आधी वडील आणि नंतर दुसऱ्या दिवशी आई. या वर्षीच्या [२०२१] मे महिन्यात दोघांनाही एका पाठोपाठ ताप आला आणि पुरुषोत्तम मिसाळ एकदम हबकून गेले. “गावातल्या बऱ्याच जणांना आधीच करोना झाला होता,” पुरुषोत्तम यांच्या पत्नी विजयमाला सांगतात. “तेव्हा इतकी भीती वाटायली होती.”

बीडमध्ये हॉस्पिटल रुग्णांनी खचाखच भरली आहेत हे पुरुषोत्तम यांच्या कानावर आलं होतं. “त्यांना कल्पना होती की आई-वडील दोघांना खाजगी दवाखान्यात भरती करावं लागणार आणि तिथे सगळ्यालाच भरपूर खर्च येतो,” विजयमाला म्हणतात. “नुसता एक आठवडा तर माणूस भरती झाला तरी लाखात बिल येतं.” पुरुषोत्तम यांची एक अख्ख्या वर्षाची कमाई पण तितकी भरत नाही.

गरिबी असली तरी या कुटुंबाने आतापर्यंत कशासाठी कर्ज काढलं नव्हतं. दवाखान्याच्या खर्चासाठी कर्ज काढायच्या विचाराने ४० वर्षीय पुरुषोत्तम फारच अस्वस्थ झाले. परळी तालुक्यातल्या आपल्या हिवरा गोवर्धन या गावापासून १० किलोमीटरवरच्या सिरसाळा गावी ते चहाची टपरी चालवायचे. मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा उद्रेक झाला तेव्हापासून ती बंद असल्यातच जमा होती.

आईला ताप आला त्या रात्री पुरुषोत्तम यांचा काही डोळ्याला डोळा लागत नव्हता. ते या कुशीवरून त्या कुशीवर करत होते. पहाटे चार वाजता ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, “कोविड असला तर?” पुरुषोत्तम चक्क जागे होते, नजर आढ्याला लागली होती, असं ३७ वर्षीय विजयमाला सांगतात. 'चिंता करू नका' असं त्यांना सांगितल्यावर, “तेच म्हणाले, ‘असू दे, काळजी करू नको,’ आणि मला झोपी जा असं म्हणाले.”

Left: A photo of the band in which Purushottam Misal (seen extreme left) played the trumpet. Right: Baburao Misal with his musical instruments at home
PHOTO • Parth M.N.
Left: A photo of the band in which Purushottam Misal (seen extreme left) played the trumpet. Right: Baburao Misal with his musical instruments at home
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः पुरुषोत्तम मिसाळ (सर्वात डावीकडे) ट्रम्पेट वाजवायचे त्या बॅंडचा फोटो. उजवीकडेः बाबुराव मिसाळ आपल्या घरी, सोबत त्यांची वाद्यं

त्यानंतर काहीच वेळात पुरुषोत्तम घरून निघाले आणि आपल्या चहाच्या टपरीकडे गेले. तिथे शेजारीच एक पत्र्याची रिकामी शेड होती. तिथे आढ्याला रस्सी बांधून त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

मिसाळ कुटंबाच्या नावावर कसलीच जमीन नाही. त्यामुळे टपरीवर चहा बिस्किट विकून जो काही पैसा मिळायचा तोच पुरुषोत्तम यांच्या कमाईचा मुख्य स्रोत होता. मिसाळ कुटुंब मातंग या दलित समाजाचं आहे. पुरुषोत्तम गावातल्या एका बँडमध्येही वादन करायचे. जास्त करून लग्नांमध्ये बँड वाजवला जायचा. त्यांचं सात जणांचं कुटुंब त्यांच्या एकट्याच्या कमाईवरच अवलंबून होतं. “चहाच्या टपरीतून महिन्याला ५,००० ते ८,००० रुपये यायचे,” विजयमाला सांगतात. बँडमध्ये वाजवून जे काही पैसे मिळायचे ते पकडून वर्षाला सुमारे १.५ लाखाचं उत्पन्न येत होतं.

“माझा लेक चांगला वाजवायचा,” त्यांच्या आई, ७० वर्षीय गंगुबाई सांगतात. दुःखाने त्यांचा आवाज जड झालाय. पुरुषोत्तम ट्रम्पेट वाजवायचे, कधी कधी कीबोर्ड आणि ड्रमदेखील. “मी त्याला सनईसुद्धा शिकवली होती,” त्यांचे वडील ७२ वर्षीय बाबुराव सांगतात. आतापर्यंत गावातली २५-३० जण बाबुरावांकडे वाद्यं वाजवायला शिकली असतील. त्यांना गावातले लोक उस्ताद म्हणूनच ओळखतात.

पण कोविडमुळे बॅंडला देखील काम नव्हतं. विजयमाला सांगतात, “लोक विषाणूला तर घाबरायले होतेच. पण त्यांच्याकडे ना चहाला पैसे ना लग्नात बँड वाजवायला.”

Left: Gangubai Misal says her son, Purushottam, was a good musician. Right: Vijaymala Misal remembers her husband getting into a panic when his parents fell ill
PHOTO • Parth M.N.
Left: Gangubai Misal says her son, Purushottam, was a good musician. Right: Vijaymala Misal remembers her husband getting into a panic when his parents fell ill
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः गंगुबाई मिसाळ सांगतात की पुरुषोत्तम चांगलं वाजवायचे. उजवीकडेः आई-वडील दोघंही आजारी पडल्यानंतर पुरुषोत्तम एकदम हात पाय गाळून बसले

अमेरिकेतील प्यू रीसर्च सेंटरच्या अहवालात असं नमूद केलं आहे की, “भारतामध्ये गरिबांच्या (दिवसाला २ डॉलरहून कमाई) संख्येत कोविड-१९ मुळे आलेल्या मंदीमुळे साडेसात कोटींची भर पडली आहे.” यासोबतच २०२० साली भारतात ३.२ कोटी लोक मध्यम वर्गातून बाहेर पडले. मार्च २०२१ मध्ये आलेला हा अहवाल म्हणतो की वैश्विक दारिद्र्यवाढीत दोन्हींचं प्रमाण ६० टक्के इतकं आहे.

बीडमध्ये लोकांची क्रयशक्ती घटली असल्याचं अगदी ठळकपणे जाणवतं. कायमच्या दुष्काळामुळे गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्यातले शेतकरी कर्ज आणि अनेक संकटांशी झुंज देत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था आधीच गर्तेत असताना कोविड-१९ मुळे ग्रामीण कुटुंबांवरचा बोजा आणखीच वाढलाय.

पुरुषोत्तम यांचा चरितार्थ जरी प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून नसला तरी त्यांचं बहुतेक गिऱ्हाईक शेतकरीच. त्यांचाच खिसा रिकामा व्हायला लागल्यावर त्याचा परिणाम कृषी आधारित व्यवस्थेच्या परिघापर्यंत जाणवायला वेळ लागला नाही - चर्मकार, नाभिक, कुंभार, चहाच्या टपऱ्या चालवणारे आणि असे कित्येक. आता आपलं पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न या सगळ्यांपुढे उभा राहिलाय.

बीड तालुक्यातल्या कामखेडा गावातला असाच एक भनान दिवस. ५५ वर्षांच्या लक्ष्मी वाघमारे कोविडच्या आधीचा काळ आठवतात. “आमची हालत अजून बेकार होईल, वाटलं नव्हतं,” त्या खेदाने म्हणतात.

Lakshmi and Nivrutti Waghmare make a variety of ropes, which they sell at their shop in Beed's Kamkheda village. They are waiting for the village bazaars to reopen
PHOTO • Parth M.N.
Lakshmi and Nivrutti Waghmare make a variety of ropes, which they sell at their shop in Beed's Kamkheda village. They are waiting for the village bazaars to reopen
PHOTO • Parth M.N.

लक्ष्मी आणि निवृत्ती वाघमारे बीडच्या कामखेड्यामध्ये आपल्या दुकानात दोर, कासरे इत्यादी वस्तू विकतायत. आठवडी बाजार सुरु व्हायची त्यांना प्रतीक्षा आहे

लक्ष्मी आणि त्यांचे पती, निवृत्ती वाघमारे, वय ५५ वेगवेगळ्या प्रकारचे दोर बनवतात. हे नवबौद्ध पती-पत्नी भूमीहीन आहेत. त्यांचं सगळं उत्पन्न त्यांच्या परंपरागत व्यवसायावर आणि कारागिरीवर अवलंबून आहे. ही महासाथ पसरायच्या आधीपर्यंत ते आठवडी बाजारांमध्ये त्यांच्या वस्तू विकत होते.

“बाजारात तुम्हाला सगळेच लोक भेटणार. कशी लगबग सुरू राहते,” निवृत्ती म्हणतात. “जनवराचा बाजार असायचा, शेतकरी माळवं विकायचे आणि कुंभार गाडगी. आम्ही दोर विकायचो. जनावर खरेदी केल्यावर शेतकरी दावं, कासरा घेतोच.”

करोना विषाणूचं आगमन व्हायचं होतं तोपर्यंत आठवडी बाजार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा होता. सगळ्या वस्तूंची खरेदी विक्री सुलभपणे होत होती. “आम्ही आठवड्यात चार बाजारांना जात होतो. वीस हजाराचा माल विकला जायचा,” लक्ष्मी सांगतात. “आम्हाला [आठवड्याला] ४,००० नफा सुटायचा. हा करोना आल्यापासून आठवड्याला ४०० रुपयांचा सुद्धा माल जात नाहीये. नफ्याची तर बातच करू नका.” या वर्षी एप्रिल महिन्यात लक्ष्मी आणि निवृत्ती यांनी ५०,००० रुपयांना आपला टेम्पो विकून टाकला. ते आपला माल यातूनच ने आण करायचे. “त्याची देखभाल आता झेपंना गेलीये,” लक्ष्मी सांगतात.

दोर वळणं हे फारच कौशल्याचं काम आहे. कोविडच्या आधी लक्ष्मी आणि निवृत्ती या कामासाठी मजूर घ्यायचे. आता त्यांचा मुलगा बांधकामावर मजुरी करतोय आणि महिन्याला ३,५०० रुपये कमवतोय. “त्यातनंच भागतंय,” लक्ष्मी सांगतात. “घरी ठेवलेले दोर जुने व्हायलेत, रंग विटायलाय.”

Left: Lakshmi outside her house in Kamkheda. Right: Their unsold stock of ropes is deteriorating and almost going to waste
PHOTO • Parth M.N.
Left: Lakshmi outside her house in Kamkheda. Right: Their unsold stock of ropes is deteriorating and almost going to waste
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः लक्ष्मी कामखेड्यात आपल्या घरी. उजवीकडेः पडून राहिलेले दोर-रस्स्या आता वाया चाललेत

कामखेड्याहून १० किलोमीटरवर असलेल्या पडलसिंगीमध्ये कांताबाई भुतडमलसुद्धा बाजार कधी उघडतील याकडे डोळे लावून बसल्या आहेत. त्या बनवत असलेले फडे कुठे विकायचे असा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. “मी हे फडे घेऊन सगळ्या बाजारानी जायचे. गावोगावी जाऊन देखील मी फडे विकलेत,” त्या सांगतात. “बाजार बंद केलेत, लॉकडाउनमुळे पोलिस आम्हाला इथून तिथल्या गावी जाऊ देईना गेलेत. आता इथवर कुणी आलं तरच फडे विकायलेव. त्यातनं काय पैसा सुटावा?”

महासाथीच्या आधी कांताबाई दर आठवड्याला १०० फडे विकत होत्या – नगाला ४०-५० रुपये मिळायचे. “आता अधनं मधनं एखांदा व्यापारी येऊन आमच्याकडून माल घेऊन चाललाय. नगाला २०-३० रुपये भाव द्यायलेत,” त्या सांगतात. “मी आधी जेवढा माल विकायचे ना त्याच्या निम्मा सुदिक जाईना गेलाय. कुणाच्या बी घरी जावा हीच गत हाय – हितं ३०-४० घरात आम्ही फडे बवनितो.”

साठीच्या कांताबाई सांगतात की त्यांची नजर आता वयानुसार अधू व्हायला लागलीये. पण चार पैसे कमवायचे तर त्यांना फडे बनवणं थांबवून चालणार नाही. “आतासुद्धा तुम्ही मला धड दिसत न्हाव,” असं म्हणणाऱ्या कांताबाईंचे हात मात्र स्वयंचलित यंत्रासारखे फडा बांधत होते. “माझे दोन्ही लेक बसून आहेत. त्यांचा बाप शेरडं राखतो. तितकंच. आमचं पोट या फड्यावरच आहे म्हणा की.”

दिसत नसताना सुद्धा त्या फडे कसे बांधू शकतात असं मी त्यांना विचारलं तर त्या म्हणतात, “सगळी जिंदगी हेच करण्यात गेलीये. दिसायचं बंद झालं तरी जमतंय.”

Kantabai Bhutadmal (in pink saree) binds brooms despite her weak eyesight. Her family depends on the income she earns from selling them
PHOTO • Parth M.N.

कांताबाई भुतडमल (गुलाबी साडीत) नजर अधू असली तरी फडे बांधायचं काम करतायत. या फड्यांच्या विक्रीतून येणाऱ्या पैशावरच त्यांचं कुटुंब अवलंबून आहे

पूर्वीसारखी बाजारांची लगबग सुरू व्हावी याचीच कांताबाईंना प्रतीक्षा आहे. पुरुषोत्तम यांनी आयुष्य संपवल्यानंतर बाबुराव सुद्धा निवृत्तीनंतर पुन्हा कामाला लागले आहेत आणि मुलाचा चहाचा गाडा त्यांनी चालवायला घेतलाय.

बाबुरावांना आपल्या नातवंडांची – प्रियांका, विनायक आणि वैष्णवी – काळजी लागून राहिली आहे. “त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करावी?” ते म्हणतात. “त्यांचं शिक्षण पुढे चालू राहील याची खात्री कशी द्यावी? त्यानं असे हातपाय का बरं गाळून बसला?”

पुरुषोत्तम गेले त्यानंतर आठवडाभरात बाबुराव आणि गंगुबाईंना बरं वाटायला लागलं आणि तापही उतरला. त्यांच्या मुलाला ज्याची भीती होती तसं काही झालं नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये जावंच लागलं नाही. तरीसुद्धा शंका नको म्हणून बाबुराव आणि गंगुबाईंनी कोविडची तपासणी करून घेतली – दोघांनाही संसर्ग झालाच नव्हता.

लेखकाला या आणि इतर लेखांच्या लेखमालेसाठी पुलित्झर सेंटरतर्फे स्वतंत्र अर्थसहाय्य मिळाले आहे.

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale