मंचावर मुन्शी बाबूंच्या हस्ते आज त्याला बक्षीस मिळणार होतं. या मुन्शीजींच्या अखत्यारीत अनेक शाळांचा कारभार असायचा. आणि बक्षीस म्हणजे एक नवा कोरा पैसा. १९३९ सालच्या पंजाबातली गोष्ट आहे. त्या ११ वर्षांच्या चिमुकल्याने तिसऱ्या इयत्तेत पहिला क्रमांक पटकावला होता. मुन्शी बाबूंनी त्याच्या डोक्यावर थापटलं आणि त्याला म्हणाले आता म्हण, ‘ब्रिटेनिया जिंदाबाद, हिटलर मुर्दाबाद.’ ज्येष्ठ क्रांतीकारक भगत सिंगांचंच नाव असणाऱ्या या छोट्याशा भगत सिंगने प्रेक्षकांकडे तोंड केलं आणि तो मोठ्याने ओरडलाः “ब्रिटेनिया मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद.”

या आगाऊपणाचा परिणाम लगेच झाला. मुन्शीबाबूंनी तिथेच त्याला झोडपून काढलं आणि समुंद्राच्या सरकारी प्राथमिक शाळेतून त्याची हकालपट्टी झाली. तिथे असलेल्या बाकीच्या विद्यार्थ्यांची हे पाहून वाचाच गेली आणि त्यांनी तिथून धूम ठोकली. आताच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांसारख्या तत्कालीन स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी उपायुक्तांच्या मान्यतेचं पत्र दिलं. हा इलाका आता पंजाबच्या होशियारपूरमध्ये येतो. पत्रात त्याच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं आणि त्याचं वर्णन ‘धोकादायक’ आणि ‘क्रांतीकारी’ असं करण्यात आलं होतं. वय वर्ष ११.

याचा एकच अर्थ होता कोणतीच शाळा आता काळ्या यादीत टाकलेल्या भगत सिंग झुग्गियांला आपल्या शाळेत प्रवेश देणार नव्हती. तशाही फारशा शाळा आसपास नव्हत्याच. त्याच्या आई-वडलांनी आणि इतरही अनेकांनी हा निर्णय मागे घ्या म्हणून अधिकाऱ्यांन्या विनवण्या केल्या. मोठ्या लोकांमध्ये ऊठबस असणारे जमीनदार गुलाम मुस्तफा यांनी देखील त्यांच्या परीने सर्व प्रयत्न करून पाहिले. पण इंग्रज राजवटीचे चमचे खवळले होते. एक चिमुरड्या पोराने त्यांच्या अतिथीचा अपमान केला होता. नंतर भगत सिंग झुग्गियां अतिशय रंजक आयुष्य जगले, जगतायत. पण त्यांनी शाळेची पायरी मात्र त्यानंतरच कधीच चढली नाही.

आज, वयाच्या ९३ व्या वर्षी देखील बिनभिंतीच्या, आयुष्याच्या शाळेचे मात्र ते अव्वल ठरले आहेत.

होशियारपूर जिल्ह्याच्या रामगड गावी आपल्या घरी ते आमच्याशी बोलत होते. तो सगळा प्रसंग आठवून सांगताना त्यांना हसू फुटतं. त्यांना त्या सगळ्या प्रकरणाबद्दल वाईट नाही वाटलं? तर, ते म्हणतात, “मला इतकंच वाटत होतं – आता मी बिनधास्त इंग्रजविरोधी लढ्यात सामील होऊ शकतो.”

Bhagat Singh Jhuggian and his wife Gurdev Kaur, with two friends in between them, stand in front of the school, since renovated, that threw him out in 1939
PHOTO • Courtesy: Bhagat Singh Jhuggian Family

१९३९ साली ज्या शाळेतून त्यांना काढून टाकलं होतं, तिच्यापुढे उभे असलेले भगत सिंग झुग्गियां आणि त्यांच्या पत्नी गुरदेव कौर, आपल्या दोन मित्रांसोबत

त्यांचा इरादा काही लपून राहिला नव्हता. सुरुवातीला ते आपल्या शेतीत काम करू लागले होते – पण त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. पंजाबच्या जहाल क्रांतीकारी गटांनी त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली होती. १९१४-१५ दरम्यान राज्यात जो गदर उठाव झाला त्या गदर पार्टीची एक शाखा असणाऱ्या कीर्ती पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला.

क्रांतीकारी रशियाला जाऊन सैनिकी आणि विचारसरणीविषयी प्रशिक्षण घेऊन आलेले अनेक जण या कीर्ती पार्टीमध्ये होते. गदर उठाव मोडून काढण्यात आल्यानंतरच्या त्या काळातल्या पंजाबात त्यांनी कीर्ती नावाचं एक मासिक सुरू केलं. या मासिकाच्या सुविख्यात पत्रकारांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ क्रांतीकारक शहीद भगत सिंग. मासिकाच्या संपादकांच्या अनुपस्थितीत तीन महिने त्यांनी हे मासिक स्वतः चालवलं होतं. त्यानंतर २७ मे १९२७ रोजी त्यांना अटक झाली. १९४२ साली मे महिन्यात कीर्ती पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाली.

झुग्गियांचं नाव त्या भगत सिंगांच्या नावावरून ठेवलं नव्हतं बरं. ते सांगतात, “मी त्यांच्यावरची गाणी ऐकतच लहानाचा मोठा झालो. पुष्कळ गाणी होती.” त्या काळातल्या एका गाण्याचे काही बोल ते आजही गोऊन दाखवतात. १९३१ साली इंग्रजांनी भगत सिंगांना फासावर लटकवलं, तेव्हा हे भगत सिंग केवळ तीन वर्षांचे होते.

शाळेतून काढून टाकल्यानंतरची काही वर्षं तरुण भगत सिंग झुग्गियां भूमीगत क्रांतीकारकांसाठी निरोप्याचं काम करत होते. आपल्या घरच्या पाच एकरात राबत असतानाच, “ते सांगतील ती कामं मी करायचो.” यातलं एक काम असं होतं - नुकतंच मिसरुड फुटलेला हा मुलगा छोटं पण “प्रचंड जड” असलेलं छपाई यंत्र दोन पोत्यात घालून रात्रीच्या किर्र काळोखात वीस किलोमीटर अंतर चालत जाऊन क्रांतीकारकांच्या गुप्त तळावर पोचवून यायचा. स्वातंत्र्याचं पायदळ म्हणतात ते अक्षरशः असं होतं.

“शेवटी शेवटी सुद्धा आमच्या संपर्कातल्या साथीदारांना अन्न आणि इतर रसद पुरवण्यासाठी मी भरपूर वजन घेऊन चालत गेलेलो आहे.” त्यांच्या कुटुंबाने देखील भूमीगत क्रांतीकारकांसाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय केली होती.

Prof. Jagmohan Singh (left), nephew of the great revolutionary Shaheed Bhagat Singh, with Jhuggian at his home in Ramgarh
PHOTO • P. Sainath

ज्येष्ठ क्रांतीकारक शहीद भगत सिंग यांचे पुतणे प्रा. जगमोहन सिंग (डावीकडे) झुग्गियांसोबत त्यांच्या रामगडमधल्या घरी

जे छपाई यंत्र ते घेऊन जायचे त्याला ‘उडारा प्रेस’ (शब्दशः उडता प्रेस, थोडक्यात इथून तिथे नेण्यासारखा) म्हणायचे. हे यंत्र म्हणजे छापखान्याचे सुटे भाग होते, खोललेलं छोटं छपाई यंत्र होतं का सायक्लोस्टाइल यंत्र होतं हे समजायला मार्ग नाही. त्यांना इतकंच लक्षात आहे, “बिडाचे सुटे भाग होते, मोठाले आणि जड.” त्यांचं हे निरोप्याचं काम तसं सुखरुपच पार पडलं. जोखीम आणि धोका या दोन्हींना त्यांनी कधीही नकार दिला नाही. आजही त्यांना एका गोष्टीचा फार अभिमान आहे – “मी जितका घाबरायचो त्यापेक्षा पोलिसांनाच माझी जास्त भीती वाटायची.”

*****

आणि मग फाळणी झाली.

या काळाबद्दल बोलताना मात्र भगत सिंग झुग्गियां फार भावुक होतात. फाळणीच्या काळात उडालेला गदारोळ आणि कत्तलींबद्दल सांगत असताना अश्रू थोपवणं त्यांना जड जातं. “सीमा पार करून जाणाऱ्या हजारो लोकांच्या तांड्यावर अनेकदा हल्ले केले जात होते, कत्तली होत होत्या. इथे, या भागात देखील किती तरी जणांची कत्तल झालीये.”

“इथून फक्त चार किलोमीटरवर, सिंबली गावात दोन दिवस आणि एका रात्रीत मिळून २५० जणांना मारून टाकलं होतं, सगळे मुसलमान होते,” अजमेर सिधू सांगतात. ते शिक्षक, लेखक आणि या भागातले प्रसिद्ध इतिहासकार आहेत. भगत सिंग झुग्गियांची मुलाखत घेत असताना सिधू आमच्यासोबत होते. “तरीही, गडशंकर पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराने फक्त १०१ मृत्यूंची नोंद केलीये.”

“१९४७ च्या ऑगस्टमध्ये इथे दोन प्रकारची माणसं होती. एक गट मुसलमानांचं शिरकाण करणारा आणि दुसरा, हल्ल्यांपासून त्यांचं रक्षण करणारा,” भगत सिंग सांगतात.

“माझ्या शेताजवळ एका तरुणाला गोळ्या घालून ठार केलं होतं. त्याचं दहन करण्यासाठी आम्ही मदत करतो असं आम्ही त्याच्या भावाला सांगत होतो. पण तो इतका भेदरून गेला होता की तो त्यांच्या जत्थ्याबरोबर पुढे निघून गेला. आम्ही तो देह आमच्या शेतात पुरला. या भागात १५ ऑगस्टच्या आठवणी फारशा सुखद नाहीयेत,” ते म्हणतात.

Bhagat Singh with his wife Gurdev Kaur and eldest son 
Jasveer Singh in 1965.
PHOTO • Courtesy: Bhagat Singh Jhuggian Family
Bhagat Singh in the late 1970s.
PHOTO • Courtesy: Bhagat Singh Jhuggian Family

भगत सिंग, गुरदेव कौर आणि त्यांचा थोरला मुलगा जसवीर, १९६५ साली घेतलेल्या या छायाचित्रात. उजवीकडेः १९७०च्या दशकातले भगत सिंग.

सीमा पार करून जाणाऱ्यांमधले एक म्हणजे गुलाम मुस्तफा. तेच, ज्यांनी भगत सिंग झुग्गियांना शाळेत परत घ्यावं म्हणून बरेच प्रयत्न केले होते.

“पण,” भगत सिंग सांगतात, “मुस्तफांचा मुलगा, अब्दुल रहमान काही काळ मागेच राहिला होता आणि त्याच्या जिवाला मोठा धोका होता. माझ्या घरच्यांनी एका रात्री त्याला आमच्या घरी आणलं. त्याच्यासोबत त्याचा घोडाही होता.”

मुसलमानांचा शोध घेणाऱ्या टोळक्यांना सुगावा लागला. “मग असंच एका रात्री आम्ही त्याला गुपचुप बाहेर काढलं आणि आमच्या साथीदारांच्या, मित्रांच्या मदतीने तो सही सलामत सीमापार गेला.” त्यानंतर त्याचा घोडा देखील सीमापार त्याच्यापर्यंत पोचवला होता. मुस्तफाने आपल्या मित्रांना लिहिलेल्या पत्रांमध्ये झुग्गियांचे आभार मानले होते आणि एक दिवस भारतात परत येऊन त्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं. “पण तो कधीच परत आला नाही.”

फाळणीबद्दल बोलताना भगत सिंग दुःखी व अस्वस्थ होतात. काही काळ गप्प होतात आणि मग परत बोलू लागतात. त्यांना १७ दिवसांसाठी कैद देखील झाली होती. होशियारपूरच्या बिरमपूर गावात स्वातंत्र्य लढ्याबद्दलची एका परिषद पोलिसांनी बंद पाडली आणि त्यांना अटक केली.

१९४८ साली त्यांनी लाल कम्युनिस्ट पार्टी हिंद युनियनमध्ये प्रवेश केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन झालेल्या तेव्हाच्या कीर्ती पार्टीतून बाहेर पडलेला हा गट होता.

त्याच काळात, १९४८-१९५१ या काळात तेलंगण आणि इतर ठिकाणी होत असलेल्या उठावांनंतर कम्युनिस्ट गटांवर बंदी घालण्यात आली होती. भगत सिंग झुग्गियां परत एकदा आपल्या ‘दिवसा शेतकरी आणि रात्री निरोप्या’च्या भूमिकेत शिरले. भूमीगत राहून करणाऱ्या सतत फिरत असलेल्या क्रांतीकारकांसाठी त्यांचं घर म्हणजे हक्काचा निवारा होता. या काळात ते स्वतः देखील एक वर्षभर भूमीगत झाले होते.

कालांतराने, १९५२ मध्ये लाल पार्टी देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाली. १९६४ साली भाकपमध्ये फूट पडली आणि भगत सिंग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेले, ते कायमसाठी.

Jhuggian (seated, centre) with CPI-M leader (late) Harkishan Singh Surjeet (seated, right) at the height of the militancy in Punjab 1992
PHOTO • Courtesy: Bhagat Singh Jhuggian Family

१९९२ मध्ये पंजाबात अतिरेकी कारवाया टिपेला पोचल्या होत्या त्या काळातले झुग्गियां (मध्यभागी, बसलेले) आणि मार्क्सवादी कम्युनिस्त नेते दिवंगत हरकिशन सिंग सुरजीत (उजवीकडे, बसलेले)

त्या संपूर्ण कालखंडात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कळीच्या असलेल्या जमिनीच्या आणि इतरही अनेक लढ्यांमध्ये भाग घेतला. १९५९ साली भगत सिंग यांना खुश हसियाती टॅक्स मोर्चा दरम्यान अटक करण्यात आली. त्यांचा गुन्हा काय होता तर (सध्या पंजाबच्या ईशान्येकडे असलेल्या) कांडी भागातल्या शेतकऱ्यांना संघटित करणे. संतप्त झालेल्या प्रताप सिंग कैरों सरकारने त्यांची म्हैस आणि कडबा कुट्टी यंत्र जप्त केलं – त्याचा लिलावही करून टाकला.  गावातल्याच एकाने हे दोन्ही ११ रुपयांना विकत घेतले आणि मूळ मालकाला परत केले.

याच मोर्चाच्या वेळी भगत सिंग यांनी लुधियाना तुरुंगात तीन महिने काढले. आणि त्याच वर्षी पतियाळा तुरुंगामध्येही तीन महिने.

अख्खं आयुष्य ते ज्या गावात राहिले त्या जागेवर आधी काही झोपड्या होत्या आणि म्हणूनच त्याचं नाव पडलं झुग्गियां. आणि त्यांचं नाव झालं भगत सिंग झुग्गियां. आता हा भाग गडशंकर तालुक्याच्या रामगड गावात येतो.

१९७५ साली ते पुन्हा एकदा भूमीगत झाले, या वेळी आणीबाणीच्या विरोधात. लोकांना संघटित करायचं, गरज पडेल तेव्हा निरोप्याचं काम करायचं आणि आणीबाणीच्या विरोधात पत्रकं इत्यादी वाटायची.

या संपूर्ण काळात त्यांची नाळ त्यांच्या गावाशी आणि त्यांच्या इलाख्याशी घट्ट जोडलेली होती. ज्या माणसाने तिसरीनंतर शाळेत पाय ठेवला नाही त्याने आपल्या आजूबाजूच्या तरुणांच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी मदत केलेल्या अनेकांनी पुढे चांगली प्रगती केली, काहींना सरकारी नोकऱ्या मिळाल्या.

*****

१९९०: आपल्या आणि आपल्या कूपनलिकेपासून काही मिनिटांच्या अंतरावर दहशत येऊन ठेपली आहे हे झुग्गियांच्या कुटुंबाला कळून चुकलं होतं. शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असलेले खलिस्तानी मारेकरी त्यांच्या शेतात काही क्षण थांबले होते. घरापासून ४०० मीटरवर असलेल्या कूपनलिकेवरचं त्यांचं नाव वाचून आपलं लक्ष्य इथेच आहे याची त्यांनी खातरजमा केली आणि ते तिथेच दबा धरून बसले. पण ते लपून राहू शकले नव्हते.

१९८४ ते १९९३ या काळात पंजाब दहशतीच्या भयंकर सावटाखाली होता. शेकडो लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं, हत्या आणि खून होत होते. खलिस्तान्यांना कडवा विरोध केला असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचे बळी गेले होते. या काळात भगत सिंग कायमच खलिस्तान्यांच्या निशाण्यावर असायचे.

Bhagat Singh Jhuggian at the tubewell where the Khalistanis laid an ambush for him 31 years ago
PHOTO • Vishav Bharti

३१ वर्षांपूर्वी याच कूपनलिकेपाशी खलिस्तानी त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी दडून बसले होते

मात्र, त्यांचं लक्ष्य असणे म्हणजे नक्की काय याची त्यांना प्रचिती आली १९९० साली. त्यांची तिघं तरुण मुलं गच्चीत होती, त्यांच्या हातात पोलिसांनी दिलेल्या बंदुकी होत्या. त्या काळात जिवाला धोका असणाऱ्या व्यक्तींना स्व-संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा होती, इतकंच नाही पोलिस त्यासाठी सहाय्य करत असत.

“त्यांनी ज्या बंदुकी दिल्या होत्या, त्या फारशा चांगल्या नव्हत्या. म्हणून मी एक १२ बोअरची शॉटगन वापरासाठी घेतली होती आणि माझ्यासाठी नंतर मी एक जुनी बंदूक विकतही घेतली होती,” त्या काळाच्या आठवणी ते सांगतात.

त्यांचे पुत्र, परमजित, वय ५० सांगतात, “एकदा दहशतवाद्यांनी माझ्या वडलांना लिहिलेलं एक पत्र माझ्या वाचनात आलं. ‘तुमच्या कारवाया थांबवा, नाही तर तुमचं सगळं कुटुंब संपवून टाकू.’ मी ते परत लिफाफ्यात ठेवलं आणि ते कुणीच पाहिलं नसल्याचा आव आणला. माझे वडील ते पाहून काय करतील याची मला उत्सुकता होती. त्यांनी शांतपणे पत्र वाचलं. त्याची घडी घातली आणि आपल्या खिशात टाकलं. काही क्षणांनंतर त्यांनी आम्हा तिघांना गच्चीत नेलं आणि सावध रहायला सांगितलं. पत्राबद्दल त्यांनी चकारही काढला नाही.”

१९९० चा तो संघर्ष अंगावर काटा आणणारा होता. निधड्या छातीच्या या कुटुंबाने अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली असती यात शंकाच नाही. पण एके-४७ सारखी आणि इतरही जीवघेणी शस्त्रं असलेल्या प्रशिक्षित मारेकऱ्यांपुढे त्यांचा निभाव लागला नसता हेही तितकंच खरं.

त्याच वेळी अतिरेक्यांपैकी एकाने कूपनलिकेवरचं नाव वाचलं. “तो सगळ्यांना म्हणाला, ‘जर आपण भगत सिंग झुग्गियांसाठी इथे आलो असलो, तर माझं या कारवाईशी काहीही देणंघेणं नाही’,” वयोवृद्ध झुग्गियां सांगतात. मारेकऱ्यांच्या त्या गटाने आपला इरादा बदलला आणि त्यांच्या शेतातून बाहेर येऊन ते गायब झाले.

नंतर समजलं की त्या अतिरेक्याच्या धाकट्या भावाला भगत सिंगांनी गावात बरीच मदत केली होती. इतकंच काय त्याला सरकारी नोकरी मिळाली होती – पटवारी म्हणून. “ते माघारी गेल्यानंतर0 पुढची दोन वर्षं तो मोठा भाऊ मला खबर पोचवायचा, इशारे द्यायचा. कुठे जायचं, कुठे नाही...” भगत सिंग हसत हसत सांगतात. जिवावरचा धोका टाळण्यासाठी त्यांना याचा निश्चित उपयोग झाला.

Bhagat Singh with his wife Gurdev Kaur at their home in Ramgarh. Right: He has sold off his 12-bore gun as, he says, now even ‘a child could snatch it from my hands’
PHOTO • Vishav Bharti
Bhagat Singh with his wife Gurdev Kaur at their home in Ramgarh. Right: He has sold off his 12-bore gun as, he says, now even ‘a child could snatch it from my hands’
PHOTO • P. Sainath

भगत सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरदेव कौर आपल्या रामगडच्या घरी. उजवीकडेः त्यांनी आपली १२ बोअरची बंदूक विकून टाकली कारण ‘एखादं मूलसुद्धा माझ्याकडून आता ती हिसकावून घेऊ शकेल,’ सिंग म्हणतात

या प्रसंगाबद्दल हे कुटुंबीय ज्या पद्धतीने बोलतात त्याने आपल्यालाच अस्वस्थ व्हायला होतं. भगत सिंग मात्र या सगळ्याचं विश्लेषण करताना निश्चल असतात. पण फाळणीचा विषय निघाला की ते फार भावुक होतात. त्यांच्या पत्नींचं काय? त्या घाबरल्या नाहीत? “मला खात्री होती की आम्ही तो हल्ला परतवून लावू,” ७८ वर्षांच्या गुरदेव कौर शांतपणे सांगतात. अखिल भारतीय जनवादी महिला सभेच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्या असणाऱ्या कौर म्हणतात, “माझी मुलं शूर होती, मला भय नव्हतं – आणि गावाचा आम्हाला पाठिंबा होता.”

१९६१ साली गुरदेव कौर यांनी भगत सिंग यांच्याशी लग्न केलं. भगत सिंगांचं हे दुसरं लग्न. १९४४ साली त्यांचं पहिलं लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यांच्या दोघी मुली आता परदेशी स्थायिक झाल्या आहेत. गुरदेव कौर आणि त्यांना तीन मुलं आहेत. पण सर्वात थोरला जसवीर सिंग २०११ साली वयाच्या ४७ व्या वर्षी वारला. इतर दोघं म्हणजे इंग्लंडमध्ये असणारे कुलदीप सिंग, वय ५५ आणि त्यांच्यासोबत राहणारे परमजीत.

त्यांच्याकडे ती १२ बोअरची पिस्तुल अजून आहे का? “नाही, मी आता ती नाही बाळगत. तसाही तिचा आता काय उपयोग – एखादं लहान मूलसुद्धा माझ्या हातातून ती हिसकावून घेऊन जाईल,” ९३ वर्षांचे सिंग खळखळून हसतात.

१९९२ च्या राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळी पुन्हा एकदा दहशतीने त्यांचं दार ठोठावलं होतं. पंजाबमध्ये निवडणुका घ्यायच्या यावर केंद्र सरकार ठाम होतं. खलिस्तान्यांनी निवडणुका उधळण्याचा निर्धार केला होता आणि त्यांनी उमेदवारांचे खून करायला सुरुवात केली. निवडणुकीसंबंधीच्या भारतीय कायद्यानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान मृत्यू झाल्यास ‘स्थगिती’ येते किंवा त्या मतदारसंघातली निवडणूक रद्द करावी लागते. त्यामुळे आता सगळ्याच उमेदवारांचा जीव धोक्यात होता.

आणि खरंच जून १९९१ मध्ये अभूतपूर्व हिंसाचारामुळे याच निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागल्या होत्या. एशियन सर्वे या वार्तापत्रातील गुरहरपाल सिंग यांच्या शोधनिबंधात म्हटलं आहे की त्या वर्षी मार्च ते जून या काळात “मतदानाच्या एक आठवडा आधी विधानसभा आणि संसदेचे मिळून २४ उमेदवार मारले गेले होते, दोन रेल्वेगाड्यांमधल्या ७६ प्रवाशांची कत्तल करण्यात आली. पंजाब अशांत प्रदेश जाहीर करण्यात आला.”

Bhagat Singh, accompanied by a contingent of security men, campaigning in the Punjab Assembly poll campaign of 1992, which he contested from Garhshankar constituency
PHOTO • Courtesy: Bhagat Singh Jhuggian Family

१९९२ साली भगत सिंग गडशंकर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढले तेव्हा प्रचारादरम्यान सुरक्षारक्षकांच्या वेढ्यात

अतिरेक्यांचा इरादा स्पष्ट होता. पुरेशा उमेदवारांना संपवा. प्रत्युत्तर म्हणून सरकारने उमेदवारांना आतापर्यंत कधीही पाहिली नाही अशी सुरक्षा पुरवली. यातलेच एक भगत सिंग झुग्गियां. ते गड़शंकर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. अकाली दलाच्या सगळ्या गटांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. “ प्रत्येक उमेदवारासाठी ३२ रक्षकांची तुकडी तैनात होती. आणि महत्त्वाच्या नेत्यांसाठी ५० किंवा त्याहून जास्त.” अर्थात हा जामानिमा केवळ निवडणुकीच्या काळापुरता.

भगत सिंगांच्या ३२ रक्षकांचं कसं? ते सांगतात, “१८ सुरक्षारक्षक माझ्या पक्ष कार्यालयापाशी असायचे. १२ जण माझ्यासोबत, मी प्रचाराला जाईन तिथे सोबत असायचे. आणि दोघं कायम घरी, माझ्या कुटुंबासोबत.” निवडणुकीआधी कित्येक वर्षं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने त्यांना अधिकच जोखीम होती. पण त्यातून ते सुखरुप बाहेर आले. सैन्य, सशस्र सेना आणि पोलिसांनी अतिरेक्यांविरोधात प्रचंड मोठी मोहीम उघडली आणि फार रक्तपात न होता निवडणुका पार पडल्या.

“त्यांनी १९९२ ची निवडणूक लढवली,” परमजीत सांगतात. “का, तर त्यांना असं वाटायचं की स्वतः निशाण्यावर राहलं तर खलिस्तान्यांचं सगळं लक्ष त्यांच्यावर राहील आणि सोबतच्या तरुण कॉम्रेडकडे कुणी फारसं वळणार नाही.”

भगत सिंग ती निवडणूक हरले. काँग्रेसचा उमेदवार जिंकला. पण इतर काही निवडणुकांमध्ये मात्र त्यांचा विजय झाला होता. १९५७ साली ते रामगड आणि चक गुज्जरन या दोन गावांचे सरपंच म्हणून निवडून आले होते. चार वेळा त्यांची सरपंचपदी नेमणूक झाली. १९९८ साली त्यांनी शेवटची निवडणूक लढवली.

१९७८ साली नवांशहरमध्ये (आता या शहराचं नाव शहीद भगत सिंग नगर आहे) सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. या निवडणुकीत त्यांनी अकाली दलाशी संलग्न असलेल्या धनदांडग्या संसार सिंग या जमीनदाराला हरवलं होतं. १९९८ साली त्यांची पुन्हा त्या पदावर निवड झाली – बिनविरोध.

*****

After being expelled from school in Class 3, Bhagat Singh Jhuggian never returned to formal education, but went to be a star pupil in the school of hard knocks (Illustration: Antara Raman)

तिसऱ्या इयत्तेत शाळेतून काढून टाकलेले भगत सिंग झुग्गियां परत कधी शाळेत गेले नाहीत, पण बिनभिंतीच्या, आयुष्याच्या शाळेत मात्र ते अव्वल ठरले (चित्रः अंतरा रामन)

शाळेतून हकालपट्टी झाली तेव्हापासून आजतागायत, ऐंशी वर्षांच्या काळात भगत सिंग झुग्गियां राजकारणाबाबत कायम सतर्क, सजग आणि सक्रीय राहिले आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय काय सुरू आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. ते माकपच्या राज्य नियंत्रण आयोगाचे पदाधिकारी आहेत आणि जालंधरमधल्या देश भगत यादगार हॉलची व्यवस्था पाहणाऱ्या मंडळाचे विश्वस्तदेखील. इतर कुठल्याही संस्थेनं केलं नसेल इतकं काम, प्रामुख्याने पंजाबातील क्रांतीकारी चळवळीच्या नोंदी, दस्तावेज आणि स्मृती जतन करण्याचं काम देश भगत यादगार हॉलने केलं आहे. ही विश्वस्त संस्था खुद्द गदर चळवळीतल्या क्रांतीकारकांनी स्थापन केली आहे.

“आजही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कधी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हायला इथून जत्थे निघतात तेव्हा सर्वात आधी कार्यकर्ते भगत सिंगांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतात,” त्यांचे मित्र दर्शन सिंग मट्टू सांगतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य असणारे मट्टू म्हणतात, “पूर्वीपेक्षा आता त्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या असल्या तरी त्यांची निष्ठा आणि कामाचा जोश मात्र पूर्वीइतकाच जबरदस्त आहे. आजही ते रामगड़ आणि गड़शंकरमधून शाहजहाँपूरमध्ये तळ ठोकून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांसाठी डाळ-तांदूळ, तेल, इतर शिधा आणि पैसे गोळा करतायत. स्वतःचं योगदान वेगळंच.”

आम्ही निघालो तेव्हा आम्हाला निरोप द्यायला ते उठलेच. आपला वॉकर घेऊन ते पटकन आले. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ते लढले त्याची आजची अवस्था त्यांना बिलकुल पसंत नाही हे आपल्याला समजावं असं भगत सिंग झुग्गियांना कळकळीने वाटतं. ते म्हणतात की हा देश चालवणाऱ्या कुणालाही, “स्वातंत्र्य चळवळीचा वारसा नाही. ते ज्या राजकीय शक्तींचं प्रतिनिधीत्व करतात ते स्वातंत्र्यांच्या आणि मुक्तीच्या चळवळीत कधीही सहभागी नव्हते. त्यांच्यातला एकही नाही. त्यांना वेळीच आवर घातला नाही तर ते या देशाचं वाटोळं करतील,” सचिंत आवाजात ते म्हणतात.

आणि मग मात्र एकच सांगतात, “माझ्यावर विश्वास ठेवा, या सत्तेचा सूर्यही मावळणारच आहे.”

लेखकाची टीपः द ट्रिब्यून चंदिगडचे विशव भारती आणि ज्येष्ठ क्रांताकारी शहीद भगत सिंग यांचे पुतणे, प्रा. जगमोहन सिंग यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. अजमेर सिधू यांनी दिलेली माहिती आणि मोठ्या मनाने केलेली मदत यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale