“आम्हाला करोनाबद्दल माहितीये, पण आम्ही कामं थांबवू शकत नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्या रानात काम करावंच लागतं. शेतकऱ्यासाठी आणि आमच्यासाठी शेती ही एकमेव आशा आहे. आम्ही काम केलं नाही, तर आमचं कसं काय भागावं?”

शुभद्रा ठेकेदारीण आहे. तिच्या हाताखाली ३० बाया आहेत, सगळ्या शेतमजूर. छत्तीसगडच्या धमतरीहून पाच किलोमीटरवर बलियारा म्हणून गाव आहे, तिथल्या.

२० जुलैच्या आसपास कधी तरी आमची त्यांची गाठ पडली. भातशेतीच्या मधून जाणाऱ्या एका वाटेवर. एका ट्रॅक्टरनी त्यांनी तिथे आणून सोडलं होतं. त्या एका शेतातून दुसऱ्या शेतात कामाला निघाल्या होत्या. लगबगीत होत्या – भातरोपांची लावण सूर्यास्ताच्या आत उरकायची होती.

“एकरी ४,००० रुपये आम्हाला मिळतात,” शुभद्रा सांगते, “आम्ही सगळ्या मिळून रोज दोन एकरावर भातलावणी करतो.” म्हणजे गटातल्या प्रत्येकीला २६० रुपये रोज.

खरिपाच्या भाताची लागवड सध्या सुरू आहे. आणि आम्ही त्यांना भेटलो तोपर्यंत त्यांची २०-२५ एकरात लावणी करून झाली होती. आणखी काही दिवस हे काम सुरू राहणार आहे.

woman working the farm
PHOTO • Purusottam Thakur

शुभद्रा साहू, बलियारा गावची मजूर आणि ठेकेदारीणः ‘आम्ही काम नाही केलं तर आमचं कसं भागावं?’

जुलैच्या मध्यावर असंच एकदा, कोलियारी-खरेंगा गावच्या रस्त्यावर, घमतरीहून सुमारे १५ किलोमीटरवर, आम्ही शेतमजुरांच्या आणखी एका टोळीला भेटलो. “आम्ही काम केलं नाही, तर आम्ही उपाशी मरू. [कोविड-१९ चा धोका आहे म्हणून] घरीच बसून राहण्याची चैन आम्हाला परवडण्यासारखी नाही,” धमतरी तालुक्यातल्या खरेंगा गावची भुखीन साहू सांगते. २४ जणांच्या टोळीची ती प्रमुख, ठेकेदारीण आहे. “आम्ही कष्टकरी आहोत. आमच्यापाशी केवळ हात आणि पाय आहेत. पण काम करताना आम्ही एकमेकांत अंतर ठेवतोय...”

ती आणि इतर सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसल्या होत्या. घरनं आणलेला डाळ-भात आणि भाजी असं जेवण सुरू होतं. त्या पहाटे ४ वाजता उठतात, स्वयंपाक करतात, घरची काम उरकतात, सकाळची न्याहरी करून ६ वाजेपर्यंत शेतात पोचतात. १२ तासांनी, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्या घरी परततात. त्यानंतर परत स्वयंपाक आणि इतर कामं, भुखीन तिच्या आणि इतर बायांच्या दिनक्रमाबद्दल सांगते.

“आम्ही रोज दोन एकर भातलावणी करतो आम्हाला एकरी ३,५०० रुपये मिळतात,” भुखिन सांगते. एकरी किती मजुरी मिळते त्याचा दर ३,५०० ते ४,००० (धमतरीमध्ये यंदाच्या हंगामात) असा असतो. अर्थात टोळीत किती जण आणि त्या कशा प्रकारे वाटाघाटी करतात त्यावरही ही रक्कम ठरते.

भुखीनचा नवरा काही वर्षांपूर्वी भोपाळला मजुरीसाठी म्हणून गेला तो परतलाच नाही. “तो आम्हाला इथे गावी सोडून गेला. त्याचा आमच्याशी काहीच संपर्क नाहीये,” ती सांगते. तिचा मोठा मुलगा कॉलेजला आहे आणि त्या दोघांचं पोट भरण्याचा एकमेव स्रोत म्हणजे भुखिनची मजुरी.

त्याच मार्गावर आम्हाला मजुरांची आणखी एक टोळी भेटली. बहुतेक बायाच, काही गडी. खाचरात लावण करायला भाताची रोपं घेऊन निघाले होते. “यातनंच आमचं पोट भरतंय. त्यामुळे आम्हाला काम करावंच लागतं. आम्हीच काम केलं नाही तर पिकवणार कोण? प्रत्येकाच्याच पोटाला खाणं पाहिजे ना,” सबिता साहू म्हणते. धमतरी तालुक्याच्या दर्री गावातली ती ठेकेदारीण आहे. “आम्ही करोनाला घाबरून बसलो तर आम्हाला कामच करता येणार नाही. मग आमच्या लेकरांना खायला कोण घालील? तसंही आमचं कामच असं असतं की [भाताच्या खाचरात] एकमेकांपासून अंतर राहतंच.” मी त्यांना भेटलो तेव्हा जुलैच्या मध्य उजाडला होता. सबिता आणि तिच्या टोळीतल्या ३० जणांनी २५ एकरात भातलावणी केली होती. एकरी ३,६०० रुपये मजुरीवर.

Bhukhin Sahu from Karenga village tells me, 'We are labourers and we have only our hands and legs...'
PHOTO • Purusottam Thakur

करेंगा गावातील भुखीन साहू सांगते, ‘आम्ही कष्टकरी आहोत आणि आमच्यापाशी हे हात आणि पाय तेवढे आहेत...’

“[लॉकडाउन एकदम कडक होता, तेव्हा] काही कामंच नव्हती. त्या वेळी सगळंच ठप्प झालं होतं. आणि मग खरीप आला आणि आम्ही परत एकदा कामाला लागलोय,” खरेंगा गावच्याच शेतमजूर हिराउंदी साहू सांगतात.

साधारणपणे २० जुलैपर्यंत, देशाच्या कानाकोपऱ्यातून धमतरी जिल्ह्यात अंदाजे १,७०० लोक परत आले असावेत, धमतरीच्या श्रम विभागातले एक अधिकारी मला सांगतात. यात विद्यार्थी, काम सुटलेले लोक आणि सुमारे ७०० मजूर होते. आतापर्यंत छत्तीसगडमध्ये कोविड-१९ च्या १०,५०० केसेस निघाल्या आहेत. धमतरीचे आरोग्य आणि वैद्यकीय प्रमुख, डॉ. डी. के. तुरे सांगतात की जिल्ह्यात आतापर्यंत कोविड-१९ च्या पक्कं निदान झालेल्या ४८ केसेस आहेत.

हिरौंदीच्याच टोळीत दर्री गावची चंद्रिका साहू देखील होती. तिला दोघी मुली आणि एक मुलगा आहे. एक जण कॉलेजला आहे आणि बाकी दोघं दहावीत आणि बारावीत शिकतायत. “माझा नवरा देखील मजुरी करायचा. पण एक दिवस त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय मोडला,” ती सांगते. “त्यानंतर त्याला काम करता येईना आणि मग तीन वर्षांपूर्वी त्याने स्वतःचा जीव घेतला.” चंद्रिका आणि तिची तिन्ही मुलं तिच्याच कमाईवर अवलंबून आहेत. तिला महिन्याला ३५० रुपये विधवा पेन्शन मिळते आणि या कुटुंबाकडे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठीचं रेशन कार्ड आहे.

आम्हाला भेटलेल्या सगळ्या मजुरांना कोविड-१९ विषयी माहिती होती. काही जण म्हणाले की त्यांना फारशी फिकीर नाही तर बाकीच्यांनी सांगितलं की तसंही ते एकमेकांपासून लांब उभं राहूनच काम करतात. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. “तसंही आम्ही थेट उन्हात काम करतोय, त्यामुळे आम्हाला करोना होण्याची शक्यता कमीच आहे,” सबिताच्या टोळीतला मजूर भुजबल साहू म्हणतो. “एकदा का तुम्हाला तो झाला, की तो तुमचा जीव घेणार,” तो म्हणतो. “पण आम्ही त्याला घाबरत नाही कारण आम्ही कष्टकरी आहोत.”

भाताची आवणी आणि लावणी सुमारे १५ दिवस सुरू राहणार आहे. “त्यानंतर काहीही काम मिळणार नाही.” या जिल्ह्यात धमतरी आणि कुरुड या दोनच तालुक्यात थोड्या फार सिंचनाच्या सोयी आहेत, त्यामुळे शेतकरी वर्षातून दोनदा भातलावणी करू शकतात. आणि दोन्ही हंगामात शेतात काम मिळतं. “पण आम्हाला आणखी काम हवंय,” भुजबल सांगतो.

Labourers from Baliyara village, not far from Dhamtari town, on their way to paddy fields to plant saplings
PHOTO • Purusottam Thakur

धमतरीपासून जवळच असणाऱ्या बलियारा गावचे मजूर भाताच्या खाचरात रोपांची लावण करायला निघालेत

'Everyone needs food to eat', said Sabita Sahu', a contractor from Darri village. 'If we will fear corona, we will not able to work'
PHOTO • Purusottam Thakur

‘प्रत्येकाच्याच पोटाला खायला लागतं,’ दर्री गावची ठेकेदारीण, सबिता साहू म्हणते. ‘आम्ही करोनाला घाबरत बसलो, तर आम्ही कामच करू शकणार नाही’

'We earn 4,000 rupees per acre, and together manage to plant saplings on two acres every day'
PHOTO • Purusottam Thakur

‘आम्ही एकरी ४,००० रुपये कमावतो आणि सगळे मिळून दिवसाला दोन एकरात लागवड करतो’

That’s a daily wage of around Rs. 260 for each labourer in the group
PHOTO • Purusottam Thakur

म्हणजे टोळीतल्या प्रत्येकीला २६० रुपये रोज

All the labourers we spoke too knew about Covid-19; some said they didn’t care, others said that while working they anyway stood at a distance from each other, so it was fine
PHOTO • Purusottam Thakur

आम्ही बोललो त्या सगळ्या मजुरांना कोविड-१९ बद्दल माहित होतं. काही जण म्हणाले की त्यांना त्याची फिकीर नाही तर काहींचं म्हणणं होतं की ते काम करताना तसंही एकमेकांपासून लांबच थांबतात, त्यामुळे चिंतेचं कारण नाही

The sowing and planting of paddy would continue for roughly 15 days (after we met the labourers in July)
PHOTO • Purusottam Thakur

भाताची पेरणी आणि लावण अजून १५ दिवस तरी सुरू राहील (जुलैमध्ये आमची या मजुरांशी भेट झाली त्यानंतर)

Bhukhin Sahu and the others were sitting on the road and eating a lunch of rice, dal and sabzi, which they had brought from home. They wake up at 4 a.m., compete household tasks, have a morning meal and reach the field at around 6 a.m.
PHOTO • Purusottam Thakur

भुखिन साहू आणि बाकी बाया रस्त्याच्या दुतर्फा बसून घरनं आणलेला डाळ भात आणि भाजी खात होत्या. त्या पहाटे ४ वाजता उठतात, घरची कामं उरकतात, न्याहरी करतात आणि सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेतात पोचतात

That’s a daily wage of around Rs. 260 for each labourer in the group
PHOTO • Purusottam Thakur

त्यानंतर १२ तास सलग काम – इथे शेतमजूर भाताची रोपं खाचरात नेतायत – संध्याकाळी ६ वाजता घरी परतेपर्यंत

अनुवादः मेधा काळे

Purusottam Thakur

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker and is working with the Azim Premji Foundation, writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale