‘कॅप्टन भाऊ’ (रामचंद्र श्रीपती लाड)
स्वातंत्र्य सैनिक आणि तुफान सेनेचे प्रमुख
२२ जून १९२२ – ५ फेब्रुवारी २०२२

ते गेले. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्या देशाकडून कोणताही मानाचा मुजरा नाही ना शासकीय  इतमाम. पण १९४० च्या दशकात जगातल्या सर्वात बलशाली सत्तेविरोधात जे आपल्या सहकाऱ्यांसह दंड थोपटून उभे राहिले त्यांची महती माहित असणाऱ्या हजारोंच्या उपस्थितीत हा शिलेदार अनंतत्वात विलीन झाला. १९४३ साली क्रांतीसिंह नाना पाटलांनी सातारा इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त झाल्याचं जाहीर करत भूमीगत प्रति सरकार स्थापन केलं आणि याच प्रति सरकारचा कॅप्टन म्हणजे रामचंद्र श्रीपती लाड.

पण कॅप्टन भाऊ (भूमीगत असतानाचं त्यांचं नाव) आणि त्यांचे सैनिक तितक्यावर थांबले नाहीत. पुढची तीन वर्षं, १९४६ पर्यंत त्यांनी इंग्रजांना त्यांच्या राज्यात थारा दिला नाही. जवळपास ६०० गावांमध्ये प्रति सरकारचं राज्य होतं. समांतर आणि जनतेचं राज्य. ५ फेब्रुवारी रोजी भाऊ गेले. गोऱ्या साहेबाच्या राजवटीला धूळ चारणारं सरकारच विलीन झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Ramchandra Sripati Lad, or 'Captain Bhau,' as he appeared in a 1942 photograph and (right) 74 years later
PHOTO • P. Sainath

रामचंद्र श्रीपती लाड किंवा ‘कॅप्टन भाऊ’ १९४२ च्या एका फोटोमध्ये आणि (उजवीकडे) ७४ वर्षांनंतर

कॅप्टन भाऊ प्रति सरकारच्या भूमीगत सशस्त्र सेनेचे म्हणजेच तुफान सेनेचे सेनापती होते. त्यांना आदर्शवत असणाऱ्या जी. डी. बापू लाड यांच्या सोबत त्यांनी ७ जून १९४३ रोजी महाराष्ट्राच्या शेणोलीमध्ये एक हल्ला केला. कशावर होता हा हल्ला? इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांचे पगार घेऊन जाणाऱ्या पुणे मिरज पे स्पेशल मालगाडीवर.आणि लुटलेला पैसा मुख्यत्वे टंचाई किंवा दुष्काळाच्या वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं पोट भरण्यासाठी वापरला गेला.

कित्येक दशकं लोटली, प्रति सरकार लोकांच्या स्मृतीतून विरून जायला लागलं. पण पारीने कॅप्टन भाऊंना शोधून काढलं. त्यांची स्वतःची गोष्ट आम्ही त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकली. तेव्हाच त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य आणि मुक्तीतला भेद समजावून सांगितला. भारत स्वतंत्र झाला, पण मुक्ती आजही काही मूठभरांच्या मालकीची आहे असं ते म्हणाले. आणि “आज ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या हाती सत्ता आहे. ज्याच्या हाती ससा, तो पारधी – अशी आपल्या स्वातंत्र्याची अवस्था झालीया.”

व्हिडिओ पहाः ‘कॅप्टन भाऊ’ आणि तुफान सेना

आम्ही त्यांच्यावर एक छोटी फिल्म देखील तयार केली. अर्चना फडकेचं दिग्दर्शन आणि पारीच्या सिंचिता माजी, संयुक्ता शास्त्री आणि श्रेया कात्यायनी यांच्या प्रयत्नातून ही सुंदर फिल्म तयार झाली. आजही ही फिल्म पाहून तरुणाई भारावून जाते. कारण आजवर त्यांना एका खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला पाहण्याची, त्याचं बोलणं ऐकण्याची संधीच मिळालेली नसते. काही महाविद्यालयांमध्ये ही फिल्म पाहून विद्यार्थ्यांचे डोळे भरून येतात. इतकी निःस्वार्थी माणसं खरंच या जगात आहेत यावर विश्वास ठेवणं, आजवर त्यांना अशा सच्च्या नायकांची कुणीच ओळख का करून दिली नाही हा विचार करणं त्यांना अवघड होऊन जातं.

त्यानंतर दर वर्षी २२ जून रोजी त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांच्याशी बोलत असे. त्यांचा नातू, दीपक लाड आवर्जून फोन लावत असे. आणि कॅप्टन भाऊ अगदी अभिमानाने म्हणायचे देखील, “आज मी ९६ पूर्ण झालो....” किंवा ९७ आणि ९८...

२०१७ साली, जुलै महिन्यात सातारा आणि सांगलीतल्या हयात असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे कॅप्टन भाऊंची भेट पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधीचे नातू गोपाळ गांधी यांच्याशी झाली. त्यांना भेटताच या लढवय्या सेनानीच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि त्यांनी गांधीजींच्या नातवाला प्रेमाने मिठी मारली.  खरंच. तो क्षण त्यांच्या आयुष्यातल्या मन हेलावून टाकणाऱ्या क्षणांपैकी एक होता, भाऊ नंतर म्हणाले होते.

२०१८ साली नोव्हेंबर महिन्यात १,००,००० शेतकऱ्यांनी दिल्लीत संसदेवर मोर्चा काढला होता तेव्हा पारीच्या भारत पाटीलजवळ त्यांनी एक संदेश पाठवला होता. “माझी तब्येत साथ देत असती तर आज तुमच्यासोबत मी देखील मोर्चात चालत असतो.” ९६ वर्षांचा हा सेनानी गरजला होता.

२०२१ साली जून महिन्यात मी ठरवलं की एकदा तरी भाऊंना भेटावं, स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पहावं, या महामारीत ते ठीक आहेत ना ते विचारावं. आणि मग मी आणि माझी सहकारी मेधा काळे, आम्ही दोघं भाऊंना त्यांच्या जन्मदिनी भेटायला गेलो. पारीच्या वतीने त्यांना काही भेटवस्तू दिल्या. त्यांच्या आवडीचं एक नेहरू जॅकेट, हाताने कोरलेली तांब्याची काठी आणि त्यांच्या फोटोंचा संग्रह. पण, २०१८ सालानंतर थेट त्या दिवशी त्यांना पाहिलं आणि धक्काच बसला. तेव्हाचे रांगडे भाऊ एकदम वाळलेले, थकलेले दिसत होते. त्यांचं चित्त तिथे नव्हतं, एक शब्दही त्यांना बोलता आला नव्हता. पण आम्ही दिलेल्या भेटवस्तू त्यांना मनापासून आवडल्या होत्या. जॅकेट त्यांनी लागलीच घातलं – सांगलीची रणरणती दुपार होती, तरीही. आणि तांब्याची काठी आपल्या मांडीवर ठेवून त्यांनी फोटो अल्बम अगदी निरखून पाहिला.

खेदाची बाब ही की तिथे गेल्यावर आम्हाला समजलं की त्यांच्या पत्नी, कल्पना लाड यांचं इतक्यात निधन झालंय. तो धक्का काही या गृहस्थाला सहन झालेला नाही. त्यांच्या घरून निघतानाच आत कुठे तरी मला जाणवून गेलं होतं की भाऊसुद्धा आता पैलतीराच्या वाटेवर निघाले आहेत.

Captain Bhau wearing the Nehru jacket and holding the hand stick gifted by PARI on his birthday in 2021.
PHOTO • Atul Ashok
Partners of over 70 years, Kalpana Lad and Captain Bhau seen here with a young relative. Kalpanatai passed away a couple of years ago
PHOTO • P. Sainath

डावीकडेः २०२१ साली पारीने सप्रेम भेट दिलेलं नेहरू जॅकेट परिधान केलेले आणि काठी हातात घेतलेले भाऊ. उजवीकडेः सत्तर वर्षांचा संसार केलेले भाऊ आणि कल्पनाताई इथे एका चिमुकलीसोबत. कल्पनाताई काही वर्षांपूर्वी निवर्तल्या

दीपक लाडने मला फोन करून सांगितलं – “भाऊ गेले तेव्हा तुम्ही दिलेलं जॅकेटच त्यांच्या अंगावर होतं.” हाताने कोरलेली तांब्याची काठी त्यांच्या शेजारी ठेवलेली होती. दीपकने असंही सांगितलं की सरकारी अधिकाऱ्यांनी भाऊंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं पण ते काही घडू शकलं नाही. पण भाऊंना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय मात्र उपस्थित होता.

पारीची स्थापना झाल्यापासून ८५ महिन्यांच्या काळात पारीला ४४ पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांच्या स्वतःच्या गावात, कुंडलमध्ये जेव्हा भाऊंवरची फिल्म दाखवण्यात आली तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया कोणत्याही पुरस्कारापेक्षा आमच्यासाठी मोलाची आहे. २०१७ साली दीपक लाडकरवी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं:

“पी. साईनाथ आणि पारीने उजाळा दिला म्हणून. नाही तर प्रति सरकारचा सगळा इतिहास धुळीत गेला होता. आपल्या इतिहासातलं हे पानच आता गळून गेलंय. आम्ही स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी लढलो. पण जसजशी वर्षं सरत गेली तसं आमचं योगदान लोक विसरले. आम्ही अडगळीत पडलो. गेल्या साली साईनाथ माझ्या घरी आले आणि माझी गोष्ट त्यांनी ऐकली. शेणोलीत ज्या ठिकाणी आम्ही इंग्रजांच्या गाडीवर हल्ला केला होता, अगदी नेमक्या त्याच ठिकाणी ते मला घेऊन गेले.”

“ही फिल्म, माझ्यावरचा आणि माझ्या सहकाऱ्यांवरचा लेख आला आणि साईनाथ आणि पारीने प्रति सरकारच्या स्मृती जागवल्या. आपल्या जनतेसाठी आम्ही कसे लढलो ते पुन्हा लोकांना समजलं. आमचा मान, सन्मान त्यांनी आम्हाला परत मिळवून दिला. समाजाला पुन्हा एकदा आमचं भान आलं. ही आमची खरीखुरी गोष्ट होती.”

Left: Old photos of Toofan Sena and its leaders, Captain Bhau and Babruvahan Jadhav. Right: Captain Bhau with P. Sainath in Shenoli in 2016
PHOTO • P. Sainath
Left: Old photos of Toofan Sena and its leaders, Captain Bhau and Babruvahan Jadhav. Right: Captain Bhau with P. Sainath in Shenoli in 2016
PHOTO • Sinchita Maji

डावीकडेः तुफान सेनेचे व सेनेचे नेते कॅप्टन भाऊ आणि बब्रुवाहन जाधव यांचे जुने फोटो. उजवीकडेः २०१६ साली पी. साईनाथ यांच्यासोबत कॅप्टन भाऊ

“ती फिल्म पाहताना मला फार भरून आलं. तोवर आमच्या गावातल्या तरुण पिढीला मी कोण आहे, [स्वातंत्र्यलढ्यात] मी काय काम केलं याची काहीही कल्पना नव्हती. पण आज हीच तरुण पोरं माझ्याकडे वेगळ्याच आदराने पाहतात. आता त्यांना समजलंय की मी आणि माझ्या साथीदारांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय काय केलंय ते. हयातीची जी काही शेवटची थोडी फार वर्षं उरलीयेत, त्यात माझा मान मला परत मिळालाय.”

भाऊ गेले आणि भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातला एक बिनीचा शिलेदार आपल्याला सोडून गेला. कसलाही स्वार्थ नाही आणि आपण करतोय त्यात किती जोखीम आहे याची संपूर्ण कल्पना असतानाही त्यांनी या संग्रामात उडी घेतली होती.

२०१७ साली, त्यांची मुलाखत घेतली त्याला एक वर्ष उलटून गेल्यावर भारत पाटीलने मला त्यांचा एक फोटो पाठवला होता. कुंडलमधल्या शेतकऱ्यांच्या एका मोर्चात भाऊ चालत होते. इतक्या उन्हात तुम्ही तिथे काय करत होतात, मी पुढे त्यांची भेट झाली तेव्हा विचारलं होतं. आता कशासाठी लढताय? स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले होते:

“तेव्हासुद्धा लढा शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी होता. आणि आतादेखील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठीच.”

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale