पांढरे ठिपके असलेली पिसं खुरट्या गवतात विखुरलेली दिसतात.

अंधारून आलंय, तशाच अंधुक उजेडात राधेश्याम बिष्णोई चार बाजूंनी फिरून पाहतो. मनातली शंका खोटी ठरावी असं त्याला मनापासून वाटतंय. “पिसं कुणी उपटली आहेत असं वाटत नाही,” तो जोरात म्हणतो. आणि त्यानंतर फोन करून कुणाशी तरी बोलणं सुरू होतं, “तुम्ही येताय का? मला तर नक्कीच वाटतंय...” फोनवरच्या पलिकडच्या व्यक्तीला तो सांगू लागतो.

आकाशात गंध ओढल्यासारख्या २२० किलो व्हॅटच्या तारा चुनचुन आवाज करत होत्या. संध्याकाळच्या अंधारत जाणाऱ्या आभाळात त्याच आता काळ्या फटकाऱ्यांसारख्या दिसू लागल्या होत्या.

माहिती गोळा करण्याचं आपल्याला दिलेलं काम आठवल्याने २७ वर्षीय राधेश्याम आपला कॅमेरा काढतो आणि ‘गुन्हा’ घडलाय तिथले अनेक फोटो काढतो. काही जवळून तर काही थोडेसे लांबून.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा एकदा त्याच ठिकाणी येतो – जैसलमेर जिल्ह्यातल्या खेतोलईजवळच्या गंगाराम की धाणी या वस्तीपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर.

आता मात्र कसलीच शंका मनात राहत नाही. पिसं ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच राजस्थानात गोडावण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचीच आहेत.

Left: WII researcher, M.U. Mohibuddin and local naturalist, Radheshyam Bishnoi at the site on March 23, 2023 documenting the death of a Great Indian Bustard (GIB) after it collided with high tension power lines.
PHOTO • Urja
Right: Radheshyam (standing) and local Mangilal watch Dr. S. S. Rathode, WII veterinarian (wearing a cap) examine the feathers
PHOTO • Priti David

डावीकडेः भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक एम. यू. मोहिबुद्दिन आणि स्थानिक निसर्गरक्षक राधेश्याम बिष्णोई २३ मार्च २०२३ रोजी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना धडकून माळढोक पक्षी जिथे मरण पावला तिथे पाहणी करतायत. उजवीकडेः पशुवैद्यक डॉ. एस. एस. राठोड (टोपी घातलेले) पिसांची तपासणी करत असताना राधेश्याम (उभा) आणि स्थानिक मांगीलाल पाहतायत

वन्यजीव पशुवैद्यक असणारे डॉ. श्रावण सिंग राठोड, २३ मार्च २०२३ रोजी सकाळी दिसणारे सगळे पुरावे तपासून म्हणतात, “वरच्या उच्च दाबाच्या तारांना धडकूनच पक्षी मरण पावलाय यात शंकाच नाही. तीन दिवस होऊन गेले असतील, म्हणजे सुमारे २० मार्च [२०२३] रोजी.”

२०२० पासून डॉ. राठोड यांनी चार मेलेल्या माळढोक पक्ष्यांचे देह तपासले आहेत. पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय तसंच राज्यस्तरावरच्या वन्यजीव खात्याची तांत्रिक शाखा म्हणजे वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया किंवा भारतीय वन्यजीव संस्था. “आम्हाला मिळालेले सगळे शव उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली होते. त्यामुळे या तारा आणि या पक्ष्यांचे मृत्यू यांचा नक्कीच थेट संबंध आहे.”

मरण पावलेला गोडावण किंवा माळढोक पक्षी लुप्तप्राय प्रजातीं मध्ये समाविष्ट आहे. गेल्या फक्त पाच महिन्यात हा दुसरा पक्षी या तारांना धडकून मरण पावलाय. “२०१७ पासून [जेव्हापासून तो या पक्ष्यांवर लक्ष ठेवून आहे] नऊ पक्षी मेले आहेत,” राधेश्याम सांगतो. जैसलमेरच्या संकरा तालुक्यातलं ढोलिया हे त्याचं गाव इथून जवळच आहे. तो तिथेच शेती करतो. राधेश्याम हाडाचा निसर्गरक्षक आहे आणि या पक्ष्यांचा फार बारकाईने अभ्यास करतो. “गोडावण सगळ्यात जास्त मरण पावतायत ते एचटी तारांखाली,” तो सांगतो.

वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या पहिल्या सूचीत माळढोक पक्ष्याचा समावेश केला गेला आहे. कधी काळी पाकिस्तान आणि भारताच्या गवताळ पट्ट्यांमध्ये सहज दिसून येणारा माळढोक पक्ष्याची संख्या आता अख्ख्या जगात केवळ १२०-१५० इतकीच उरली आहे. आणि आता पाच राज्यांमध्ये हे पक्षी विखुरले गेले आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमाप्रदेशात ८-१० पक्षी दिसले आहेत आणि गुजरातेत चार पक्षिणी.

इथे जैसलमेरमध्ये सगळ्यात जास्त पक्षी आहेत. “दोन ठिकाणी त्यांची वस्ती दिसते – पोकरणपाशी एक आणि १०० किमी अंतरावरच्या डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये दुसरी,” डॉ. सुमित डूकिया सांगतात. राजस्थानाच्या पश्चिमेकडच्या गवताळ पट्ट्यामध्ये राहणाऱ्या या पक्ष्याचा ते बऱ्याच काळापासून मागोवा घेत आहेत.

Today there are totally only around 120-150 Great Indian Bustards in the world and most live in Jaisalmer district
PHOTO • Radheshyam Bishnoi

आजमितीला जगभरात केवळ १२०-१५० माळढोक उरले आहेत आणि यातले बहुतेक जैसलमेर जिल्ह्यात आहेत

'We have lost GIB in almost all areas. There has not been any significant habitat restoration and conservation initiative by the government,' says Dr. Sumit Dookia
PHOTO • Radheshyam Bishnoi

‘सगळीकडचेच माळढोक पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे अधिवास पुनरुज्जीवित करण्यासाठी किंवा त्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून लक्षणीय असे प्रयत्न झालेले नाहीत,’ डॉ. सुमित डूकिया सांगतात

ते अगदी रोखठोकपणे म्हणतात, “सगळीकडचेच माळढोक पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे अधिवास पुनरुज्जीवित करण्यासाठी किंवा त्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून लक्षणीय असे प्रयत्न झालेले नाहीत.” डूकिया इकॉलॉजी, रुरल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबिलिटी (ईआरडीएस) फाउंडेशन या संस्थेसोबत मानद वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतात. माळढोक पक्षी वाचवण्याच्या कामात समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी ही संस्था २०१५ सालापासून कार्यरत आहे.

“अहो, मी स्वतः या पक्ष्यांचे थवे आकाशातून उडत जाताना पाहिले आहेत. आणि आता कसाबसा एखादा पक्षी दिसला तर दिसतो. उडताना तर क्वचितच,” सुमेर सिंग भाटी सांगतात. चाळिशीचे भाटी स्थानिक पर्यावरणवादी आहेत आणि माळढोक तसंच जैसलमेर जिल्ह्यातल्या त्यांच्या अधिवासांचं रक्षण करण्यात सक्रिय आहेत.

ते इथून तासभर अंतरावर साम तालुक्याच्या सानवटा गावी राहतात. गोडावण मरण पावल्याचं कळाल्यावर ते इथे आले आहेत. इतर काही स्थानिक आणि शास्त्रज्ञही ही बातमी ऐकल्यावर काळजी वाटून इथे पोचले आहेत.

*****

इथून १०० मीटर अंतरावर रासला गावात देगराय माता मंदिरात प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेला खऱ्या आकाराचा माळढोक पक्ष्याचा एक हुबेहूब पुतळा दिसतो. अगदी हायवेवरूनही दोऱ्यांनी बंदिस्त केलेल्या जागेत एका चौथऱ्यावर हा पुतळा आपल्याला दिसू शकतो.

स्थानिकांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी तो उभारला आहे. “इथे मरण पावलेल्या पहिल्या गोडावणच्या स्मृतीत तो उभारलाय,” ते आम्हाला सांगतात. हिंदी भाषेत खाली लिहिलंयः १६ सप्टेंबर २०२० रोजी देगराय माता मंदिराजवळ एक गोडावण मादी उच्च दाबाच्या वीजेच्या तारांना धडकून मरण पावली. तिच्या स्मृतीत आम्ही हा पुतळा उभारत आहोत.

Left: Radheshyam pointing at the high tension wires near Dholiya that caused the death of a GIB in 2019.
PHOTO • Urja
Right: Sumer Singh Bhati in his village Sanwata in Jaisalmer district
PHOTO • Urja

डावीकडेः २०१९ साली एका माळढोक पक्ष्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांकडे राधेश्याम निर्देश करत आहे. उजवीकडेः सुमेर सिंग भाटी जैसलमेर जिल्ह्याच्या सानवटा या आपल्या गावी

Left: Posters of the godawan (bustard) are pasted alongwith those of gods in a Bishnoi home.
PHOTO • Urja
Right: The statue of a godawan installed by people of Degray
PHOTO • Urja

डावीकडेः एका बिष्णोई कुटुंबाच्या घरात देवाच्या तसबिरींसोबत गोडावण (माळढोक) पक्ष्याचं पोस्टर चिकटवलं आहे. उजवीकडेः देगरायच्या गावकऱ्यांनी उभरलेला गोडावणचा पुतळा

सुमेर सिंग, राधेश्याम आणि जैसलमेरच्या स्थानिकांसाठी गोडावणची घटती संख्या आणि त्यांचे अधिवास लुप्त होणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्यांच्यासारखे पशुपालक समूह त्यांच्या भोवतालाबद्दल काहीही ठरवू शकत नाहीत आणि त्यातूनच त्यांची पशुपालनावर आधारित आयुष्यं आणि उपजीविकांचा ऱ्हास होत चालला आहे.

“विकासाच्या नावाखाली किती तरी गोष्टी आपल्या हातून निसटत चालल्या आहेत,” सुमेर सिंग म्हणतात. “आणि हा सगळा विकास नक्की आहे तरी कुणासाठी?” त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. इथून १०० मीटर अंतरावर सोलर फार्म आहे. वरून उच्च दाबाच्या तारा जातायत. पण त्यांच्या गावात मात्र विजेचा लपंडाव थांबलेला नाही.

गेल्या साडेसात वर्षांत भारताची अक्षय ऊर्जा क्षमता २८६ टक्क्यांनी वाढली असल्याचा नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा दावा आहे. गेल्या दशकात, त्यातही गेल्या ३-४ वर्षांमध्ये सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती करणारे अक्षरशः हजारो प्रकल्प राजस्थानात उभारण्यात आले आहेत. यात अदाणी रिन्यूएबल एनर्जी पार्क राजस्थान लि. (एआरपीआरएल) जोधपूरच्या भादला इथे ५०० मेगावॅट तसच जैसलमेरच्या फतेहगडमध्ये १,५०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करत आहे. विजेच्या तारा जमिनीखालून घातल्या जात आहेत का यासंबधी कंपनीच्या वेबसाइटवरून माहिती विचारली असता त्याला हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत तरी कुठलं उत्तर प्राप्त झालेलं नाही.

या सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज राष्ट्रीय ग्रिडमध्ये पाठवण्यासाठी विजेच्या तारांचं प्रचंड मोठं जाळं उभारण्यात आलं असून याच तारा माळढोक, गरूड, गिधाडं आणि इतर पक्ष्यांना उडताना अडथळा ठरत आहेत. पोखरण आणि रामगड-जैसलमेरमधल्या माळढोकांच्या अधिवासातूनच या नवीकरणीरय ऊर्जा प्रकल्पांचं हरित क्षेत्र तयार केलं जातं आहे.

Solar and wind energy  projects are taking up grasslands and commons here in Jaisalmer district of Rajasthan. For the local people, there is anger and despair at the lack of agency over their surroundings and the subsequent loss of pastoral lives and livelihoods
PHOTO • Radheshyam Bishnoi

सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातले गवताळ पट्टे आणि सामूहिक मालकीच्या जागा संपादित केल्या जात आहेत. स्थानिक लोक मात्र त्यांच्या भोवतालाबद्दल काहीही ठरवू शकत नाहीत आणि त्यातूनच त्यांची पशुपालनावर आधारित आयुष्यं आणि उपजीविकांचा ऱ्हास होत चालला आहे

दर वर्षी आर्क्टिकहून मध्य युरोप आणि आशिया खंड पार करून हिंदी महासागरापर्यंत स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा ठरलेला मार्ग आहे. त्याला सेंट्रल एशियन फ्लायवे म्हणतात. आणि जैसलमेर याच मार्गामध्ये आहे. पाण्यामध्ये राहणाऱ्या किमान १८२ प्रकारच्या पक्ष्य़ांचे २७९ थवे या मार्गाने उडत येत असल्याचं स्थलांतर करणारे पक्षी आणि वन्यजीव संवर्धन जाहीरनाम्यामध्ये म्हटलं आहे. यातले काही पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये पांढऱ्या पाठीचं गिधाड, लांब चोचीचे गिधाड, व्हाइट ब्रोड बुशचॅट, हिरवी मुनिया आणि हौबारा बस्टर्ड या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

राधेश्याम एक उत्तम छायाचित्रकार आहे. त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्सने टिपलेली काही छायाचित्रं आपल्याला अस्वस्थ करतात. “कधी कधी पेलिकन पक्ष्यांना सौर ऊर्जा प्रकल्पाची पॅनेल म्हणजे तलाव वाटतात आणि ते तिथेच उतरतात आणि खाली घसरून पडतात. त्यांचे पाय नाजूक असतात आणि त्यांना इजा झाली तर ते परत बरेच होऊ शकत नाहीत.”

डेझर्ट नॅशलन पार्कच्या ४,२०० चौकिमी क्षेत्रात विजेच्या तारांमुळे फक्त माळढोकच नाही तर दर वर्षी अंदाजे ८४,००० पक्षी मरण पावत असल्याचं वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा २०१८ साली करण्यात आलेला एक अभ्यास सांगतो. “कुठल्याही प्रजातीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे मृत्यू धोक्याची घंटा आहेत. ती प्रजात नष्ट होण्याची ही नांदीच म्हणता येईल.”

आणि धोका फक्त आभाळात नाहीये. जमिनीवर देखील आहे. सामूहिक मालकीचे गवताळ पट्टे आणि ओरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरायांच्या क्षेत्रात आता जिथे तिथे २०० मीटर उंच पवनचक्क्या उभारल्या गेल्या आहेत. दोन पवनचक्क्यांमध्ये ५०० मीटरचं अंतर आहे. अनेको हेक्टर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले गेले आहेत आणि जागा कुंपण बांधून बंदिस्त केलेल्या आहेत. सगळेच समूह सांगतात की या देवरायांमध्ये पूर्वी एक फांदीसुद्धा तोडायला बंदी होती. पण आता मात्र नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांनी या जागा गिळंकृत केल्या आहेत. गुरं-जनावरं चारणं म्हणजे आता सापशिडीचा खेळ झालाय. सरळ वाटा राहिल्याच नाहीयेत. कुंपणांच्या कडेने, पवनचक्क्या आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या मायक्रोग्रिड तारा टाळून चारणी करावी लागत आहे.

Left: The remains of a dead griffon vulture in Bhadariya near a microgrid and windmill.
PHOTO • Urja
Left: The remains of a dead griffon vulture in Bhadariya near a microgrid and windmill.
PHOTO • Vikram Darji

डावीकडेः पवनचक्की आणि एका मायक्रोग्रिड क्षेत्राजवळ आढळलेले एका भुऱ्या गिधाडाचे अवशेष. उजवीकडेः राधेश्याम गोडावण पक्ष्यांच्या मागावर असतो, जेणेकरून त्यांचं रक्षण करता यावं

“मी सकाळी घर सोडतो आणि थेट संध्याकाळीच घरी परतते,” धानी सांगते (ती आडनाव लावत नाही). घरच्या चार गाया आणि पाच बकऱ्यांसाठी तिला जंगलात जाऊन गवत गोळा करून आणावं लागतं. “मी जनावरं घेऊन जंगलात जाते तेव्हा मला कधी कधी विजेचा झटका बसतो.” धानीचा नवरा बारमेर शहरात शिक्षण घेत आहे. ती शेती पाहते आणि तीन लहान मुलांची काळजी घेतं. तिघांची वयं ८, ५ आणि ४ वर्षं अशी आहेत.

“आम्ही आमच्या आमदाराला, डिस्ट्रिक्ट कमिशनरला सांगून पाहिलंय, पण काहीही झालेलं नाहीये,” मुरीद खान सांगतात. ते जैसलमेरच्या साम तालुक्यातल्या रासला गावाच्या देगरायचे ग्राम प्रधान आहेत.

“आमच्या पंचायतीत सहा सात उच्च दाबाच्या वाहिन्या उभारल्या आहेत,” ते सांगतात. “हे आमचे ओरण आहेत. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, ‘भाई, तुम्हाला परवानगी तरी कुणी दिली,’ ते सरळ म्हणतात, ‘आम्हाला तुमच्या परनावगीची गरजच नाहीये’.”

या घटनेच्या एक दिवसानंतर २७ मार्च २०२३ रोजी लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण, वन आणि वातावरण बदल खात्याचे मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी उत्तरात सांगितलं की माळढोक पक्ष्यांच्या महत्त्वाच्या अधिवासांना राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता देण्यात येईल.

या दोन अधिवासांपैकी एक आधीच नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. दुसरं क्षेत्र संरक्षण खात्याच्या मालकीचं आहे. पण तिथेही माळढोक काही सुरक्षित नाहीत.

*****

१९ एप्रिल २०२१ रोजी एका याचिकेवर उत्तर देत असताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की, “माळढोक पक्ष्याच्या संभाव्य आणि प्राधान्य असणाऱ्या क्षेत्रात शक्य असेल तिथे हवेतल्या विजेच्या तारा जमिनीखालून नेण्यात येतील आणि हे काम एक वर्षाच्या आत पूर्ण केलं जाईल. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत [पक्ष्यांना इशारा देतील अशा उजेड परावर्तित करणाऱ्या] प्लास्टिकच्या चकत्या सध्याच्या तारांना अडकवल्या जातील.”

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात राजस्थानात जमिनीखाली टाकण्यात याव्यात अशा १०४ वीजवाहिन्यांची यादी दिली आहे. इथे १,२३८ किमी लांबीच्या तारांना प्लास्टिकच्या चकत्या अडकवणं आवश्यक आहे.

'Why is the government allowing such big-sized renewable energy parks in GIB habitat when transmission lines are killing birds,' asks wildlife biologist, Sumit Dookia
PHOTO • Urja
'Why is the government allowing such big-sized renewable energy parks in GIB habitat when transmission lines are killing birds,' asks wildlife biologist, Sumit Dookia
PHOTO • Urja

‘वीजवाहिन्यांमुळे पक्षी परत असताना सरकार माळढोकांच्या अधिवासात एवढे मोठे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प सुरूच का करतंय?’ वन्यजीव जीवशास्त्रज्ञ सुमीत डूकिया विचारतात

विजेच्या तारा जमिनीखाली टाकण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला दोन वर्षं उलटली आहेत, मात्र एप्रिल २०२३ मध्ये परिस्थिती पाहिली तर दिसतं की अगदी थोड्या भागात, तेही मुख्य रस्त्यांना लागून जाणाऱ्या काही किलोमीटर विजेच्या तारांना प्लास्टिकच्या चकत्या अडकवल्या आहेत. लोकांचं आणि माध्यमांचं लक्ष इथे पटकन जाऊ शकतं. “जे काही अभ्यास आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यातून लक्षात येतंय की अशा चकत्या बसवल्या तर पक्षी तारांना धडकण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. म्हणजे खरं तर या पक्ष्याचा मृत्यू नक्कीच टाळता येण्यासारखा होता,” डूकिया म्हणतात.

आपल्याच देशात आढळणाऱ्या या पक्ष्याचं या पृथ्वीतलावरचं हे एकच घर आहे. आणि तिथेच हा पक्षी सुरक्षित नाहीये. आणि आपण मात्र परक्या भूमीवरच्या परक्या प्रजातीला, आफ्रिकन चित्त्याला आपल्याकडे वसवण्यासाठी पुढच्या पाच वर्षात २२४ कोट खर्च करणार आहोत. यामध्ये विशेष विमानं, चित्त्यांसाठी सुरक्षित बंदिस्त क्षेत्राची उभारणी, उच्च दर्जाचे कॅमेरे आणि निरीक्षण करण्यासाठी मचाण इत्यादी उभारण्यात येत आहेत. आणि वाघाची संख्याही वाढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २०२२ साली ३०० कोटी इतकी भरभक्कम तरतूद करण्यात आली होती.

*****

माळढोक पक्ष्याची शान खरंच पाहण्यासारखी आहे. एक मीटर उंच असलेल्या या पक्ष्याचं वजन ५ ते १० किलो भरतं. वर्षभरात माळढोक पक्षीण एकच अंडं घालते तेही उघड्यावर. या भागात शिकारी कुत्र्यांची संख्याही वाढत असल्याने माळढोक पक्ष्याची अंडीही सुरक्षित नाहीत. “परिस्थिती फार बिकट आहे. पक्ष्यांची संख्या टिकवण्याचे मार्ग आपल्याला शोधून काढावे लागतील तसंच या पक्ष्यांसाठी काही भागात सगळ्यांनाच प्रवेश पूर्णपणे वर्ज्य करावा लागेल,” नीळकंठ बोधा म्हणतात. ते बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस) सोबत कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करतात आणि या भागात एका प्रकल्पाचं काम पाहतात.

जमिनीवर राहणाऱ्या या पक्ष्याला उडण्यापेक्षा चालणं जास्त आवडतं. पण जेव्हा तो आकाशात झेप घेतो ते दृश्य पाहण्यासारखंच असतं – वाळवंटावरच्या निरभ्र आकाशात पंख पसरून जेव्हा हा वजनदार पक्षी उडतो तेव्हा त्याच्या पंखांची लांबी जवळपास ४.५ फूट इतकी भरते.

'The godawan doesn’t harm anyone. In fact, it eats small snakes, scorpions, small lizards and is beneficial for farmers,”' says Radheshyam
PHOTO • Radheshyam Bishnoi

‘गोडावण कुणाचंच काही नुकसान करत नाही. उलट तो छोटे साप, विंचू, छोट्या पालींसारखे प्राणी खाऊन शेतकऱ्यांना मदतच करतो’ राधेश्याम म्हणतो

Not only is the Great Indian Bustard at risk, but so are the scores of other birds that come through Jaisalmer which lies on the critical Central Asian Flyway (CAF) – the annual route taken by birds migrating from the Arctic to Indian Ocean
PHOTO • Radheshyam Bishnoi

फक्त माळढोकच धोक्यात आहे असं नाही तर दर वर्षी आर्क्टिकमधून हिंदी महसागरात येणाऱ्या लाखो पक्ष्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या सेंट्रल एशियन फ्लायवेमधे येणाऱ्या जैसलमेरमधून उडत जाणाऱ्या अनेक पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे

माळढोक पक्ष्याचे डोळे समोर नाही तर दोन बाजूला असतात त्यामुळे समोर संकट आलं तरी त्याला लगेत दिसत नाही. त्यामुळे तो थेट विजेच्या तारांवर जाऊन आदळतो किंवा अगदी शेवटच्या क्षणी आपली दिशा बदलतो. पण मोठे ट्रॉलर ट्रक जसे अचानक वळण घेऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे माळढोक अचानक दिशा बदलू शकत नाहीत. कधी कधी वेळ निघून गेलेली असते. कधी कधी त्यांचे पंख किंवा डोकंच ३० मीटर उंचीवरच्या तारांना आपटतं. “तारांना धडकल्याने विजेचा झटका लागून पक्षी मरतात किंवा धडक लागून खाली पडल्यानंतर जीव जातोच,” राधेश्याम सांगतो.

२०२२ साली राजस्थानात मोठी टोळधाड आली होती. “गोडावण होते तिथे त्यांनी अक्षरशः हजारो टोळखाऊन टाकले आणि पिकं वाचली,” राधेश्याम सांगतो. “गोडावण कुणाचंच काही नुकसान करत नाही. उलट तो छोटे साप, विंचू, छोट्या पालींसारखे प्राणी खाऊन शेतकऱ्यांना मदतच करतो.”

तो आणि त्याचं कुटुंब घरच्या ८० बिघा (सुमारे ८ एकर) जमिनीवर गवार आणि बाजरीचं पीक घेतात. हिवाळ्यात पाऊस झाला तर कधी कधी तिसरं पीकसुद्धा घेतलं जातं. “तुम्हीच विचार करा, १५० गोडावण आहेत तिथे हजारो असते तर ही टोळधाडीसारखी संकटं नक्कीच कमी होऊ शकली असती,” तो म्हणतो.

माळढोक वाचवायचा असेल तर त्याच्या अधिवासात कसलाही हस्तक्षेप टाळायला पाहिजे आणि हे अधिवास फार मोठ्या क्षेत्रावर नाहीत. “आपण प्रयत्न करू शकतो. फार मोठी गोष्ट नाहीये. विजेच्या तारा जमिनीखाली टाकाव्या आणि नव्या तारा उभारू नयेत असा आदेश आहे,” राठोड म्हणतात. “सगळं काही संपण्याआधी सरकारने जरा उसंत घेऊन विचार करायला पाहिजे.”

बायोडायव्हर्सिटी कलेक्टिव्हचे सदस्य डॉ. रवी चेल्लम यांनी या वार्तांकनासाठी बहुमोल मदत केली आहे. मनःपूर्वक आभार.

Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Photographs : Urja

Urja is Senior Assistant Editor - Video at the People’s Archive of Rural India. A documentary filmmaker, she is interested in covering crafts, livelihoods and the environment. Urja also works with PARI's social media team.

Other stories by Urja
Photographs : Radheshyam Bishnoi

Radheshyam Bishnoi is a wildlife photographer and naturalist based in Dholiya, Pokaran tehsil of Rajasthan. He is involved in conservation efforts around tracking and anti-poaching for the Great Indian Bustard and other birds and animals found in the region.

Other stories by Radheshyam Bishnoi

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath