बामडाभैसा मोहल्ल्यातले सगळे जण नहकुल पांडोच्या घरावरची कौलं तयार करण्यासाठी गोळा झाले होते. सगळे मिळून, एकमेकांच्या मदतीसाठी आणि कोणत्याही मोबदल्याशिवाय कौलं तयार करत होते. नहकुल घरी तयार केलेली दारू थोडी थोडी सगळ्यांना वाटत होता, पण तिला काय मोबदला म्हणायचं नसतं.

पण त्याच्या छपरासाठी कौलं तयार करण्याची वेळ का आली बरं? कारण मुळात छपरावरची कौलं गेली तरी कुठे? त्याच्या घराकडे नजर टाकली तर छपरावर मध्येच कौलं गायब झाल्याने घराचं आढं आणि खांब ओकेबोके दिसत होते.

“सरकारी कर्ज होतं,” तो त्रासून सांगतो. “मी ४,८०० रुपये कर्ज काढलं आणि दोन गायी घेतल्या.” या योजनेचा हा खरा गाभा होता – ‘सॉफ्ट लोन्स’ – म्हणजेच तुम्ही जर गायी घेतल्या तर त्यावरचं अनुदान आणि कमी व्याजदर अशा दोन्ही सवलती तुम्हाला मिळणार. आणि खरंच, १९९४ साली सरगुजासारख्या भागात इतक्या रकमेत तुम्हाला दोन गायी विकत घेणं शक्य होतं. (तत्कालीन मध्य प्रदेशात असलेला हा जिल्हा आता छत्तीसगडमध्ये समाविष्ट आहे.)

कुठलंही कर्ज किंवा उसनवारी करण्याची कल्पना नहकुलला स्वतःलाच फारशी आवडलेली नव्हती. त्याच्या पांडो या आदिवासी जमातीच्या इतरांनीही कर्जाचा धसकाच घेतला होता. कारण कर्ज काढलं की पुढे जाऊन आपल्या जमिनींवर पाणी सोडावं लागतं, हा त्यांचा अनुभव. पण या कर्जाची बात वेगळी होती. हे सरकारी कर्ज होतं, गावातल्याच बँकेतून आणि खासकरून आदिवासींच्या भल्यासाठी हे देण्यात येत होतं. त्यामुळे हे फारसं जोखमीचं नव्हतं. आणि म्हणतात ना – तेव्हा त्यात काही वावगं वाटलं नव्हतं.

“पण मला काही ते फेडणं जमलं नाही,” नहकुल सांगतो. पांडो समुदाय अतिशय गरीब असून ‘विशेष बिकट स्थितीतील आदिवासी समुदाया’मध्ये त्यांची गणना होते. त्यामुळे नहकुलची स्थिती फारशी काही वेगळी नव्हती.

PHOTO • P. Sainath

नहकुलसाठीही सरकारी योजना म्हणजे लाभ नसून शिक्षाच ठरली

“कर्जाचे हप्ते फेडायचा ताण होता,” त्याने आम्हाला सांगितलं. आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली होती. “मी काही तरी किडुकमिडुक विकून थोडं कर्ज फेडलं. शेवटी मी घरावरची कौलं विकली आणि त्यातनं काही पैसा उभा केला.”

नहकुलची दारिद्र्यातून सुटका करण्यासाठी दिलेल्या कर्जाने त्याच्या घरावरचं छप्पर हिरावून नेलं. कर्जाच्या पैशाने घेतलेल्या गायीसुद्धा विकाव्या लागल्या होत्या. नहकुलला ही योजना आपल्या भल्यासाठी आहे असं वाटलं असलं तरी खरं तर योजनेच्या 'लक्ष्यपूर्ती'तला तो केवळ एक आकडा होता. थोडी माहिती काढल्यावर आमच्या लक्षात आलं की आसपास राहणाऱ्या अनेकांना या योजनेचे असेच चटके बसले होते.

“या योजनेखाली मिळणाऱ्या पैशाची नहकुलला आणि त्याच्यासारख्या इतरांना गरज होती – पण त्यांना ज्या गोष्टींसाठी पैसा होता त्यासाठी मात्र कर्जाची सोय नव्हती,” मोहन कुमार गिरी सांगतात. मूळचे सरगुजाचे रहिवासी असणारे मोहन कुमार वकील असून इथल्या काही गावांमध्ये माझ्याबरोबर आले होते. “त्यांच्या गरजांशी कसलाही ताळमेळ नसणाऱ्या योजनांखाली त्यांना कर्जं काढावी लागली होती. तसं पाहता, तुमच्या डोक्यावरचं छप्पर शाबूत रहावं म्हणून तुम्ही कर्ज काढाल की नाही? नहकुलच्या गळ्यात कर्जाचा असा फास पडला की त्याचं हेच छप्पर हिरावून घेतलं गेलं. इतके सगळे लोक आजही सावकाराकडे का जातात ते आता तुमच्या लक्षात येईल.”

आपल्या जादुई हातांनी निर्गुण निराकार मातीतून अत्यंत देखणी कौलं साकारणाऱ्या या लोकांकडे आम्ही कौतुकाने पाहत होतो. आणि आमच्याच सोबत असणाऱ्या इतर दोघांचं लक्ष मात्र कौलं घडवणाऱ्या हातांकडे नाही तर त्यांच्या हातातल्या पेयाकडे आणि त्यातल्या मदिरेकडे लागलेलं होतं.

Everybody Loves a Good Drought या पुस्तकातील, ‘टेक अ लोन, लूझ युवर रूफ’ या छायाचित्रांशिवाय प्रकाशित केलेल्या कथेतून – इथे, छायाचित्रांसह.

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale