तर, आज, पुन्हा एकदा पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया जागतिक अनुवाद दिन हा अनोखा दिवस साजरा करतंय. आणि फक्त एक दिवसच नाही तर आमच्या अनुवादकांच्या चमूचे कष्टही. कारण आमच्या मते पत्रकारितेच्या क्षेत्रात हा असा गट दुसऱ्या कोणत्याच वेबसाइटकडे नाहीये. माझ्या मानण्यानुसार पारीची वेबसाइट जगभरातली सर्वात जास्त भाषांमध्ये काम करणारी वेबसाइट आहे. जर कुणाचं दुमत असेल तर माझं म्हणणं जरुर खोडून काढावं. आमच्याकडे १७० अनुवादक इतकं जबरदस्त काम करतात की आज पारी १४ भाषांमध्ये आपलं काम प्रकाशित करू शकतंय. अर्थात काही माध्यमसमूह अगदी ४० भाषांमध्ये देखील काम करतात, मान्य आहे. पण त्यतही भाषांमध्ये एक उतरंड असतेच. काही भाषां इतर भाषांच्या तुलनेत समसमान मानल्या जात नाहीत.

शिवाय, प्रत्येक भारतीय भाषा तुमची स्वतःची भाषा आहे हेच आमचं तत्त्व असल्याने सगळ्या भाषा आमच्यासाठी सारख्या आहेत. कोणताही लेख एका भाषेत प्रकाशित झाला तर तो सर्वच्या सर्व १४ भाषांमध्ये अनुवादित होतोय यावर आमचा विशेष भर आहे. या वर्षी पारीच्या या भाषापरिवारात छत्तीसगडी सामील झाली आहे आणि भोजपुरीचाही समावेश लवकरच केला जाणार आहे.

भारतीय भाषांचा पुरस्कार करणं हे संपूर्ण समाजाच्या हिताचं आहे असं आम्ही मानतो. आपल्या देशात इतक्या भाषा बोलल्या जातात की दर बारा मैलावर भाषा बदलते असं म्हणतात.

पण एवढ्यावर खूश राहून चालणार नाही. आपल्या देशात आजही ८०० भाषा बोलल्या जातात असं पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियामधून दिसून असलं तरी गेल्या ५० वर्षांत यातल्या २२५ भाषा संपल्या आहेत. हे शतक संपेल तोपर्यंत या जगातल्या ९०-९५ टक्के भाषा अस्तंगत झाल्या असतील असं संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे. आणि आजही दर दोन आठवड्याला या जगातली एक भाषा विस्मृतीत जातीये. अशा काळात आपण राहतोय.

हाच लेख  ऐका आणि भारतीय साइनमध्ये पहा. भाषा, अनुवाद आणि वैविध्याच्या कक्षा रुंदावत खुणांची भाषाही आम्ही समाविष्ट करत आहोत

एखादी भाषा मरते तेव्हा तिच्यासोबत आपल्या समाजाचा एक भाग, संस्कृतीचा छोटा तुकडा आणि इतिहासाचं एक पान गळून पडतं. एखादी भाषा अस्तंगत होते तेव्हा तिच्यासोबत संपून जातात आठवणी, मिथकं, गाणी, गोष्टी, कला, नाद, मौखिक परंपरा आणि जगण्याची रीतही. एखादा समूह जगाशी कसा भिडतो, कसा जोडून घेतो, त्या समूहाची ओळख आणि मानही भाषेसोबत विझून जाते. एखाद्या देशाच्या भाषा संपणं म्हणजे त्या देशातलं शेवटच्या घटका मोजणारं वैविध्य संपून जाणं. आपल्या भाषा टिकल्या तर आपल्या जीविका, परिसंस्था आणि लोकशाही टिकून राहणार आहे. आणि या भाषांसोबत येणारी विविधता आजइतकी महत्त्वाची कधीच नव्हती. आणि आजइतकी संकटातही कधी नव्हती.

कविता, कथा आणि गाण्यांमधून पारी भारतीय भाषा साजऱ्या करते. या भाषांच्या अनुवादातून त्यांचं सौंदर्य टिपते. भारताच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम डोंगरदऱ्यात राहणाऱ्या, परिघावरचं आयुष्य जगणाऱ्या अनेक लोकांनी पारीसाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी लिहिल्या आहेत. त्याही आपल्या स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या बोलीत. आमचे अनुवादक या कथा-कविता-गाणी आपापल्या भाषेत आणि लिपीत ही रत्नांची खाण उघडत जातात, नवनव्या प्रांतात, या गोष्टींच्या उगमस्थानापासून दूर या गोष्टी पोचवतात. भारतीय भाषांमधून इंग्रजीत असा काही हा एकतर्फी प्रवास नसतो. पारीवरती आम्ही या भाषा जोपासतो कारण आम्हाला वैविध्य जोपासायचं आहे.

आज आमच्या अनुवादकांच्या गटाने आपापल्या भाषेच्या खजिन्यातलं एक रत्न आपल्यासाठी शोधून आणलं आहे. या देशाची भाषिक आणि सांस्कृतिक श्रीमंती आणि वैविध्य कसं आहे त्याची एक झलक आपल्याला आसामी, बंगाली, छत्तीसगडी, हिंदी, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि ऊर्दूमध्ये ऐकायला मिळेल.

इथे मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि कार्यकर्ते वसंत बापट यांची एक लोकप्रिय कविता आपण ऐकणार आहोत. या देशाचा वारसा आणि संस्कृती जपत असतानाच, या विश्वासाठी स्वतःचे बाहू पसरत असतानाही स्वतःच्या मायभूमीतल्या, मातीतल्या नद्या, डोंगरदऱ्या आणि लोककलांनी कवीचा ऊर भरून येतो. एक देश-एक संस्कृतीच्या आरोळ्यांमध्ये स्वतःच्या भूमीवरचं हे प्रेम समजून घ्यायला हवं.

वसंत बापट यांची ‘केवळ माझा सह्यकडा’ , वाचनः मेधा काळे


केवळ माझा सह्यकडा

भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगा-यमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक् तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्याला खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा ।।१।।

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनी जनार्दन बघणारा तो ‘एका’ हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी, जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तीची पेठ फुले ।।२।।

रामायण तर तुमचे माझे, भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयात परंतु बाजीची बाजी सुचते


अभिमन्यूचा अवतारच तो ऐसा माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते बोल अजुनि हृदयामाजीं
बच जाये तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचे रुसवेफुगवे, घ्या सारा नाजुक नखरा
माझ्यासाठी, राहील गाठीं, मरहट्ट्याचा हट्ट खरा ।।३।।

तुमचे माझे ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते, परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन् मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खरा तो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनि जाते
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासाशी दृढ नाते।।४।।

कळे मला काळाचे पाउल दृत वेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे अंतर क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची खुशाल हीं राहोत खुली
मज गरिबाची कांबळवाकळ सकलांसाठी अंथरली
मात्र भाबड्या हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी, मुक्त करुनि झंझावा
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारु निमिषांत।।५।।

कवीः वसंत बापट

स्रोत: https://balbharatikavita.blogspot.com/2011/11/blog-post_07.html

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Illustration : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale