हे पॅनेल दिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया या ऑनलाइन फोटो प्रदर्शनातील आहे. ग्रामीण बाया किती विविध तऱ्हेची कामं करतात ते या फोटोंमधून आपल्याला दिसतं. १९९३ ते २००२ या काळात पी. साईनाथ यांनी भारतातल्या १० राज्यांमध्ये हे फोटो काढले आहेत. अनेक वर्षं भारताच्या विविध भागांत सादर झालेलं हे मूळ प्रदर्शन पारीने कल्पकरित्या डिजिटाइझ केलं आहे.

धूळ उडवीत गायी निघाल्या

बिहारमधली शेणगोळे सुकायला ठेवणारी ही बाई देशाच्या अर्थव्यवस्थेत फार मोठं योगदान देते आहे. अर्थात या योगदानाची देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मात्र कधीच दखल घेतली जात नाही. चुलीसाठी शेणाचा वापर करणाऱ्या लाखो कुटुंबांनी जर जीवाश्म आधारित इंधनाकडे वळायचं ठरवलं तर काय संकट ओढवेल याची कल्पना करणं मुश्किल आहे. पेट्रोल आणि आणि इतर इंधनाच्या आयातीवर आपल्या देशाचं जेवढं परकीय चलन खर्च होतं तितकं इतर कोणत्याच गोष्टीवर होत नाही. १९९९-२००० साली हा आकडा ४७,४२१ कोट रुपये म्हणजेच १०.५ अब्ज डॉलर इतका होता.

हा आकडा नक्की किती मोठा आहे ते समजून घेऊ या. अन्न, खाद्यतेल, औषधं आणि इतर औषधी पदार्थ, रसायनं, लोखंड आणि स्टील या सगळ्या घटकांच्या आयातीवर मिळून जितकं परकीय चलन खर्च होतं त्यापेक्षा हा आकडा तिपटीहून जास्त आहे. पेट्रोल आणि पेट्रोलजन्य पदार्थांच्या आयातीचा खर्च आपल्या एकूण आयातीच्या एक चतुर्थांश इतका आहे.

इतकंच नाही तर खतांवर होणाऱ्या आयातीवरील खर्चाच्या – १.४ अब्ज डॉलर - हा आकडा आठपट आहे. लाखो भारतीय शेतात उत्तम जैव खत म्हणूनही शेणाचा वापर करतात. म्हणजे त्या बाबतीतही आपला प्रचंड पैसा वाचतोय ते वेगळंच. कीटकरोधक म्हणून आणि इतर किती तरी गोष्टींसाठीदेखील शेणाचा वापर केला जातो. काहीही म्हणा, शेण्या आणि शेण गोळा करणाऱ्या बाया – अर्थात हेही बाईचंच काम आहे – देशाच्या गंगाजळीतले करोडोच नाही अब्जावधी डॉलर वाचवतात हे निश्चित. कदाचित शेअर बाजाराच्या यादीत शेण नाही म्हणून किंवा बायांच्या आयुष्याबद्दल किंवा शेण गोळा करण्यासाठी त्यांना पडणाऱ्या कष्टांबद्दल कुणाला घेणं देणं नाही म्हणून असेल – मुख्य प्रवाहातल्या अर्थतज्ज्ञांनी या गोष्टीची कधीही दखल घेतलेली नाही. त्यांना हे श्रम दिसतच नाहीत. त्याबद्दलचा आदर ठेवणं तर दूरच.

व्हिडिओ पहाः 'ती ज्या पद्धतीने ओणवी होऊन झाडून घेतीये, असं वाटतंय की संपूर्ण छतच तिने तिच्या पाठीवर तोलून धरलंय'


गायी-गुरं, म्हशींना लागणारा चारा आणण्याचं कामही बायाच करतात. काड्या आणि शेतातला पाला पाचोळा घालून शेणाच्या गोवऱ्याही त्याच थापतात. स्वतःच्या खर्चाने आणि खरं तर नाईलाज म्हणून. शेण गोळा करणं तसं किचकट काम आहे, त्याचा वापरही तसा अवघडच.

भारत जगातल्या सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशांपैकी एक आहे आणि यात फार मोठं योगदान या देशातल्या लाखो स्त्रियांचं आहे. देशभरातल्या १० कोटीहून अधिक दुभत्या गायी-म्हशींना दोहण्याचं काम त्या करतात इतकंच ते मर्यादित नाही. आंध्र प्रदेशातल्या विजयानगरमच्या या बाईसाठी धार काढणं हा कामाचा एक छोटा भाग आहे. चारा आणणं, जनावरं चारणं, त्यांना आंघोळी घालणं, गोठा साफ करणं आणि शेण काढणं हे सगळं ती करते. तिची शेजारीण गायीचं दूध घेऊन दूध सोसायटीत पोचलीये सुद्धा. तिथले सगळे व्यवहार ती स्वतःच पाहते. दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण किती याबाबतचे आकडे वेगवेगळे अंदाज वर्तवतात – ६९ ते ९३ टक्के. दुधावर प्रक्रिया करण्याचंही बरंचसं काम त्याच करतात. खरंच, जनावरांची देखभाल आणि पुनरुत्पादनात स्त्रिया फार मोलाची भूमिका बजावतात.

PHOTO • P. Sainath

एक जण रानातून म्हशी घराकडे घेऊन येतीये. म्हैस थोडी बिथरल्यासारखी वाटतीये कारण छोटा पण अंगावर येणारा एक शत्रू तिला दिसलायः पायाचा चावा घ्यायच्या तयारीत असणारं एक कुत्रं. तिच्याही हे लक्षात आलंय. पण स्थिती तिच्या नियंत्रणात आहे. ती म्हशीला सांभाळत सुखरुप घरी घेऊन येणार. तिच्यासाठी हे नित्याचंच आहे.

दूध किंवा मांसविक्रीतून मिळणारा पैसा इतकंच जनावरांचं मोल नाहीये. लाखो गरीब भारतीयांसाठी जनावर विम्यासारखं असतं. अगदी हालाखीच्या परिस्थितीत, उत्पन्नाचे सगळे स्रोत आटले की एखाद-दुसरं जनावर विकण्याचा एकमेव मार्ग गरिबाकडे असतो. त्यातून तो तग धरून राहू शकतो. त्यामुळेच देशातली जनावरं किती हट्टीकट्टी आहेत त्यावर किती तरी गरीब कुटुंबांचं स्वास्थ्य अवलंबून असतं. आणि या जनावरांची देखभाल, त्यांच्या तब्येती सांभाळण्याचं काम कुणाकडे – बाईकडे. असं असूनही स्वतःच्या मालकीची जनावरं असणाऱ्या आणि त्यांचे व्यवहार स्वतः सांभाळणाऱ्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. भारतातल्या ७०,००० हून अधिक गावपातळीवरच्या दूध सोसायट्या पुरुषांच्याच ताब्यात आहेत. या सोसायटीच्या एकूण सदस्यांपैकी केवळ १८ टक्के स्त्रिया आहेत. सोसायट्यांच्या व्यवस्थापन मंडळांची परिस्थिती तर अजूनच गंभीर आहे. यामध्ये महिला सभासदांचं प्रमाण केवळ ३ टक्के इतकं नगण्य आहे.

PHOTO • P. Sainath

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale