गाठ कडक झाली होती, “हड्डी की तरह,” प्रीती यादव सांगते.

२०२० साली जुलै महिन्यात प्रीतीला उजव्या स्तनामध्ये मटाराच्या आकाराची काही तरी वाढ झाल्याचं जाणवलं. त्याला वर्ष झालं. पटण्यामधल्या कर्करोग रुग्णालयातल्या कर्करोगतज्ज्ञांनी बायोप्सी करून ही वाढ काढून टाकावी लागेल असा सल्ला दिला होता त्यालाही आता वर्ष उलटेल.

पण प्रीती काही परत हॉस्पिटलमध्ये गेलेली नाही.

“करवा लेंगें,” ती म्हणते. प्रीतीचं घरं चांगलं प्रशस्त, मोठं अंगण, फुलांची झाडं. घराच्या ओसरीत प्लास्टिकच्या विटकरी रंगाच्या खुर्चीवर प्रीती बसली होती.

ती हलक्या आवाजात बोलते. तिचे शब्द थकून आल्यासारखे भासतात. गेल्या काही वर्षांत तिच्या कुटुंबातल्या किमान चार व्यक्ती कॅन्सरने मरण पावल्या आहेत. बिहारच्या सरन जिल्ह्यातल्या तिच्या सोनेपूर गावात मार्च २०२० मध्ये कोविडची महासाथ पसरण्याआधी काही वर्षांपासून कॅन्सरचे अनेक रुग्ण आढळले आहेत. (तिच्या विनंतीवरून तिच्या गावाचं आणि तिचं नाव बदलण्यात आलं आहे.)

शस्त्रक्रिया करून गाठ कधी काढून टाकायची हा काही २४ वर्षीय प्रीतीचा एकटीचा निर्णय नाही. तिच्या घरचे तिच्या लग्नाचं पाहतायत, सैन्यदलात नोकरी असणारा शेजारच्या गावातला एक मुलगा पसंतही केला आहे. “मी लग्नानंतर सुद्धा ऑपरेशन करून घेऊ शकते ना? डॉक्टर म्हणाले की कधी कधी मूल झाल्यावर अशा गाठी आपोआप विरघळून जातात,” ती म्हणते.

पण जर लग्न ठरलं तर नवऱ्या मुलाकडच्यांना या गाठीबद्दल तसंच ही गाठ ऑपरेशन करून काढून टाकावी लागू शकते हे सांगणार का? किंवा तिच्या कुटुंबातल्या अनेकांना कॅन्सर झाल्याची माहिती देणार का नाही? “वही तो समझ नही आ रहा,” ती म्हणते. या गुंत्यापायी ऑपरेशनचा निर्णय होत नाहीये.

Preeti Kumari: it’s been over a year since she discovered the growth in her breast, but she has not returned to the hospital
PHOTO • Kavitha Iyer

प्रीती कुमारीः स्तनात गाठीसारखी वाढ आढळून आली त्याला वर्ष होऊन गेलंय मात्र त्यानंतर पुन्हा ती हॉस्पिटलमध्ये गेलेली नाही

२०१९ साली प्रीतीने भूगर्भशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. ही गाठ आढळल्यानंतर एक वर्षभरात तिच्या एकटेपणात भरच पडली आहे. २०१६ साली तिच्या वडलांचं निधन झालं. त्यांना अगदी शेवटच्या टप्प्यातला मूत्राशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. थोडेच महिने उलटले होते. त्या आधीच्या जानेवारी महिन्यात तिची आई हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावली. २०१३ पासून हृदयरोगावर उपचार करणाऱ्या अनेक हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार घेतले होते. ते दोघंही पन्नाशीचे होते. “मी एकटीच राहिले,” प्रीती म्हणते. “माझी आई असती तर तिला माझा त्रास समजला असता.”

प्रीतीची आई वारली त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांना समजलं की त्यांच्या कुटुंबातल्या कॅन्सरचा संबंध घरच्या पाण्याशी, त्याच्या गुणवत्तेशी आहे. दिल्लीच्या एम्समध्ये (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान) त्यांना ही माहिती मिळाली. “डॉक्टरांनी आईला तिला काही मानसिक ताणतणाव आहेत का ते विचारलं होतं. आमच्या कुटुंबात अनेक जण मरण पावल्याचं आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी आम्ही कुठलं पाणी पितो त्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. गेल्या काही वर्षांपासून आमच्या हातपंपातलं पाणी भरून ठेवलं की अर्ध्या तासानंत पिवळं पडतंय,” प्रीती सांगते.

भारतातल्या सात राज्यांमध्ये (बिहार, आसाम, छत्तीसगड, झारखंड, मणीपूर, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल) भूजलामध्ये आर्सेनिकचं प्रमाण धोकादायक असल्याचं आढळलं आहे. आणि यातही बिहारमध्ये हे प्रमाण सर्वात धोकादायक आहे. राज्य शासन आणि कृती दलाच्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या केंद्रीय भूजल संस्थेच्या २०१० सालातील दोन अहवालांमध्ये बिहारच्या १८ जिल्ह्यातल्या ५७ गावांमध्ये भूजलामध्ये अर्सेनिकचं प्रमाण लिटरमागे ०.०५ मिलिग्राम इतकं आढळून आलं आहे. यामध्ये प्रीती राहते तो सरन जिल्हाही समाविष्ट आहे. लिटरमागे ०.०१ मिलिग्राम किंवा १० मायक्रोग्राम ही अर्सेनिकची सुरक्षित पातळी समजली जाते.

*****

प्रीती २ किंवा ३ वर्षांची असताना तिची मोठी बहीण वारली. “तिला पोटात प्रचंड दुखत असायचं. बाबा तिला किती तरी दवाखान्यांमध्ये घेऊन गेले. पण तिला वाचवू शकले नाहीत,” ती सांगते. तेव्हापासून तिची आई कायमच प्रचंड तणावाखाली असायची.

त्यानंतर २००९ साली तिचे धाकटे चुलते आणि २०१२ साली धाकटी चुलती वारली. हे सगळे जण एकाच छताखाली रहायचे. त्या दोघांनाही रक्ताचा कर्करोग झाला होता आणि दोघंही उपचारासाठी दवाखान्यात फार उशीरा पोचल्याचं डॉक्टर म्हणाले होते.

२०१३ साली त्याच चुलत्यांचा मुलगा, प्रीतीचा चुलत भाऊ वयाच्या ३६ व्या वर्षी वारला. शेजारच्या वैशाली जिल्ह्यातल्या हाजीपूरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यालाही रक्ताचा कर्करोग होता.

कित्येक वर्षं ही अशी दुखणी आणि मृत्यूंनी हे कुटुंब गांजून गेलं होतं. त्यामुळे प्रीतीनेच घरची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. “दहावीत असल्यापासून मीच किती तरी काळ घरचं सगळं बघत होते कारण आधी आई आणि त्यानंतर बाबा आजारीच असायचे. एक काळ तर असा होता की दर वर्षी कुणी जात तरी होतं. किंवा गंभीर आजारी तरी असायचं.”

Coping with cancer in Bihar's Saran district
PHOTO • Kavitha Iyer

बिहारच्या सरन जिल्ह्यात कॅन्सरशी मुकाबला

पण जर लग्न ठरलं तर नवऱ्या मुलाकडच्यांना या गाठीबद्दल तसंच ही गाठ ऑपरेशन करून काढून टाकावी लागू शकते हे सांगणार का? किंवा तिच्या कुटुंबातल्या अनेकांना कॅन्सर झाल्याची माहिती देणार का नाही? “वही तो समझ नही आ रहा,” ती म्हणते. या गुंत्यापायी ऑपरेशनचा निर्णय होत नाहीये

प्रीतीचं घर म्हणजे जमीनदारांचं संयुक्त कुटुंब आहे. एवढ्या सगळ्यांचं स्वयंपाक पाणी पहायचं म्हटल्यावर तिचा अभ्यास तसा मागेच पडत गेला. तिच्या दोघा भावांपैकी एकाचं लग्न झालं. त्याची बायको आल्यानंतर स्वयंपाक, साफसफाई आणि आजारी माणसाची काळजी घेण्याचं काम असा ताण थोडा हलका झाला. या सगळ्यात भर म्हणजे नात्यातल्या एका भावाच्या बायकोला विषारी साप चावला आणि तिचा जीव जाता जाता राहिला. त्यानंतर २०१९ मध्ये प्रीतीच्या एका भावाला शेतात अपघात होऊन डोळ्याला गंभीर दुखापत झाली. एक दोन महिने त्याची नियमित काळजी घ्यावी लागत होती.

तिचे आई-वडील वारले त्यानंतर प्रीती एकदम हताश झाली होती. “मायूसी थी... बहुत टेन्शन था तब.” त्या ताणातून ती जरा कुठे बाहेर येत होती तेव्हाच तिच्या स्तनात गाठ सापडली.

गावातले सगळेच आणि प्रीतीच्या घरचे देखील पिण्यासाठी हापशाचं म्हणजेच हातपंपाचं पाणी वापरायचे. पण ते गाळून किंवा उकळून घेण्याची पद्धत नव्हती. अंदाजे वीस वर्षांपूर्वी घेतलेल्या सुमारे १२०-१२५ फूट खोल बोअरवेलचं पाणी सगळ्या गरजांसाठी वापरलं जात होतं – धुणी, अंघोळ, पिण्यासाठी आणि स्वयंपाकात. “बाबा गेले तेव्हापासून आम्ही प्यायला आणि स्वयंपाकासाठी आरओ फिल्टरचं पाणी वापरायला लागलोय,” प्रीती सांगते. तोपर्यंत भूजलामध्ये अर्सेनिकचं प्रमाण धोकादायक झाल्याबद्दलचे अनेक अभ्यास बाहेर यायला लागले होते त्यामुळे या जिल्ह्यातले बरेच अशा जल प्रदूषणाचे धोके काय काय असू शकतात याबद्दल जागरुक व्हायला लागले होते. आरओ तंत्रज्ञानावर आधारित जलशुद्धीकरण यंत्रणा जर नियमित देखभाल दुरुस्ती करून वापरात असल्या तर पिण्याच्या पाण्यातून अर्सेनिक काढून टाकण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होतात.

जागतिक आरोग्य संघटना पार १९५८ पासून अर्सेनिकमिश्रित पाणी प्यायल्यास शरीराला काय धोके आहेत त्याबद्दल सांगत आली आहे. अशा प्रदूषित पाण्याचं दीर्घकाल सेवन केलं तर अर्सेनिकची विषबाधा किंवा अर्सेनिकोसिस हा आजार होऊ शकतो, त्वचा, मूत्राशय, मूत्रपिंड किंवा फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्वचेचा रंग जाणे, तळव्यावर आणि टाचेवर त्वचेचा काही भाग कडक होणे, घट्टे पडणे असाही त्रास यातून उद्भवू शकतो. जागतिक आरोग्य संघटना असंही नमूद करते की अर्सेनिक मिश्रित पाण्याचं सेवन आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि प्रजननासंबंधी विकारांचाही संबंध असू शकतो, तसे पुरावे आहेत.

२०१७ ते २०१९ दरम्यान पटणा येथील महावीर कॅन्सर संस्थान अँड रीसर्च या खाजगी धर्मादाय संस्थेने आपल्या बाह्योपचार विभागातील २,००० कर्करुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. या रुग्णांच्या रक्तात अर्सेनिकची पातळी जास्त असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या विदेच्या आधारे भौगोलिक नकाशांमधून रक्तातील अर्सेनिकची पातळी, कर्करोगाचा प्रकार आणि लोकसंख्याविषयक माहितीचा परस्परसंबंध तपासण्यात आला.

“रक्तात अर्सेनिकची पातळी जास्त असणारे बहुतेक कर्करुग्ण गंगेच्या किनाऱ्यावरील जिल्ह्यांमधले [यात सरनचाही समावेश आहे] होते. त्यांच्या रक्तातलं अर्सेनिकचं जास्त प्रमाण हेच दाखवतं की याचा कर्करोगाशी, खास करून कार्सिनोमाशी जवळचा संबंध आहे,” डॉ. अरुण कुमार सांगतात. या संशोधनासंबंधी त्यांनी इतर तज्ज्ञांसोबत अनेक शोधनिबंध लिहिले असून ते महावीर संस्थानमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

'Even if I leave for a few days, people will know, it’s a small village. If I go away to Patna for surgery, even for a few days, everybody is going to find out'

‘मी थोडे दिवस जरी गावाला गेले तर लोकांना कळेल. हे छोटं गाव आहे. मी जर ऑपरेशनसाठी अगदी थोडे दिवस जरी पटण्याला गेले तरी सगळ्यांना समजेल’

“२०१९ साली आमच्या संस्थेत १५,००० कर्करुग्णांची नोंद झाली,” जानेवारी २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात म्हटलं आहे. “आजारासंबंधीच्या माहितीवरून हे दिसून आलं की बहतेक कर्करुग्ण गंगा नदीच्या आसपासच्या गावांमधले किंवा शहरांमधले होते. कॅन्सरचं सर्वात जास्त प्रमाण बक्सर, भोजपूर, सरन, पटणा, वैशाली, समस्तीपूर, मुंगेर, बेगुसराई आणि भागलपूर या जिल्ह्यांमध्ये दिसून येतं.”

सरन जिल्ह्यातल्या प्रीतीच्या गावात आणि तिच्या कुटुंबात अनेक पुरुष आणि स्त्रिया या आजाराला बळी पडले आहेत. पण खास करून तरुण मुली आणि स्त्रियांना कॅन्सर तज्ज्ञांकडे जाणं अधिक जिकिरीचं आहे. या आजाराकडे समाज आजही कलंक म्हणून पाहतो, आणि तरुण स्त्रियांसाठी हे जास्तच जाचक आहे. प्रीतीचा एक भाऊ म्हणतो, “गावातले लोक बोलतात... त्यामुळे आम्हाला काळजी घ्यायला लागते.”

“मी थोडे दिवस जरी गावाला गेले तर लोकांना कळेल. हे छोटं गाव आहे. मी जर ऑपरेशनसाठी अगदी थोडे दिवस जरी पटण्याला गेले तरी सगळ्यांना समजेल,” प्रीती म्हणते. “आता वाटतंय पाण्यात कॅन्सर आहे हे आधीच माहिती व्हायला पाहिजे होतं.”

आपला नवरा प्रेमळ असेल असं तिला मनापासून वाटतं – पण त्या सुखाच्या आड ही गाठ तर येणार नाही ना याची चिंताही तिला ग्रासून टाकते.

*****

“ती आपल्या बाळाला अंगावर पाजू शकेल का?”

पटणा हॉस्पिटलमध्ये काही खाटा पलिकडे असलेल्या विशीतल्या एका तरुण स्त्रीकडे पाहताना रामुनी यादवांच्या मनात हाच प्रश्न कायम येत होता. त्या स्त्रीचं सहाच महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. २०१५ चा उन्हाळा होता. “माझ्या छातीचं ऑपरेशन होणारे, पण माझं वय तर होऊन गेलंय. माझी चारही मुलं तरणीताठी झाल्यावर मला स्तनाचा कॅन्सर झाला. पण या तरुण मुलींचं कसं?” ५८ वर्षीय रामुनी यादव विचारतात.

बक्सरमधल्या सिमरी तालुक्यात बडका राजपूर गावामध्ये रामुनींच्या कुटुंबाची ५० बिघा (सुमारे १७ एकर) जमीन आहे. प्रीतीच्या गावाहून हे गाव १४० किलोमीटरवर आहे. कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर सहा वर्षांनी रामुनी यादव आता राजपूर कालन पंचायतीच्या मुखियाच्या पदासाठी निवडणुकीला उभं राहण्याच्या विचारात आहेत. त्यांचं गाव याच पंचायतीत येतं. कोविडमुळे विलंब झाल्यामुळे या वर्षी तरी निवडणुका होणार का असी शंका आहे.

Ramuni Devi Yadav: 'When a mother gets cancer, every single thing [at home] is affected, nor just the mother’s health'
PHOTO • Kavitha Iyer

रामुनी देवी यादवः ‘जेव्हा घरातल्या आईला कॅन्सर होतो ना, तेव्हा फक्त तिच्या तब्येतीवर नाही तर [घरातल्या] सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो’

रामुनी फक्त भोजपुरी बोलतात पण त्यांची मुलं आणि पती उमाशंकर यादव तत्परतेनं हिंदीत त्यांचं म्हणणं सांगतात. बडका राजपूरमध्ये कॅन्सरचे किती तरी रुग्ण आहेत, उमाशंकर सांगतात. केंद्रीय भूजल आयोगाच्या अहवालात ज्या १८ जिल्ह्यांमधल्या ५७ तालुक्यात भूजलात अर्सेनिकचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं त्यात बक्सरचाही समावेश आहे.

त्यांच्या शेतात आम्ही फेरपटका मारत होतो. एक छोटा ट्रक भरून फणस आणि काही पोती भरून मालदा आंबा नुकताच उतरवला होता. रामुनी सांगतात की त्यांचा आजार किती गंभीर आहे हे त्यांच्या घरच्यांनी त्यांना समजू दिलं नव्हतं. शेवटच्या ऑपरेशननंतर आणि रेडिएशनचा उपचार सुरू झाल्यानंतर त्यांना ते कळालं.

“सुरुवातीला आम्हाला काय झालंय तेच कळलं नाही आणि आमच्या अज्ञानामुळे खूप त्रास झाला,” त्या सांगतात. वाराणसीमध्ये त्यांचं पहिलं ऑपरेशन झालं पण ते व्यवस्थित झालं नाही त्याबद्दल त्या सांगतात. यादव कुटुंबियांचे नातेवाईक तिथे राहतात. गाठ काढली पण ती परत वाढली आणि प्रचंड वेदना व्हायला लागल्या. २०१४ साली ते पुन्हा एका वाराणसीच्या त्याच दवाखान्यात गेले आणि गाठ काढण्यासाठी परत एकदा तेच ऑपरेशन करण्यात आलं.

“पण जेव्हा जखमेची मलमपट्टी करण्यासाठी आम्ही आमच्या गावातल्या डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी पाहून सांगितलं की जखम धोकादायक दिसतीये,” उमाशंकर सांगतात. त्यानंतर आणखी दोन हॉस्पिटलला ते जाऊन आले. अखेर २०१५ च्या मध्यावर त्यांना कुणी तरी पटण्याच्या महावीर कॅन्सर संस्थानला जायला सांगितलं.

हॉस्पिटलच्या चकरा आणि सारखं गावाला जावं लागत असल्यामुळे त्यांचं आयुष्य एकदम विस्कळीत होऊन गेलं होतं, रामुनी सांगतात. “घरातल्या आईला जेव्हा कॅन्सर होतो ना तेव्हा फक्त तिच्या तब्येतीवर नाही [घरातल्या] सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो,” त्या म्हणतात. “तेव्हा फक्त थोरल्याचं लग्न होऊन सून घरी आली होती. बाकीच्यांची लग्नं नंतर झाली. हे सगळं सांभाळणं तिच्यासाठी फार मुश्किलीचं होतं.”

त्यांच्या मुलांनाही अधून मधून त्वचेच्या आजारांचा त्रास सहन करावा लागला आहे. आता कुठे त्याचा दोष ते हापशाच्या गढूळ पाण्याला देतात. या हापशाखालची बोअरवेल १००-१५० फूट खोल आणि २५ वर्षं जुनी आहे. रामुनींची ऑपरेशनं, केमोथेरपी आणि रेडिएशन सुरू होतं तेव्हा घरी नुसता गोंधळ असायचा. एक जण बक्सरमधल्या घरी येऊन जाऊन असायचा. तो सीमा सुरक्षा दलात तैनात होता. दुसऱ्या मुलगा शेजारच्या गावात शिक्षकाची नोकरी करत असल्याने संपूर्ण दिवस कामात असायचा. शिवाय शेतातलं पहावं लागायचंच.

“माझं शेवटचं ऑपरेशन झालं तेव्हा मी अगदी नवीन लग्न झालेल्या एकीला तिथे पाहिलं. मी तिच्यापाशी गेले, माझा वण दाखवला आणि तिला सांगितलं की काळजीचं कारण नाही. तिला देखील स्तनाचा कॅन्सर होता. त्यांचं लग्न होऊन काही महिनेच झाले होते पण तिचा नवरा तिची इतकी छान काळजी घेत होता, ते पाहूनच मला बरं वाटलं. डॉक्टरांनी नंतर मला सांगितलं की ती बाळाला अंगावर पाजू शकेल. ते ऐकल्यावर मी इतकी खूश झाले, सांगू,” रामुनी सांगतात.

Ramuni Devi and Umashankar Yadav at the filtration plant on their farmland; shops selling RO-purified water have also sprung up
PHOTO • Kavitha Iyer

रामुनी देवी आणि उमाशंकर यादव त्यांच्या शेतातल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ, आरओ तंत्रज्ञानाने शुद्ध केलेलं पाणी विकणारी अनेक दुकानं इथे सुरू झाली आहेत

त्यांचा मुलगा शिवजीत सांगतो की बडका राजपूरमध्ये भूजल मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालं आहे. “आमच्या स्वतःच्या आईला इतका गंभीर आजार होईपर्यंत आम्हाला आरोग्याचा आणि पाण्याचा संबंध लक्षात आला नव्हता. इथल्या पाण्याचा रंग नाही, काही तरी विचित्र आहे. २००७ पर्यंत पाणी ठीक होतं, पण त्यानंतर पाणी पिवळसर व्हायला लागलंय. सध्या आम्ही भूजलाचा वापर फक्त धुणी आणि अंघोळीसाठी करतोय,” तो सांगतो.

काही संस्थांनी एक जल शुद्धीकरण प्रकल्प त्यांना दिला आहे त्याचंच पाणी ते स्वयंपाक आणि पिण्यासाठी वापरतायत. या प्रकल्पातील पाणी सुमारे २५० कुटुंब वापरतायत. २०२० साली सप्टेंबर महिन्यात यादव यांच्या जमिनीत प्रकल्प बसवण्यात आला. मात्र पाण्याचं प्रदूषण होत असल्याचे दाखले मात्र १९९९ पासून नोंदवले गेले आहेत.

हा शुद्धीकरण प्रकल्प देखील फारसा यशस्वी झालेला नाही. लोक म्हणतात की उन्हाळ्यात यातलं पाणी तापतं. शिवजीत सांगतो की आरओ ने शुद्ध केलेल्या पाण्याचे २० लिटरचे कॅन २०-३० रुपयाला विकणारी अनेक दुकानं इथे सुरू झाली आहेत. पण ते पाणी खरंच अर्सेनिक मुक्त आहे का याबद्दल कुणीच खात्रीने काही सांगू शकत नाही.

अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की उत्तर आणि पूर्वेकडच्या अर्सेनिकचं प्रमाण जास्त असणाऱ्या नदीखोऱ्यांचे प्रदेश हे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांच्या मार्गालगत आहेत. गंगेच्या खोऱ्यातल्या या विषारी जलप्रदूषणाचे स्रोत भूगर्भात आहेत. उथळ जलधरांमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया होऊन अर्सेनोपायराइट्ससारख्या निर्धोक खनिजांपासून अर्सेनिक निर्माण होतं. या अभ्यासांमध्ये असं म्हटलं आहे की भूजलाचा प्रचंड उपसा होत असल्याने जमिनीखालची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे अर्सेनिक प्रदूषण. ते इतरही काही कारणांकडे निर्देश करतातः

“पाण्यात साचलेल्या अर्सेनिकचे इतरही काही स्रोत असू शकतात. यामध्ये राजमहल खोऱ्यात आढळणाऱ्या गोंडवाना कोळसा पट्ट्याचा समावेश आहे. या भागात २०० पीपीएम इतक्या प्रमाणात अर्सेनिक सापडतं. हिमालयात दार्जिलिंगच्या काही विखुरलेल्या सल्फाइड सड्यांवर ०.८ टक्क्यांपर्यंत आणि गंगा नदीच्या वरच्या भागातही अर्सेनिकचे स्रोत आहेत,” एस. के. अचार्य आणि इतरांनी नेचर या वार्तापत्रात १९९९ साली लिहिलेला शोधनिबंध सांगतो. आचार्च पूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेचे महासंचालक होते.

या अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की एक तर अगदी कमी खोलीच्या किंवा भरपूर खोल असणाऱ्या विहिरींच्या पाण्यात अर्सेनिकचं प्रमाण कमी असतं. ज्या विहिरींच्या पाण्यात अर्सेनिक जास्त आढळतं त्या सगळ्या ८० ते २०० फूट खोल विहिरी आहेत. ही संस्था आजही एका व्यापक अभ्यासासाठी अनेक गावांमधून पाण्याचे नमुने गोळा करत आहे. त्या गावातल्या लोकांचा अनुभवही असाच असल्याचं डॉ. कुमार सांगतात – पावसाच्या पाण्यात आणि कमी खोलीच्या विहिरींमध्ये अर्सेनिकचं प्रमाण कमी किंवा नाहीच. पण उन्हाळ्याच्या महिन्यात अनेक घरांमध्ये बोअरचं पाणी मात्र रंगहीन असतं.

*****

Kiran Devi, who lost her husband in 2016, has hardened and discoloured spots on her palms, a sign of arsenic poisoning. 'I know it’s the water...' she says
PHOTO • Kavitha Iyer
Kiran Devi, who lost her husband in 2016, has hardened and discoloured spots on her palms, a sign of arsenic poisoning. 'I know it’s the water...' she says
PHOTO • Kavitha Iyer

किरण देवींचे पती २०१६ साली वारले. त्यांच्या हातावर कडक घट्टे पडले आहेत, अर्सेनिक विषबाधेची ही खूण आहे. ‘हे पाण्यामुळेच झालंय...’ त्या सांगतात

बडका राजपूरहून चार किलोमीटरवर बक्सर जिल्ह्यातलं तिलक राय का हट्टा हे ३४० उंबऱ्याचं गाव लागतं. इथली बहुतेक कुटुंबं भूमीहीन आहेत. इथल्या काही घरांबाहेरच्या हापशाला फारच गढूळ पाणी येतं.

२०१३-१४ साली महावीर कॅन्सर संस्थानने या गावात एक अभ्यास केला. या अभ्यासाचे अग्रणी संशोधक डॉ. कुमार सांगतात की भूजलामध्ये अर्सेनिकचं प्रमाण फार जास्त आढळलं, त्यातही तिलक राय का हट्टाच्या पश्चिमेकडच्या भागात जास्तच. अर्सेनिकोसिसची नेहमीची लक्षणं गावात “मोठ्या प्रमाणावर आढळून येत होती.” २८ टक्के लोकांना हायपरकेराटॉसिस तळव्याला आणि टाचांना म्हणजे भेगा गेल्या होत्या, ३१ टक्के लोकांना त्वचेवर मेलनॉसिस म्हणजे डाग पडले होते, ५७ टक्के लोकांना यकृताशी संबंधित आजार होते, ८६ टक्के लोकांना जठराला सूज होती आणि ९ टक्के स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येत होती.

किरण देवींचे पती या गावापासून जरा दूर बिच्छू का डेरा या वस्तीत राहायचे. इथल्या सगळ्यांची घरं माती आणि विटांची आहेत. “ते २०१६ साली वारले. त्यांना अनेक महिने पोटदुखीचा त्रास होता,” त्या सांगतात. घरच्यांनी त्यांना सिमरी आणि बक्सरमधल्या डॉक्टरांकडे नेलं मात्र निदान वेगवेगळंच यायचं. “आधी म्हणाले क्षयरोग आहेय किंवा यकृताचा कॅन्सर,” पन्नाशीच्या किरण सांगतात. त्यांच्या मालकीची थोडी जमीन आहे पण घर चालायचं ते त्यांच्या पतीच्या रोजंदारीवर.

२०१८ पासून किरण देवींच्या तळव्यावर रंग उडालेले घट्टे पडले आहेत. ही अर्सेनिक विषबाधेची खूण आहे. “हे पाण्यामुळेच होतंय मला माहितीये, पण माझा स्वतःचा हापसा वापरायचा नाही तर मी पाणी कुठून भरणार?” त्यांचा हापसा घराबाहेरच्या गोठ्यापाशीच आहे. तिथे एक बैल एकटाच निवांत रवंथ करत बसलेला आहे.

पाऊस नसतो तेव्हा (नोव्हेंबर ते मे) पाणी फारच खराब येत असल्याचं त्या सांगतात. पाणीदार चहा सारखं. “इथे पोटभर अन्नाची भ्रांत आहे. तपासायला पटण्याला कुठून जाणार?” त्या विचारतात. त्यांच्या तळव्यांना भयंकर खाज सुटते. कपड्याचा साबण किंवा गोठ्यातली शेणघाण काढली का हाताची जळजळ होते.

“पाण्याचं आणि बायांचं सारखंच आहे,” रामुनी म्हणतात, “दोन्हींभोवती घर फिरतं. त्यामुळे पाणी बिघडलं तर बाईवर पण त्याचा वाईट परिणाम व्हायचाच.” त्यात कॅन्सर या आजाराला असलेल्या कलंकामुळे लोक, विशेषतः बाया अगदीच सहन होईनासं झाल्यावर उपचारासाठी जातात.

रामुनींना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर गावातल्या अंगणवाडीने पाण्याच्या गुणवत्तेबाबत जाणीवजागृती कार्यक्रम घेतल्याचं त्या सांगतात. मुखिया म्हणून निवडून आल्यास असे आणखी कार्यक्रम घेण्याचा त्यांचा मानस आहे. “सगळ्यांनाच काही आरओ पाणी विकत घेणं परवडणारं नाहीये,” त्या म्हणतात. “आणि सगळ्याच बायासुद्धा सहज हॉस्पिटलला जाऊ शकत नाहीत. या चक्रातून बाहेर पडण्याचे आणखी काही मार्ग आहेत का त्याचा शोध आम्ही घेतच राहू.”

पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

Kavitha Iyer

Kavitha Iyer has been a journalist for 20 years. She is the author of ‘Landscapes Of Loss: The Story Of An Indian Drought’ (HarperCollins, 2021).

Other stories by Kavitha Iyer
Illustration : Priyanka Borar

Priyanka Borar is a new media artist experimenting with technology to discover new forms of meaning and expression. She likes to design experiences for learning and play. As much as she enjoys juggling with interactive media she feels at home with the traditional pen and paper.

Other stories by Priyanka Borar
Editor and Series Editor : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale