“हर नफ़्स को मौत का मज़ा चखना है (प्रत्येक जिवाला मरणाची चव चाखावीच लागेल),” कोरलेला एक संदेश आपल्याला दिसतो. भविष्यवाणी म्हणून नाही तर नवी दिल्लीतल्या जदीद एहल-इ-इस्लाम या मोठ्या दफनभूमीतल्या कबरीवर हा कोरलाय.

ही ओळ - كُلُّ نَفْسٍ ذَائِقَةُ الْمَوْتِ – कुराणातली आयत आहे. प्रामुख्याने मुसलमानांच्या या दफनभूमीवर झाकोळ पसरलेला असताना त्यात या ओळीने एक प्रकारचा सुकून आणि उदासी मिसळून गेलीये. आणखी एक मृतदेह घेऊन अँब्युलन्स येते. जिवलग गेलेल्या व्यक्तीसाठी अखेरची प्रार्थना म्हणतात. आणि क्षणात गाडी रिकामी आणि कबर भरते. यंत्राच्या सहाय्याने माती लोटली जाते.

या दफनभूमीच्या एका कोपऱ्यात – बहादूर शाह जफर मार्गावर माध्यमांची कार्यालयं ज्या इमारतींमध्ये आहेत तिथून जवळच आपल्याला ६२ वर्षीय निज़ाम अख्तर दिसतात. ते कबरींवरच्या चिऱ्यांवर – ज्यांना ते मेहराब म्हणतात गेलेल्यांची नावं कोरतायत. दोन बोटात परकज़ा (सुलेखनासाठीचा कुंचला) पकडून हलक्या हाताने ते एक नुक्ता रंगवतात. या एका छोट्या बिंदूवर ऊर्दू अक्षरांचे उच्चार ठरतात. ते लिहित असलेला शब्द होता दुरदाना – कोविड-१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव.

निज़ाम कबरींवर गेलेल्या व्यक्तीचं नाव आणि सोबत काही ओळी रंगवतायत. अतिशय सफाईदार आणि तितकंच क्लिष्ट सुलेखन ते करतात. त्यांचं काम झालं की त्यांचाच एक सहकारी त्यांनी लिहिलेली अक्षरं छिन्नीने कोरून काढेल. आणि हळू हळू रंग नाहीसा होईल.

गेली चाळीस वर्षं कातिब असलेले निज़ाम कबरींवर गेलेल्या व्यक्तींची नावं लिहितायत. “आजवर किती कबरींवर नावं लिहिलीत ते काही लक्षात नाही,” ते म्हणतात. “यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात कोविडने मरण पावलेल्या १५० जणांची आणि कोविडशिवाय इतर कारणांनी गेलेल्या तितक्याच लोकांची नावं मी लिहिली आहेत,” ते सांगतात. सगळं काम ऊर्दूमध्ये. दुसऱ्या बाजूला गेलेल्या व्यक्तीचं केवळ नाव इंग्रजीत दिसतं. “एका सेकंदात पानभर लिहिलं, असं काम नाहीये हे,” मी झरझर लिहून घेत होतो त्याची चेष्टा करत हलकं हसून ते म्हणतात.

Left: One of the gates to the qabristan; on this side only those who died of Covid are buried. Right: Nizam Akhtar writing the names of the deceased on gravestones
PHOTO • Amir Malik
Left: One of the gates to the qabristan; on this side only those who died of Covid are buried. Right: Nizam Akhtar writing the names of the deceased on gravestones
PHOTO • Q. Naqvi

डावीकडेः कब्रस्तानाचं एक द्वार, या बाजूला ज्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला त्यांना दफन केलं जातंय. उजवीकडेः कबरींच्या चिऱ्यांवर नावं लिहिताना निज़ाम अख्तर

ही महामारी सुरू होण्यापूर्वी जदीद कब्रस्तानात दिवसाला एक किंवा दोन चिऱ्यांची मागणी येत असे पण आता मात्र तो आकडा चार ते पाच इतका झालाय, २०० टक्क्यांहून अधिक वाढलाय. हे काम चार जणं मिळून करतात. या आठवड्यात त्यांना नवीन काम नाहीये. १२० चिऱ्यांचं अर्धवट काम झालंय आणि आणखी पन्नासांचं काम तर अजून सुरू करायचंय.

धंदा एकदम तेजीत आलाय – पण त्याचा वेग या कारागिरांच्या काळजाला घरं करतोय. “फार लोकं मरण पावली,” मोहम्मद शमीम म्हणतात. या कब्रस्तानात काम करणाऱ्यांची त्यांची ही तिसरी पिढी. “आणि त्यांच्यासोबत माणुसकी सुद्धा लोप पावलीये. मरणाची ही दृश्यं बघून तासंतास माझं मन रडत राहतं.”

“आयुष्याचं हे वास्तव आहे – जे या धरतीवर आलेत ते जगतील आणि मृत्यूही अटळ सत्य आहे – सगळ्यांनाच एक दिवस इथून जावं लागणार आहे,” निज़ाम सांगतात. “लोक जग सोडून जातायत, आणि मला कबरींवरच्या चिऱ्यांची कामं येतायत,” मृत्यूचे तत्त्वज्ञ असल्यासारखे ते बोलतात. “आज जे काही सुरू आहे ते या आधी मी कधीही पाहिलेलं नाही.”

सगळी कुटुंबं काही कबरीवर शिळा रोवत नाही, तरीही मागणी प्रचंड वाढलीये. ज्यांना हा खर्च परवडणारा नाही ते साध्या लोखंडी फळ्यावर मजकूर रंगवून घेतात. हे स्वस्त पडतं. अनेक कबरींना काहीच खुणा नाहीत. “आणि काहींची मागणी दफन झाल्यावर १५-४५ दिवसांनी येते,” निज़ाम सांगतात. “आम्ही एक काम हाती घेतलं की त्या लोकांना किमान २० दिवस तरी थांबावं लागतं,” असीम (त्यांच्या विनंतीवरून नाव बदललं आहे) सांगतो. हरयाणाच्या फरीदाबाद जिल्ह्याच्या बल्लभगडचा तो रहिवासी आहे.

३५ वर्षांचा असीम गेल्या वर्षी करोनाबद्दल जरा साशंकच होता. पण आता मात्र त्याचा विश्वास बसलाय. “मृतदेह तर खोटं बोलत नाहीत ना. इतके पाहिलेत की आता विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नाही.” काही लोकांनी तर स्वतःच त्यांच्या जिवलगांच्या कबरींसाठी खड्डे खणलेत. “कधी कधी तर खड्डे खणायलाही पुरेसे लोक नसतात,” तो म्हणतो.

“महासाथ येण्याआधी, या कब्रस्तानात रोज चार ते पाच मृतदेह यायचे. महिन्याला सुमारे १५०,” कब्रस्तानाचं व्यवस्थापन बघणाऱ्या समितीतल्या एकाने आम्हाला सांगितलं.

Asim, Aas and Waseem (left to right) engraving the mehrab: 'Every order that we take, the family has to wait for at least 20 days'
PHOTO • Q. Naqvi
Asim, Aas and Waseem (left to right) engraving the mehrab: 'Every order that we take, the family has to wait for at least 20 days'
PHOTO • Amir Malik

असीम आणि आस (डावीकडे) मेहराबवरचा मजकूर कोरतायतः ‘आमच्याकडे काम आलं की त्या लोकांना किमान २० दिवस तरी थांबावं लागतं.’

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्येच, इथे १,०६८ मृतदेह दफनासाठी आले आहेत – ४५३ कोविडमुळे मरण पावलेल्यांचे आणि ६१५ इतर. अर्थात हे या कब्रस्तानाकडची अधिकृत आकडे आहेत. इथे काम करणाऱ्या कामगार – नाव न सांगण्याच्या अटीवर – सांगतात की हा आकडा किमान दीडपट जास्त आहे.

“एक बाई आपल्या दीड वर्षांच्या बाळाला घेऊन इथे कब्रस्तानात आली होती,” असीम सांगतो. “तिचा नवरा कोविडने गेला आणि ते दुसऱ्या राज्यातून इथे आले आहेत. तिचं इथे कुणीच नाही. आम्ही त्याचा दफनविधी केला. त्या बाळाने वडलांच्या कबरीवर माती लोटली.” जुनी एक म्हण आहेः जर एखादं बाळ मरण पावलं तर ते आपल्या आई-वडलांच्या मनात दफन होतं. पण जेव्हा एखाद्या बाळाला आपल्या आई-वडलांचं दफन करावं लागतं तेव्हा काही म्हटलं जातं का?

असीम आणि त्याच्या कुटुंबाला पण कोविडने घेरलं होतं. तो, त्याच्या दोघी बायका, आई-वडील अशा सगळ्यांनाच लक्षणं जाणवत होती. त्याची पाचही मुलं मात्र सुरक्षित होती. या कुटुंबातलं कुणीही एकदाही तपासायला मात्र गेलं नाही. पण सगळे तगले. “मी घर चालवण्यासाठी इथे दगड फोडतोय,” ज्यांच्यावर मजकूर कोरला जातो त्या दगडांविषयी तो बोलतोय. जदीद कब्रस्तानाकडून असीमला महिन्याला ९,००० रुपये दिले जातात. शिवाय आजवर त्याने गेलेल्या हजारो जणांसाठी नमाज़-ए-जनाज़ा अदा केली आहे, कोविडच्या रुग्णांसाठी आणि इतरही.

“मी इथे काम करतोय त्यासाठी माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे कारण जाणाऱ्यांच्या शेवटच्या प्रवासात त्यांची साथ दिली तर पुढच्या आयुष्यात आपल्याला त्याचं पुण्य मिळतं,” असीम सांगतो. निज़ाम यांच्या घरच्यांना त्यांचं इथे काम करणं मान्य आहे, तेही याच धारणेमुळे. दोघांनाही आधी या कामाबद्दल थोडी भीती मनात होती पण ती लवकरच दूर झाली. “जेव्हा एखादा मृतदेह जमिनीवर ठेवलेला असतो तेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीचा नाही तर तो दफन करण्याचा विचार करत असता,” असीम सांगतो.

इथे पूर्ण कोरीव काम केलेल्या एका चिऱ्याचे १,५०० रुपये होतात. निज़ाम यांना त्यांच्या कामाचे, ज्याला 'किताबत' म्हणतात, २००-३०० रुपये मिळतात. ६ फूट लांब आणि ३ फूट रुंद पत्थरातून प्रत्येकी ३ फूट लांब आणि १.५ फूट रुंद अशा चार शिळा कापल्या जातात. त्यानंतर प्रत्येक शिळेला वरती घुमटाचा आकार दिला जातो. पूर्ण झाल्यावर यालाच 'मेहराब' म्हणतात. काही जण थोडा संगमरवरही वापरतात. जे लोखंडी फळा वापरतात त्यांना २५०-३०० रुपये खर्च येतो, दगडावरच्या कामाला याच्या सहापट पैसा खर्च होतो.

व्हिडिओ पहाः कब्रस्तानातले कातिब

एखादं काम स्वीकारलं की निज़ाम घरच्या एखाद्या सदस्याला जो मजकूर हवाय तो नीट एका कागदावर लिहून द्यायला सांगतात. यामध्ये मृत व्यक्तीचं नाव, पती किंवा पित्याचं नाव (स्त्री असेल तर), जन्म आणि मृत्यूची तारीख आणि पत्ता या गोष्टी असतात. याशिवाय घरच्यांना कुराणातली एखादी आयत कोरून हवी असेल तर ती. “यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक तर नातेवाइकांना आपल्या जिवलगाचं नाव लिहिण्याची अखेरची संधी मिळते आणि दुसरं म्हणजे कुठल्याही चुका होत नाहीत,” निज़ाम मला सांगतात. कधी कधी यात एखादा शेरही असू शकतो. जहाँ आरा हुसैन यांच्या घरच्यांनी आताच मेहराब तयार करण्याचं काम निज़ाम यांना दिलंय आणि त्यावर खालील ओळी लिहिलेल्या असतील.

अब्र-ए-रहमत उनकी मरक़द पर गुहर-बारी करे
हश्र तक शान-ए-करीमी नाज़ बरदारी करे

निज़ाम १९७५ साली किताबत करायला लागले. १९७९ साली चित्रकार असणारे त्यांचे वडील मरण पावले आणि त्यानंतर निज़ाम कबरींवर लेखन करायला लागले. “माझे वडील कलाकार होते, पण मी त्यांच्याकडून कधी काही शिकलो नाही. मी ते चित्र रंगवत असायचे तेव्हा नुसता बघत असायचो. आणि मला आपसूकच ही कला देणगी म्हणून मिळालीये,” ते म्हणतात.

१९८० साली त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडी मल कॉलेजमधून ऊर्दूतली पदवी प्राप्त केली. आणि या कामाला सुरुवात केली. आता बंद पडलेल्या जगत सिनेमा थिएटरसमोर त्यांनी स्वतःचं दुकान टाकलं. पाकीज़ा आणि मुग़ल-ए-आज़म सारखे ऐतिहासिक सिनेमे या थिएटरमध्ये लागत असत. १९८६ साली निज़ाम यांचं नसीम आरा यांच्याशी लग्न झालं. अतिशय निष्णात कातिब असणाऱ्या निज़ाम यांनी आपल्या पत्नीला मात्र एकही पत्र आजवल लिहिलेलं नाही. गरजच पडली नाही. “ती माहेरी जायची आणि परत यायची कारण एकाच वस्तीत आमची घरं आहेत.” निज़ाम आणि नसीम आरा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि सहा नातवंडं. ते पुरानी दिल्लीच्या जामा मस्जिदजवळ राहतात.

Left: From across the graveyard, you can see the building of the Delhi police headquarters at ITO. Right: Nizam has been printing names of the deceased on these gravestones for over 40 years
PHOTO • Amir Malik
Left: From across the graveyard, you can see the building of the Delhi police headquarters at ITO. Right: Nizam has been printing names of the deceased on these gravestones for over 40 years
PHOTO • Amir Malik

डावीकडेः या कब्रस्तानातून तुम्हाला आयटीओमध्ये असलेलं दिल्ली पोलिसांचं मुख्यालय दिसतं. उजवीकडेः निज़ाम गेली चाळीस वर्षं या कबरींवर गेलेल्या व्यक्तींची नावं रंगवतायत

“त्या काळी मी मुशायऱ्यांचे बोर्ड रंगवायचो. अधिवेशनं, जाहिराती, सेमिनार, धार्मिक किंवा राजकीय सभांचे फलक असायचे.” त्यांच्या दुकानात ते मेहराब लिहून द्यायचं काम देखील करायचे. त्यांच्या दुकानात निदर्शनांसाठीचं देखील भरपूर साहित्य तयार व्हायचं, फलक, होर्डिंग आणि पोस्टर, इत्यादी.

ते सांगतात की तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ८० च्या दशकात बाबरी मशिदीची कुलुपं काढायला परवानगी दिली होती. “त्याला मुस्लिम समाजातून आणि इतरांकडूनही मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. मी या बाबीचा निषेध करण्याचं आवाहन करणारे कापडी आणि कागदी बॅनर रंगवून देत असे,” निज़ाम सांगतात. “लोकांच्या मनात [मशीद पाडल्याबद्दल] संताप होता, पण ते रस्त्यावर उततर नव्हते.” तसंही अशा प्रकारचं काम करणारी राजकीय कृती समाजात हळू हळू कमीच होत चालल्यांचं निरीक्षण ते मांडतात. “माझ्याकडे आठ जण कामाला होते पण हळू हळू त्यांना काम सोडावं लागलं. त्यांना द्यायला माझ्याकडे पैसाच नव्हता. आता ते कुठे आहेत याचा काहीच पत्ता नाही, याचं मात्र वाईट वाटतं,” ते सांगतात.

“२००९-१० साली मला घशाला आजार झाला होता आणि त्यात माझा आवाजच गेला. १८ महिन्यानंतर आवाज परत आला. मला समजून घ्यायला एवढी माहिती देखील पुरे होईल बहुतेक,” ते हसतात. त्याच वर्षी निज़ाम यांचं दुकाम बंद पडलं. “पण मेहराबवर नावं रंगवणं मात्र मी थांबवलं नाही.”

“आणि मग भारतात कोविड-१९ आला आणि कब्रस्तानातल्या लोकांना माझी मदत हवी होती. मी काही त्यांना नाही म्हणू शकलो नाही. मी गेल्या वर्षी जून महिन्यात इथे आलो. मला देखील माझं घर चालवायचं होतं ना.” निज़ाम यांचा मुलगा जामा मस्जिदपाशी एक चपला-बुटांचं छोटं दुकान चालवतो. पण टाळेबंदीमुळे त्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

२००४ साली जगत सिनेमा थिएटर बंद पडलं तसाच निज़ाम यांच्या दुकानाभोवतालचा परिसर आता गतस्मृतींच्या खुणा बनून राहिलाय. त्यांना साहिर लुधियानवींचं काव्य आवडतं आणि ते त्यांची गाणी ऐकत असतात. निज़ाम ज्या वर्षी पदवीधर झाले त्याच वर्षी साहिरचं निधन झालं. साहिरची त्यांची सर्वात आवडती ओळ - ‘चलो, एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनो’.

Nandkishore, an expert in cutting stones and shaping them with hammer and chisel, says, 'The graveyard has never seen such a horrible situation as it does now'
PHOTO • Amir Malik
Nandkishore, an expert in cutting stones and shaping them with hammer and chisel, says, 'The graveyard has never seen such a horrible situation as it does now'
PHOTO • Amir Malik

दगड कापून छिन्नी हातोड्याने त्याला आकार देण्यात पटाईत असलेले नंदकिशोर म्हणतात, ‘सध्यासारखी भयंकर परिस्थिती या कब्रस्तानात कधीच कुणी पाहिलेली नाही’

“त्या काळात स्वतः ऊर्दू लिहिणारे कलावंत होते. आणि आता कबरीवर देखील हिंदी आणि इंग्रजी लिहिलं जातंय. आज दिल्लीत मेहराबवर ऊर्दूत लिहिणारं कुणी मिळणं फार दुर्मिळ झालंय,” ते म्हणतात. “राजकारणामुळे या भाषेचं फार नुकसानही झालंय, आणि तिच्यावर ठपका बसलाय. का तर ही भाषा केवळ मुस्लिमांची आहे या भ्रमामुळे. पूर्वी ऊर्दूमध्ये किताबत करून विविध प्रकारचं काम करता येत होतं, आज तसं नाही.”

मेहराबवर निज़ाम यांची किताबत पूर्ण झाल्यावर रंग सुकायची वाट पाहून त्यानंतर असीम-सुलेमान आणि नंदकिशोर – अक्षरं कोरतात. पन्नाशी पार केलेले नंदकिशोर गेली ३० वर्षं या कब्रस्तानात काम करतायत. दगड कापून कोणतंही यंत्र न वापरता, केवळ छिन्नी आणि हातोड्याने त्याला घुमटाकार आकार देण्यात ते माहिर आहेत. “सध्यासारखी भयंकर परिस्थिती या कब्रस्तानात कधीच कुणी पाहिलेली नाही,” ते म्हणतात.

नंदकिशोर कोविडने मरण पावलेल्यांच्या कबरींवर काम करत नाहीत. ते जदीद कब्रस्तानाच्या दुसऱ्या टोकाला बसून काम करतात. या विषाणूपासून बचाव करण्याची त्यांची खटपट. “दर रोज मी एक दगड कापतो, धुतो, कोरून काढतो आणि त्याचे मला ५०० रुपये मिळतात,” ते सांगतात. “यह अंग्रेजों के जमाने का कब्रस्तान है,” ते म्हणतात. इंग्रजांनी आपल्यासाठी फक्त कब्रस्तानच मागे ठेवलंय का असं विचारताच ते हसायला लागतात.

“मुस्लिम कब्रस्तानात नंदकिशोर नावाचा माणूस काम करतोय म्हटल्यावर काहींना जरा आश्चर्य वाटतं. अशा वेळी मी फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून हसतो, अजून काय करायचं ते काही मला समजत नाही. पण कधी कधी मात्र मी त्यांना म्हणतोः ‘मी तुमच्यासाठी कुराणातल्या आयता कोरतोय. तुम्ही स्वतः एक मुसलमान असून देखील अख्ख्या आयुष्यात ते केलं नाहीयेत.’ मग ते माझे आभार मानतात, माझ्यावर पूर्ण विश्वास टाकतात आणि मोकळे होतात,” नंदकिशोर सांगतात. नवी दिल्लीच्या सदर बाजार भागात राहणाऱ्या नंदकिशोर यांना तीन मुलं आहेत.

“या कबरींमध्ये चिरनिद्रा घेणारी ती माणसं माझी स्वतःची माणसं आहेत. इथून बाहेर पडलं तर ते जग मला आपलंसं वाटत नाही. इथे कसा सुकून आहे,” ते म्हणतात.

Pawan Kumar and Aas Mohammad: the dust from the stone work often covers them entirely
PHOTO • Amir Malik
Pawan Kumar and Aas Mohammad: the dust from the stone work often covers them entirely
PHOTO • Amir Malik
Pawan Kumar and Aas Mohammad: the dust from the stone work often covers them entirely
PHOTO • Amir Malik

पवन कुमार आणि आस मोहम्मदः कधी कधी तर दगडाच्या धुरळ्यात त्यांचं पूर्ण शरीर माखून जातं

दोनच महिन्यांपूर्वी एक नवीन कामगार कामावर आलाय. पवन कुमार बिहारच्या बेगुसराईचा आहे. त्याची बायको आणि तिघं मुलं घरी आहेत. ३१ वर्षांचा पवन देखील दगड कापायचं काम करतो. “माझा चेहरा लाल झालाय,” दगड कापायच्या छोट्या यंत्राने त्याने आज २० दगड कापले आहेत. त्यातनं उडालेला धुरळा अंगभर माखलाय. “कोविड असला काय, नसला काय, मला माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करावंच लागतं. इथे कधी कधी मला दिवसभरात ७०० रुपये देखील मिळतात.” त्याच्याकडे आधी धड असं कोणतं काम नव्हतं. नंदकिशोर आणि शमीमप्रमाणे तोही कधी शाळेत गेलेला नाहीये.

२७ वर्षांचा आस मोहम्मद देखील इथे काम करतो. मूळचा उत्तर प्रदेशच्या अलिगड़चा असलेला आस कब्रस्तानातल्या सगळ्या कामांमध्ये भाग घेणारा अष्टपैलू कामगार आहे. तो गेली सहा वर्षं इथे काम करतोय. आसच्या घरच्यांनी उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातल्या दूरच्या नातेवाइकांच्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलंय.

“मी तिच्या प्रेमात पडलो होतो. मागच्या वर्षी ती कोविड-१९ मध्ये गेली,” तो सांगतो. त्याच्या घरच्यांनी दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न जुळवायचा प्रयत्न केला. “त्या मुलीने, या वर्षी मार्चमध्ये स्थळाला नकार दिला कारण तिला कब्रस्तानात काम करणाऱ्याशी लग्न करायचं नव्हतं.”

“मला इतकं वाईट वाटलं, मी जास्त काम करायला लागलो. जास्त खड्डे खणायचे, जास्त दगड कापायचे. आणि आता तर मला लग्नच करायचं नाहीये,” आस म्हणतो. बोलता बोलता त्याचं एक दगड कापायचं काम सुरूच आहे. तोदेखील धुरळ्याने माखलाय. त्याला महिन्याला ८,००० रुपये मिळतात.

जवळच्याच काही कबरींवर एक पिवळं फुलपाखरू विहरत होतं. कबरींवरच्या फुलांवर बसावं का कबरींवर अशा गोंधळात असल्यासारखं.

कबरींवरती संदेश कोरणारे निज़ाम म्हणतातः “जे मरण पावतात, ते आपल्यातून जातात. अल्लाची मेहरबानी, मी अंतसमयी त्यांचं नाव कोरून ठेवतो. सांगतो की या इथे कुणी जे कोण आहे, ते कुणाचं तरी जिवलग आणि आप्त होतं.” काळ्या आणि पांढऱ्या रंगात बुडालेला त्यांच्या हातातला कुंचला त्यांच्या मर्जीप्रमाणे मेहराबवर कलाकारी करत असतो. आणि परत एकदा आणखी एका चिऱ्यावर अरबी भाषेतल्या एका ओळीच्या शेवटच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराखाली ते नुक्ता रंगवतातः ‘हर नफ़्स को मौत का मज़ा चखना है’.

अनुवादः मेधा काळे

Amir Malik

Amir Malik is an independent journalist, and a 2022 PARI Fellow.

Other stories by Amir Malik
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale