator herself, she has been working in the area of language and archives for a while. Originally from Murshidabad, she now lives in Kolkata and also writes on women's issues and labour.

Other stories by Smita Khator
Illustration : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David