तम्मीगमल काशिमिया चष्म्यातून नीट पाहत कापडावर आरशाचा एक छोटासा तुकडा लावतायत. “हा संगळी टाका सगळ्यात अवघड, कारण आरसा बिलकुल निसटून चालत नाही,” त्या मला सांगतात. तमिळ नाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातल्या सिट्टिलिंगी खोऱ्यातल्या दोन लमाणी तांड्यैपैकी, अक्कारे काट्टू तांड्यावरच्या त्यांच्या घरी आम्ही बोलत होतो.

गेली १२ वर्षं साठीच्या तम्मीगम्मल किंवा ‘गम्मी’ यांनी आरशापेक्षाही फार मोलाचं असं काही निसटू दिलं नाहीये. आपली मैत्रीण आर. नीला यांच्या संगतीने त्यांनी त्यांच्या समुदायाच्या तरूण मुलींना घाटेर ही लमाणी भरकामाची कला शिकवलीये. ही कला लोकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून ही सगळी खटपट. या कलेमुळे जी कमाई होऊ लागलीये त्यामुळे या बायांवर स्थलांतर करण्याची वेळ येत नाहीये हे म्हणजे दुधात साखर.

लमाणी बाया शक्यतो सिट्टिलिंगीपासून २०० किलोमीटरवर असणाऱ्या तिरुप्पूरच्या कापड गिरण्यांमध्ये किंवा बांधकामांवर कामाला जातात. गड्यांना केरळमध्ये बांधकामावर किंवा झाडं तोडण्याची कामं मिळतात. या स्थलांतरित कामगारांची महिन्याची कमाई सरासरी रु. ७,००० ते रु. १५,००० इतकी असते.

तमिळ नाडूमध्ये लमाणी (मागास जातींमध्ये समाविष्ट) बहुतकरून धर्मापुरी आणि तिरुअन्नमलई जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास आहेत. ग्राम पंचायत अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, सिट्टिलिंगीमध्ये ९२४ लमाणी राहतात (इतर राज्यांमध्ये त्यांना बंजारा म्हणूनही ओळखलं जातं). सिट्टिलिंगीच्या बहुतेक लमाणी कुटुंबांकडे पावसावर अलवंबून असलेली एक-दोन एकराची पोटापुरती शेती आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात जास्त पाणी लागणाऱ्या ऊस किंवा भातासारख्या पिकाकडे लोकांचा ओढा आहे, त्यात अपुरा पाऊस यामुळे पैशाची गरज सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळेत दोन आठवड्यासाठी किंवा अगदी वर्षभरासाठी लोक कामानिमित्ताने स्थलांतर करू लागलेत.

“स्थलांतर हे इथल्या जगण्याचं वास्तव आहे, पण ज्या घरांमध्ये बाया घाटेर विणून पैसे कमवतायत, तिथे मात्र स्थलांतर थांबलंय,” असं ३५ वर्षांच्या तैकुलम यांचं म्हणणं आहे.

Woman stitching a piece of cloth while sitting on a cot
PHOTO • Priti David
Woman sewing a piece of cloth
PHOTO • Porgai Artisans Association

तम्मीगम्मल कसिमिया (डावीकडे) आणि आर. नीला (उजवीकडे) यांनी त्यांच्या तांड्यावरच्या तरूण मुलींना ही भरतकामाची कला शिकवलीये जेणेकरून ती विस्मरणात जाणार नाही

सिट्टिलिंगीच्या दोन तांड्यावर, सत्तरी पार केलेल्या दोघी-तिघी सोडल्या तर लमाणी बायांनी (आणि गड्यांनीदेखील) सण सोडता आपले पारंपरिक पोषाख वापरणं सोडून दिलं आहे. गेल्या ३०-४० वर्षांमध्ये हळू हळू हा बदल झाला आहे. हे टप्प्याटप्प्याने घडत गेलंय. तैकुलम सांगतातः “आम्हाला फार भिन्न दिसायचं नव्हतं. विचित्र वाटायचं ते. म्हणून मग आम्ही गावातले बाकीचे लोक जसे कपडे घालतात, तसं रहायला सुरुवात केली.”

लमाणी बायांनी पारंपरिक पोषाख वापरणं सोडून दिल्यामुळे भरतकामाची गरजच भासेनाशी होऊ लागली. तिशीची एक लमाणी कलावंत आणि गम्मींची अगदी सुरुवातीची विद्यार्थिनी, ए रमणी सांगते, “माझी आजी घाटेर भरायची, पण माझ्या आईने कधीही सुई-दोरा हातात घेतला नाही, अगदी तिच्या लग्नातल्या पेहरावासाठीही नाही.”

लमाणी बायांच्या पारंपरिक पेहरावावर भरपूर भरतकाम केलेलं असतं. पेटिया म्हणजे एकरंगी रेशमी परकर, चोळी आणि दुपट्टा किंवा ओढणी. बहुतेक वेळा परकराची कंबरेकडचा काठ आणि चोळी वेगवेगळ्या सुती धाग्यांनी आणि भौमितिक आकारांमधल्या नाजूक टाक्यांनी भरलेली असते. या समुदायाचे पुरुष मात्र पांढऱ्या रंगाचे जाडे भरडे सदरे आणि धोतर नेसतात, ज्यावर कसलंही काम केलेलं नसतं.

रमणीच्या आईच्या पिढीमध्ये ही कला मागे पडत गेली असली तरी बहुतेक कुटुंबांना लग्नासारख्या सण-समारंभांमध्ये पारंपरिक पोषाखांची गरज भासायचीच. आणि हे कपडे जुने झाले होते, विरले होते. “बाया आमच्याकडे यायच्या. आणि मग आम्ही भरलेला भाग काढून तो नव्या कपड्यावर जोडून द्यायचो,” गम्मी सांगतात. या समुदायाचं आपल्या कलेशी असणारं नातं हे असं काहीसं टिकून राहिलं होतं. त्यातूनच हळू हळू या कलेचं पुनरुज्जीवन व्हायला सुरुवात झाली.

Woman showing her work
PHOTO • Priti David
Woman stitching a design
PHOTO • Priti David

तिशीची ए. रमणी गम्मींची अगदी सुरुवातीची विद्यार्थिनी. ‘मी एक पान भरलं होतं, आठ टाक्याच्या आठ ओळी – तीच माझी पहिली कमाई’

सिट्टिलिंगीमध्ये आता ६० लमाणी बाया भरतकाम करतायत, आणि या सगळ्या पोरगई कलावंत संघटनेच्या (Porgai Artisans Association) सदस्य आहेत. ही संघटना त्यांनीच सुरू केलीये आणि त्याच तिचं कामकाज पाहतात. “आमच्य भाषेत, ‘पोरगई’ म्हणजे अभिमान आणि सन्मान. आमच्या कलेचा अभिमान आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मिळणारा सन्मान,” तैकुलम सांगतात. नुकतीच त्यांची संघटनेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. “जणू काही आमचा आवाजच आम्हाला गवसलाय. आता कसं आम्ही सगळ्या एक असल्याची भावना निर्माण झालीये आणि आमच्यातल्या कलेलाही वाट मिळालीये.”

पोरगईचा पहिला एकत्रित भरतकामाचा प्रयोग सुरू झाला तो स्थानिक डॉक्टर ललिता रेजी यांच्या प्रयत्नातून. ३० वर्षांपूर्वी केरळमधून डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर लगेचच त्या सिट्टिलिंगीमध्ये रहायला आल्या आणि आपले डॉक्टर पती रेजी यांच्या सोबत त्यांनी ट्रायबल हेल्थ इनिशिएटिव्ह (टीएचआय) ही संस्था सुरू केली. अनेक लमाणी बाया त्यांच्याकडे उपचारासाठी यायच्या. त्यांना दोन गोष्टीतला विरोधाभास फार जाणवायचाः फक्त वयस्क बाया त्यांच्या भरतकाम केलेल्या पारंपरिक पोषाखात यायच्या आणि त्यांच्या रुग्णांपैकी अनेक जण शेतीतल्या कमाईत भर घालण्यासाठी म्हणून काही काळासाठी या भागातून बाहेर स्थलांतर करून जात असत. तिथे कोंदट ठिकाणी काम केल्याने आणि आहारावर निर्बंध आल्याने अनेक संसर्गजन्य आजारांची लागण होऊन ही मंडळी गावी परतत होती. “मी विचार केला, जर या तरुण मुली कमाईचं साधन म्हणून भरतकाम करायला लागल्या तर कामासाठी गाव सोडण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही,” स्त्री रोग तज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या ललिता सांगतात.

लमाणी समुदायातल्या गम्मी आणि नीला या दोघींनाच ही कला अवगत होती. गम्मींनी तर क्षणात ही कल्पना धुडकावून लावली होती. “हे विकत कोण घेणार?” त्यांना काही हे पटत नव्हतं. “आमची लोकं तरी कुठे नेसतायत!” पण ललितांना मात्र पक्का विश्वास होता आणि म्हणून त्यांनी सुरुवात करण्यासाठी टीएचआयकडून एक लाख रुपये ‘उसने’ घेतले. (कालांतराने टीएचआयने ही रक्कम पोरगईला देणगी म्हणून देऊ केली.)

ही बातमी कानोकानी झाली आणि २००६ मध्ये १० बायांनी या कामासाठी आपली नावं नोंदवली. गम्मी आणि नीलांनी या कलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या सरळ रेषा आणि घट्ट टाक्यांपासून सुरुवात केली. रमणीला आठवतंय - “आम्हाला ताकीद दिली होती की आमच्या शिक्षिकांना त्यांच्या रोजच्या कामामध्ये त्रास द्यायचा नाही, त्यामुळे मग त्या मोकळ्या झाल्या की आम्ही त्यांच्याबरोबर बसायचो. एकेक टाका नीट शिकायला मला महिनाभर लागला होता.”

A finished embroidered piece of cloth
PHOTO • Priti David
Finished tassles (latkan)
PHOTO • Priti David

सिट्टिलिंगीच्या बायांनी बनवलेल्या अनोख्या लमाणी भरतकाम केलेल्या वस्तू आता दुकानांमध्ये आणि हस्तकला प्रदर्शनांमध्ये विकल्या जातायत

लमाणी भरतकामामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण टाके आहेतः जाळी, पोथा बांधण वेळा (एखादी ओळ मधूनच तोडणे), एकसुईगाड (साधा धाव दोरा). वेगवेगळी चिन्हं, काठ, नक्षी, किनार, तुरपणी आणि मोकळ्या जागा भरण्यासाठी हे टाके वापरले जातात. लमाणी लोकांचं मूळ स्थान मानल्या जाणाऱ्या गुजरात आणि राजस्थानातल्या आरसेकामाशी साम्य असणारी तरीही वेगळी अशी ही कलाकुसर आहे.

सहा महिन्यांतच रमणी आणि इतर विद्यार्थिनी पोरगईने दिलेलं काम करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. पण वस्तू बाजारात नेणं आणि त्यांची विक्री हे सगळं सावकाश होत होतं. कलाकारांच्या मजुरीची थकबाकी द्यायला तीन वर्षं लागली, २००९ उजाडलं. त्यानंतर कुठे वेळेवर पैसे देणं शक्य होऊ लागलं.

“मी एक पान भरलं होतं, आठ टाक्यांच्या आठ ओळी – ती माझी पहिली कमाई,” रमणी अगदी अभिमानाने सांगते. ती आणि तिची नवरा त्यांच्या एकरभर शेतात ऊस आणि हळद ही नगदी पिकं घेतात आणि घरच्यासाठी तृणधान्यं, डाळी आणि भाज्या पिकवतात. घाटेरच्या उत्पन्नातून त्यांचं ट्रॅक्टरचं कर्ज फेडायला मदत झालीये (रु. २.५ लाख, महिन्याला ८,००० चा हप्ता) आणि एखाद्या वर्षी शेतात काही पिकलं नाही तरी नियमित उत्पन्नाचं एक साधन आहे हे. “माझा मुलगा धनुष्कोडी दोन महिन्यांचा होता, तेव्हा मी सुरुवात केली [आता तो १३ वर्षांचा आहे] आणि त्यानंतर मला पोटासाठी गाव सोडून दुसरीकडे जावं लागलेलं नाही.” ती खुशीने सांगते. “माझी घाटेर सतत माझ्या सोबत असते. रानाला पाणी देता देताही मी टाके भरू शकते.”

गेल्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) पोरगईने ४५ लाखांची कमाई केली. यातला मोठा हिस्सा कारागिरांच्या मानधनाचा होता. भरतकामासाठी जितका वेळ काढता येतो त्यानुसार प्रत्येक जण महिन्याला रु. ३,००० ते रु. ७,००० इतकी कमाई करते. “मी [दिवसाला] आठ तास द्यायचा प्रयत्न करते,” रमणी सांगते. “दिवसभरात नाही जमलं तर मी रात्री काम करते.”

Showcasing a design
PHOTO • Priti David
Little girl showing a design
PHOTO • Priti David
Woman showing one of her works
PHOTO • Priti David

सिट्टिलिंगीमध्ये रणजीतम जी. सारख्या (उजवीकडे) ६० बाया आता भरतकामात तरबेज झाल्या आहेत. आणि रमणीची मुलगी गोपिका (मध्यभागी) तर आतापासूनच ही कला शिकतीये

पोरगईच्या नफ्यातून बाकी कच्चा माल विकत आणला जातो – कापड, धागे आणि आरसे. संघटनेने सहा वर्षांपूर्वी शिलाई केंद्रही सुरू केलंय – संघटनेच्या कचेरीत सात शिवणयंत्रं आहेत – कारण जसजसं उत्पादन वाढू लागलं तसं त्याचे प्रकारही वाढायला लागले. उशांचे अभ्रे, पिशव्या, बटवे आणि साड्या, कुडते आणि सदऱ्यांसारख्या थोड्या जास्त काम असलेल्या वस्तू आणि चक्के दागिनेही आता दुकानांमध्ये आणि हस्तकला प्रदर्शनांमध्ये विकले जातायत.

तैकुलम म्हणतात, पोरगई सुरू झाल्यापासून त्यांच्या कुणाही सदस्याला कामासाठी गाव सोडावं लागलं नाहीये. “आम्हाला अजून काम मिळालं तर अजून जास्त बाया इथे येऊ शकतील आणि मग स्थलांतर अजून कमी होईल,” त्या म्हणतात. “जेव्हा कामासाठी बाया बाहेरगावी जातात तेव्हा कुटुंबं विस्कळित होतात, आईबाप आणि मुलांची ताटातूट होते. तासंतास काम केल्याने आणि हलाखीत राहिल्यामुळे ते परतताना अनेक दुखणी आणि आजार घेऊन येतात.”

वेगवेगळ्या हस्तकला प्रदर्शनांना हजेरी लावल्यामुळे आता पोरगईला जास्त ऑर्डर मिळू लागल्या आहेत आणि मूळ १० वरून आता सदस्यांची संख्या ६० वर पोचलीये. दर वर्षी पोरगईच्या कचेरीत नक्षीकाम आणि प्रशिक्षणाची सत्रं घेतली जातात आणि कोणीही लमाणी बाई इच्छा असेल तर या सत्रांमध्ये भाग घेऊ शकते. इतकंच नाही, या १० दिवसांच्या प्रशिक्षणाच्या काळात २०० रुपये रोजाने बायांच्या मजुरीची भरपाई केली जाते. गम्मींसारख्या अनुभवी शिक्षिकांना वरचे ५० रुपये जास्त दिले जातात. अनुभवी जाणत्या भरतकाम कारागीर म्हणून मिळणारा मान वेगळाच.

रमणीच्या गोपिकासारख्या लहानग्या लमाणी मुली आतापासूनच ही कला शिकू लागल्या आहेत. शाळेतल्या हस्तकलेच्या तासाला तिने केलेलं काम ती अगदी अभिमानाने आम्हाला दाखवते.

तर, या कलेला नवजीवन मिळालं आहे त्याबद्दल गम्मींना काय वाटतंय? “एखादं मेलेलं माणूस पुन्हा जितं झालं तर कसं वाटेल, सांगा,” त्या म्हणतात. “या कलेत आम्ही प्राण फुंकलाय बरं.”

अनुवादासाठी मदत केल्याबद्दल के. गायत्री प्रिया, अनघा उन्नी आणि अभय यांचे आभार.

अनुवादः मेधा काळे

Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale