त्‍यांना अंधाराची भीती वाटत नाही. थोड्या थोड्या वेळाने रेल्‍वेगाड्या जातात, त्‍यांचंही काही वाटत नाही. त्‍यांना सतत भीती वाटते ती एकच, कोणी पुरुष आपल्‍याला पाहातायत...

‘‘रात्रीच्‍या वेळी एकच शौचालय उपलब्‍ध असतं, रेल्‍वेची पटरी,’’ सतरा वर्षांची नीतू कुमारी सांगते.

दक्षिण मध्य पाटणामधल्‍या यारपूर भागात वॉर्ड नंबर ९ झोपडपट्टीत नीतू राहाते. वस्‍तीच्‍या मध्यभागी सिमेंटचा एक चौकोन आहे. तिथे रांगेने नळ लावलेले आहेत. फक्‍त चड्डीवर असलेले दोन पुरुष तिथे साबणाने खसाखसा आपलं अंग घासत अंघोळ करत असतात. जवळजवळ डझनभर मुलं पाण्‍यात खेळत असतात. एकमेकांच्‍या अंगावर पाणी उडवत असतात, निसरड्या जमिनीवरून एकमेकांना खेचत असतात, कोणी पडलं की खिदळत असतात.

तिथून साधारण पन्‍नास मीटरवर दहा शौचालयांची एक रांग आहे. या वस्‍तीतली एकमेव. या सगळ्याच्‍या सगळ्या शौचालयांना मोठ्ठं टाळं लावलं आहे आणि त्‍यामुळे ती वापरातच नाहीत. कारण...? कोरोनामुळे त्‍यांचं ‘लोकार्पण’ करायला उशीर झालेला आहे. सध्या त्‍यांच्‍या पायर्‍यांवर बकर्‍यांचं एक कुटुंब विश्रांती घेतं आहे. मागे रेल्‍वेची पटरी आहे, तिच्‍यावर कचर्‍याचे ढीग पडले आहेत. चालू स्‍थितीतलं एक शौचालय आहे या वस्‍तीपासून चालत दहा मिनिटांच्‍या अंतरावर. रेल्‍वे पटरी पार करून वस्‍तीतले काही जण यारपूरच्‍या दुसर्‍या टोकाला जातात, पण तिथेही पोचायला दहा मिनिटं लागतातच.

‘‘मुलांना काय, कधीही कुठेही करता येतं. मुली मात्र फक्‍त रात्री रेल्‍वे पटरीवर जातात,’’ नीतू सांगते. ती बीएच्‍या पहिल्‍या वर्षाला आहे. (सर्व नावं बदलली आहेत.) तिच्‍या वस्‍तीतल्‍या इतर मुलींपेक्षा नीतू स्‍वतःला ‘लकी’ समजते. कारण तिला दिवसा दोनशे मीटरवर राहाणार्‍या तिच्‍या आत्‍याच्‍या घरातलं स्‍वच्‍छतागृह वापरता येतं.

‘‘आमचं घर दोन खोल्‍यांचं आहे. एका खोलीत माझा धाकटा भाऊ झोपतो, दुसर्‍या खोलीत आई आणि मी. त्‍यामुळे निदान घरात मला पॅड बदलायला खाजगी जागा मिळू शकते,’’ नीतू म्हणते. ‘‘अनेक मुली आणि बायका संपूर्ण दिवस थांबतात आणि रात्री रेल्‍वे पटरीवर सगळ्यात काळोखी जागा शोधून तिथे पॅड बदलतात.’’

A public toilet block – the only one in this colony – stands unused, its handover to the community delayed by the pandemic
PHOTO • Kavitha Iyer

या वस्‍तीतली एकमेव, सार्वजनिक शौचालयांची रांग. कुलुपबंद, वापरात नसलेली. कोरोनामुळे तिच्‍या ‘लोकार्पणा’ला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही!

नीतू राहाते ती वॉर्ड नंबर ९ ही छोटी झोपडपट्टी आणि यारपूर आंबेडकर नगरची मोठी झोपडपट्टी, या दोन्‍ही वस्‍त्‍यांमध्ये मिळून जवळपास दोन हजार कुटुंबं राहात असल्‍याचं इथले रहिवासी सांगतात. बहुतेक जण मजुरी करणारे. नीतूसारखे, इथे राहणार्‍या दुसर्‍या पिढीतले. बिहारच्‍या वेगवेगळ्या भागातून रोजगार मिळवण्‍यासाठी कित्‍येक वर्षांपूर्वी शहरात आलेली ही कुटुंबं.

यारपूर आंबेडकर नगरमधल्‍या स्‍त्रिया माझ्‍याशी बोलण्‍यासाठी एका मंदिराच्‍या आवारात जमल्‍या होत्‍या. त्‍या बरीच वर्षं सॅनिटरी नॅपकीन्‍स वापरत होत्‍या; पण कोरोनामुळे बर्‍याच घरातले रोजगार गेले आहेत, आर्थिक ओढाताण होते आहे. त्‍यामुळे काही जणींनी आता घरगुती कापडाचे पॅड्‌स वापरायला सुरुवात केली आहे. त्‍यांच्‍या वस्‍तीत स्‍वच्‍छतागृहं आहेत, त्‍या जातातही तिथे. पण त्‍यांची देखभाल-दुरुस्‍ती होत नाही आणि त्‍यामुळे ती भयंकर स्‍थितीत आहेत. रात्री पुरेसे दिवेही नसतात. स्‍वच्‍छतागृहं चोवीस तास उघडी असतात, पण रात्री काळोखातून तिथे जायचं म्हणजे... स्‍त्रिया टाळतातच तिथे जाणं.

"‘पटरीच्‍या पलीकडच्‍या वॉर्ड नंबर ९ मध्ये स्‍वच्‍छतागृहंच नाहीत,’’ प्रतिमा देवी म्हणते. अडतीस वर्षांची प्रतिमा देवी शाळेच्‍या बसवर सहाय्‍यक म्हणून काम करत होती आणि तिला दरमहा ३,५०० रुपये मिळत होते. पण मार्च २०२० पासून शाळा बंद झाल्‍या आणि तेव्‍हापासून तिला काम नाही. तिचा नवरा एका रेस्‍टॉरंटमध्ये आचारी होता. पण २०२० च्‍या अखेरीस त्‍याचीही नोकरी गेली.

तेव्‍हापासून हे दोघं समोसा आणि इतर खाण्‍याचे पदार्थ विकून आपलं घर चालवतायत. यारपूर शहरात जाणार्‍या रस्‍त्‍यावरच ते गाडी लावतात. प्रतिमा पहाटे चार वाजता उठते. समोसे आणि इतर पदार्थ तयार करते. सगळी साफसफाई करून घरच्‍यांसाठी स्वयंपाक करते. तसंच काही बाजार, घरची इतर कामं... ‘‘पूर्वीसारखे आता दहा-बारा हजार नाही मिळवू शकत आम्ही, त्‍यामुळे खर्चही जपूनच करावा लागतो,’’ ती सांगते. यारपूरमधल्‍या ज्‍या स्‍त्रियांनी आता सॅनिटरी पॅड्‌स विकत घेणं थांबवलंय, त्‍यापैकी एक प्रतिमा आहे.

नीतूचे वडील काही वर्षांपूर्वी गेले. ते दारू प्यायचे. नीतू आता कॉलेजला जाते. तिची आई काही घरांमध्ये स्‍वयंपाकाची कामं करते आणि काही घरांमध्ये साफसफाईची. त्‍यासाठी ती घरापासून पाच किलोमीटरवर, बोरिंग रोडवरच्‍या घरांपर्यंत चालत जाते. या सगळ्यातून तिला महिन्‍याला पाच ते सहा हजार मिळतात.

‘‘कॉलनीतल्‍या आमच्‍या बाजूच्‍या आठ-दहा घरांच्‍या आत स्‍वच्‍छतागृहं आहेत, बाकी सगळे रेल्‍वे पटरीचा वापर करतात किंवा मग वेगवेगळ्या सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांमध्ये जातात,’’ नीतू सांगते. ज्‍या घरांमध्ये स्‍वच्‍छतागृह आहे, त्‍या घरांपैकी एक आहे नीतूच्‍या आत्‍याचं घर. मात्र ही स्‍वच्‍छतागृहं कोणत्‍याही मलवाहिनीला जोडलेली नाहीत, त्‍यांचं ड्रेनेज खूपच प्राथमिक अवस्‍थेतलं आहे. ‘‘मला फक्‍त रात्रीच्‍या वेळीच प्रश्‍न असतो. पण आता त्‍याचीही सवय झालीय मला,’’ ती म्हणते.

The Ward Number 9 slum colony in Yarpur: 'At night, the only toilet available is the railway track'
PHOTO • Kavitha Iyer

यारपूरची वॉर्ड नंबर ९ झोपडपट्टी : ‘रात्रीच्‍या वेळी एकच स्‍वच्‍छतागृह उपलब्‍ध असतं... रेल्‍वेची पटरी’

जेव्‍हा रात्री रेल्‍वे पटरीवर जावं लागतं, तेव्‍हा नीतू दक्ष असते. ट्रेनचा हॉर्न आणि ट्रेन येण्‍याच्‍या कितीतरी आधी होणारं रुळांचं कंपन यांचा ती कानोसा घेत असते. आता इतक्‍या वर्षांनंतर, या भागात साधारण किती किती वेळाने ट्रेन येतात, याचा तिला नेमका अंदाज आहे.

‘‘हे सुरक्षित नाही. असं पटरीवर जावं लागलं नसतं तर बरं झालं असतं, असं मला नेहमी वाटतं. पण त्‍याला पर्याय तरी कुठे आहे? बर्‍याच मुली आणि स्‍त्रिया पटरीवरच्‍याच एखाद्या काळोख्या पट्ट्यात सॅनिटरी नॅपकीन बदलतात. काही वेळा मला वाटतं, पुरुष सतत आमच्याकडे टक लावून पाहतायत...’’ नीतू म्‍हणते. दर वेळी पाण्याची सोय करता येत नाही, पण जेव्‍हाजेव्‍हा पाणी असतं, तेव्‍हा तेव्‍हा नीतू बादलीत पाणी घेऊन जाते.

पुरुष सतत पाहात असतात असं नीतू म्हणते खरं, पण नीतू किंवा इतर कोणत्‍याही मुलीला, स्‍त्रीला कधीही स्‍वच्‍छतागृहापर्यंत जाताना लैंगिक अत्‍याचाराला सामोरं जावं लागलेलं नाही. तिथे जाणं सुरक्षित वाटतं का त्‍यांना? नीतूसारखं सगळ्‍याच म्हणतात, आम्हाला आता याची सवय झालीय. आणि शिवाय अधिकची काळजी म्हणून त्‍या जोडीने किंवा चारसहा जणी एकत्र मिळूनच स्‍वच्‍छतागृहापर्यंत जातात.

नीतूच्‍या आईने कोरोना लाटेदरम्‍यान काही काळ सॅनिटरी नॅपकीन्‍स घेणं थांबवलं होतं. ‘‘पण मी तिला सांगितलं की नॅपकीन्‍स आवश्‍यक आहेत. आता आम्ही घेतो ते. काही वेळा वेगवेगळ्या स्‍वयंसेवी संस्‍थासुद्धा पॅकेट्‌स देतात वस्‍तीत,’’ नीतू सांगते. नॅपकीन्‍स मिळतात, पण मोठा प्रश्‍न असतो तो त्‍यांची योग्‍य ती विल्‍हेवाट लावण्‍याचा. ‘‘बर्‍याच मुली ते नुसतेच स्‍वच्‍छतागृहात किंवा रेल्‍वे पटरीवर ठेवून देतात. कारण हातात ती छोटीशी पुडी घेऊन कचर्‍याचा डबा शोधत फिरण्‍याची लाज वाटते,’’ ती म्हणते.

नीतू मात्र वापरलेला सॅनिटरी नॅपकीन कचर्‍याच्‍या गाडीतच टाकते, पण तिच्‍या वेळेत ती गाडी आली तरच. नाहीतर मग आंबेडकर नगरच्‍या दुसर्‍या टोकाला असलेल्‍या मोठ्या कचर्‍याच्‍या डब्‍यापर्यंत ती जाते आणि तिथे टाकते. दहा मिनिटं लागतात तिथे चालत जायला. तिला तेवढा वेळ नसेल तर मग मात्र ती पटरीवर फेकते.

Left: Neetu's house is located alongside the railway track. Right: Women living in the colony have to wash and do other cleaning tasks on the unpaved street
PHOTO • Kavitha Iyer
Left: Neetu's house is located alongside the railway track. Right: Women living in the colony have to wash and do other cleaning tasks on the unpaved street
PHOTO • Kavitha Iyer

डावीकडे : नीतूचं घर रेल्‍वे पटरीला लागूनच आहे. उजवीकडे : कॉलनीत राहाणार्‍या स्‍त्रियांना धुणी किंवा इतर साफसफाई रस्‍त्‍यावरच करावी लागते

यारपूरपासून तीन किलोमीटरवर, दक्षिण मध्य पाटण्‍यामध्ये सगद्दी मस्‍जिद रोडवर हज भवनच्‍या मागे एका उघड्या नाल्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंना अर्धपक्‍क्‍या घरांची रांग आहे. इथले रहिवासीही अनेक वर्षांपूर्वीपासून जगायला शहरात आले आहेत. सुट्टीत, लग्‍नकार्याला किंवा इतर काही निमित्तांनी ते बेगुसराय, भागलपूर किंवा खगारिया इथल्‍या आपल्‍या घरी, कुटुंबाबरोबर राहायला जात असतात.

अठरा वर्षांची पुष्‍पाकुमारी नाल्‍याच्‍या खालच्‍या अंगाला राहाते. ‘‘ यहां तक पानी भर जाता है ,’’ आपल्‍या कमरेवर हात ठेवत ती सांगते. खूप पाऊस पडतो तेव्‍हा इथे किती पाणी भरतं, ते ती दाखवत असते. ‘‘नाला भरून वाहतो आणि आमच्‍या घरात आणि टॉयलेटमध्ये पाणी भरतं.’’

साधारण अडीचशे घरं आहेत इथे आणि बहुतेक घरांच्‍या समोर, नाल्‍याच्‍या अगदी काठावर त्‍या त्‍या कुटुंबाने आपलं स्‍वच्‍छतागृह बांधलं आहे. त्‍याचं पाणी थेट नाल्‍यात सोडलेलं आहे. दोनेक मीटर रुंद असलेल्‍या त्‍या नाल्‍याच्‍या सांडपाण्‍यात हे मैल्‍याचं पाणी मिसळतं आणि अनेक दुर्गंधांचा एकत्रित दुर्गंध वातावरणात भरून राहातो.

काही घरं सोडून राहाणारी २१ वर्षांची सोनी कुमारी सांगते, ‘‘पावसाळ्यात कधीकधी टॉयलेटमधलं पाणी संपूर्ण ओसरायला आख्खा दिवस लागतो आणि मग ते ओसरायची वाट बघत बसण्याशिवाय काही पर्यायच नसतो.’’

सोनीचे वडील खगारिया जिल्ह्यातल्‍या भूमिहीन कुटुंबातून आलेले. इथे पाटणा महापालिकेत ते सफाई कामगार आहेत. ते कचर्‍याच्‍या ट्रकवर चढतात, गल्‍ल्‍यागल्‍ल्‍यांमध्ये जाऊन कचरा गोळा करतात.‘‘संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ते काम करत होते. सगळ्‍या सफाई कामगारांना मास्‍क आणि सॅनिटायझर दिले होते आणि कामावर यायला सांगितलं होतं,’’ सोनी सांगते. सोनी आता बीएच्‍या दुसर्‍या वर्षाला आहे. तिची आई जवळच्‍याच एका घरामध्ये लहान मूल सांभाळायचं काम करते. या कुटुंबाचं महिन्‍याचं उत्‍पन्‍न आहे १२,००० रुपये.

उघड्या नाल्‍याच्‍या काठावर असलेल्‍या त्‍यांच्‍या कॉलनीत प्रत्येक स्‍वच्‍छतागृह घराच्‍या समोर बांधलेलं आहे. त्‍या त्‍या घरात राहाणारी माणसंच त्‍याचा वापर करतात. ‘‘आमचं टॉयलेट पडायला आलंय. एकदा तर त्‍याचा स्‍लॅबच नाल्‍यात पडला,’’ पुष्पा सांगते. तिची आई गृहिणी आहे आणि वडील बांधकाम मजूर. त्‍यांचं काम गेले कित्‍येक महिने बंद आहे.

Left: Pushpa Kumari holding up the curtain to her family's toilet cubicle. Right: In the Sagaddi Masjid Road colony, a flimsy toilet stands in front of each house
PHOTO • Kavitha Iyer
Left: Pushpa Kumari holding up the curtain to her family's toilet cubicle. Right: In the Sagaddi Masjid Road colony, a flimsy toilet stands in front of each house
PHOTO • Kavitha Iyer

डावीकडे : पुष्पा कुमारी तिच्‍या कुटुंबाचं स्‍वच्‍छतागृह पडदा वर करून दाखवताना... उजवीकडे : सगद्दी मस्‍जिद रोड कॉलनीमध्ये प्रत्येक घराच्‍या समोर त्‍या घराचं मोडकंतोडकं स्‍वच्‍छतागृह उभं आहे

ही स्‍वच्‍छतागृहं म्हणजे छोटेसे आडोसे आहेत, बांबूच्‍या खांबांना ॲसबेस्‍टॉस किंवा टिनाचे पत्रे ठोकून केलेले. राजकीय पक्षांचे जुने बॅनर, लाकडाचे तुकडे, थोड्याशा विटा अशी त्‍यासाठी वापरलेली इतर सामुग्री. आतमध्ये सिरॅमिकचे ‘पॉट’... तुटलेले, टवके उडालेले, डाग पडलेले... थोड्या उंचावर बसवलेले. या क्‍युबिकल्‍सना दरवाजे नाहीत. थोडासा आडोसा करायला जुन्‍या कापडाचे पडदे आहेत लावलेले.

वस्‍तीतल्‍या सुरुवातीच्‍या घरांपासून काही मीटरवर, सगद्दी मस्‍जिद रोडच्‍या जवळजवळ दुसर्‍या टोकाला सरकारी प्राथमिक शाळा आहे. शाळेच्‍या इमारतीच्‍या बाहेर दोन स्‍वच्‍छतागृहं आहेत, मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी आल्‍यानंतर बंद झालेल्‍या शाळेसारखीच तीही बंद आहेत.

वस्‍तीतले रहिवासी जवळच असलेल्‍या सार्वजनिक नळांवरून पाणी भरतात. तिथेच लोक अंघोळही करतात. काही बायका त्‍यांच्‍या घराच्‍या मागे कुठेतरी कोपर्‍यात जुन्‍या साड्यांचा, चादरींचा, पडद्यांचा आडोसा करून अंघोळ करतात. ज्‍या मुली आणि तरुण स्‍त्रियांशी मी बोलले, त्‍यांच्‍यापैकी बर्‍याच जणी त्‍यांच्‍या घराच्‍या बाहेर किंवा सार्वजनिक नळांवर संपूर्ण कपडे घालून गटागटाने अंघोळ करतात.

‘‘काही जणी घराच्‍या मागे अंघोळीसाठी पाणी घेऊन जातात. थोडा अधिक आडोसा आणि खाजगीपणा असतो तिथे,’’ सोनी म्हणते.

‘‘ ॲडजस्‍ट कर लेते है ,’’ पुष्पा म्हणते. ‘‘पण पाण्‍याचा नळ ते टॉयलेट ही वरात मात्र टाळता येत नाही,’’ ती हसत हसत सांगते, ‘‘तुम्‍ही विधी उरकायला जाताय, हे सगळ्यांना कळतं.’’

Left: During the monsoon, sometimes drain water recedes from the toilet after an entire day. Right: Residents use public taps, which are also bathing areas
PHOTO • Kavitha Iyer
Left: During the monsoon, sometimes drain water recedes from the toilet after an entire day. Right: Residents use public taps, which are also bathing areas
PHOTO • Kavitha Iyer

डावीकडे : पावसाळ्यात स्‍वच्‍छतागृहात साठलेलं पाणी ओसरायला आख्खा दिवस जातो. उजवीकडे : इथे रहिवासी पाण्‍यासाठी सार्वजनिक नळांचा वापर करतात. अंघोळीची जागाही तीच

पाण्‍याचा दुसरा एक स्रोत आहे. तो म्हणजे वस्‍तीत असलेला हातपंप. तेही फार नाहीत, वस्‍तीभर विखुरलेले आहेत. स्‍वयंपाक, पिण्‍यासह सगळ्या गोष्टींसाठी नळाचं किंवा हातपंपाचं पाणी वापरलं जातं. स्‍वयंसेवी संस्‍थांचे कार्यकर्ते, शाळेतले शिक्षक पिण्‍याच्‍या स्‍वच्‍छ आणि सुरक्षित पाण्‍याविषयी सतत बोलत असतात, पाणी गाळा, उकळा, असं सांगत असतात, पण इथे कोणीही पाणी उकळून पीत नाही.

सॅनिटरी नॅपकीन्‍स इथे सर्रास वापरले जातात. लॉकडाऊनमध्ये मात्र काही मुलींना दुकानात जाताच आलं नव्‍हतं आणि त्‍यामुळे कपडा घ्यायला लागला होता. बर्‍याच मुली सांगतात की, त्‍यांच्‍या आया स्‍वतः कपडा वापरतात, पण त्‍यांना मात्र नॅपकीन्‍स आणून देतात.

हे वापरलेले सॅनिटरी नॅपकीन्‍स जातात ते मात्र थेट उघड्या नाल्‍यामध्ये. काही दिवसांनी प्‍लास्‍टिकच्‍या पिशवीतून किंवा कागदातून बाहेर येऊन ते नाल्‍यातल्‍या पाण्‍यावर तरंगतात. ‘‘एनजीओचे कार्यकर्ते आम्हाला शिकवतात वापरलेलं पॅड नीट बांधून महापालिकेच्‍या कचर्‍याच्या गाडीत कसं टाकायचं ते, पण काही वेळा नीट बांधलेलं असलं तरी ते पॅड घेऊन जायचं आणि सगळ्या पुरुषांच्‍या समोर ते कचर्‍यात टाकायचं म्हणजे खूपच अवघडल्‍यासारखं होतं,’’ सोनी सांगते.

‘‘ए आठवतंय, तो पाणी भरलेला संडास वापरायलाच नको म्हणून गेल्‍या वर्षी पावसाळ्यात एक संपूर्ण दिवस आपण काही खाल्‍लंच नव्‍हतं?’’ पुष्‍पा विचारते आणि हास्‍याचा एकच स्फोट होतो. मुली मला भेटायला ज्‍या समाज मंदिरात जमलेल्‍या असतात, तिथे कधी खुसखुस होत असते, कधी हास्‍याचे धुमारे फुटत असतात आणि त्‍यांच्‍या जगण्‍याच्‍या अनेक कथा माझ्‍यासमोर उलगडत असतात.

सोनीला पदवीधर झाल्‍यावर नोकरी करायची आहे. ‘‘म्हणजे माझ्‍या आईवडिलांची मरमर मेहनतीतून सुटका होईल,’’ ती म्हणते. या मुलींनी शिक्षणाच्‍या पायर्‍या चढल्‍यायत, आरोग्‍य आणि इतर सुविधाही काही प्रमाणात मिळवल्‍यायत. त्‍यांच्‍या आयुष्यात सगळ्यात मोठी अडचण आहे ती स्‍वच्‍छतेची. ‘‘वस्‍तीतल्‍या मुलींची सगळ्यात मोठी समस्‍या आहे ती स्‍वच्‍छतागृहांची.’’

या लेखासाठी केलेली मदत आणि दिलेला सहयोग यासाठी मी दिक्षा फाउंडेशनची आभारी आहे. फाउंडेशन यूएनएफपीए आणि पाटणा महानगरपालिका यांच्‍या सहयोगाने पाटणा शहरातल्‍या झोपडपट्ट्यांमधल्‍या स्‍त्रिया आणि मुलं यांच्‍यासाठी स्‍वच्‍छता आणि इतर प्रश्‍नांवर काम करतं.

पारी आणि काउंटर मीडिया ट्रस्‍ट यांच्‍यातर्फे ग्रामीण भारतातल्‍या किशोरवयीन आणि तरुण मुली यांना केंद्रस्‍थानी ठेवून केल्‍या जाणार्‍या पत्रकारितेचा हा देशव्‍यापी प्रकल्‍प आहे. ‘पॉप्‍युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्‍या सहकार्याने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. सामान्‍य माणसांचा आवाज आणि त्‍यांचं आयुष्य यांचा अनुभव घेत या महत्त्वाच्‍या, पण उपेक्षित समाजगटाची परिस्‍थिती, त्‍यांचं जगणं सर्वांसमोर आणणं हा त्‍याचा उद्देश आहे.

हा लेख प्रकाशित करायचा आहे? [email protected] या पत्त्यावर ईमेल करा आणि त्‍याची एक प्रत [email protected] या पत्त्यावर पाठवा.

अनुवादः वैशाली रोडे

Kavitha Iyer

Kavitha Iyer has been a journalist for 20 years. She is the author of ‘Landscapes Of Loss: The Story Of An Indian Drought’ (HarperCollins, 2021).

Other stories by Kavitha Iyer
Illustration : Priyanka Borar

Priyanka Borar is a new media artist experimenting with technology to discover new forms of meaning and expression. She likes to design experiences for learning and play. As much as she enjoys juggling with interactive media she feels at home with the traditional pen and paper.

Other stories by Priyanka Borar
Editor and Series Editor : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode