शाळेच्या दरवाज्यावरच्या फलकावर तालीम (उर्दूमध्ये शिक्षण) असं लिहिलंय. पण आत गेल्या गेल्या पहिल्यांदा नजरेस पडते ती हनुमानाची मूर्ती. हनुमान हे सगळ्या पैलवानांचं दैवत. इथल्या संस्कृतीत अनेक रंगछटांचा मिलाप आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या कुस्तीशाळांना तालीम म्हणतात, आखाडा नाही. याची नाळ जुळते ती थेट फाळणीच्या आधीच्या पंजाबातल्या तालमींशी. १०० वर्षापासूनचे हे संबंध आहेत. खास करून कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराजांच्या काळात तर ते अधिकच दृढ होते. शाहू स्वतः कुस्तीचे मोठे चाहते असल्याने त्यांनी अखंड भारताच्या वेगवेगळ्या भागातून मल्लांना कोल्हापूरला आणलं होतं, यात पंजाबमधलेही अनेक होते.

आजही, पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या मोठ्या कुस्ती स्पर्धांमध्ये पाकिस्तान, इराण आणि काही आफ्रिकी देशातले मल्ल आवर्जून भाग घेतात. पाकिस्तानी आणि इराणी पैलवान इथल्या बहुसंख्य हिंदू पुरुष प्रेक्षकांचे अतिशय लाडके आहेत. “बाहेरच्या पैलवानांना बघून इथले प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होतात,” विनय कोरे सांगतात. कोरे कोल्हापूरचे आमदार. साखर कारखाना आणि दूधसंघाचे मालक असणारे कोरे राज्यात कुठे होत नाही अशी एक कुस्ती स्पर्धा भरवतात. अख्ख्या महाराष्ट्रात सर्वात मोठं कुस्तीचं मैदान असणाऱ्या वारणानगरची कुस्ती. या स्पर्धा १३ डिसेंबरला होतात.

कोरेंच्या सांगण्यानुसार, “तीन लाखापर्यंत लोक जमू शकतात. कधी कधी व्हिसाची मोठी डोकेदुखी होऊन बसते. एक वर्षी पाकिस्तानी मल्लांचा व्हिसा यायला फार उशीर झाला. त्यानंतर हे मल्ल इस्लामाबादहून विमानाने दिल्लीला, तिथून पुण्याला आले. तिथनं आम्ही त्यांना घेतलं आणि वाहनानं वारणेला आणलं. या सगळ्या दरम्यान, लाखाच्या वर लोक, शांतपणे १२-१३ तास त्यांची वाट पाहत थांबून होते.”

तालमींमध्ये महाराष्ट्राचे वस्ताद त्यांच्या शिष्यांना नैतिक आणि मूल्यांची शिकवण देत असतात. त्याचा गाभा अध्यात्माचा आणि धर्माच्या पल्याड जाणारा असतो. किती तरी वस्ताद त्यांच्या शिष्यांना थोर गामा पैलवानाबद्दल सांगत असतात. (गामा एक अजिंक्य पैलवान होता. त्याने जगातल्या मोठ्यात मोठ्या पैलवानाला चीत केलं होतं). गामा म्हणजे पंजाबचा गुलाम मंहमद, मुस्लिम, १९४७ नंतर पाकिस्तानात वास्तव्यास गेला. फाळणीदरम्यान संतप्त जमावाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या हिंदू शेजाऱ्यांच्या वसाहतीबाहेर एखाद्या कड्यासारखं उभं राहणाऱ्या गामा पैलवानाच्या कथा गुरू शिष्यांना सांगत असतात. “पैलवान असावा तर असा,” सर्वांच्या तोंडी हेच पालुपद.

“सगळ्या शिक्षकांचं एकमत आहे की नैतिक शिक्षण फार कळीचं आहे,” कोल्हापुरातल्या तालमीत, नावाजलेले पैलवान अप्पासाहेब कदम सांगतात. “कसलंही नैतिक अधिष्ठान नसणारा पैलवान म्हणजे विनाशच म्हणावा,” ते म्हणतात. इतर काही राज्यातल्या पैलवानांसारखं महाराष्ट्राच्या पैलवानांचं नाव काही खराब झालेलं नाही.

कुस्ती फक्त खेळ नाही, त्याला अगत्य आणि पाहुणचाराच्या संस्कृतीचं कोंदण आहे. कुंडल असो किंवा वारणानगरच्या जंगी कुस्त्या असोत, लोक आम्हाला हे कळकळीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. “लक्षात घ्या, कुस्त्या पहायला जे लाखो लोक इथे येतात की नाही, ते गावच्या लोकांसाठी पाव्हण्यासारखे असतात. त्यांच्यासाठी गावात शेकड्यानी पंगती उठत असतात. मोजदादच नको.”


/static/media/uploads/Articles/P. Sainath/Wrestling /29n2.jpg


तालमीत कुणाकडेही पहा, कान पिरगाळलेले किंवा तुटलेले. “पैलवान असल्याचं प्रमाणपत्र आहे ते,” विख्यात पैलवान आणि पूर्वी ऑलिम्पिकमध्ये खेळलेले वस्ताद गणपतराव आंधळकर हसत हसत म्हणतात. हे सगळे ‘कानफाटे’, यात गुरूही आलेच, गावाकडचे. शेतकरी किंवा श्रमिक. खास करून पश्चिम महाराष्ट्रात हेच चित्र आहे.

“कुस्त्यांचे, उसाचे आणि तमाशाचे फड – एकमेकाशी फार जोडलेले आहेत,” एशियाड, कॉमनवेल्थ आणि राष्ट्रीय पजक विजेते मल्ल काका पवार त्यांच्या पुण्याच्या तालमीत आम्हाला सांगतात. “तमाशा का? खेळणाऱ्याची शिस्त आणि प्रेक्षकांचा पाठिंबा – यावरच दोन्ही अवलंबून आहेत.”

कुस्त्या पहायला येणारे प्रेक्षक जरी बहुसंख्येने हिंदू असले तरी कुस्त्या खेळणाऱ्यांमध्ये मात्र आता थोडं वैविध्य दिसू लागलं आहे. आधी जिथे मराठ्यांचंच वर्चस्व होतं तिथे आता धनगर समाजातनं नवे मल्ल कुस्त्या जिंकू लागलेत. कुस्त्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात मुस्लिम समाजातूनही नवे मल्ल पुढे येऊ लागलेत.

महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीतले वस्ताद उत्तम विश्लेषक आहेत आणि त्यांचा मुद्दा ते अगदी नेमकेपणाने मांडतात. ऑलिम्पिकमधून कुस्तीला वगळण्याचा जो काही वाद चालू होता तो ते सरळ धुडकावून लावतात. “अहो, तीस देशात खेळले जाणारे खेळ ऑलिम्पिकमध्ये घेतात. १२२ देशांमध्ये कुस्त्या खेळल्या जातात. कुस्तीला कसं वगळणार?” कदम उपहासाने म्हणतात.

खरं तर त्यांना महाराष्ट्रात कुस्तीला कशी वागणूक मिळतीये याची जास्त चिंता आहे. आम्ही किती तरी तालमींना भेच दिली, पैलवानांना भेटलो. त्यांच्या तक्रारी सारख्याच होत्या. शेतीवर आधारित पंजाब आणि हरयाणासारखी राज्यं झपाट्याने ‘शहरी’ होत जाणाऱ्या महाराष्ट्रापेक्षा कुस्तीचा जास्त गांभीर्याने विचार करत असल्याचं चित्र आहे.

“तिथे पैलवानांना पोलिस किंवा इतर सुरक्षा दलांमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी लगेच दखल घेतली जाते,” एक वस्ताद सांगतात. “इथे, जो कुस्ती सोडतो, तो मजुरीला लागतो.” काही अतिशय गुणवान पैलवान अखेर साखर कारखान्यांवर रखवालदार म्हणून नोकरीला लागलेत.

राजकीय नेते संधीसाधू असतात, असाच दृष्टीकोन आढळतो. “कुस्त्यांना गर्दी होते, म्हणून ते यायचे.” क्रीडा महासंघाचे अध्यक्ष जरी झाले तरी कुस्तीसाठी मात्र फारसं काही केलं जात नाही. “केंद्रीय मंत्री शरद पवार राज्याच्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत,” एक कुस्ती आयोजक सांगतात. “आम्हाला माहित आहे, हो. त्यांच्या लक्षात आहे का याचं मला कोडं पडलंय.” दुसरे एक जण सांगतात, “आमचे दोन आमदारांनी आधी पैलवानकी केलीये. ते तर आमच्याकडे साधं ढुंकूनही पाहत नाहीत.”

एकूणच समाज आणि संस्कृती बदलतीये, छोटी, घरापुरती शेती कमी कमी होत चाललीये, पाण्याचं संकट कायमचं झालंय आणि त्यात राज्य सरकारचं दुर्लक्ष. या सगळ्याचा परिपाक म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचं अंग असणाऱ्या या अस्सल मातीतल्या खेळाला अवकळा येऊ लागलीये. आंधळकर म्हणतात त्याप्रमाणे, “पैलवानाचं आयुष्य म्हणजे डोळ्याला न दिसणारी तपस्या असते. एखाद्या क्रिकेट खेळाडूला साधं खरचटलं तरी दिवसभर त्याचीच चर्चा चालू. पण एखाद्या पैलवानाचा जीव जरी गेला तरी कुणाला त्याची फिकीर नाही.”
या लेखाची एक आवृत्ती याआधी हिंदू मध्ये ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रसिद्ध झाली होती .

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale