“शेतांमधला गाळ आणि बाकी राडा सुकत चाललाय, त्यामुळे उडणारी बारीक धूळ फार त्रासदायक आहे,” पट्टणमथिट्टामध्ये दातन सी एस सांगतात. “प्लीज, हा वापरा,” शल्यचिकित्सक वापरतात तसला एक मास्क त्यांनी मला दिला, हे पाहून एका ताईला हसू यायला लागलं – केरळच्या पुरात जिच्या शेताचं निकसान झालं होतं त्यातली ही एक. “अहो, मुंबईत राहतात ते,” ती शेरा मारते, “यांना प्रदूषणापासनं काय जपायचंय?”

ही शेतं म्हणजे विध्वसांची चित्रं आहेत. कधी काळी नफा मिळवून देणारी भाताची आणि आरारोटची सुंदर शेती सध्या नदीपात्रातून वाहून आलेल्या काही इंच – काही ठिकाणी तर काही फूट – गाळाच्या थराखाली लपून गेलीये. उंचावरून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांसोबत गाळाबरोबर कारखान्यांचं सांडपाणी आणि प्रदूषणकारी घटकही जमा झाले आहेत. अनेक एकर शेतजमिनींवर हा जीवघेणा गाळ आता कडक उन्हात वाळून घट्ट झालाय आणि सगळ्या मातीवर जणू काही कच्च्या सिमेंटचा थर दिल्याचं चित्र आहे.

पाण्याची पातळी कमी व्हायला लागलीये, पाणी जमिनीत मुरायचंच थांबलंय, विहिरी कोरड्या पडू लागल्यायत आणि हवा तापायला लागलीये. या सगळ्यामुळे भूजल आणि भूस्तराचं सगळं समीकरणच बिघडून गेलंय. नद्यांच्या परिस्थितिकीत लक्षणीय बदल घडून आलेत. गाळ आणि वाळूचे किनारे वाहून गेल्यामुळे अनेक नद्या आणि ओढ्यांमध्ये आता पाणी थोपवून ठेवण्याची क्षमताच राहिलेली नाही. आणि त्यामुळेच, विचार करायला कितीही विचित्र वाटत असलं तरी आता केरळमधली यानंतरची आपत्ती ही दुष्काळ असू शकते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आपली शेती रुळावर आणणं अगदी खूप धीराच्या माणसालाही भोवंडून टाकू शकतं.

पण कुटुंबश्रीच्या महिला शेतकऱ्यांना मात्र नाही.

या तब्बल अडीच लाखाहून जास्त महिला आहेत, केरळमधल्या गाव-वस्ती पातळीवरच्या महिलांच्या प्रचंड मोठ्या जाळ्याचा एक अंश. कुटुंबश्री (शब्दशः, कुटुंबाची समृद्धी) मध्ये ४५ लाख स्त्रिया आहेत. सर्व सज्ञान महिलांना याचं सभासद होता येतं, एका कुटुंबातून एक महिला एवढीच मर्यादा घालण्यात आली आहे. थोडक्यात काय तर केरळच्या ७७ लाख कुटुंबांपैकी ६० टक्के घरांमधून एक तरी सभासद या जाळ्यामध्ये आहे. कुटुंबश्रीच्या गाभ्याशी आहेत या ३.२ लाख स्त्रिया ज्यांनी स्वतःला संघ कृषीशी जोडून घेतलंय – हे सामूहिक शेती करणारे गट आहेत.

Silt now covers a lot of the farmland, running several inches – sometimes feet – deep
PHOTO • P. Sainath

आता सगळ्या शेतात गाळ भरला आहे, कित्येक इंचांचा – कुठे कुठे तर काही फुटांचा थर आहे

४५ लाख सदस्य, त्यातही ३.२ लाख शेतकरी स्त्रिया असलेला कुटुंबश्री हा कदाचित जगातला स्त्रियांसाठी न्यायाचा आणि गरिबी निर्मूलनाचा सगळ्यात भव्य असा कार्यक्रम असेल

एकूण ७०,००० संघ कृषी समूह आहेत, आणि प्रत्येक गटात पाच सदस्य. प्रत्येक समूह भाडेपट्ट्यावर जमीन कसतो, जास्तीत जास्त जमिनी अडीच एकराहून कमी आहेत. कधी कधी तर फक्त एक एकर. बहुतेक जणी जैविक किंवा कमी लागत लागणारी शाश्वत शेती करतात. देशभरात शेतीचा बट्टयाबोळ होत असताना, या स्त्रियांनी मात्र त्यांची भाड्याच्या जमिनीवरची शेती नफ्यात चालवलीये आणि इतकंच नाही तर त्यामागे ‘अन्नाचा न्याय’ हे तत्त्व आहे – वरकड पीक बाजारात विकायचं पण गटातल्या सगळ्या कुटुंबांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच, हे ते तत्त्व.

त्यांचं यश आणि प्रभाविता अशी की इतर राज्यांच्या अगदी विरुद्ध चित्र इथे आहे, इथे बँका त्यांना गळ घालत असतात, त्या बँकेचे पाय धरत नाहीत. आम्ही आता आहोत त्या पट्टणमथिट्टा जिल्ह्यामध्ये त्यांचा कर्जाच्या परतफेडीचा दर ९८.५% आहे. काही गावांमध्ये स्थानिक बँकेत कुटुंबश्रीच सगळ्यात मोठा ठेवीदार आहे.

पण सध्या पुराने या संघ कृषी गटांचा विध्वंस केलाय – अख्ख्या राज्यात मिळून त्यांचं ४०० कोटीचं नुकसान झालंय. त्यातलं पिकांचं नुकसानच २०० कोटींच्या घरात आहे. जमिनीची सुपीकता कमी होणं, जमिनीत भराव घालण्याचा खर्च, उचल आणि तारण म्हणून ठेवलेल्या गोष्टींचं नुकसान याची मोजदाद वेगळीच. इतर खर्च जसजसे गणतीत येतील तसा नुकसानीचा आकडा वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.

PHOTO • P. Sainath

रानी अंगाडी पंचायत कार्यालयात भरलेल्या उत्साहपूर्ण बैठकीला आलेल्या विविध संघ कृषी गटाच्या कुटुंबश्री सदस्य

रानी तालुक्यातल्या नऊ पंचायत क्षेत्रातल्या ९२ एकरवर ७१ संघ कृषी समूह शेती करतायत आणि त्यांनी बँकांकडून ७२ लाखांचं कर्ज घेतलेलं आहे. “आता या पुरात सगळं गेलंय,” कुटुंबश्रीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या आणि सांघिक शेती करणाऱ्या ओमना राजन सांगतात. त्यांचा स्वतःच्या ‘मन्न’ (दैवी भेट) संघ कृषी समूहाने गेल्या साली केवळ केळीच्या पिकातून २ लाखाचा नफा कमवला होता. गेल्या वर्षी गटातल्या पाच सदस्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा नफा झालाय. “आम्हाला एकदम चांगला भाव मिळतो कारण आम्ही जैविक शेती करतो. पण यंदा मात्र चांगला भाव मिळण्याची संधी - ओणमचा काळ – गेली. हातचं सगळंच गेलंय. पण आम्ही नव्याने सगळं उभारू.”

आम्ही तो विध्वंस रानी अंगाडी गावात पाहत होतो. पंचायतीतल्या ७१ संघ कृषी समूहांमधल्या १० हून कमी समूहांनी विमा काढला आहे – भाडेपट्ट्यावरच्या जमिनींसाठी विमा मिळवणं फार मुश्किल आहे. एमएससी, अॅग्री असणारे दातन केरळच्या मृदा संधारण विभागात नोकरी करतात आणि एका तज्ज्ञाच्या नजरेने सगळ्या नुकसानीचा अभ्यास करतात. ते कामाचा भाग म्हणून कुटुंबश्रीसोबत करतात. एका मुंबईकराला धुळीपासून संरक्षण करण्याची गरज भासल्याबद्दल थट्टा करणाऱ्या बिन्सी बिजॉय कुटुंबश्रीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांची दृष्टी एका कृषी व्यावसायिकाची आहे.

तुम्ही कुठेही पहा, झालेलं नुकसान भयंकर आहे. पण केरळमधल्या या शतकात आलेल्या सगळ्यात भयंकर अशा ऑगस्टच्या पुरामध्ये त्यांचं जितकं जास्त नुकसान तितकं जास्त धैर्य आणि उमेद वाढत असल्याचं दिसून येतं. रानी अंगाडी पंचायत कचेरीतल्या आमच्या पहिल्या बैठकीत येतानाच त्या उत्साहात आणि हसत आत आल्या. पंचायत अध्यक्ष बाबू पुलट हसून म्हटले देखीलः “आपण एका गहिऱ्या संकटात असणं अपेक्षित आहे, ज्याबद्दल लिहिण्यासाठी हा माणूस इथे आला आहे,” त्यांनी त्यांना सांगितलं, “आणि इथे तुम्ही खुशाल खिदळताय. काय वाटेल त्यांना? आपण जरा तरी गंभीर व्हायला पाहिजे की नाही?” यानंतर तर हास्याचा आणखी एक फवारा उसळला. त्यातल्या बऱ्याच जणींना माझ्याशी हिंदीत बोलायचं होतं, खरं तर त्यांना आणि मला, दोघांनाही थोडं थोडं तमिळ बोलता येतं. पण मी मुंबईहून आलो होतो, त्यामुळे हिंदीतच बोलणार, झालं.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

पुराचं पाणी रानी अंगाडीतल्या या घराच्या जवळ जवळ छताला टेकलं होतं. उजवीकडेः केळी आणि आरारोटचं सगळं पीक धुऊन गेलं

एका एकरात केळी लावायला जवळ जवळ ३ लाखाचा खर्च येतो, बिजॉय सांगतात. “एका एकरात १००० केळी लागतात आणि प्रत्येकीची किंमत ३०० रुपये आहे. कीटकनाशकावर – जैविक कीटकनाशकावरही आम्हाला थोडाफार खर्च करावा लागतो. आणि मजुरीचा खर्चही खूप आहे.” पण एका एकरात त्यांना १०-१२ टनाचं उत्पादन मिळतं आणि त्या ६० रुपये किलोने केळी विकू शकतात. त्यामुळे त्यांना दीड ते दोन लाखांचा नफा होतो, आणि इथल्या अनेक गटांना गेल्या साली, तसा लाभ झाला आहे. “शिवाय, ओणमच्या काळात आम्हाला एकदम चढा भाव मिळतो, किलोमागे ८०-८५ रुपये,” संगमम संघ कृषीच्या शायनी जोसेफ सांगतात.

गेल्या साली संगममच्या सहा सदस्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा नफा झाला. “या वर्षी मात्र आमचं होतं नव्हतं, सगळंच गेलं. तीनही एकर भुईसपाट झालेत. आता या रानात जमा झालेला गाळ आणि चिखल साफ करायलाच एकरामागे १ लाख रुपये खर्च येईल,” जोसेफ सांगतात. “कालवेही साफ करायला लागणार आहेत. तीन महिन्यांचं काम आहे हे, पण आम्ही लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पाण्याचे सगळे स्रोत कोरडे पडायला लागलेत. आणि आता आमच्यापुढे दुष्काळाचं संकट उभं आहे.”

एकामागून एक शेतकरी स्त्रिया आम्हाला हेच पटवून देत होत्या की त्या सगळं नव्याने उभारतील – आणि तेही लवकरच. आणि असं काही नाहीये की त्यांना किती मोठी आपत्ती आहे त्याचा अंदाज नाहीये, पण त्यांच्या निर्धारापुढे झालेलं नुकसानही फिकं पडेल. “आमची एकीची ताकद आहे. आमच्या एकीतूनच आम्हाला बळ आणि धाडस मिळतं. कुटुंबश्री म्हणजे ही एकीच आहे.” गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या तोंडून पुन्हा पुन्हा हे विधान ऐकतोय. आणि आता केरळच्या पुरानंतरच्या या कोलाहलात या विधानाला त्या खरोखर जागतायत.

PHOTO • P. Sainath

या स्त्रिया आता गाळ साफ करण्याच्या कामाला लागल्यायत, पण शेतात मध्यभागी मात्र गाळ आता कडक होऊन बसलाय आणि तो काढणं अवघड झालंय

राज्यभरात, स्वतःचं जवळ जवळ सगळं गमावून बसलेल्या या संघ कृषी समूहाच्या महिला शेतकऱ्यांनी पदरमोड करून मुख्यमंत्री मदत निधीसाठी व्यापक स्तरावरच्या कुटुंबश्रीला सात कोटींची निधी गोळा करण्यात मदत केली.
११ सप्टेंबरला लक्षात राहील अशी अजून एक महत्त्वाची घटना घडली. याच दिवशी, नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने (NRLM – National Rural Livelihoods Mission) कुटुंबश्रीचा ‘शेती आधारित उपजीविका क्षेत्रात उत्कृष्ट कार्य’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. अभियानाने पहिल्यांदाच असा पुरस्कार दिला आहे हे विशेष.

कुटुंबश्री हा स्त्रियांसाठी न्यायाचा आणि गरिबी निर्मूलनाचा जगातला कदाचित सर्वात भव्य कार्यक्रम असेल. १९९८ साली शासनाचा उपक्रम म्हणून सुरू झालेल्या या कार्यक्रमामध्ये आजपावेतो स्त्रियांनी एकत्र येऊन जे स्वातंत्र्य आणि स्वायतत्ता निर्माण केली आहे ती त्यांच्यासाठी फार मोलाची आहे. त्यांचं धाडस आणि स्वातंत्र्य कितीही वाखाणलं तरी आज मात्र त्यांना बँका आणि इतर संस्थांकडून मदतीची गरज आहे – आणि हवी आहे आपल्या सर्वांची साथ. अख्ख्या देशात गरीब स्त्रियांच्या नेतृत्वातला शेतीचा अशा प्रकारचा दुसरा कोणताच कार्यक्रम सापडणार नाही. त्याचा आवाका, व्याप्ती आणि उपलब्धी या सगळ्याच बाबतीत.

आम्ही इतर काही संघ कृषी समूहांना भेटायला निघालो, तसं एक ताई आली आणि म्हणालीः “आम्ही परत वर येऊ. आता आम्हाला मोठा फटका बसलाय, पण आम्ही परत उभारी घेऊ. एका महिन्याच्या आतच आम्ही जमिनी कसायला सुरुवात करू, बघालच तुम्ही.”


अनुवादः मेधा काळे

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale