“आमच्या पथकाने दोन गट तयार करून ट्रेनवर हल्ला केला, एकाचे नेतृत्व जी. डी. बापू लाडांनी,  तर दुसर्या गटाचे नेतृत्व मी स्वत: केलं. अगदी येथेच, जेथे तुम्ही आता उभे आहात - याच ट्रॅकवर एकावर एक दगड रचून ट्रेन थांबवली. मग ट्रेन माघारी जाऊ शकणार नाही अशा रितीने मागेही धोंडे रचले. विळे-कोयते, लाठ्या आणि दोन-तीन सुतळी बॉम्ब याशिवाय कोणतीही बंदूक किंवा शस्त्रे आमच्याकडे नव्हती. मुख्य अंगरक्षकाकडे बंदूक होती पण तो घाबरलेला होता आणि त्याला काबूत ठेवणे सहज सोपे होते. आम्ही पगार उचलून खिळे ठोकले."

हे घडलं ७३ वर्षांपूर्वी. पण 'कॅप्टन भाऊ' लाडांकडून ऐकून ती कालचीच घटना वाटत होती. आता ९४ वर्षांचे, रामचंद्र श्रीपती लाड ज्यांना 'भाऊ' संबोधले जाते, ब्रिटिश राजच्या अधिकार्यांचे पगार घेऊन जाणार्या पुणे-मिरज ट्रेनवर त्यांनी नेतृत्व केलेला हल्ला किती आश्चर्यकारक स्पष्टतेने सांगत होते. "खूप दिवसांनंतर भाऊ एवढं स्पष्ट उच्चारात बोलले," या वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानीचे अनुयायी, बाळासाहेब गणपती शिंदे दबलेल्या आवाजात म्हणाले. परंतु नव्वदीतल्या 'कॅप्टन भाऊं' च्या आठवणी त्या रेल्वे ट्रॅकवर जिवंत झाल्या. येथेच त्यांनी आणि बापू लाडांनी धाडसी तूफान सेनेद्वारे ७ जून, १९४३ ला धाड टाकलेली.

त्या लढाईनंतर, सातारा जिल्ह्यातल्या शेणोली गावातल्या या स्थानी ते प्रथमच परत आले होते. काही क्षण तर ते विचारांमध्ये हरवूनच गेलेले, नंतर सर्व काही डोळ्यांसमोर लख्ख उभे राहिले. धाडीत सहभागी झालेल्या आपल्या सर्व सहकारी कॉम्रेड्सची नावे त्यांच्या लक्षात आहेत. आणि त्यांना आम्हांला हे आवर्जून सांगायचे आहे: "तो पैसा कोणत्याही व्यक्तीच्या खिशात नाही तर प्रतिसरकारला गेला. [सातार्याचे तात्पुरते सरकार] आम्ही ते पैसे गरजू आणि गरीबांना दिले.""आम्ही ट्रेन 'लुटली' हे म्हणणं अन्यायकारक आहे." त्यांनी तीव्र शब्दात सांगितले. "चोरलेले पैसे [ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतीयांकडून] आम्ही परत आणले." जी. डी. बापूंनी मला २०१० मध्ये, त्यांच्या मृत्युआधी एक वर्षापूर्वी सांगितलेले हेच शब्द माझ्या कानात प्रतिध्वनी निर्माण करत होते.

तूफानसेना (झंझावाती किंवा वादळी सैन्य) हा प्रतिसरकारचा सशस्त्र जहाल गट होता - भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक थक्क करणारा अध्याय. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील सशस्त्र म्हणून बहराला आलेल्या या गटातील क्रांतीकारकांनी सातार्यात समांतर सरकारची घोषणा केली. सातारा तेव्हा मोठा जिल्हा होता ज्यात आताचे सांगली समाविष्ट होते. त्यांच्या सरकारने, जे किमान १५० गावांतील प्रजेसाठी कायदेशीर अधिकारी होते - ६०० हून जास्त, आग्रहाने सांगतात, कॅप्टन भाऊंनी ब्रिटिश राजवट प्रभावीपणे उलथून टाकली. "भूमिगत सरकार म्हणजे, तुम्हांला काय म्हणायचंय?" मी वापरलेला शब्द ऐकून रागावलेले भाऊ खवळले. "आम्हीच सरकार होतो येथे. ब्रिटिश राज प्रवेश करूच शकला नाही. एवढच काय पोलिसही तूफान सेनेला घाबरून होते."


02-PS-‘Captain Elder Brother’  and the whirlwind army.jpg

कॅप्टन भाऊ १९४२ मधील एका छायाचित्रात आणि (उजवीकडे) ७४ वर्षांनंतर

हे अतिशय खरं आहे, अगदी वैध दावा आहे. नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये दिग्गज क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिसरकारने खरोखरच सुयोग्य सरकार चालविले होते. अन्नधान्य पुरवठा आणि वितरण नियोजित केले. बाजारपेठेची सुसंगत रचना केली आणि न्यायव्यवस्थाही चालविली. ब्रिटिश राजचे सावकार, तारणदलाल आणि जमीनदार संघटनांवरही दंडात्मक कारवाई केली. "न्याय आणि सुव्यवस्था आमच्या नियंत्रणात होती." कॅप्टन भाऊ सांगतात. "लोकांची आम्हांला साथ होती." तूफान सेनेने साम्राज्याची कोठारे, ट्रेन, खजिने आणि टपाल कचेर्यांविरूद्ध धाडसी संप पुकारले. सेनेने बिकट परिस्थितीत शेतकरी आणि मजूरांना मदतीचे वाटपही केले.

कॅप्टननी कित्येकवेळा तुरूंगवासही भोगला. परंतु त्यांच्या उत्तरोत्तर वाढत गेलेल्या नैतिक दर्जामुळे तुरूंग अधिकारीही त्यांना आदराची वागणूक देत. "तिसर्या वेळेस, औंधच्या तुरूंगात गेलो, तेव्हा तिथलं जगणं अगदी राजाच्या अतिथींसारखं महालातलं होतं," ते अभिमानाने हसून सांगत होते. १९४३ अणि १९४६ दरम्यान, प्रतिसरकार आणि तूफान सेनेचे सातार्यात वर्चस्व होते. भारताचे स्वांतत्र्य सुनिश्चित झाल्यावर सेना विसर्जित करण्यात आली.

आणि मी त्यांना पुन्हा डिवचलं, " मी तूफान सेवेत कधी सामील झालो, या तुमच्या प्रश्नाचा अर्थ काय?" कॅप्टननी तक्रारीच्या सुरात विचारले. " मी सेनेची स्थापना केली." नाना पाटील सरकारचे अध्यक्ष होते. जी. डी. बापू लाड, त्यांचे सर्वांत महत्वाचे सहकारी, त्यांचा उजवा हातच. ते सेनेचे उच्च अधिकारी, 'फील्ड मार्शल'  होते. कॅप्टन भाऊ तूफान सेनेचे कामकाज अध्यक्ष होते. त्यांच्या अनुयायांसह त्यांनी एकत्र येऊन वसाहतींच्या ब्रिटिश राज्याला मोठमोठे हादरे दिले. याच काळात, बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशातही असेच, ब्रिटिशांना हादरे देणारे आणि नियंत्रणास कठीण उठाव होत होते.


03-DSC00407(Crop)-PS-‘Captain Elder Brother’  and the whirlwind army.jpg

कुंडल भागातील १९४२ किंवा १९४३ दरम्यान घेतलेले तूफान सेनेचे जुने छायाचित्र

भाऊंच्या घरी बैठकीची खोली आठवणी आणि स्मृतींनी पूर्णपणे भरलेली आहे. त्यांची स्वत:ची खोली मात्र अतिशय साधी आहे. त्यांच्याहून १० वर्षांपेक्षाही कमी वयाच्या त्यांच्या पत्नी कल्पनाताई, दिग्गज भाऊंविषयी परखडपणे बोलतात: "आजही ह्या माणसाला आपली शेतजमीन कुठे आहे हे सांगता येणार नाही. मी स्वत: एकट्या स्त्रीने,  एकाहाती, घर,  शेती,  मुलं सांभाळली. एवढी वर्ष सगळं काही मी बघितलं - पाच मुलं, १३ नातवंड आणि ११ पतवंडं सांभाळली. ते तासगांव, औंध आणि अगदी काही काळ येरवडाच्या तुरूंगातही होते. तुरूंगांतून सुटले तरी ते गांवांमध्ये बेपत्ता व्हायचे आणि महिन्यांनंतर परतायचे. मी सगळं पाहते, आजही."


04-PS-‘Captain Elder Brother’  and the whirlwind army.jpg

सातारा आणि सांगलीतल्या भिन्न भागांतील स्वातंत्र्य सेनांनींची नावे असलेला कुंडलमधील स्तंभ. डाव्या बाजूला यादीत कॅप्टनभाऊंचे नाव सहावे दिसते. उजवीकडे कॅप्टन भाऊंच्या पत्नी, कल्पना लाड त्यांच्या निवासस्थानी

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी महाराष्ट्रात प्रतिसरकार आणि तूफान सेनेने खूप महत्वाच्या नेत्यांचे योगदान दिले. नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी. डी. बापू लाड, कॅप्टन भाऊ आणि कितीतरी अजून. बहुतेकांना स्वातंत्र्यानंतर जे महत्व प्राप्त होणं आवश्यक होतं ते मिळालंच नाही, ते विस्मरणात गेले. सरकार आणि सेनेतच वेगवेगळ्या राजकीय शक्तींचा उगम होऊन फूट पडली. त्यातील बहुतेक, जे त्या काळातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचेच सदस्यही होते, कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. त्यातील नाना पाटील जे नंतर अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष झाले, १९५७ मध्ये सीपाआयच्या तिकिटावर सातार्यातून संसदेत निवडून आले. इतर, जसे की कॅप्टन भाऊ आणि बापू लाड, शेतकरी कामगार पक्षात सामील झाले. तरीही माधवराव मानेंसारखे काही काँग्रेस पक्षात होते. हयात असलेल्या सर्व स्वातंत्र्य सेनांनींनी, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्याकाळातल्या सोव्हियत युनियन आणि युनियनचा हिटलरला असलेला विरोध या घटनांमध्ये उठावाच्या प्रेरणा असल्याचा उल्लेख केलेला आहे.

९४ वर्षांचे भाऊ आता थकलेले आहेत पण तरिही जुन्या आठवणी तशाच ताज्या आहेत. "सामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं आम्ही स्वप्न पाहिलं होतं. ते एक सुंदर स्वप्न होतं. आम्ही स्वातंत्र्य मिळवलंही." आणि त्यांना त्याचा अभिमान आहे. "पण मला नाही वाटत ते स्वप्न कधी प्रत्यक्षात अनुभवास आलं...आज ज्या माणसाकडे पैसा आहे त्याचंच राज्य चालतं. ही आपल्या स्वातंत्र्याची अवस्था आहे."

कॅप्टन भाऊंसाठी, निदान अंतर्यामी तरी, तूफान सेना अजूनही जिवंत आहे. "लोकांसाठी तूफान सेना अजूनही येथे आहे आणि जेव्हा त्याची आवश्यकता निर्माण होईल, तेव्हा ते पुन्हा झंझावात आणेल."


05-DSC00320-HorizontalSepia-PS-Captain Elder Brother and the whirlwind army.jpg

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Pallavi Kulkarni

Pallavi Kulkarni is a Marathi, Hindi and English translator.

Other stories by Pallavi Kulkarni