हरयाणाच्या सोनिपत जिल्ह्यात सिंघु-दिल्ली सीमेवर जमलेला शेतकऱ्यांचा अथांग जत्था हरजीत सिंग पाहत बसलेत. हिवाळ्याचं धुरकट ऊन त्यांच्या चेहऱ्यावरून तरळून जातं.

सभोवताली, वयस्क आणि तरुण – पुरुष, स्त्रिया आणि लहानगी मुलंही – सगळे वेगवेगळ्या कामात मग्न आहेत. दोन पुरुष काठ्यांनी धोपटून गाद्यांमधली धूळ काढतायत, रात्रीची निजण्याची तयारी सुरू आहे. काही जण जाणाऱ्या येणाऱ्यांना चहा आणि बिस्किटं वाटतायत. अनेक जण त्यांच्या पुढाऱ्यांची भाषणं ऐकण्यासाठी मोठ्या जमावाच्या पुढे निघालेत. काहींची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. आणि बाकी निवांत इकडे तिकडे हिंडतायत.

या वर्षी सप्टेंबर महिन्यात संसदेत जे तीन कृषी कायदे रेटून मंजूर करून घेण्यात आले त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांपैकी एक म्हणजे हरजीत.

ते सांगतात की पंजाबच्या फतेहगड साहिब जिल्ह्यातल्या माजरी सोधियाँ गावात आपल्या चार एकरात ते भात आणि गहू घ्यायचे. पन्नाशीचे हरजीत अविवाहित आहेत आणि आपल्या आईबरोबर राहतात.

२०१७ साली एक अपघात झाला आणि तेव्हापासून हरजीत चालू शकत नाहीयेत. पण आपल्या शेतकरी बांधवांबरोबर या प्रचंड मोठ्या निदर्शनांना येण्यापासून त्यांना कुणी रोकू शकलं नाही. “मी माझ्या घराच्या छतावर काम करत होतो आणि तिथून खाली पडलो,” अपघाताबद्दल ते सांगतात. “खुब्याचं हाड मोडलं.”

Harjeet Singh attending the meeting
PHOTO • Amir Malik
A farmer making placards at the protest site
PHOTO • Amir Malik

चालता येत नसलं तरीही हरजीत सिंग एका ट्रक-ट्रॉलीतून २५० किलोमीटरवरच्या सिंघुत येऊन दाखल झाले. उजवीकडेः निदर्शनांच्या ठिकाणी एक शेतकरी फलक तयार करतोय

करण्यासारखं फार काही नव्हतं. “सुरुवातीचे प्रथमोपचार सोडले तर मला ठीक उपचार घेताच आले नाहीत कारण हॉस्पिटल २-३ लाख रुपये मागत होते. आता एवढा पैसा माझ्याकडे कुठून येणार?”

आता इथे ते सगळं कसं करतायत? मोर्चाच्या वेळी, भाषणं सुरू असताना ते उभे कसे राहतात?

“या ट्रॅक्टरचं चाक दिसतंय? एका हातानी ते धरायचं आणि दुसऱ्या हातात ही काठी घेऊन तिच्या आधारे मी उभा राहतो. कधी कधी दुसऱ्या कुणाची मदत घेतो, किंवा मग भिंतीला टेकून उभा राहतो. ह्या काठीचा आधार घेऊन मी उभं राहण्याचा प्रयत्न करतो,” ते सांगतात.

“मी इथे आंदोलनासाठी आलो कारण आमच्या सगळ्यांसाठी इथे लोक किती खस्ता खातायत ते पाहणं मला सहन झालं नाही,” ते म्हणतात. “मी एका ट्रक-ट्रॉलीमध्ये जवळपास २५० किलोमीटर प्रवास केलाय.” इतर शेतकऱ्यांनी मला आंदोलनाच्या ठिकाणी पोचायला मदत केली. इथे जमलेल्या शेतकऱ्यांनी जे भोगलंय त्यापुढे त्यांचं स्वतःचं दुखणं काहीच नाही असं ते म्हणतात.

रस्त्यातले अडथळे आणि काटेरी तारा दूर केल्या, अश्रुधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा झेलला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, रस्त्यात खणलेले खंदक पार केले – हे सगळं आणि याहूनही अधिक यातना शेतकरी झेलत होते ते त्यांनी पाहिलं होतं.

“पुढे ज्या अपेष्टा सोसाव्या लागणार आहेत त्या याहून भयंकर आहेत,” हरजीत म्हणतात. त्यांचे मित्र, शेतकरी असणारे केसर सिंग, मुक्यानेच मान डोलावतात.

ते मला सांगतात की आमचे नेते म्हणतायत, “अदानी आणि अंबानीसारखे कॉर्पोरेट आमच्या जमिनींवरचा आमचा हक्क हिरावून नेतील. मला वाटतं त्याचं म्हणणं बरोबर आहे.”

A large gathering listens intently to a speech by a protest leader
PHOTO • Amir Malik

वर डावीकडेः आम्ही इतर आंदोलकांशी बोलत असताना माजरी सोधियाँ गावचे एक शेतकरी सगळं पाहत होते. वर उजवीकडेः दोन जण काठीने झोडपून गादीतली धूळ काढत होते. खाली डावीकडेः सिंघु सीमेवर आलेल्या पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातल्या शेतकरी. खाली उजवीकडेः आंदोलनातील नेत्याचं भाषण ऐकणारा मोठा जमाव

अपघातानंतर स्वतः शेती करणं अशक्य झाल्यामुळे हरजीत यांनी आपली चार एकर जमीन दुसऱ्या एका शेतकऱ्याला भाड्याने कसायली दिली. दुसऱ्याने शेती केली की काय होतं ते त्यांना लगेचच अनुभवायला मिळालं. “लगेचच माझ्या वाट्याला घाटा आला.”

२०१९ साली त्यांनी दुसऱ्या एका शेतकऱ्याला तीच जमीन एकरी ५२,००० रुपये खंडाने कसायला दिली. त्यांना वर्षाला रु. २,०८,००० (भात आणि गहू – दोन पिकं) मिळाले. त्यातले निम्मे त्यांनी खंडकऱ्याकडून पेरणीच्या आधी घेतले होते. बाकी पिकं निघाली की मिळणार आहेत. त्यांच्या जमिनीतून त्यांना या वर्षी इतकं उत्पन्न मिळणार आहे.

“२०१८ साली, जेव्हा मी स्वतः शेती करत होतो, तेव्हा मला त्याच जमिनीतून अडीच लाखांचं उत्पन्न मिळालं होतं,” ते म्हणतात. “४६,००० रुपयांचं सरळ सरळ नुकसान झालंय. शिवाय, महागाई म्हणजे सोने पे सुहागा [दुष्काळात तेरावा]. त्यामुळे बचत म्हणायची तर काहीच नाही. आणि मला कसलं पेन्शनही मिळत नाही.”

“माझ्या कण्याला चीर गेलीये,” हरजीत सांगतात. “काचेच्या पेल्याला कधी कधी तडे जातात ना तशी,” त्यांचे मित्र केसर म्हणतात.

तरीही, ते इथे दिल्लीच्या सीमेवर येऊन पोचलेत. कणा जायबंदी असला तरी ते कणाहीन नाहीत. हरजीत सिंग चालू शकत नाहीत कदाचित, पण या कृषी कायद्यांच्या विरोधात त्यांनी टाकलेलं पाऊल मोठं दमदार आहे.

अनुवादः मेधा काळे

Amir Malik

Amir Malik is an independent journalist, and a 2022 PARI Fellow.

Other stories by Amir Malik
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale