अख्खा वर्ग शांत बसलाय. जीवशास्त्राच्या पुस्तकातला मानवामध्ये लिंग निर्धारित करणाऱ्या गुणसूत्रांचा विषय सुरू आहे. “मादीमध्ये दोन x गुणसूत्रं असतात. नरामध्ये एक x आणि एक y गुणसूत्र असतं. जर xx आणि एक y असा संयोग झाला तर जन्माला येणारं बाळ तिथे बसलेल्या विद्यार्थ्यासारखं होणार,” एका विद्यार्थ्याकडे निर्देश करत शिक्षक म्हणतात. अख्खा वर्ग खिदळायला लागतो. उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्याला पुरतं कानकोंडं होतं.
ट्रान्स किंवा पारलिंगी व्यक्तींनी सादर केलेल्या संदकारंग (लढ्यासाठी सज्ज) या नाटकातला हा अगदी पहिला प्रसंग. वर्गामध्ये किंवा एरवी देखील मान्य लैंगिक साच्यांमध्ये न बसल्यामुळे एखाद्या मुलाला किंवा मुलीला किती अवमान, खिल्ली, चेष्टा सहन करावी लागते हे नाटकाच्या पहिल्या अंकात दाखवण्यात आलं आहे. दुसऱ्या अंकामध्ये हिंसेचा सामना करणाऱ्या ट्रान्स स्त्रिया आणि पुरुषांच्या कहाण्या आपल्याला पहायला मिळतात.
ट्रान्स राइट्स नाऊ कलेक्टिव्ह (टीआरएनसी) भारतभरातल्या दलित, बहुजन आणि आदिवासी ट्रान्स व्यक्तींचं म्हणणं मुखर करण्यावर भर देतं. त्यांनी संदकारंगचा पहिला प्रयोग २३ नोव्हेंबर २०२२ रोजी चेन्नईमध्ये केला. एक तासाच्या प्रयोगाचं दिग्दर्शन, निर्मिती नऊ ट्रान्स साथींनी केली असून. तेच त्यात अभिनयही करतात.
“२० नोव्हेंबर हा दिवस ज्या ट्रान्स व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांच्या स्मृतीत इंटरनॅशनल ट्रान्स डे ऑफ रिमेंमबरन्स – आंतरराष्ट्रीय ट्रान्स व्यक्ती स्मृती दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांचं जगणं सोपं नसतं. अनेकदा घरच्यांकडून त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, समाज त्यांना वाळीत टाकतो. अनेकांचा खून पडलाय आणि कित्येकांनी आत्महत्या केली आहे, टीआरएनसीच्या संस्थापक ग्रेस बानू सांगतात.

तमिळ नाडूच्या चेन्नईमध्ये संदकारंग नाटकाची तालीम सुरू आहे

नाट्यक्षेत्रात अभिनय करणाऱ्या ग्रेस बानू वर्गामध्ये ट्रान्स व्यक्तींची लैंगिक ओळख आणि गुणसूत्रांची माहिती देणाऱ्या शिक्षकाची भूमिका करतात
“घटना वाढतच चालल्या आहेत. ट्रान्स समुदायावर हिंसा होते तेव्हा कुणीच त्याविरोधात आवाज उठवत नाही. आपल्या समाजात या विषयी पूर्ण चुप्पी असल्याचं आपल्याला दिसतं,” कलाकार आणि कार्यकर्त्या बानू आपल्याला सांगतात. “आम्हाला कुठे तरी संवाद सुरू करायलाच लागणार होता. आणि म्हणूनच आम्ही या प्रयोगाचं नाव संदकारंग ठेवलं आहे.”
२०१७ साली, हा प्रयोग संदकारई या नावाने सादर करण्यात आला होता. पण त्याचं नाव बदलून ते संदकारंग करण्यात आलं. “आम्हाला सगळ्या ट्रान्स व्यक्तींना समाविष्ट करून घ्यायचं होतं,” ग्रेस बानू सांगतात. या प्रयोगात काम करणारे नऊ जण जगण्यातल्या वेदना आणि यातनांविषयी बोलतात. ट्रान्स समुदायावर होणाऱ्या शारीरिक आणि शाब्दिक हिंसेविषयी आजूबाजूचा समाज कसा काय गप्प राहू शकतो हा प्रश्नही ते विचारतात. “ट्रान्स पुरुष आणि ट्रान्स स्त्रिया पहिल्यांदाच या प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत,” संदकारंगच्या लेखक आणि दिग्दर्शक नेघा म्हणतात.
“आमचा सगळा संघर्ष केवळ जगण्यासाठी असतो. महिन्याची बिलं कशी भरायची, घरचा किराणा कसा भरायचा याची भ्रांत असते. या प्रयोगाच्या पटकथेचं काम सुरू होतं तेव्हा खूप मजा येत होती पण ट्रान्स स्त्रिया आणि पुरुषांना नाटक किंवा सिनेमामध्ये काम करण्याची संधी का मिळत नाही हा विचार करून रागही येतो. मग मी विचार केला आपण फक्त जिवंत राहण्यासाठी एवढा धोका पत्करतो, मग एक नाटक उभं करण्यासाठी जोखीम घ्यायला काय हरकत आहे?” नेघा सांगतात.
ट्रान्स समुदायाचा इतिहास पुसून टाकला गेला ते क्षण, जगण्याचा त्यांचा अधिकार, शरीराविषयी आवश्यक तो आदर आणि सन्मान अशा सगळ्याचा वेध घेणाऱ्या या प्रयोगाची काही क्षणचित्रं टिपण्याचा हा प्रयत्न.


संदकारंग नाटकाची दिग्दर्शक आणि अभिनेती नेघा (डावीकडे) आणि ट्रान्स कार्यकर्ती ग्रेस बानू (उजवीकडे)


डावीकडेः रेणुका जे ट्रान्स राइट्स नाउ कलेक्टिव्हच्या सांस्कृतिक उपक्रमांच्या समन्वयक आहेत आणि नाटकात अभिनय करतात. उजवीकडेः प्राझ्झी डी. देखील नाट्यकलाकार असून कॉस्ट्युम डिझाइन अँड फॅशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे


रिझवान एस. (डावीकडे) आणि अरुण कार्तिक (उजवीकडे) एका खाजगी कंपनीत काम करतात आणि नाट्यकलाकार आहेत. ‘ट्रान्स समुदायात ट्रान्स पुरुष अल्पसंख्य आहेत आणि अदृश्यही. या प्रयोगात ट्रान्स पुरुषांच्याही गोष्टी आपल्याला कळतात,’ अरुण म्हणतो


‘हा प्रयोग सर्वदूर पोचावा आणि त्यातून ट्रान्स व्यक्तींना जगण्याचं बळ मिळावं,’ अजिता वाय (डावीकडे) सांगते. ती अभियांत्रिकीची विद्यार्थी आणि नाट्य कलाकार तसंच ट्रान्स राइट्स नाउ कलेक्टिव्हची विद्यार्थी समन्वयक आहे. नाट्यकलाकार रागिणीराजेश (उजवीकडे)


डावीकडेः निशातना जॉन्सन, खाजगी कंपनीत ॲ नलिस्ट आणि नाट्यकलाकार. ‘या प्रयोगातून ट्रान्स व्यक्तींच्या आयुष्यातली वेदना आणि यातना तर समजतातच पण ज्यांनी आमच्या हक्कांसाठी लढताना आपले प्राण दिले त्यांची आयुष्यंही पहायला मिळतात.’ उजवीकडेः चेन्नईमध्ये तालमीच्या वेळी सगळे कलाकार


डावीकडेः निशातना जॉन्सन आणि अजिता वाय. उजवीकडेः प्राझ्झी डी स्वतःचा मेक अप स्वतः करतात

संदकारंग शैक्षणिक संस्थांमध्ये ट्रान्स व्यक्तींना सहन करावा लागणारा छळ प्रयोगातून दाखवतं

घरामध्ये एखाद्या ट्रान्स स्त्रीला कशी वागणूक मिळते ते दाखवणारा प्रसंग

कन्व्हर्जन थेरपीचे लहानपणी आलेले अनुभव आणि त्यांचा आघात आणि लैंगिक ओळखीच्या साच्यात, भूमिकांमध्ये बसत नसल्याने होणारा छळ दाखवणारा प्रसंग

चेन्नईत संदकारंग प्रयोगाची तालिम सुरू आहे

ट्रान्स समुदायाला सहन करावी लागत असणारी हिंसा आणि छळाबद्दल समाज मूक कसा राहू शकतो हा प्रश्न नेघा या प्रयोगातून विचारते

प्राझ्झी डी. लिंग निश्चिती शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या ट्रान्स ओळख असलेल्या व्यक्तीच्या वेदना आणि यातना व्यक्त करताना

रिझवान एस. ट्रान्स पुरुषाची भूमिका साकार करतो. भिन्नलैंगिक संबंधांनाच मान्यता देणाऱ्या समाजात त्याच्या वाट्याला येणारं प्रेम, नकार आणि वेदना व्यक्त करतो

ग्रेस बानू पोलिसांकडून अत्याचार झालेल्या ट्रान्स स्त्रीची भूमिका साकार करताना

नेघा प्रयोग पाहणाऱ्या प्रेक्षकांना ट्रान्स व्यक्तींच्या शरीराचा आदर करण्याचं आवाहन करतात. शरीरावरून दूषणं देणं, ट्रान्स व्यक्तींविषयी द्वेष-भीती आणि हिंसा थांबवा असं त्या सांगतात

कितीही दुःख, वेदना असली तरी हा समुदाय अनेक सुखाचे क्षण आणि सोहळे साजरे करतो ते दाखवणारा प्रसंग

नोव्हेंबर २०२२ मध्ये सादर झालेल्या संदकारंग या नाट्यप्रयोगातून ट्रान्स समुदायाचा विस्मृतीत गेलेला इतिहास जिवंत करणारे कलाकार

पहिला प्रयोग संपल्यानंतर कलाकारांना उभं राहून मानवंदना देणारे प्रेक्षक