“इन्किलाब जिंदाबाद,” एका शेतकरी नेत्याने घोषणा दिली. “जिंदाबाद, जिंदाबाद,” शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. १८० किलोमीटरचा लांबचा पल्ला पार करून आझाद मैदानात पोचलेल्या थकल्या भागल्या शेतकऱ्यांच्या घोषणांचा जोर जरासा कमी झाला होता. १२ तारखेला संपन्न झालेला हा मोर्चा ६ मार्चला नाशिकमध्ये सुरू झाला, तेव्हाचा बुलंद आवाज काहीसा नमल्यासारखा वाटत होता. तळपत्या उन्हात आठवडाभर चालून, पायाला फोड येऊन पाय रक्ताळले तरी, रात्री मोकळ्यावर झोपायला लागलं असलं आणि पोटात कसेबसे दोन घास गेले असले तरी “इन्किलाब जिंदाबाद” चा नारा पुकारल्यावर त्याला प्रतिसाद येणारच.

मैलाचा दगड ठरेल असा हा मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची शेतकरी संघटना असणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केला होता. नाशिक शहरातल्या सीबीएस चौकातून २५००० आंदोलकांसोबत मोर्चाची सुरुवात झाली. मुंबईला पोचेपर्यंत शेतकऱ्यांची संख्या ४० हजारापर्यंत पोचली होती असं किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले सांगतात जे आयोजकांपैकी एक आहेत.

सगळेच दमले होते मात्र त्यांचा निश्चय काही ढळला नव्हता.

जसजसे ते मार्गक्रमण करत होते, राज्यभरातून शहापूर (मुंबईपासून ७३ किमी) आणि ठाण्याला (मुंबईपासून २५ किमी) शेतकरी सामील होत होते.

“सरकार आम्हाला जशी वागणूक देतंय तितका काही हा प्रवास असह्य नव्हता,” टेंपोला रेलून उभे असलेले विलास बाबर सांगतात. भिवंडी तालुक्यातल्या सोनाळे गावात (आझाद मैदानापासून ५५ किमी) १० मार्चच्या दुपारी सगळे शेतकरी जेवणासाठी थांबले होते. जेवण त्यांनीच रांधलं होतं, प्रत्येक तालुक्याने आपापला शिधा गोळा करून आणलेला होता.

PHOTO • Shrirang Swarge

शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून पुढे निघाला, पाचव्या दिवशी मुंबईहून ५५ किमीवर भिवंडीला पोचेतो आंदोलकांची संख्या ४० हजारापर्यंत गेली होती

सोनाळ्याला माळावर पोचायच्या आधी शंभर मीटरवर महामार्गावरच्या एका धाब्यात तहानलेल्या शेतकऱ्यांना पाणी पाजलं जातं होतं – धाब्याचे चार नोकर हातात जग आणि पेले घेऊन उभे होते, जवळच्या ड्रममधून जगाने पाणी भरून सगळ्यांना दिलं जात होतं.

मोर्चाचा पाचवा दिवस होता, दक्षिण मुंबई अजून ५५ किमी दूर होती.

अंदाजे ४५ वर्षांचे असणारे बाबर मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातल्या सूरपिंपरीचे शेतकरी आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी ते ५ मार्चला परभणीहून रेल्वेने नाशिकला पोचले आणि तेव्हापासून त्यांचा प्रवास थांबलेलाच नाही. “माझ्यापुढे दुसरा काय पर्याय होता?” ते विचारतात. “माझा पाच एकरावरचा कापूस बोंडअळीने पूर्ण फस्त केला. एकूण ६० क्विंटल कापूस झाला असता मला. अगदी कमीत कमी म्हणजे क्विंटलमागे ४००० रुपये भाव जरी धरला तरी माझं किमान अडीच लाखाचं नुकसान झालंय.” नोव्हेंबर २०१७ मध्ये, कापूस अगदी वेचणीला आला असतानाच विदर्भ आणि परभणीच्या कापूस क्षेत्रावर बोंडअळीने जोरदार हल्ला केला.

बाबर टोमॅटोचंही पीक घेतात. “मी १ रु. किलो भावाने माझा माल खरेदी करा म्हणून व्यापाऱ्यांच्या हातापाया पडतोय, पण कुणीच घेईना गेलंय [टोमॅटोचे भाव इतके कोसळलेत की अगदी कमीत कमी भावही मिळत नाहीये],” ते सांगतात. “सरकारला आमच्या मागण्यांची दखल घ्यावीच लागणार आहे. बोंडअळी आणि गारपिटीने नुकसान झालेल्यांना भरपाई, [राज्य सरकारचा असा अंदाज आहे की महाराष्ट्रात गारपिटीमुळे २ लाख ६२ हजार हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं, यातलं ९८,५०० हेक्टर क्षेत्र मराठवाड्यात तर १,३२,००० हेक्टर विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातलं आहे], उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आणि आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मालकी मिळावी म्हणून वन हक्क कायद्याची अंमलबजावणी या मागण्यांचा यात समावेश आहे.”

PHOTO • Shrirang Swarge

वरतीः विलास बाबर (डावीकडे) यांचं कपाशीवरच्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे अडीच लाखांचं नुकसान झालंय. इतरही अनेक प्रश्न असणारे बरेच शेतकरी हातात लाल बावटा घेऊन मोर्चात सहभागी झाले. खालीः भिवंडीच्या सोनाळे गावात जेवणासाठी थांबलेले शेतकरी, आपापला शिधा गोळा करून स्वतःच रांधून शेतकऱ्यांनी चार घास खाल्ले

११ मार्चः सकाळी ११ वाजता खाणं उरकून मोर्चेकरी ठाणे शहरातून सकाळी ११ वाजता निघाले (आदल्या दिवशी ते ४० किमी चालून आले होते), मुंबईच्या चुनाभट्टी परिसरातल्या के जे सोमय्या मैदानावर रात्री ९ वाजता मोर्चा येऊन थांबला. रात्री तिथेच मुक्काम करण्याचं त्यांचं नियोजन होतं. त्यामुळे आजचा दिवस संपला असा विचार बाबर करत होते. “सकाळपासून माझ्या पायात गोळे येतायत,” ते सांगतात. मोर्चेकऱ्यांचे लोंढे मैदानात येऊ लागले होते. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषणं सुरू होती, परिणामी शिणलेल्या शेतकऱ्यांची जेवणं लांबली होती. “उद्या अखेरचा टप्पा,” बाबर म्हणतात.

मात्र १२ मार्चला मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा होती. किसान सभेच्या नेत्यांनी याबाबत रात्री चर्चा केली आणि रात्री ११.३० वाजता निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी वाहतुकीला खोळंबा होऊन विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आताच ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करतील. बाबर नुकतेच अंथरुणावर कलंडले होते. त्यांनी एक तासाची डुलकी काढली, त्यानंतर उठून अंथरुण गोळा केलं, पाठपिशवीत टाकलं आणि रात्री १ वाजता ते परत चालायला तयार होते.

कितीही हातघाईवर आले असले तरी आपलं सत्त्व काय आहे हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आणि हे थकले भागले शेतकरी मध्यरात्री आझाद मैदानाच्या दिशेने निघाले, पहाटे ५ वाजता ते तिथे पोचले. म्हणजेच विक्रोळीला दुपारी ३ वाजता घेतलेली क्षणभर विश्रांती, रात्रीच्या जेवणाचा तास-दीड तास आणि सोमय्या मैदानातला थोडा आराम वगळता दक्षिण मुंबईत पोचेपर्यंतच्या गेल्या १८ तासातले १४-१५ तास ते अविरत चालतायत.

मुंबईतल्या त्यांच्या संपूर्ण प्रवासात लोकांनी फार प्रेमाने त्यांचं स्वागत केलं – पूर्व द्रुतगती मार्गावर आणि पुढे शहरातही लोकांनी, रहिवासी संस्था, धार्मिक गट आणि राजकीय पक्षांनी त्यांना पाणी, केळी, बिस्किटांचं वाटप केलं.

Farmers at Somaiya ground in Mumbai on the night of March 11th
PHOTO • Shrirang Swarge
A woman at the Somaiya ground in Mumbai on the night of March 11th
PHOTO • Shrirang Swarge
Farmers getting medical attention a the Somaiya ground in Mumbai on the night of March 11th
PHOTO • Shrirang Swarge

आझाद मैदानाच्या आधीचा थांबा चुनाभट्टीमध्ये होता. तेव्हा तिकडच्या फिरत्या दवाखान्यातून रात्री कमलाबाई गायकवाडांसारख्या (मध्यभागी) अनेकांनी आपल्या भेगाळलेल्या, रक्ताळलेल्या पायांसाठी औषधं घेतली

सोमय्या मैदानात मला ६५ वर्षांच्या कमलाबाई गायकवाड भेटल्या. मध्यरात्र होत होती आणि त्या फिरत्या दवाखान्यापाशी वेदनाशामक गोळ्या घ्यायल्या आल्या होत्या. “दुसरा काही पर्याय नाही बाबा,” त्या हसल्या. त्या नाशिकच्या दिंडोरीपासनं अनवाणी चालत आल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मला त्या भेटल्या तेव्हा त्यांच्या पायात चपला होत्या, त्यांच्या पायाहून अवचित मोठ्याच. तापलेल्या रस्त्यांच्या चटक्यांपासून थोडा तरी दिलासा. “आज सकाळी कुणी तरी दिल्यात मला,” त्यांनी सांगितलं.

मोर्चा जसजसा पुढे जात होता तसे डहाणू, शहापूर, मराठवाडा आणि इतरही भागातून आलेले कित्येक शेतकरी मोर्चात सामील झाले. तरीही ६ मार्च रोजी मोर्चाची सुरुवात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या मुख्य मागण्या म्हणजे जमिनीची मालकी आणि सिंचनाच्या सुविधा.

पन्नाशीच्या सिंधुबाई पालवे म्हणतात आता खूप झालं, त्यांना जमिनीची मालकी मिळालीच पाहिजे. “आम्ही आमच्या जमिनी कसतो आणि एक दिवस अचानक कुणी तरी येऊन त्या आमच्यापासनं हिरावून घेणार,” त्या म्हणतात. सिंधुबाई महादेव कोळी आहेत आणि सुरगाणा तालुक्याच्या करवड पाड्यावरनं आल्या आहेत. “जे आमचंच आहे त्याची मालकी आम्हाला का मिळू नये?” त्या सवाल करतात. “अजून एक, [नार-पार आणि दमणगंगा-पिंजळ] नदी जोड प्रकल्पात सुरगाण्यातली बरीच जमीन बुडिताखाली जाणार आहे [ज्यामुळे आदिवासी शेतकरी विस्थापित होणार आहेत].”

सिंधुबाई मला सगळ्यात आधी भिवंडीला भेटल्या आणि नंतर आझाद मैदानात. आणि इतर अनेक मोर्चेकऱ्यांप्रमाणे त्याही पायाला फोड आले असले तरी तशाच चालत होत्या, मोर्चासोबतच्या अँब्युलन्समध्ये मिळालेलं मलम रोज रात्री पायाला लावून भागवत होत्या. “माझ्या तीन एकरात मी भात लावलाय,” घामेघूम झालेल्या सिंधूबाई सांगतात. “पण आम्हाला पुरेसं पाणीच नाहीये. नुसत्या पावसावर आम्ही कशी शेती करावी?”

PHOTO • Shrirang Swarge

दुसऱ्या दिवशी सकाळी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलक शेतकरी ११ मार्चला मध्यरात्रीनंतर चुनाभट्टीहून आझाद मैदानाच्या दिशेने निघाले. खाली, उजवीकडेः मुक्काम आझाद मैदान, शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं असताना मार्क्सवादी पक्षाच्या नेत्यांची भाषणं ऐकणारे आंदोलक शेतकरी

मोर्चा जेव्हा आझाद मैदानावर आला तेव्हा त्या लाल झेंड्यांच्या आणि टोप्यांच्या महासागरात दूरचित्रवाहिन्यांचे अनेक प्रतिनिधी शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण हे शेतकरी इतके दमले होते, की त्यांनी काहीही बोलायला नकार दिला आणि मंचावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भाषणं चालू असताना आम्हाला त्यांचं शांत ऐकू द्या असं सांगून पत्रकारांना पांगवलं.

१२ मार्च संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की शासन शेतकऱ्यांच्या प्रती “संवेदनशील” आहे आणि येत्या दोन महिन्यात शासन शेतकऱ्यांच्या समस्यांवरील उपायांसंबंधी एक लेखी निवेदन देईल. फडणविसांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाने त्यानंतर विधानभवनाला घेराव घालण्याचा मनसुबा रद्द केला. फडणविसांच्या लेखी आश्वासनानंतर आणि विधानसभेमध्ये ते सादर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्य सरकारसोबत वाटाघाटी करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी आंदोलन मागे घेतलं.

मोर्चा यशस्वी झाला हे शासनाच्या घोषणांमधूनच कळतंच आहे. पण तितकंच नाहीये. तीन मंत्री आझाद मैदानात आंदोलकांना भेटायला समक्ष आले, महाराष्ट्रात रडतखडत दिली जात असलेली कर्जमाफी, त्याच्या कालावधीतील आवश्यक बदल आणि आदिवासी शेतकऱ्यांचे वनजमिनींवरचे हक्क याबाबतच्या त्यांच्या मुख्य मागण्या त्यांनी मान्य करत असल्याचं सांगितलं. शासनाने एक सहा सदस्यांची कॅबिनेट समिती गठित केली आणि या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी व हमीभाव, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी आरोग्य सेवांसारख्या इतर मागण्यांचा पाठपुरावा केला जावा असे आदेश दिले.

जेव्हा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा सिंधुबाई अगद सहजपणे म्हणाल्या, “आमचा आमच्या नेत्यांवर विश्वास आहे,” रात्री मध्य रेल्वेने सीएसटी ते भुसावळला ज्या दोन विशेष गाड्या सोडायचं जाहीर केलं त्यातली एक गाडी पकडण्यासाठी त्यांची तयारी सुरू झाली. “आता सरकार त्याचा सबुद पाळतंय का ते पहायचं. गरज पडली तर आम्ही पुन्हा मोर्चा काढून येणार इथं.”

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale