यंदाच्या मोसमात मराठवाड्यात सगळ्यात मोठं पीक आहे – तहान. ऊस वगैरे विसरा. तहान - माणसांना आणि उद्योगांना लागलेली तहान बाकी सर्व काही झाकोळून टाकतीये. आणि संपूर्ण मराठवाड्यात या तहानेचं पीक घेणारे दर दिवशी लाखो रुपये कमवत आहेत. वाळून गेलेला ऊस गाड्या भरभरून जनावरांच्या छावण्यांकडे चारा म्हणून चाललाय. आणि त्याच रस्त्यावरचे अगणित टँकर नफा कमवायला शहरं, गावं आणि उद्योगांकडे धावतायत. सध्या सर्वात मोठा बाजार आहे पाण्याचा. आणि त्यांचं प्रतीक म्हणजे हे टँकर.

मराठवाड्यात रोज हजारो टँकर पाणी भरतायत, वाहून नेतायत आणि विकतायत. यातले सरकारी टँकर हाताच्या बोटावर मोजण्याइतके आणि काही तर फक्त कागदावर. तेजीत वाढणाऱ्या पाण्याच्या बाजाराचा कणा आहेत खाजगी टँकर.

ठेकेदारीत उतरलेले आमदार आणि नगरसेवक आणि नगरसेवक आणि आमदार झालेले ठेकेदार या टँकर अर्थकारणासाठी फार महत्त्वाचे आहेत. प्रशासकीय अधिकारीसुद्धा. काहींचे स्वतःच्या नावावर टँकर आहेत तर काही बेनामी.

पण हा टँकर नक्की आहे तरी काय? खरं तर, स्टीलचे पत्रे वाकवून केलेल्या मोठ्या टाक्या. १०,००० लिटरच्या एका टँकरमध्ये ५ फूट x १८ फूट मापाचे तीन पत्रे असतात, प्रत्येकाचं वजन १९८ किलो. पत्रे वाकवून तयार केलेल्या टाक्या एकमेकाला जोडल्या जातात. या टाक्या ट्रकवर, लॉऱ्यांमध्ये किंवा इतर मोठ्या वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारे लादून नेता येतात. छोटी वाहनं कमी पाण्याच्या छोट्या टाक्या वाहून नेतात. ५,००० लिटरची छोटी टाकी मोठ्या व्हॅनच्या ट्रॉलीत मावू शकते. तिथपासून ते अगदी १,००० आणि ५०० लिटरच्या टाक्या छोट्या ट्रॅक्टर आणि विना छपराच्या रिक्षांमध्ये आणि बैलगाड्यांमधनं नेल्या जातात.

पाण्याचं संकट जसजसं गंभीर व्हायला लागलंय तसं राज्यात दर दिवशी शेकडो टँकरची जोडणी होऊ लागली आहे. जालना जिल्ह्याच्या जालना शहरात सुमारे १२०० टँकर, ट्रक, ट्रॅक्टर आणि रिक्षा विविध आकाराच्या टाक्या वाहून नेण्याचं काम करत आहेत. पाण्याचा स्रोत आणि तहानलेले लोक यांच्यामध्ये त्यांच्या वाऱ्या चालू असतात. टँकरचालक मोबाइलवर गिऱ्हाइकाशी भाव ठरवून घेतात. मात्र सर्वात जास्त पाणी उद्योगांना जातं, जे मोठ्या प्रमाणावर पाणी विकत घेतात. “टँकरमालक रोज साधारणपणे ६० ते ७५ लाखांचे व्यवहार करतात,” मराठी दै. लोकसत्ताचे लक्ष्मण राऊत सांगतात. “पाण्याच्या बाजाराच्या एका अंगाचं हे इतकं मूल्य आहे – तेही या एका शहरात.” राऊत आणि त्यांच्या सहयोगी वार्ताहरांनी गेली अनेक वर्षं या भागातल्या बाजार आणि व्यापाराचा मागोवा घेतला आहे.

टाक्यांचे आकार वेगवेगळे आहेत. पण या शहरात, राऊत सांगतात, “सरासरी क्षमता अंदाजे ५००० लिटर भरेल. हे सगळे १२०० टँकर दिवसातून तीन फेऱ्या तरी करतातच. म्हणजे सगळे मिळून २४ तासात किमान १.८ कोटी लिटर पाणी वाहून नेतात. चालू दर आहे, हजार लिटरला ३५० रुपये. म्हणजे दिवसाला ६० लाख रुपये. पाणी घरगुती वापरासाठी आहे, जनावरांसाठी की उद्योगांसाठी, त्याप्रमाणे भाव ठरतो.”

पाण्याची टंचाई टँकर अर्थकारणाला चालना देते. टँकर तयार होतायत, दुरुस्त होतायत, भाड्याने जातायत, विकले जातायत आणि विकत घेतले जातायत. जालन्याच्या वाटेवर आम्ही एका बरीच लगबग चालू असलेल्या ठिकाणी पोचलो – अहमदनगर जिल्ह्यातलं राहुरी. इथे १०,००० लिटरच्या टँकरची टाकी बनवण्यासाठी सुमारे ३०,००० रुपये लागतात. त्याच्या दुप्पट पैशात ती विकली जाते. राहुरीच्या कारखान्यात, छोट्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आमची टँकर तंत्रज्ञानाशी छान तोंडओळख होते. “एमएस प्लेटचा ५ फूट x १८ फूटचा पत्रा ३.५ मिमि जाड असतो (याला ग्रुप १० म्हणतात),” एका फॅब्रिकेशन युनिटचे मालक श्रीकांत मेलवणे आम्हाला माहिती देतात. ते आम्हाला “पत्रा वाकवण्याचं यंत्र” दाखवतात. यावर प्रत्येक पत्रा हाताने वाकवावा लागतो.

PHOTO • P. Sainath

या मशीनवर १५ x १८ फुटाचे स्टीलचे पत्रे वाकवले जातात आणि मग एकमेकांशी जोडून टँकर किवा टाक्या बनवल्या जातात, मागे राहुरीच्या फॅक्टरीत दिसतायत तसे

“१०,००० लिटरच्या टँकरचं वजन जवळ जवळ ८०० किलो असतं” ते सांगतात. स्टीलच्या तीन पत्र्यांसाठी सुमारे २७,००० रुपये खर्च येतो. (किलोमागे ३५ रुपये). मजुरी, वीज आणि इतर खर्च मिळून वरचे ३००० रुपये. “एक १०,००० लिटरचा टँकर बनवण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो.” ते म्हणतात. “या हंगामात उसंतच नव्हती. आम्ही तीन महिन्यात (वेगवेगळ्या आकाराचे) १५० टँकर बनवलेत.” एका किलोमीटरच्या परिघात त्यांच्यासारखे इतर चार उद्योग आहेत. त्यांच्याच वेगाने टँकर तयार करणारे. आणि हेच काम करणारे असे १५ कारखाने अहमदनगर शहराच्या ३ किलोमीटरच्या परिघात आहेत.

“सगळ्यात मोठे – २०,००० लिटरचे टँकर जनावरांच्या छावण्यांना आणि कारखान्यांना जातात,” मेलवणे आम्हाला सांगतात. “१०,००० लिटरवाले शहरांना आणि मोठ्या गावांना जातात. मी बनवलेले सगळ्यात लहान टँकर फक्त १००० लिटर पाणी वाहून नेणारे आहेत.” हे छोटे टँकर “फळबागावाले विकत घेतात. डाळिंबाच्या बागा असणारे छोटे शेतकरी, ज्यांना ठिबक परवडत नाही. ते या टाक्या बैलगाडीवर लादतात आणि हाताने बागांना पाणी घालतात.”

पण एवढं सगळं पाणी नक्की कुठून येतंय? भूजलाच्या बेसुमार उपशातून. खाजगी बोअरवेलमधून – काही तर अगदी नव्याने पाणी टंचाईत आपले हात ओले करून घेण्यासाठी खोदल्या गेल्या आहेत. पाण्याचं संकट जसजसं गंभीर होत जाईल तशा या बोअरवेल आटतील. ज्यांना भविष्याचा कानोसा घेता येतो त्यांनी पैसा कमवण्यासाठी सध्या पाणी असणाऱ्या साध्या विहिरी विकत घेतल्या आहेत. जालन्यातले बाटलीबंद पाण्याचे काही कारखाने थेट बुलडाण्याहून (विदर्भात) पाणी घेऊन येतात. तिथेही पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई लवकरच इतर प्रदेशातही पोचणार असं दिसतंय. काही जण तर सरकारी तलाव आणि जलाशयांतल्या पाण्याची चोरी करतायत.

टँकरमालक १०,००० लिटर पाणी १,००० ते १,५०० रुपयांना विकत घेतो आणि तेच पाणी तो ३,५०० रुपयांना विकतो – एका व्यवहारात २,५०० रुपयांचा नफा. त्याच्याकडे स्वतःचा पाण्याचा स्रोत असेल – चालू बोअरवेल किंवा विहीर, तर खर्च अजून कमी होतो. आणि तो सरकारी पाणी साठ्यातून चोरी करत असेल, तर मग खर्च शून्य.

“या वर्षी राज्यभरात ५०,००० हून जास्त टँकर (मध्यम आणि मोठ्या आकाराचे) तयार करण्यात आले,” माजी खासदार (आणि विधीमंडळाचे माजी सदस्य) प्रसाद तनपुरे सांगतात. “या आधीच्या वर्षांमध्ये तयार केलेले हजारो टँकर विसरून कसं  चालेल? त्यामुळे सध्या किती टँकर चालू आहेत याचा अंदाज कुणीही बांधू शकतं.” या भागातले ज्येष्ठ राजकारणी असणारे तनपुरे एकूणच पाण्याचं चित्र काय आहे हे ओळखून आहेत. इतर काही अंदाजांनुसार, एक लाख नवे टँकर तयार केले गेले आहेत.

अगदी नवे ५०,००० टँकर म्हटलं तरी राज्यभरातल्या टँकर बनवणाऱ्यांनी गेल्या काही महिन्यात सुमारे दोन अब्ज रुपयांचा धंदा केला आहे असं समजायला हरकत नाही. आता काहींना इतर कामामध्ये तोटाच सहन करायला लागलाय “बांधकामं खोळंबलीयेत. सळया, तुळया, बीम, काहीही काम नाहीये,” मेलवणे सांगतात. पण यातला पैसा पाहून नव्याने या धंद्यात उड्या टाकणारेही आहेतच. तिथे जालन्यात स्वतः टँकर तयार करणारे सुरेश पवार सांगतात, “या एका गावात तब्बल १०० फॅब्रिकेटर आहेत. यातल्या किमान ९० जणांनी याआधी हे काम कधीही केलेलं नाही पण आता करतायत.”

जालना जिल्ह्याच्या शेलगाव गावचे एक शेतकरी (आणि स्थानिक पुढारी) दीपक अंबोरे दिवसाला सुमारे २००० रुपये खर्च करतात.  “माझ्या १८ एकर रानासाठी मला रोज पाच टँकर लागतात. यातल्या पाच एकरावर मोसंबीचा बाग आहे. मला सावकाराकडून कर्ज घ्यावंच लागणारे.” पीक हातातनं गेल्यात जमा असताना इतका खर्च कशाला करायचा? “सध्या तरी, माझी बाग जगवायला, बास.” इथल्या सावकारांचे व्याजाचे दर वर्षाला २४ टक्के किंवा त्याहूनही जास्त आहेत.

परिस्थिती वाईट आहे, पण टोकाला गेलेली नाही. अजून तरी नाही. जालन्यातले किती तरी जण वर्षानुवर्षं टँकरवरच तगून आहेत. संकटाचं गांभीर्य आणि टँकरचा आकडा तेवढा आभाळाला भिडलाय. खरी नामुष्की अजून यायचीये. आणि हे फक्त पावसाबद्दल नाहीये. याला काही अपवाद आहेत. एका राजकारण्याने उपाहासाने विधान केलं होतं, “माझ्या मालकीचे १० टँकर असते तर मी एकच प्रार्थना केली असती, यंदाही दुष्काळ पडो.”

पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, २७ मार्च २०१७

नक्की वाचा – असा सुकत चाललाय निम्मा महाराष्ट्र...

२०१४ मध्ये पी साईनाथ यांना एका लेखमालेसाठी वर्ल्ड मीडिया समिट ग्लोबल अवॉर्ड फॉर एक्सलन्स हे पारितोषिक मिळालं. हा लेख त्या लेखमालेचा भाग आहे.

अनुवाद - मेधा काळे

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale