/static/media/uploads/Kali/img_3364.jpg


"अक्का, तुला माझ्या 'कच्चेरी' परीक्षेसाठी आग्रहाचं आमंत्रण आहे. तुझ्या मित्र-परिवारासह या प्रसंगाची शोभा वाढवायला ये"... काली वीरभद्रन ने मला त्याच्या अंतिम परीक्षेचे आमंत्रण द्यायला फोन केला होता. त्याची परीक्षा 'कलाक्षेत्र' या चेन्नईतल्या देशभरात नावाजलेल्या नृत्यशाळेत होणार होती.

दोन क्षण थांबून तो म्हणाला, " अक्का, माझं इंग्लिश बरोबर आहे नं?"

काली साशंक होता कारण अगदी चार वर्षांपर्यंत त्याचा इंग्रजी भाषेशी फारसा संबंधही नव्हता; पण तसाच तो नृत्यालाही परिचित नव्हता! पण आता तर त्याने 'भरतनाट्यम' या शास्रीय आणि कर्गट्टम, थप्पाट्टम आणि ओयीलाट्टम या तमिळनाडूतील तीन लोकनृत्य प्रकारात प्राविण्य मिळवलंय. तो हे सगळे प्रकार त्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांकडूनच शिकलाय.


uploads/Kali/img_1736.jpg


चेन्नई जवळ कोवलम नावाचे गरीब मच्छिमारांचे गाव आहे ; तिथे कालीचे कुटुंब वसलेले आहे. ते हिंदू-आदि-द्रविडार ( एक दलित जमात ) आहेत असं तो सांगतो. २१ वर्षीय कालीच्या वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले. "मी तेंव्हा साधारण सहा- सात महिन्यांचा होता", फार भावूक न होता असं तो सांगतो. त्याने त्याच्या भावना त्याच्या आईसाठी राखून ठेवलेल्या आहेत; जिने तेव्हापासून त्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पेलली - तेही कुलीचे काम करून.

"मला तीन मोठ्या बहिणी आणि दोन भाऊ आहेत; मी आधी माझ्या आजीकडे राहत असे; जेंव्हा माझा एक भाऊ मेंदूज्वराने मरण पावला, तेंव्हा मी परत आईकडे आलो".

पूर्वी आईचं घर आतासारखं पक्कं नव्हतं. चेन्नईतल्या थेंब-थेंब पावसातही ते गळायच; पण तेंव्हा सरकारने जोमाने काम केलं आणि यांच्या डोक्यावर पक्के छत आले. कालीला त्याबद्दल कृतज्ञता वाटते, तशी त्याला प्रत्येका बद्दल कृतज्ञता वाटते ज्यांनी त्याला त्याचे स्वप्न साकार करायला मदत केली.

कालीचे स्वप्न आहे की त्याने नृत्य करावे. हे फार काही नवीन नसेल, पण कालीला दोन पूर्णपणे वेगळ्या नृत्यशैलींमध्ये प्रावीण्य मिळवायचे आहे, ही नवीन बाब आहे! त्या दोन नृत्यशैलींपैकी एक आहे भरतनाटयं - ही एक रचनात्मक शास्त्रीय कला आहे. पूर्वी हा प्रकार देवदासी करायच्या आणि दैव असे की पूर्वी जो उच्च-जातीय आणि श्रीमंतवर्ग त्यांना नाकारायचा, तोच आता या कलेचा आश्रयदाता झाला आहे.

दुसरा प्रकार आहे लोकनृत्य - त्यात साधारणपणे तामिळनाडूतल्या गावांमध्ये पूर्वीपासून चालत आलेले आणि अजूनही चालणारे सगळेच नृत्यप्रकार येतात.


/static/media/uploads/Kali/Kannan Kumar.jpg


सहसा भरतनाट्यम चे नर्तक लोकनृत्यात फारसे लक्ष घालत नाहीत, पण जर त्यांच्या निर्मितीत एखादे 'करगम' व 'कवडी' या नृत्य प्रकारांचे प्रवेश असले तरच ते शिकतात. लोकनृत्य शिकणेच नाही मग सादरीकरण तर सोडाच! कालीचे लोकनृत्यातील गुरु 'कन्नन कुमार' हे पूर्ण तामिळनाडूत एकमेव पूर्णवेळ शिक्षक आहेत. ते सांगतात की लोकनृत्य हे एका आधार देणाऱ्या भक्कम भिंतीप्रमाणे आहे, आणि भरतनाट्यम, ज्यात एखादी गोष्ट सांगण्यासाठी मुद्रांचा वापर केला जातो, हे त्यावरील चित्राप्रमाणे आहे.

त्यांच्यामते हे दोन्ही नृत्यप्रकार परस्पर-पूरक आहेत आणि कालीने त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. तो दोन्हींचा सराव करतो - कुठल्याही अडचणींशिवाय! खरंतर कालीला अडचण तेंव्हाच आली होती जेंव्हा त्याने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. आपण काय करावं, याबद्दल त्याच्याकडे ठाम मत नव्हतं. सर्वसाधारणपणे बरोबर पर्याय होता नोकरी करण्याचा… त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज होती.

पण तेंव्हाच त्याच्या काकूने त्याला कोवलम जवळच असलेल्या 'दक्षिणचित्र' या दक्षिण-भारताच्या पारंपारिक संग्रहालयात चालणाऱ्या 'मोफत लोकनृत्य शिकवणी' बद्दल सांगितले. प्रभावित झालेल्या कालीने त्या शिक्षणात वेगाने प्रगती केली आणि दोन महिन्यात करगट्टम, थप्पाट्टम आणि ओयीलाट्टम यात प्राविण्य मिळवले. त्याने प्रभावित होऊन त्यांचे गुरु कन्नन कुमार यांनी त्याला चौथा नृत्यप्रकार 'देवराट्टाम' शिकवायला सुरुवात केली, आणि तेंव्हाच कालीने चार वर्षांच्या नृत्यातील डिप्लोमासाठी प्रवेश घेतला.


/static/media/uploads/Kali/img_7975.jpg


काही वर्षांपूर्वी कालीने कलाक्षेत्राबद्दल ऐकलेही नव्हते. सारा चांद यांनी कोवालमच्या 'त्सुनामी पुनर्वसन केंद्रात' त्याचे नृत्य पाहिले आणि त्याच्यातील कलेला ओळखले. त्यांनी त्याला सांगितले, की त्याने कलाक्षेत्र येथे रीतसर या कलेचे शिक्षण घ्यावे. यावर त्याच्या दूर-दूरच्या नातेवाईकांनी त्याला नाउमेद केले; पण त्यावर मात करून तो मुलाखतीत पास झाला आणि त्याला प्रवेश मिळाला. त्याने हे अडथळे पार केले असले, तरी पुढे काही अजून काही अडथळे उभे ठाकणार होतेच.

भरतनाट्यम आणि शास्त्रीय संगीताचा गंधही नसलेल्या, 'तामिळ शाळेत शिकलेल्या' या मुलाला कलाक्षेत्र सुरुवातीला फार अवघड वाटलं होतं. तिथले अन्न काटेकोरपणे शाकाहारी असायचे, त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या मांसाहाराची त्याला कमी वाटू लागली. त्याची प्रकृती कृशः झाली होती. पण तो जेंव्हा लट्ठ होता तेंव्हा त्याचा नाच कसा दिसायचा हे त्याने हसत-हसत दाखवलं. तिथल्या अनेक विदेशी लोकांपेक्षा तो चांगलं नृत्य करू शकत असे. त्याला तिथली संस्कृती तितकीच अनभिज्ञ होती, जितकी इतरांना, आणि त्याला इंग्लिश बोलणंही जमायचं नाही, त्याचा त्याला त्रास व्हायचा.

त्यावर त्याने नृत्यातूनच तोडगा काढला! तो शब्दांऐवजी हावभाव वापरू लागला आणि त्याने त्याच्या बुजरेपणावर मात केली. त्याहीपुढे जाऊन त्याने रशियन आणि दक्षिण आफ्रिकेतील मुलींना जमवून 'प्रथम वर्षीय विद्यार्थी दिन' ला ओयीलाट्टम सादर केलं. कलाक्षेत्राच्या डायरेक्टर लीला सामसन यांना त्याचे प्रयत्न आवडले. तो वर्गातही प्रथम आला. अशाप्रकारे त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे ज्ञान दिवसेंदिवस वाढू लागले.

आता तो एका क्षणात राग ओळखू शकतो. कलाक्षेत्राच्या संस्थापिका आणि डायरेक्टर रुक्मिणीदेवी अरुन्दले यांच्यापासून नावाला आलेल्या 'रुक्मिणी अरंगम' या नावाजलेल्या कार्यक्रमात तो राग ओळखतो आणि त्याच्या मित्रांना तो चूक आहे, की बरोबर हे विचारतो. बहुतेक वेळेस तो बरोबरच असतो. आता त्याचे नृत्य पूर्वीपेक्षा फारच सुधारलेले आहे त्याच्या स्टेप्स आणि हावभाव नेमके असत्तात.


/static/media/uploads/Kali/img_0059.jpg


२८ मार्च २०१४ ला रुक्मिणी अरंगम या कार्यक्रमात त्यांची कच्चेरी ची परीक्षा झाली. त्याच्या आठ जणांच्या समुदायाने सगळे 'मार्गम' सादर केले आणि त्यांच्या वर्गशिक्षिकेने 'नत्तुवंगम' वर ताल दिला. तिला तिच्या वर्गाचा नक्कीच अभिमान वाटत असणार. प्रेक्षकांना तर फारच कौतुक वाटत होतं !

कालीची आई, त्याचा भाऊ रजनी (हा कोवलम मध्ये इडलीचे दुकान चालवतो) त्याच्या तीन बहिणी आणि त्यांचे परिवार, त्यांचे मित्रमंडळ, असे सगळे कलाक्षेत्राला त्याच्या कुच्चेरीसाठी आले होते. जेंव्हा मी कालीच्या सुंदर नृत्यासाठी रजनीचे अभिनंदन केले, तेंव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, "आम्हांला त्याचा हा नाच काही कळत नाही, आम्ही फक्त इथे बाहेर बसलो होतो; तुम्हांला त्याचा नाच आवडला, हे छान झालं!"

काली तोपर्यंत त्यांना भेटायला बाहेर आला होता. तो आईला बिलगला, घरच्यांसोबत फोटो काढले; पण त्याचे मित्र त्याला वर्गांच्या फोटोंसाठी बोलवत होते. जसा तो आत पळाला, त्याने कन्नन कुमारांना पाहिलं आणि त्यांच्या पाया पडला. त्याच्या गुरूंनी त्याला खांद्याला धरून उठवलं आणि जवळ धरलं. त्या गुरूच्या डोळ्यांत अभिमान साठलेला होता, तर शिष्याच्या डोळयांत आनंद!


/static/media/uploads/Kali/img_1713.jpg


"मी हे दोन्ही नृत्यप्रकार सोडणार नाही " असं परीक्षेनंतर निश्चिंत झालेला काली म्हणतो. तो फर्स्ट क्लास ने पास झाल्याची बातमी कधी येते, याबद्दल उत्सुक आहे, आणि कलाक्षेत्रात भरतनाट्यं मध्ये पी. जी. डिप्लोमा करायला मिळणार म्हणून खूष आहे! आणि आता त्याचा लोकनृत्यासाठी काही करण्याचा निर्धार अजून पक्का झालाय. त्याच्यामते लोकनृत्य लोप पावत चालले आहे ते, शिवाय भरतनाट्यं - हे सामान्य लोकांसाठी सहज-साध्य करायचे आहे, ज्यांना एरवी त्यातले सौंदर्य अनुभवता येत नाही.

"मला दोन्ही प्रकार शिकवायचे आहेत, - एक वर्ग लोकनृत्याचा, एक भरतनाट्यंचा. मला एक नृत्यशाळा उभारायची आहे, मला अर्थार्जन करायचे आहे, माझ्या आईची काळजी घ्यायची आहे आणि मला नृत्य करायचे आहे! "

असे म्हणत हा तरुण नर्तक त्याची स्वप्ने सांगून जातो.

(मराठी अनुवाद: पल्लवी मालशे)

Aparna Karthikeyan

Aparna Karthikeyan is an independent multimedia journalist. She documents the vanishing livelihoods of rural Tamil Nadu and volunteers with the People's Archive of Rural India.

Other stories by Aparna Karthikeyan