आजचा दिवस म्हणजे पारीचं विलक्षण असं अनुवादकार्य साजरं करण्याचा दिवस आहे. अनुवादकांचा आमचा तब्बल १७० जणांचा गट आहे, ज्यातले किमान ४५ जण मिळून दर महिन्यात १३ भाषांमध्ये काम करतायत. आम्ही अगदी योग्य पावलं टाकत, योग्य दिशेने निघालो आहोत. याची साक्ष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ३० सप्टेंबर रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन .

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणतो, हा दिवस “भाषाविषयक काम करणाऱ्या सगळ्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. राष्ट्रांना एकत्र आणण्यात, संवाद, समज आणि सहकार्य वृद्धींगत करण्यात आणि विकासामध्ये सहयोग देण्यात त्यांचं काम मोलाचं आहे...” शिवाय इतरही बरंच काही. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या अनुवादक गटाचं अभिनंदन करतोय. पत्रकारितेच्या कोणत्याही वेबसाइटपाशी ही अशी टीम नाही.

कोण आहेत हे अनुवादक? डॉक्टर, इंजिनियर, भौतिकशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ, गृहिणी, शिक्षक, कलावंत, पत्रकार, लेखक, विद्यार्थी आणि प्राध्यापक असे सगळे. सर्वात ज्येष्ठ अनुवादक आहेत ८४ वर्षांच्या आणि सगळ्यात तरुण केवळ २२. काही जण भारताच्या बाहेर आहेत. काही जण देशाच्या दुर्गम कानाकोपऱ्यांमध्ये. जिथे नेटवर्कसुद्धा व्यवस्थित मिळत नाही.

पारीवरचं अनुवादाचं हे विलक्षण काम या देशातल्या सगळ्याच भाषांना समान आदर आणि समान वागणूक मिळावी या उद्देशाने सुरू आहे. पारीवरचा प्रत्येक लेख जवळपास १३ भाषांमध्ये उपलब्ध आहे – नसलाच तरी लवकरच असेल. आता हीच गोष्ट पहा – आपल्या स्वातंत्र्यांसाठी संघर्षरत भगत सिंग झुग्गियां - १३ भाषांमध्ये अनुवादित. आणि आमच्या अनुवादकांनी आजवर ६,००० लेख अशाच प्रकारे अनुवादित केले आहेत. आणि यातल्या अनेकांमध्ये बहुविध माध्यमांचा वापर केला आहे.

पी. साईनाथ लिखित 'प्रत्येक भारतीय भाषा ही तुमची स्वतःची भाषा आहे' - वाचनस्वर - मेधा काळे

भारतीय भाषा पारीसाठी फार मोलाच्या आहेत – त्या तशा नसत्या तर आम्ही केवळ इंग्रजीवर लक्ष केंद्रित करून त्याच भाषेत अधिकाधिक मजकूर प्रकाशित करण्याचा मार्ग स्वीकारला असता. पण असं  करून, इंग्रजीचा गंध नसणाऱ्या भारतातल्या बहुसंख्यांना मात्र आम्ही आमच्यापासून दूर लोटलं असतं. भारतीय भाषांच्या जनसर्वेक्षणानुसार भारतात आजही ८०० भाषा बोलल्या जातायत. आणि गेल्या ५० वर्षांत ५० भाषा विरून गेल्या आहेत. आमच्या मते भारताच्या बहुरंगी आणि बहुढंगी संस्कृतीचा गाभा म्हणजे इथल्या अनेकानेक भाषा. शिवाय माहिती आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार केवळ इंग्रजी येणाऱ्यांच्याच हाती नाही हाही आमचा ठाम विश्वास आहेच.

अर्थात बीबीसीसारख्या मोठ्या माध्यम संस्थाही ४० हून अधिक भाषांमध्ये वार्तांकन करतात. पण अनेकदा भाषांनुसार मजकूर वेगवेगळा असल्याचं दिसतं. भारतातही काही कॉर्पोरेट मालकीच्या वाहिन्या एकाहून अधिक भाषांमध्ये मजकूर प्रकाशित करत असतात. पण त्या वाहिन्याही १२ भाषांच्या पलिकडे गेलेल्या नाहीत.

पारीसाठी मात्र अनुवादाचं काम हा एक स्वयंपूर्ण कार्यक्रम आहे. पारीवर इंग्रजीत प्रकाशित झालेल्या प्रत्येक मजुकाराचा १२ भाषांमध्ये अनुवाद होतो. आणि या अनुवादित आवृत्त्या अगदी त्वरित प्रकाशित होतायत. या प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्र संपादक आहेत आणि लवकरच छत्तीसगडी आणि संथाली भाषांचाही आम्ही समावेश करणार आहोत.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर पारीसाठी अनुवाद म्हणजे केवळ इंग्रजीचं दुसऱ्या भाषेत रुपांतरण नाही. इंग्रजीत जे प्रकाशित झालंय ते इतर भाषांमध्ये सांगणं इतकंच ते मर्यादित नाही. आपल्या परिचयाच्या नसणाऱ्या अनेक संदर्भांच्या गाभ्यापर्यंत पोचण्याचं काम हे अनुवाद करतायत. आमचे अनुवादक भारताच्या विविध बोली आणि भाषांमधून भारत ही कल्पना आपापल्या परीने मांडण्याचा, तीत भर घालण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच आमच्यासाठी अनुवाद म्हणजे एका भाषेचा शब्दसंग्रह दुसऱ्या भाषेत आणणे इतकंच ते संकुचितही नाही. गुगल-ट्रान्सलेट वापरून केलेले विनोदी अनुवाद याचं उत्तम उदाहरण आहेत. एखादी कथा अनुवादित करत असताना तिचं मर्म, तिचा संदर्भ, सांस्कृतिक पैलू, म्हणी आणि मुळात ती कथा जिथली आहे त्या भाषेतले बारकावे अनुवादात आणण्याचा आमचे अनुवादक प्रामाणिक प्रयत्न करत असतात. प्रत्येक अनुवादकाचा प्रत्येक अनुवाद दुसऱ्या कुणी तरी तपासून त्यातल्या चुका दुरुस्त करण्याचा, तो अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला जातो.

पारीवरील अनुवादांमुळे विद्यार्थ्यांना विविध भाषांमध्ये लेख वाचता येतात. यातून त्यांची भाषिक कौशल्यं वाढायला निश्चितच मदत होते

आमचा सर्वात नवीन उपक्रम – पारी एज्युकेशन सुद्धा आता वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये लेखन प्रकाशित करू लागलाय. ज्या समाजात इंग्रजीवर प्रभुत्व म्हणजे यशाची गुरुकिल्ली अशी धारणा आहे किंबहुना इंग्रजी येणं हे जणू एक अस्त्र बनू पाहतंय त्या काळात एकच लेख अनेक भाषांमध्ये वाचता येणं फारच महत्त्वाचं आहे. ज्यांना महागड्या शिकवण्या लावून भाषा शिकणं शक्य नाही अशा अनेक विद्यार्थ्यांना आपलं इंग्रजी सुधारण्यासाठी या अनुवादांचा उपयोग होत असल्याचं दिसून आलंय. आपल्या मातृभाषेत एखादा लेख वाचायचा आणि त्यानंतर तोच इंग्रजीत (किंवा हिंदी, मराठी... जी भाषा शिकायची आहे तीत) वाचायचा. आणि हे सगळं विनाशुल्क, मोफत. पारीवर येण्यासाठी कोणतीही नोंदणी फी नाही, किंबहुना पारीवरील मजकूर वाचण्यासाठी, वापरण्यासाठी देखील कसलंही शुल्क आकारलं जात नाही.

पारीवर तुम्हाला ३०० हून अधिक मुलाखती, चित्रफिती आणि बोधपट पहायला मिळतील, जे विविध भाषांमध्ये चित्रित केले आहेत आणि आता इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये त्यांची सबटायटल्स उपलब्ध आहेत.

इतकंच नाही पारीची संपूर्ण साइट स्वतंत्रपणे पाच भाषांमध्ये – बंगाली, हिंदी, ऊर्दू, मराठी आणि ओडिया – उपलब्ध आहे. लवकरच तमिळ आणि आसामीमध्येही पारीची पूर्ण साइट तुम्हाला वाचता येईल. शिवाय समाजमाध्यमांमध्येही आमचा इंग्रजीपलिकडे हिंदी, ऊर्दू आणि तमिळमध्ये वावर आहे. या कामासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्यांचा वेळ देऊ केला तर इतर भाषांमध्येही आम्ही समाजमाध्यमांवर येऊ शकू.

या कामाची व्याप्ती अधिकाधिक वाढावी यासाठी सर्वांनाच एकच सांगणं आहे, तुमचा वेळ आणि तुमचं अर्थसहाय्य आमच्यासाठी फार मोलाचं आहे. विशेषतः अस्तंगत होऊ घातलेल्या भाषा हा आमचा आगामी उपक्रम सुरू करण्यासाठी तर नक्कीच. भारतातली प्रत्येक भाषा ही आपली स्वतःची भाषा आहे असा विचार तर करून पहा.

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Illustrations : Labani Jangi

Labani Jangi is a 2020 PARI Fellow, and a self-taught painter based in West Bengal's Nadia district. She is working towards a PhD on labour migrations at the Centre for Studies in Social Sciences, Kolkata.

Other stories by Labani Jangi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale