तीन वर्षं प्रयत्न केल्यानंतर पंढरीनाथ आणि कौशल्या शेळकेंच्या पोराचं, रणजितचं यंदाच्या फेब्रुवारीत लग्न ठरलं. “नकार आला की किती अपमान होतो ते तुम्हाला शब्दात नाही सांगता यायचं,” ५२ वर्षीय पंढरीनाथ सांगतात. “लोक पहिला सवाल काय करणार, तर ‘शेती सोडून [नवऱ्या मुलाकडे] कमाईचं दुसरं काही साधन आहे का?’ ”

रणजित २६ वर्षांचा आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या खामसवाडीत आपल्या कुटुंबाच्या चार एकर रानात सोयाबीन, हरभरा आणि ज्वारी करतो. पंढरीनाथ गावातल्या पोस्ट ऑफिसात कारकून आहेत आणि महिन्याला
रु. १०,००० पगार घेतात. काही काळ रणजितने देखील नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही यश आलं नाही – त्यामुळे शेती हाच त्याच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे.

“कुणालाच त्याची पोरगी शेतकऱ्याला द्यायाची नाही,” शेतमजुरी करणाऱ्या कौशल्या सांगतात. “शेतकऱ्याला तर न्हाईच न्हाई. सावकाराकडून कर्जं काढून, हे इतकालं व्याज देऊन, कसं बी करून पोरीचं लग्न नोकरीवाल्याशीच लावायचं बगतील. पर शेतकऱ्याच्या घरात नको.”

एक काळ असा होता जेव्हा मराठवाड्यात शेतकऱ्याच्या स्थळाला मोठी मागणी होती. पण शेतीतल्या वाढत्या अनिश्चिततेमुळे सगळंच चित्र बदलू लागलं आहे. शेतीचा वाढता खर्च, अपुरे बाजारभाव, लहरी हवामान आणि ग्रामीण भागातली वित्त व्यवस्था मोडकळीत आलीये, अशा आणि इतरही कारणाने मराठवाड्यातला शेतकरी कर्जाच्या खाईत खोल बुडालाय.

Khamaswadi's Shelke family struggled for years to find a bride
PHOTO • Parth M.N.

खामसवाडीचे शेळके कुटुंबीय पोरासाठी तीन वर्षं पोरगी शोधत होते

“कुणालाच त्याची पोरगी शेतकऱ्याला द्यायाची नाही,” कौशल्या सांगतात. “... सावकाराकडून कर्जं काढून, हे इतकालं व्याज देऊन, कसं बी करून पोरीचं लग्न नोकरीवाल्याशीच लावायचं बगतील. पर शेतकऱ्याच्या घरात नको.”

खामसवाडीचे वयस्क शेतकरी, ६५ वर्षीय बाबासाहेब पाटील यांच्या मते, काळ बदललाय आता. “मी विशीत असताना, एखाद्या सरकारी नोकरापेक्षा शेतकऱ्याचा मान जास्त होता.” या व्यवसायाला समाजात वरचं स्थान होतं आणि कमाईची देखील शाश्वती होती. “पोरगं असणारा शेतकरी लग्नाची सगळी बोलणी ठरवायचा, हुंडा असो, देणं घेणं असो.”

पण आता, हनुमान जगताप म्हणतात त्याप्रमाणे, “शेतीत काहीही भवितव्य राहिलेलं नाही.” १९९७ पासून जगताप लातूर शहरात एक वधू वर सूचक मंडळ चालवित आहेत. आताशा पोरीचे आई-वडील शक्यतो गावात न राहणारी स्थळं शोधायला सांगू लागलेत. “लोकाला असं वाटतं की पोरगं शहरात किंवा मोठ्या गावात राहतंय म्हणजे ते शेती करत नसेल,” ते म्हणतात. “पोरीसाठी पाव्हणा शोधणाऱ्या आई-वडलाचं शिक्षण किंवा पगारीवर फार ध्यान नसतं [पोरगं काय काम करतं ते जास्त महत्त्वाचं आहे].”

जगताप सांगतात की गेल्या दहा वर्षांपासून त्यांना हा बदल दिसू लागला आहे. “पूर्वी एखादं स्थळ शोधायला मला लई झाले, दोन आठवडे लागत असतील, काही वेळा दोन महिने. पण आताशा कमीत कमी सहा महिने धरून चाला. कधी कधी तर वर्ष जातं. माझे बहुतेक सगळे संपर्क लातूर शहरात किंवा आसपासच्या गावांमध्ये आहेत. मला काय औरंगाबाद, पुणे किंवा मुंबईची जास्त लोकं माहित नाहीत, आन् आई-वडलाला [लग्न झाल्यावर] तिथंच पोरी द्यायच्यायत.”

याचा अर्थ हा की शेती करणाऱ्या अनेक पोरांची विशी किंवा तिशी पार झाली तरी लग्नं झालेली नाहीत, आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर हे लग्नाचं वय ओलंडून पार पुढे चाललंय, पंढरीनाथ म्हणतात. “आम्ही २३-२४ व्या वर्षीच पोरी पाहायला सुरू करतो.”

Pandharinath Shelke
PHOTO • Parth M.N.
Babasaheb Patil
PHOTO • Parth M.N.

‘माझी पोरगी असती, तर मीसुदिक हेच केलं असतं,’ पंढरीनाथ शेळके (डावीकडे) सांगतात तर बाबासाहेब पाटील (उडवीकडे) यांच्या मते आता काळ बदलला आहे

अखेर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंढरीनाथ आणि कौशल्या यांना त्यांच्या लेकासाठी पोरगी मिळाली – रणजितची भावी वधू शेजारच्या गावातल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातली पाचवी पोरगी आहे. “तिच्या वडलांनी चार पोरींची लग्नं लावून दिली आहेत आणि आता त्यांची अशी गत आहे की ते एक पैसा देखील कर्जानं काढू शकत नाहीत,” कौशल्या सांगतात. “आम्ही त्यांना सांगितलं, आम्हाला काय बी नको, फक्त तुमची पोरगी द्या. आम्हाला घाई होती आणि त्यांचा नाविलाज होता. दोन्ही बी जुळून आलं. पण माझ्या धाकल्या लेकाचं लग्नच हुईल का नाही अशी शंका माझ्या मनात यायला लागलीये.”

“आम्हाला किती का त्रास झाला असला, तरी मी कुणाला बोल लावीत नाही,” पंढरीनाथ म्हणतात. “माझी पोरगी असती तर मीसुदिक हेच केलं असतं. शेतकऱ्याची जिंदगी एका शेतकऱ्यालाच माहित राहते. पीक चांगलं यावं तर भाव पडावे. आणि भाव चांगले असले तर पावसानं दगा द्यावा. बँका बी आमच्याशी वैर असल्यागत वागतात. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. आपल्या पोरीसाठी असली जिंदगी कुणाला हवी असणार सांगा?”

खामसवाडीहून ७० किलोमीटरवर बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या गिरवली गावच्या दिगंबर झिरमिलेंचंही हेच म्हणणं आहे. “माझी १९ वर्षांची लेक आहे,” ते सांगतात. “आता दोन वर्षांत मी तिच्यासाठी पाव्हणे शोधायला सुरू करेन. आणि मी आताच ठरविलंय, शेतकरी नको.”

‘मी अशीही उदाहरणं पाहिलीयेत जिथे लग्न होईपर्यंत पोरं शहरात नोकरी असल्याचं भासवतात आणि त्यासाठी खोटी कागदपत्रंदेखील दाखवतात,’ आपेत सांगतात. ‘लग्न झाल्यावर मग खरं काय ते बाहेर येतं’

४४ वर्षीय दिगंबर त्यांच्या दोन एकरात सोयाबीन करतात आणि जोडीला शेतमजुरी करतात. त्यांच्यावर सावकाराचं दोन लाखाचं कर्ज आहे मात्र गरज पडली तर हुंड्याची सोय करायला त्यांची आणखी कर्ज घ्यायची तयारी आहे. “जरी ते [कर्ज] वाढत गेलं तरी फिकीर नाही. किमान माझी पोरगी तरी शेतीच्या संकटात अडकणार नाही. मी जर पैशाकडे पाहत बसलो [हुंडा देला नाही] तर मग तिला [शेतकऱ्याशी लग्न लावून] आयुष्यभर हालाखीत ढकलल्यासारखं होईल. तिच्या नवऱ्याला १५,००० बी पगार असंल तरी किमान पगार यायची खात्री तर असते की नाही. तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला अशी कसलीच खात्री देता येत नाही. हां, शेतीत एकच गोष्ट निश्चित असते, अनिश्चिती.”

पोरीच्या घरच्यांना शेतकऱ्याच्या कुटुंबात पोरगी द्यायची नाही त्यामुळे संजय आपेतसारख्या गिरवलीतल्या लग्नं जुळवणाऱ्यांना पोरं शोधणं अवघड झालंय. “मी नुकतंच एका ३३ वर्षांच्या पोराचं लई कसरती करून लग्न जुळवलंय,” ते सांगतात. “त्याची गोष्टच लिहिता आली असती पण तुम्हाला त्याचं नाव नाही सांगता येणार. कारण खरं तर त्याचं वय ३७ आहे सध्या.”

ही असली बनवाबनवी वाटेल त्या थराला चाललीये. “मी अशीही पोरं पाहिलीयेत जी लग्नं होईपर्यंत नोकरी असल्याचं भासवतात आणि त्यासाठी गरज पडली तर खोटीनाटी कागदपत्रं दाखवतात,” ते सांगतात. “एकदा का लग्न झालं की खरं काय ते बाहेर येतं. आपलं वय खोटं सांगणं ही पण चोरीच आहे. पण नोकरी असल्याचं खोटंनाटं म्हणजे पोरीचं आयुष्य बरबाद केल्यासारखं आहे.”

शेती करणाऱ्या काही पोरांची लग्नं जुळवायला दोन वर्षं गेल्याचं आपेत सांगतात. “पूर्वी कसं, हुंडा किती आणि घर कसं आहे यावर बोलणी सुरू व्हायची. पण आता, पोरगा शेतकरी कुटुंबातला नसला तरच लोक पुढचं बोलतात.”

राधा शिंदेचा अनुभव बोलका आहे. तीन वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्याच्या मुडेगावातल्या शेतकरी कुटुंबात तिचं लग्न झालं. “माझे आई-वडील दोन वर्षं पाव्हणे शोधत होते,” राधा सांगते. “सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर शेतकरी कुटुंबात लग्न करायचं नाही. माझ्या सासरची १८ एकर शेती आहे जी माझे सासरे करतात. माझे मिस्टर शेती पाहत नाहीत. आमचं लग्न झाल्या झाल्या त्यांनी लातुरात दागिन्यांचं दुकान टाकलंय. दुकान सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतरच माझे आई-वडील लग्नाला तयार झाले.”

“माझ्या गावात अशी चिक्कार पोरं आहेत ज्यांची लग्नंच होणार नाहीत असं मला वाटायलंय,” आपेत भर घालतात. “सतत नकार यायलेत त्यामुळे त्यांच्या निराशेत भर पडायलीये, तसंही शेतीचं संकट आणि कर्जाचा बोजा आहेच.”

Digambar Jhirmile
PHOTO • Parth M.N.
Sandeep Bidve on the right with his friend
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः दिगंबर झिरमिलेः ‘... शेतीत एकच गोष्ट निश्चित असते, अनिश्चिती’. उजवीकडेः संदीप बिडवे (उजवीकडे), फोटो काढण्यासाठी तयार झालेल्या मोजक्या तरुणांपैकी एक

गावाकडच्या अनेक शेतकरी कुटंबांमध्ये लग्नासाठी पोरींचा शोध सुरूच आहे पण कॅमेऱ्यासमोर येणं तर दूरच मोकळेपणी बोलायला पण फारसे कुणी तयार नाहीत. पोरी शोधण्यात येणाऱ्या अडचणींबाबत काही प्रश्न विचारले तर बोलणं धुडकावून लावलं जातं किंवा लाजिरवाणं हसू समोर येतं. वीस एकर रान असणारा २६ वर्षीय संदीप बिडवे म्हणतो, “त्यांना नकार आलाय असं कुणीच मान्य करणार नाही, पण खरी परिस्थिती तीच आहे.”

बिडवे अजून अविवाहित आहे आणि लग्नासाठी पोरगी शोधतोय. तो म्हणतो, शेतीला आता काही मानच राहिलेला नाही. “आता हे मान्य करण्यात काय लाजायचंय,” तो म्हणतो. “दहा हजाराचा पगार असणाऱ्यांची लग्नं व्हायलीयेत पण १० एकराचा मालक असलेला धडपडायलाय. पोरीचा बाप काय विचारतोः पोटापाण्याचं काय करता? तुम्ही उत्तर दिलं की तो म्हननार, आम्ही कळवू. त्याला दुसरं बरं घर मिळालं नाही तर तो बऱ्याच महिन्यांनी काय तर कळविणार. आम्ही तोपर्यंत बिगर लग्नाचे असणार याची केवढी खात्री राहते बगा त्यांना.”

मी संजयशी बोलत असताना जवळच्याच गावातला एक पोलीस आमच्यापाशी आला. आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने सांगितलं की तीन वर्षांपूर्वी जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्याच्या वडलांनी १५ लाख हुंडा मागितला आणि त्यांना मिळाला पण. “मला सरकारी नोकरी आहे,” तो सांगतो. “पण माझा भाऊ शेती करतो. आणि आम्ही त्याच्यासाठी पोरगी बघतोय. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या बापाचा काय तोरा होता आणि आता काय आहे यात किती फरक पडावा, तुमचा विश्वासच बसणार नाही.”

तिथेच असलेले ४५ वर्षीय बाबासाहेब जाधव म्हणतात की त्यांना हा फरक कसा पडतो ते नीट समजलंय. त्यांचं सहा एकर रान आहे आणि २७ वर्षांचा एक मुलगा आहे, विशाल. “त्याला किती तरी वेळा नकार आलाय,” ते सांगतात. “काहीच दिवसांमागे मी त्याला तालुक्याच्या ठिकाणी वधुवर मेळाव्याला घेऊन गेलतो. पोरींना विचारलं की त्यांना कसा पोरगा हवाय. जेव्हा दोघींनी सांगितलं की ‘शेतकरी सोडून कुणीही चालेल’, मी तिथनं माघारी आलो.”

अनुवादः मेधा काळे

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale