खरं तर तिचं स्वयंपाक पाणी सगळं आधीच उरकलंय. ताडगूळ तयार करून विकणं हे तिच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन. मोठ्या कल्हईत ती ढवळतीये तो ताडगूळाचा पाक आहे. काही जरी चूक झाली, तर तिच्या कुटुंबाला पुढच्या आठवडाभराच्या कमाईवर पाणी सोडावं लागू शकतं.

हे काम पूर्ण व्हायला तिला वेळ लागणारसं दिसतंय. स्वयंपाकातही तिचा बराच वेळ गेलाय. कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने दिवसातले बरेच तास तिला धुरात काम करायला लागतं. वाफा आणि धूर नाकातोंडात जात असतात. बाई म्हणून तिच्या वाटणीच्या सगळ्या कामांमध्ये या कामांची भर पडते. अगदी लहानपणापासून तिला ही भूमिका निभवावी लागत असल्यामुळे तिच्यासारख्या लाखो जणींचा शाळा लहान वयातच, अर्ध्यावरच सुटते.


women making molasses


घराशी संबंधित किती तरी कामं असतात. आंध्र प्रदेशातल्या विजयानगरममधल्या डोक्यावर टोपली घेऊन जाणाऱ्या या तरुणीला अजून स्वयंपाकाची तयारी सुरू करायची आहे. त्यासाठी लागणारं जळण आणि इतर गोष्टी रानातून गोळा करण्यात तिचे किती तरी तास मोडलेत. तिच्या शेजारणीचा स्वयंपाक सुरू पण झाला... तिची चूल जरा मोकळ्यावर दिसतीये.


women at work


शेजारणीचं नशीब बरं आहे. नाही तर किती तरी बायांना अगदी छोट्या, खिडक्या नसणाऱ्या, कोंदट जागांमध्ये स्वयंपाक करायला लागतो. प्रदूषित कारखान्यातल्या कामगारांपेक्षा जास्त धोका चुलीचा धूर नाकातोंडात जाणाऱ्या या बायांना आहे.


women at work


उत्तर प्रदेशातली ही स्त्री कांडण करतीये. बघताना वाटतं त्यापेक्षा या कामाला कित्येक पटीने जास्त शक्ती लागते आणि कष्ट पडतात. स्वयंपाक किंवा अन्नावर प्रक्रिया करण्याची अशी किती तरी कामं ती करत असते. अन्नावर प्रक्रिया करण्याचं काम हे बायांचंच काम आहेसं दिसतं. हे करत असतानाच मुलांचं संगोपन आणि जनावरं सांभाळण्याचं कामही त्यांच्याकडेच असतं.


women making molasses


याशिवाय इतर कामं म्हणजे धुणी, भांडी, दळणं, भाज्या चिरणं आणि घरच्या वेगवेगळ्या मंडळींना वेगवेगळ्या वेळी जेऊ-खाऊ घालणं. आजारी माणसाची काळजी घेण्याची जबाबदारीही बहुतेक वेळा बायांचीच. ही सगळी कामं ‘बायांची कामं’ मानली जातात – आणि अर्थातच त्याचा मोबदला शून्य. या बाबतीत ग्रामीण आणि शहरी स्त्रियांची गत सारखीच आहे. पण ग्रामीण स्त्रीच्या कामाच्या बोजात पाणी आणि जळणासाठी करावी लागणारी पायपीट आणि रानातल्या कामाची भर पडत असते.


women at work


झारखंडच्या पलामूमधल्या या आदिवासी बाईचंच घ्या. स्वयंपाकासाठी ती गेट्टी कंद साफ करतीये. दुष्काळाच्या काळात हे कंद मिळवणं फार सोपं नसतं. जंगलात हे कंद शोधण्यातच तिचा सकाळचा बराचसा वेळ गेलाय. पाणी आणण्यात अजून किती तरी वेळ मोडलाय. तरीसुद्धा पाण्यासाठी अजून एक खेप करावीच लागणार. हे सगळं करताना गावाभोवतालच्या बालुमठ जंगलात एखादा वन्य प्राणी कधी वाटेत आडवा येईल सांगता येत नाही.

बाया सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात कमी खातात. आणि आराम जवळ जवळ नाहीच. त्यात पिळवटून काढणारं  काम... या सगळ्याचा त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होत असतो.

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is also a translator for PARI.

P. Sainath is Founder Editor of the People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought'.

Other stories by P. Sainath