यांनी धावतं समालोचन म्हणजे काय याची व्याख्याच बदलून टाकलीये. कुस्तीच्या आखाड्यात १२ तास सलग त्यांची कमेंटरी सुरू असते. तीही माइक आणि स्पीकरवर, रेडिओ किंवा टीव्हीवर नाही. शंकरराव पुजारींनी आजच्या कुस्तीच्या समालोचनाचा शोध लावला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रातले आयोजक त्यांच्या तारखा जुळाव्या म्हणून कुस्त्या पुढे ढकलतात. ते फक्त प्रेक्षकांशी बोलत नाहीत, गर्दी खेचून आणतात.

“शंकर पुजारींच्या कॉमेंट्रीने मधल्या वाईट काळात कुस्तीला तारलंय,” सांगलीच्या बेणापूरमध्ये माजी पैलवान आणि वस्ताद राजेंद्र शिंदे सांगतात. कुस्ती समजावून सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे मोठ्या संख्येने लोक यायला लागले. “यामुळे कुस्तीला नवसंजीवनी मिळाली. लोक वाढदिवसाला, इतर निमित्ताने कुस्त्या ठेवू लागले. जास्त स्पर्धा म्हणजे जास्त पैलवान.”

/static/media/uploads/Articles/P. Sainath/Wrestling /pujari's_trophy_case_at_home_dsc_1047.jpg

मजा म्हणजे ही कॉमेंटरी जमलेल्या प्रेक्षकांसाठी असते. त्यामुळे मोठाल्या मैदानांमध्ये अनेक स्पीकरची व्यवस्था आली. पण रेडिओवर का नाही? “ते जरा अवघड आहे,” कोल्हापूरच्या कवठाळीमध्ये त्यांच्या घरी, पुजारी आम्हाला सांगतात. “आमची सगळी व्यवस्था आणि पद्धतच रेडिओला साजेशी नाही. खास करून खेडेगावात तर नाहीच. कसंय, आम्ही बोलत असताना, मध्येच तिथले मानाचे कुणी आले की आम्ही त्यांच्या आगमनाची माहिती देतो.” मग त्यात मागच्या पिढीतले पैलवान असतात किंवा स्थानिक आमदारसुद्धा. “आणि मुळात कुस्त्या तास न् तास चालतात.”

वारणानगरला एकदा त्यांनी १२ तास लोकांचं लक्ष खिळवून ठेवलं होतं, त्या कुस्तीचा त्यांना फार अभिमान आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना यायला उशीर झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मग पुजारींनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली. पुजारी माहितगार आहेत, विश्लेषक आहेत आणि खरं तर त्यांना कुस्तीचा इतिहास आणि संस्कृतीचा विश्वकोषच म्हणायला पाहिजे. स्वतः पैलवान असल्याने कुस्तीतल्या डावांमध्ये ते चांगलेच वाकबगार आहेत. “मी आठ वर्षांचा असताना कुस्त्या खेळायला लागलो. पण ७२चा दुष्काळ पडला आणि मला कुस्ती सोडावी लागली. शेती संकटात सापडली की कुस्त्यांवरही सावट येतंच.”

मग त्यांनी आम्हाला दोन मिनिटात ‘लाइव्ह डेमॉन्स्ट्रेशन’ दिलं आणि कुस्त्यांचं समालोचन कसं असतं याची झलक आम्हाला पहायला मिळाली – अगदी प्रत्यक्षातल्यासारखी. त्यांचा आवाज पक्का समालोचकाचा आवाज आहे. “मी गुरूवर्य बापूसाहेब राडेंकडून बरंच काही शिकलो.” पण शैली आणि त्यातली माहिती याचं रूपच त्यांनी बदलून टाकलं. स्वतःच्या समालोचनाचं सार मांडताना पुजारी म्हणतात, “प्रेक्षकांना आणि एकूणच जनतेला, कुस्ती म्हणजे काय याबद्दल जास्तीत जास्त माहिती व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर समालोचकाने प्रेक्षकांना कुस्तीतले डावपेच आणि युक्त्यांचीही माहिती करून द्यायला पाहिजे.”

/static/media/uploads/Articles/P. Sainath/Wrestling /shankar_poojari_as_a_young_wrestler_dsc_1046.jpg

समालोचकांनी पैलवानांनाही सांगायला हवं – “तुमच्या ताकदीचा वापर करू नका. धनवानानं बळ वापरायला सुरुवात केली तर ते खतरनाक आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये मान हवा, सभ्यपणा हवा आणि दुसऱ्याबद्दल आदरही हवाच.” गामा पैलवानासारख्यांच्या गोष्टींवर पुजारी भर देतात. त्यांनी १९८५ साली समालोचनाला सुरुवात केली. “मी क्रिकेटची कॉमेंटरी ऐकत होतो आणि मला ही कल्पना सुचली. कुस्त्या पहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अशी कॉमेंटरी सुरू करून आपण कुस्ती अजून लोकप्रिय केली तर? पूर्वी तरी कुस्त्यांना भरपूर गर्दी गोळा व्हायची. कुस्तीची परंपरा, त्यातल्या खाचाखोचा, शिस्त लोकांना समजावून सांगायला काय हरकत आहे? लोकांना माहिती हवी आहे, ते जास्त संख्येने येतील आणि जास्तीत जास्त तरुणांना कुस्त्या खेळाव्याशा वाटतील.” “पार १९८५ मध्ये सुरुवाती-सुरुवातीला मोफत” समालोचन करणारे पुजारी आज वर्षाकाठी तब्बल १५० ठिकाणी समालोचन करतात. “माझा चरितार्थ त्यात भागतो,” ते म्हणतात. त्यांचा पहिला मोठा कार्यक्रम २००० साली सांगलीला झाला. गेल्या साली पाण्याच्या संकटामुळे कुस्त्या रद्द झाल्या तेव्हा पुजारींनी राजकीय नेत्यांना साद घातली. “जनावरासाठी तुम्ही चारा छावण्या काढल्यात. फार बरं केलंत, आम्ही तुमचे आभारी आहोत. या पैलवानांना जगवण्यासाठी काही छावण्या, कार्यक्रम कराल का? त्यांचं पोटही शेती आन् पावसावरच अवलंबून आहे.”

पूर्वप्रसिद्धी - http://psainath.org/kushtis-voice-of-social-commentary/

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale