“मी अगदी लहानपणापासूनच बंडखोर आहे. अन्यायाच्या विरोधात मी लढतो,” दलित कवी, गायक आणि क्रांतीकारक राजकिशोर सुनानी सांगतात. त्यांचं गाव, कारलागाव कलाहांडी जिल्ह्यातल्या वेदांता अल्युमिनियम शुद्धीकरण प्रकल्पापासून ११० किलोमीटरवर आहे. “मी २००२-०३ मध्ये [नियामगिरीत बॉक्साइट उत्खननाविरोधातील] चळवळीत आलो. मी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गाणी लिहायचो आणि गावोगावी जाऊन ही गाणी गाऊन चळवळीचा संदेश पोचवायचो.”

“तेव्हा मी आणि माझी पत्नी, लीलाबती गावात रहायचो आणि गाणी गायचो,” राजकिशोर सांगतात. या दोघांना लोक घरी बोलवायचे, त्यांना जेवू घालायचे, आसरा द्यायचे. सुनानी कुटुंबाची थोडीफार शेती होती, त्यात काही त्यांची गुजराण होत नसे. आदिवासींच्या कृपेनेच त्यांचं पोट भरत होतं. “मी आणि माझी बायको २००४ मध्ये वेदांताच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून तुरुंगाची हवाही खाऊन आलोय. मला तीन महिने आत टाकलं होतं आणि लीलाबतीला १ महिना. अगदी आजही, सरकार आणि खाण उद्योग एकमेकाला मिळालेले आहेत आणि दोघं मिळून जन आंदोलनं चिरडून टाकतायत.”

नियामगिरी डोंगररांगा ओडिशाच्या नैऋत्येच्या कलाहांडी आणि रायगडा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत. या डोंगररांगा म्हणजे डोंगरिया कोंढ (अनेक जण स्वतःला झरनिया कोंढही म्हणतात) या आदिम जमातीचं वसतिस्थान आहे. आता या जमातीचे केवळ ८,००० लोक आहेत, त्यांच्यासोबत या प्रदेशातल्या १०० गावांमधून इतर आदिवासी समुदायही राहतात.

शासनाचे ओडिशा खाण महामंडळ आणि स्टर्लाइट इंडस्ट्रीज (आता वेदांता) या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रकल्पाचा डोंगरिया आदिवासींनी खूप काळ विरोध केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत त्यांच्या पवित्र डोंगरांमध्ये उत्खनन करून बॉक्साइट काढलं जाणार होतं जे वेदांताच्या लांजीगढ तालुक्यातल्या शुद्धीकरण प्रकल्पात अल्युमिनियम निर्मितीसाठी वापरलं जाणार होतं.

२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियामगिरीच्या १२ गावांमध्ये घेण्यात आलेल्या जनादेशाच्या आधारे आदिवासींनी एकमताने या खाणी नाकारल्या. या आंदोलनाचं प्रमुख नेतृत्व नियामगिरी सुरक्षा समिती या आदिवासी संघटनेने केलं आणि सोबत राजकिशोर यांच्यासारखे इतरही कार्यकर्ते होतेच.

ओडिशा शासन तेव्हापासून हा जनादेश धुडकावून लावण्याचा (केविलवाणा) प्रयत्न करत आहे. इतर स्रोतांमधून बॉक्साइट मिळवून शुद्धीकरण प्रकल्प सुरूच आहे. आदिवासींच्या वंशपरंपरेने आलेल्या जमिनी आजही धोक्यात आहेतच.

Rajkishor Sunani sings a song while people gather around him to listen
PHOTO • Purusottam Thakur

फेब्रुवारी २०१८, नियामगिरीच्या उत्सवामध्ये कवी-क्रांतीकारक राजकिशोर सुनानी

‘जगाचं पर्यावरण काही अंशी का होईना अशा चळवळी आणि आंदोलनंच टिकवून ठेवतायत. नाही तर सगळ्याचा विनाश झाला असता,’ सुनानी म्हणतात, आपल्या डफलीवर (धाप) थाप मारत इथल्या डोंगरांचं सौंदर्य गाण्यातून व्यक्त करतात

या वर्षी नियामगिरीच्या पठारांवरच्या अनलाभाता गावात सुगीच्या उत्सवात माझी राजकिशोर यांच्याशी गाठ पडली. डोंगराळ भागात सहा किलोमीटर अंतर पार करून ते इथे पोचले होते. दर वर्षी २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान नियाम राजाच्या (दाता राजा) नावाने हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि शेवटच्या दिवशी सकाळी जेव्हा कार्यकर्ते जन आंदोलनांमधले त्यांचे अनुभव सांगत होते, तेव्हा राजकिशोर यांनी गाणी गायला सुरुवात केली. आणि त्यांची गाणी सुरू होताच जास्त लोक जमा व्हायला लागले.

ते एकदम जीव ओतून गातात, त्यांच्या डफलीची थाप ऐकली की मोठा जमाव गोळा होतो. नियामगिरीच्या आंदोलनाव्यतिरिक्त त्यांनी इतर लढ्यांसाठीही गाणी लिहिली आहेत. उदा. बारगाह जिल्ह्यातील गंधमर्दन पर्वतरांगांमधल्या भारत अल्युमिनियम कंपनीच्या (बाल्को) बॉक्साइट खाणींविरोधातील आंदोलन, इ.

पंचावन्न वर्षांचे राजकिशोर गेल्या दोन दशकांपासून गायक-कार्यकर्ते म्हणून काम करतायत. ते समाजवादी जनपरिषदेचेही सदस्य आहेत (समाजवादी नेते किशन पट्टनायक यांनी हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे), या पक्षाने नियामगिरी आणि ओडिशातल्या इतर गावांतल्या जन आंदोलनांना पाठिंबा दिला आहे.

मी त्यांना विचारलं – तुम्ही या लढ्यांमध्ये सामील आहात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? “जगाचं पर्यावरण काही अंशी का होईना, या चळवळीच टिकवून ठेवतायत,” ते म्हणतात. “नाही तर आतापर्यंत सगळ्याचा विनाश झाला असता.” आणि हे असं होऊ नये म्हणून ते डफलीवर थाप मारतात आणि या डोंगरांचं सौंदर्य सांगणारं एक गाण गाऊ लागतात. या चित्रफितीत त्यांना गाताना पहा (गाण्याचा अर्थ खाली दिला आहे)

व्हिडिओ पहाः सुनानींचं नियामगिरीचं गाणं

डोंगर, झरे, जंगल आम्ही कधीच सोडून जाणार नाही
आम्ही लढणं थांबवणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर
मित्रांनो, आम्ही कधीच लढणं थांबवणार नाही

डोंगर आणि झरे आहेत आमचा भगवान
ही जमीन, फळा-फुलांनी समृद्ध, जसा कुबेर
मित्रांनो, डोंगर, झरे, जंगल आणि जमीन आमचा हा भगवान
(‘भ’ म्हणजे भूमी, ‘ग’ म्हणजे गगन, ‘वा’ म्हणजे वायू आणि ‘न’ म्हणजे नीर – पाणी – असा हा ‘भगवान’)

माती, पाणी, पवन आणि अग्नी या आकाशीच्या देवता
देवता अशा ज्या कायम देणाऱ्या देवता,
याच तर खऱ्या आमच्या जगण्याच्या देवता

ही माती आम्हाला देते हिरवाई, झाडं आणि कंद आणि फळं
या नभातून मिळतो पाऊस आणि झऱ्यांचं पाणी
पाणी जणू काही आईचा पान्हा
हा पान्हाच आमची भागवतो तहान
मित्रांनो, डोंगर, झरे, जंगल आणि जमीन आमचा हा भगवान

तुम्ही राहत असाल सोडून तुमच्या देवांना
पण आमच्या देवांशिवाय अर्थच नाही आमच्या जीवनाला

खरं खोटं नाही आम्हाला तरी काय ठाऊक
पण निसर्गाशिवाय जगणार तरी कसं सांगा?

आणि शेवटी खरं आहे ते केवळ विज्ञान
विज्ञानाची कास धरा, असत्याला नका देऊ स्थान
डोंगर, झरे, जंगल जमीन या आमच्या इष्ट देवता

जीव-जंतू, फळा-फुलांनी भरली आहे सारी धरतीमाता
हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही कुणी
प्रकृतीची पूजा करणारे आम्ही आदिवासी भाऊ-बहिणी
मानतो आम्ही स्त्री आणि पुरुष समान
मित्रांनो, आम्हाला आमचं स्वातंत्र्य प्यारं आहे मनोमन

मित्रांनो, कंपनी आणि सरकार मात्र करत आहेत दमन
जल, जंगल, जमिनीचं आम्ही करू संरक्षण

पर्यावरणाचा विनाश झाला तर मात्र सगळ्यांनाच येईल मरण
शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळे एकत्र येतील
जर सगळंच लुटून नेलं तर कोण जिवंत राहतील

सरकारा, तुझ्या बंदुकी, लाठ्या आणि कोठड्यांना आम्ही घाबरत नाही
आमच्य मायभूसाठी लढायला आम्ही मागे पाहणार नाही
आदिवासी, कष्टकऱ्यांनो सगळे एक व्हा
आम्ही, इथले भूमीपुत्र गप्प नाही बसणार
आमचा हा संघर्ष असाच चालू राहणार

मित्रांनो, शांती आणि मुक्ती – आम्ही मिळवणार
मित्रांनो, आमच्या अधिकारांसाठी आम्ही लढा देणार
मित्रांनो, हाकलून द्या या कंपन्या आणि सरकार
मित्रांनो, डोंगर, झरे, जंगल जमीन आमचा हा भगवान

अनुवादः मेधा काळे

Purusottam Thakur

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker and is working with the Azim Premji Foundation, writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale