१९४७ साली फाळणी झाली. रक्त सांडलं. रॅडक्लिफ रेषेने एका देशाचे दोन भाग केले आणि पंजाबचेही दोन तुकडे केले. भूगोल बदलला. सीमारेषा आयोगाचा तत्कालीन अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या इंग्रजी वकिलाचं नाव दिलेल्या या सीमारेषेने देश, राज्य आणि लिपीही विभागली. “फाळणी ही आमच्या साहित्याची आणि पंजाबी भाषेची एक भळभळती जखम आहे,” किरपाल सिंग पन्नू सांगतात. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातल्या पायल तालुक्यातलं कटहरी हे त्यांचं गाव.

वयाची नव्वदी गाठलेले पन्नू पूर्वी सैन्यात होते. गेली तीस वर्षं ते फाळणीच्या या जखमेवर फुंकर घालण्याचं काम करत आहेत. सीमा सुरक्षा दलात डेप्युटी कमांडंट या पदावरून निवृत्त झालेल्या पन्नू यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब सारखे धार्मिक ग्रंथ तसंच लेख, महान कोष (पंजाबचे फार मान असलेले माहितीकोष) आणि इतरही साहित्य गुरमुखीतून शाहमुखीमध्ये लिप्यांतर करून उपलब्ध करून दिलं आहे. तसंच शाहमुखीत असलेलं साहित्य गुरमुखीत.

ऊर्दूप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी शाहमुखी भारतातल्या पंजाबात १९४७ पासून वापरली जात नाही. १९९५-९६ च्या आसपास पन्नू यांनी एक कम्प्यूटर प्रोग्राम तयार केला. तो वापरून श्री गुरु ग्रंथ साहिब गुरमुखीतून शाहमुखीत लिप्यांतरित करता येतो.

फाळणीच्या आधी ऊर्दू बोलणारे लोकही शाहमुखीत लिहिलेली पंजाबी वाचू शकत होते. पाकिस्तानची निर्मिती होण्याआधी बहुतेक साहित्य तसंच न्यायालयीन कामकाज शाहमुखीत चालायचं. पूर्वीच्या अखंड पंजाबातल्या किस्सा या कथाकथनाच्या पारंपरिक प्रकारात देखील केवळ शाहमुखी वापरली जायची.

गुरमुखी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, देवनागरीशी तिचं थोडं साम्य आहे. पाकिस्तानातल्या पंजाबात ती वापरली जात नाही. परिणामी, पाकिस्तानात पंजाबी बोलणाऱ्या अलिकडच्या पिढ्या गुरमुखी येत नसल्याने आपल्या साहित्यापासून वंचित राहिल्या आहेत. अखंड पंजाबातलं उत्तमातलं उत्तम साहित्य शाहमुखीत आलं तरच त्यांना वाचता येतं.

Left: Shri Guru Granth Sahib in Shahmukhi and Gurmukhi.
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu
Right: Kirpal Singh Pannu giving a lecture at Punjabi University, Patiala
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu

डावीकडेः श्री गुरु ग्रंथ साहिब शाहमुखी आणि गुरमुखीत. उजवीकडेः किरपाल सिंग पन्नू पंजाबी विद्यापीठ, पतियाळा  इथे भाषण करतायत

डॉ. भोज राज, वय ६८ पतियाळा स्थित फ्रेंच भाषेचे शिक्षक असून भाषा तज्ज्ञ आहेत. त्यांना शाहमुखी वाचता येते. “१९४७ च्या आधी शाहमुखी आणि गुरमुखी या दोन्ही लिपी चलनात होत्या पण गुरमुखी केवळ गुरुद्वारांपुरत्या सीमित होत्या,” ते सांगतात. राज यांच्या म्हणण्यानुसार, स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाबी भाषेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत केवळ शाहमुखी लिपी वापरण्याची मुभा होती.

“अगदी रामायण महाभारतासारखे धार्मिक ग्रंथही पर्सो-अरेबिक लिपीत लिहिले होते,” राज सांगतात. पंजाबाची फाळणी झाली आणि लिप्याही विभागल्या गेल्या. शाहमुखी पश्चिम पंजाबात गेली, पाकिस्तानी झाली. गुरमुखी केवळ भारतातच राहिली.

पंजाबी संस्कृती, भाषा, साहित्य आणि इतिहासाचा हा मोठा ठेवा असाच विरून जाणार का याची अनेक वर्षांची चिंता दूर व्हावी याचसाठी पन्नू यांनी हे काम हाती घेतलं.

“पूर्व पंजाबातल्या (भारतातल्या) लेखक आणि कवींची मनापासून इच्छा होती की त्यांच्या कलाकृती पश्चिम पंजाबात (पाकिस्तानात) वाचल्या जाव्यात,” पन्नू सांगतात. कॅनडाच्या टोरान्टोमध्ये भरणाऱ्या साहित्य संमेलनांमध्ये आलेले पाकिस्तानी पंजाबी आणि इतर देशांचे नागरिक असलेले पंजाबी लोकही हा ठेवा असाच हरवून जाणार का अशी चिंता व्यक्त करायचे.

अशाच एका बैठकीत काही वाचक आणि तज्ज्ञांनी एकमेकांची लिपी वाचता यावी अशी तळमळ व्यक्त केली. “हे कधी शक्य होणार, जेव्हा दोन्हीकडच्या लोकांना देन्ही लिप्या लिहिता-वाचता आल्या तर,” पन्नू सांगतात. “पण हे बोलणं सोपं असलं तर करणं मात्र महाकठीण.”

यावर केवळ एकच तोडगा होता. अगदी महत्त्वाच्या साहित्यकृती ज्या लिपीत उपलब्ध नाहीत त्या लिपीत त्या उपलब्ध करून देणे. पन्नूंना त्यातूनच एक कल्पना सुचली.

आणि मग कालांतराने पन्नूंनी तयार केलेल्या संगणक प्रणालीच्या मदतीने पाकिस्तानात बसलेल्या कुणालाही गुरु ग्रंथ साहिब शाहमुखीमध्ये वाचणं शक्य होऊ लागलं. तसंच ऊर्दू आणि शाहमुखीत उपलब्ध असलेली पुस्तकं आणि साहित्य गुरमुखीत आणणं शक्य होऊ लागलं.

Pages of the Shri Guru Granth Sahib in Shahmukhi and Gurmukhi
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu

श्री गुरू ग्रंथ साहिबचे 'अंग' (पानं), शाहमुखी आणि गुरमुखीत

*****

१९८८ साली पन्नू सेवानिवृत्त झाले आणि कॅनडाला गेले. तिथे त्यांनी संगणक शिकून घेतला.

कॅनडात राहणाऱ्या अनेक पंजाबी लोकांना त्यांच्या मायभूमीच्या बातम्या वाचायच्या असायच्या. अजित आणि पंजाबी ट्रिब्यूनसारखी पंजाबी दैनिक वर्तमानपत्रं भारतातून विमानाने कॅनडाला पाठवली जात होती.

या पेपरमधली कात्रणं वापरून टोराँटोमध्ये इतर वर्तमानपत्रं तयार केली जायची, पन्नू सांगतात. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातली कात्रणं वापरली जात असल्यामुळे हे नवे पेपर एखाद्या कोलाजकामासारखे दिसायचे. वेगवेगळे फाँट वापरले जायचे.

असाच एक पेपर होता, हमदर्द डेली, पन्नू पुढे जाऊन तिथे काम करू लागले. १९९३ मध्ये या वर्तमानपत्राच्या संपादकांनी असं ठरवलं की त्यांचा पेपर ते एकाच फाँटमध्ये काढणार.

“तेव्हा नवनवे फाँट यायला सुरुवात झाली होती आणि संगणक वापरणंही शक्य होतं. पहिल्यांदा मी काय काम केलं तर गुरमुखीच्या एका फाँटमधला मजकूर दुसऱ्या फाँटमध्ये नेला,” पन्नू सांगतात.

हमदर्द वीकली या साप्ताहिकाची पहिली छापील आवृत्ती अनंतपूर या फाँटमध्ये काढण्यात आली. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला टोराँटोच्या त्यांच्या घरून. त्यानंतर पंजाबी कलमां दा काफला (पंजाबी लेखक संघटना) या १९९२ साली स्थापन झालेल्या टोराँटोस्थित पंजाबी लेखकांच्या संघटनेने असा निर्णय घेतला की गुरमुखी-शाहमुखी लिप्यांतर गरजेचं आहे.

Left: The Punjabi script as seen on a computer in January 2011.
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu
Kirpal Singh Pannu honoured by Punjabi Press Club of Canada for services to Punjabi press in creating Gurmukhi fonts. The font conversion programmes helped make way for a Punjabi Technical Dictionary on the computer
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu

डावीकडेः जानेवारी २०११ मध्ये संगणकावर पंजाबी लिपी अशी दिसायची. उजवीकडेः गुरमुखी लिपीचे फाँट तयार करून पंजाबी प्रकाशनांना सहाय्य केल्याबद्दल पंजाबी प्रेस क्लबतर्फे किरपाल सिंग पन्नू यांचा सत्कार करण्यात आला. या लिप्यांतराच्या प्रणालीमुळे संगणकावर पंजाबी टेक्निकल डिक्शनरी तयार करणं शक्य झालं

संगणक वापरू शकणाऱ्या अगदी सुरुवातीच्या काही लोकांमधले एक म्हणजे पन्नू. त्यामुळे त्यांनाच हे काम सोपवण्यात आलं. १९९६ साली अकादमी ऑफ पंजाब इन नॉर्थ अमेरिका किंवा अपना संस्था, या पंजाबी साहित्याला वाहून घेतलेल्या संस्थेने एक परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये सुविख्यात पंजाबी कमी नवतेज भारती यांनी जाहीर केलं, “किरपाल सिंग पन्नू एक प्रोग्राम तयार करत आहेत. ज्याद्वारे की तुस्सी इक क्लिक करोगे गुरमुखी शाहमुखी हो जाउगा, इक क्लिक करोगे ते शाहमुखी तों गुरमुखी हो जाउगा. [एक बटण दाबलं की गुरमुखीतून शाहमुखी आणि शाहमुखीतून गुरमुखीत मजकूर रुपांतरित करता येऊ शकेल].”

सुरुवातीला आपल्याला हे सगळं काम म्हणजे अंधारात तीर मारत असल्यासारखं वाटत असल्याचं पन्नू सांगतात. काही तांत्रिक बाबींमध्ये अडथळे आली तरी त्यांचं काम पुढे जात होतं.

“एकदम उत्साहात येऊन मी माझं काम जावेद बूटांना दाखवायला गेलो. ऊर्दू आणि शाहमुखीमध्ये लिहिणारी ती मोठी असामी,” ते सांगतात.

बूटा ते पाहून म्हणाले की पन्नूंनी शाहमुखीसाठी वापरलेला फाँट एकदम निरस आहे. भिंतीच्या काँक्रीट ठोकळ्यांसारखा. ते पन्नूंना म्हणाले की हा कुफी (अरेबिक लिहिली जाते तो फाँट) सारखा आहे आणि ऊर्दू वाचकांना तो आवडणार नाही. एखाद्या वाळलेल्या झाडाला असलेल्या निष्पर्ण फांदीसारखा असणारा नस्तलिक फाँट ऊर्दू आणि शाहमुखीसाठी स्वीकारला जाईल.

पन्नू तिथून परतले ते काहीसे हिरमुसले होऊन. नंतर त्यांची मुलं आणि मित्रांनी त्यांना मदत केली. तज्ज्ञांना भेटले, ग्रंथालयांमध्ये गेले. बूटा आणि त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना मदत केली. कालांतराने पन्नू यांनी नूरी नस्तलिक हा फाँट शोधून काढला.

Left: Pannu with his sons, roughly 20 years ago. The elder son (striped tie), Narwantpal Singh Pannu is an electrical engineer; Rajwantpal Singh Pannu (yellow tie), is the second son and a computer programmer; Harwantpal Singh Pannu, is the youngest and also a computer engineer.
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu
Right: At the presentation of a keyboard in 2005 to prominent Punjabi Sufi singer
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu

डावीकडेः अंदाजे २० वर्षांपूर्वीच्या या फोटोत पन्नू आणि त्यांची मुलं. थोरले (पट्टेरी टाय) नरवंतपाल सिंग पन्नू इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, मधले रजवंतपाल सिंग पन्नू (पिवळा टाय) कम्प्यूटर प्रोग्रामर आहेत, धाकटे हरवंतपाल सिंग पन्नू देखील कम्प्यूटर इंजिनियर आहेत. उजवीकडेः एका प्रसिद्ध पंजाबी सूफी गायकाला २००५ साली कीबोर्ड दाखवत असताना

तर इतक्या प्रयत्नांनंतर आता त्यांच्याकडे फाँटसंबंधी बरंच ज्ञान गोळा झालं होतं. त्यामुळे त्यांच्या इच्छेप्रमाणे ते नूरी नस्तलिक फाँटमध्ये बदल करू शकत होते. “मी गुरमुखी तयार करत होतो तेव्हाच हा फाँटही तयार करत होतो. त्यामुळे एक मोठी समस्या तशीच राहिली होती. शाहमुखी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असल्याने आम्हाला प्रत्येक अक्षर डावीकडून उजवीकडे ओढत आणावं लागायचं. दावं बांधलेलं जनावर ओढून खांबाला बांधावं तसं मी एक एक अक्षर डावीकडून उजवीकडे ओढून आणत होतो,” पन्नू सांगतात.

जेव्हा एखादा मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत लिहिला जातो तेव्हा मूळ भाषा आणि जिच्यात लिप्यांतर होणार ती भाषा या दोन्हीत समान उच्चार असणं गरजेचं असतं. पण या दोन्ही लिप्यांमध्ये काही ध्वनी असे होते ज्यासाठी दुसऱ्या लिपीत अक्षरच नव्हतं. ن नूं या शाहमुखी अक्षराचंच उदाहरण घ्या. हलक्या नासिक उच्चारासाठी हे अक्षर वापरलं जातं. पण गुरमुखीत ते नाही. अशा प्रत्येक ध्वनीसाठी पन्नू यांनी सध्या असलेल्या अक्षरांमध्ये काही फेरफार करून नवीन अक्षरं तयार केली.

पन्नू आता गुरमुखीच्या ३० फाँटमध्ये काम करतात आणि शाहमुखीच्या चार.

*****

मूळचे शेतकरी कुटुंबातले पन्नू कटहरीचे रहिवासी. त्यांची गावात १० एकर जमीन आहे. तिघंही मुलं इंजिनियर असून कॅनडात राहतात.

१९५८ साली ते सर्वप्रथम सशस्त्र पोलिस दलात सामील झाले. पतियाळा आणि ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन या पूर्वीच्या संस्थानांच्या संघाने संयुक्तरित्या हे पोलिस दल स्थापन केलं होतं. पतियाळाच्या किला बहादुरगड इथे ते सीनियर ग्रेड कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. १९६२ च्या युद्धात गुरदासपूरच्या डेरा बाबा नानकमध्ये पन्नू हेड कॉन्स्टेबल होते. त्या काळी पंजाब सशस्त्र पोलिस रॅडक्लिफ रेषेवर गस्त घालत असे.

१९६५ साली पंजाब सशस्त्र पोलिस सीमा सुरक्षा दलात विलीन झालं आणि त्यांना लाहौल व स्पितीमध्ये पाठवण्यात आलं. तेव्हा हा भाग पंजाबमध्ये होता.

Left: Pannu in uniform in picture taken at Kalyani in West Bengal, in 1984.
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu
He retired as Deputy Commandant in 1988 from Gurdaspur, Punjab, serving largely in the Border Security Force (BSF) in Jammu and Kashmir . With his wife, Patwant (right) in 2009
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu

डावीकडेः १९८४ साली पश्चिम बंगालच्या कल्याणीमध्ये पन्नूंचे गणवेशातील एक छायाचित्र. १९८८ साली ते पंजाबच्या गुरदासपूरमधून डेप्युटी कमांडंट या पदावारून निवृत्त झाले. ते अधिककरून जम्मू काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलासोबत कार्यरत होते. २००९ साली पत्नी पतवंत यांच्यासोबत

ते म्हणतात की साहित्य आणि कवितेवरचं त्यांचं प्रेम विचारांच्या स्वातंत्र्यातून निर्माण झालंय. आणि सीमेवर राहत असताना घराची आठवण त्यामागे आहे. आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या दोन ओळी ते म्हणून दाखवतातः

पल वी सहिया न जावे वे तेरी जुदाई आ सच ए
पर एदां जुदाईयां विच ही इह बीत जानी ए ज़िन्दगी।

“एक क्षणही आता तुझा विरह सहन होत नाही,
या विरहातच सारी जिंदगी सरून जाणार असं वाटे”

सीमा सुरक्षा दलाचे कंपनी कमांडंट म्हणून त्यांची खेम करन इथे नियुक्ती झाली होती. तेव्हा त्यांची आणि पाकिस्तानच्या समपदस्थ अधिकाऱ्यांची एक सवय होती. “त्या काळात सीमेच्या दोन्ही बाजूचे लोक सीमेपाशी यायचे. पाकिस्तानी पाहुण्यांसाठी चहापानाची जबाबदारी माझ्यावर आणि भारतीय पाहुणे चहा प्यायल्याशिवाय जायचे नाहीत यावर त्यांचं जातीने लक्ष असायचं. दोन-चार कप चहा प्यायल्यावर वाणी गोड व्हायची, मनाचा ताठरपणा निघून जायचा.”

काही काळाने गुरमुखी-शाहमुखी लिप्यांतराचं त्यांचं काम डॉ. कुलबीर सिंग ठिंड यांना दाखवलं. डॉ. ठिंड एक न्यूरोलॉजिस्ट असून पंजाबी साहित्याच्या क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी कालांतराने आपल्या Sri Granth Dot Org या वेबसाइटवर पन्नूंचं ट्रान्सलिटरेशन अपलोड केलं. पन्नू सांगतात “किती तरी वर्षं ते या साइटवर ठेवलेलं होतं.”

२००० साली साहित्याच्या क्षेत्रातले अध्वर्यू डॉ. गुरबचन सिंग यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबच्या अरबी प्रतीसाठी पर्शियन अक्षरं वापरली. आणि त्यासाठी त्यांनी पन्नू यांनी तयार केलेल्या प्रोग्रामचा वापर केला होता.

Left: The cover page of Computran Da Dhanantar (Expert on Computers) by Kirpal Singh Pannu, edited by Sarvan Singh.
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu
Right: More pages of the Shri Guru Granth Sahib in both scripts
PHOTO • Courtesy: Kirpal Singh Pannu

डावीकडेः किरपाल सिंग पन्नू लिखित आणि सर्वन सिंग संपादित कम्प्यूटरां दा धनांतर या पुस्तकाचं मुखपृष्ठ. उजवीकडेः श्री गुरू ग्रंथ साहिबमधले आणखी काही अंग दोन्ही लिपींमध्ये

यानंतर पन्नूंनी 'महान कोषा'चं लिप्यांतर सुरू केलं. भाई काह्न सिंग नभा यांनी तब्बल १४ वर्षं काम करून हे विश्वकोष तयार केले आहेत. आणि हे बहुतकरून गुरमुखीमध्ये लिहिलेले आहेत.

त्यांनी नंतर 'हीर वारिस के शेरों का हवाला' हा १,००० पानी काव्यसंग्रह गुरुमुखीमध्ये रुपांतिरत केला.

१९४७ पूर्वी भारतात गुरदासपूरचा भाग असणारा शकरगड तालुका नंतर पाकिस्तानात गेला. तिथली वार्ताहर २७ वर्षीय सबा चौधरी सांगते की या भागातल्या तरुण मुला-मुलींना आता पंजाबी फारसं माहित नाही कारण पाकिस्तानात ऊर्दू बोलायला प्राधान्य दिलं जातं. “शाळेमध्ये पंजाबी शिकवलं जात नाही,” ती सांगते. “इथल्या लोकांना गुरमुखी माहित नाही. मलाही नाही. आमच्या मागच्या पिढीतल्या लोकांनाच ही लिपी माहित होती.”

पन्नू यांचा हा सगळा प्रवास कायमच यशाकडे नेणारा नव्हता. २०१३ साली एका संगणकशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाने पन्नूंचं लिप्यांतराचं काम स्वतःचं असल्याचा दावा केला. त्यांचे दावे खोडून काढण्यासाठी पन्नूंना पुस्तक लिहावं लागलं. त्यांच्यावर बदनामी केल्याचा खटला चालवण्यात आला. कनिष्ठ न्यायालयाने पन्नूंच्या बाजूने निकाल दिला असला तरी कोर्टात अजूनही त्यांच्या विरोधात खटला सुरू आहे.

फाळणीने दिलेल्या या जखमेची सल थोडी तरी कमी व्हावी यासाठी पन्नू इतकी वर्षं काम करतायत. त्या कामाबद्दल त्यांना नक्कीच समाधान वाटत असलं पाहिजे. पंजाबी भाषेच्या या दोन लिप्या म्हणजे सीमेच्या अलिकडे आणि पलिकडे चमकणाऱ्या चंद्र आणि सूर्यासारखे आहेत. प्रेम आणि आस प्रत्येक भाषेत सारखीच असते. पंजाबी भाषेसाठी तिचे खरे नायक आहेत किरपाल सिंग पन्नू.

Amir Malik

Amir Malik is an independent journalist, and a 2022 PARI Fellow.

Other stories by Amir Malik
Editor : Kavitha Iyer

Kavitha Iyer has been a journalist for 20 years. She is the author of ‘Landscapes Of Loss: The Story Of An Indian Drought’ (HarperCollins, 2021).

Other stories by Kavitha Iyer
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale