हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

“दुपारी ४ वाजून गेले की उबेसाठी आम्हाला शेकोटी पेटवायला लागायची,” केरळच्या डोंगरी वायनाड जिल्ह्यातल्या आपल्या शेतात ऑगस्टीन वडकील सांगतात. “पण हे झालं ३० वर्षांपूर्वीचं. वायनाड आत तेव्हाचं थंड, धुक्याच्या दुलईत असणारं गाव राहिलेलं नाही.” मार्चच्या सुरुवातीला जास्तीत जास्त २५ अंशापर्यंत चढणारं तापमान आता याच काळात सहज ३० अंशाच्या वर जायला लागलंय.

वडकील यांच्या आयुष्यभरातच जास्त तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या दुपटीहून जास्त झाली आहे. १९६० साली, ज्या वर्षी त्यांचा जन्म झाला, “वायनाडच्या भागात ३२ अंशापर्यंत तापमान असणारे सुमारे २९ दिवस असायचे” असं न्यू यॉर्क टाइम्सने जुलै महिन्यात इंटरनेटवर उपलब्ध केलेल्या वातावरण बदलांसंबंधीच्या एका संवादी माध्यमातून काढलेल्या अनुमानातून दिसून येतं. “आज, वायनाडच्या भागात ३२ अंशापर्यंत तापमान जाईल असे ५९ दिवस असण्याची शक्यता आहे.”

या बदलत्या हवामानाचा परिणाम काळी मिरी आणि संत्र्यासारख्या नाजूक पिकांवर झालाय, वडकील सांगतात. दख्खनच्या पठाराच्या दक्षिणेकडच्या टोकावर पश्चिमी घाटांमध्ये कधी काळी ही पिकं उदंड होती.

वडकील आणि त्यांची पत्नी वल्सा यांची मानंथावडी तालुक्यातल्या चेरुकोट्टूर गावी चार एकर शेती आहे. सुमारे ८० वर्षांपूर्वी इथल्या नगदी पिकांच्या अर्थव्यवस्थेतल्या तेजीचा लाभ घेण्यासाठी त्यांचं कुटुंब कोट्टायमहून वायनाडला आलं. त्या काळात फार मोठ्या प्रमाणावर मध्य केरळमधून छोटे आणि सीमांत शेतकरी इथे, केरळच्या ईशान्येकडच्या जिल्ह्यात स्थायिक झाले.

पण काळाच्या ओघात आता या तेजीचा फुगा फुटलाय असं दिसतंय. “जर पाऊस असाच लहरी वागत राहिला, जसा तो मागच्या वर्षी होता, तर आम्ही पिकवतो ती [जैविक रोबुस्ता] कॉफी बुडालीच म्हणून समजा,” वडकील म्हणतात. “कॉफीत नफा आहे मात्र सध्या कॉफी पिकवण्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे हवामान. उष्णता आणि लहरी पावसाने तिची वाट लागते,” वल्सा सांगतात. [रोबुस्ता] कॉफीच्या लागवडीसाठी २३-२८ अंश हे आदर्श तापमान असल्याचं या क्षेत्रातल्या जाणकारांचं मत आहे.

PHOTO • Noel Benno ,  Vishaka George

वरतीः वायनाडमधल्या कॉफीच्या पिकाला फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीला पावसाची गरज असते, एका आठवड्यानंतर बहर सुरू होतो. खालीः पावसाने ओढ दिली किंवा अवेळी पाऊस झाला तर फळांपासून कॉफीच्या बिया (उजवीकडे) तयार करणाऱ्या फुलांचं (डावीकडे) नुकसान होतं

संपूर्ण वायनाडमध्ये कडक स्वाद असणाऱ्या रोबुस्ता कुळातल्या (सदहरित झुडूप) कॉफीची लागवड डिसेंबर ते मार्च या दरम्यान केली जाते. कॉफीच्या झाडाला फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला पहिला पाऊस गरजेचा असतो – त्यानंतर एका आठवड्यात बहर सुरू होतो. पहिल्या पावसानंतर एक आठवडाभर तरी पाऊस पडून चालत नाही कारण या काळात फुलं नाजूक असतात. त्यानंतर आठवडाभराने पाऊस हवा असतो कारण तेव्हा कॉफीचं ‘फळ धरायला सुरुवात होते’. एकदा फुलं गळून पडली की कॉफीची फळं पक्व व्हायला सुरुवात होते.

“वेळेवर पाऊस आला तर ८५ टक्के पिकाची हमी असते,” वडकील सांगतात. आम्ही मार्चच्या सुरुवातीला भेटलो तेव्हा त्यांनाही हीच आशा होती, आणि पीक हाती येईल का नाही याची चिंता. त्यांची चिंता खरी ठरली.

मार्चच्या सुरुवातीला, केरळच्या अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्याची सुरुवातच ३७ अंश तापमानाने झाली. “दुसरा पाऊस (रंदामथ माळ) फार फार लवकर आला आणि सगळ्याचीच वाताहत झाली,” मार्च अखेर वडकील यांनी आम्हाला सांगितलं.

वडकील यांच्या दोन एकरांवर कॉफी आहे, म्हणजेच वर्षाला त्यांचं ७०,००० रुपयांचं नुकसान झालं. वायनाड सोशल सर्विस सोसायटी शेतकऱ्यांना प्रक्रिया न केलेल्या एक किलो जैविक कॉफीसाठी ८८ रुपये आणि जैविक नसणाऱ्या कॉफीसाठी ६५ रुपये दर देते.

२०१७-१८ साली ५५,५२५ टनांवरून या वर्षी वायनाडमधलं कॉफीचं उत्पादन ४० टक्क्यांनी घटलं आहे असं वायनाड सोसायटीचे अध्यक्ष फादर जॉन चूरापुळयिल फोनवर सांगतात. स्थानिक शेतकऱ्यांकडून कॉफी विकत घेणारी ही सहकारी संस्था आहे. अजूनही अधिकृतरित्या कोणताही आकडा जाहीर झालेला नाही. “इतकं कमी उत्पादन झालंय कारण वातावरणात होणारे बदल वायनाडच्या कॉफी लागवडीसमोरचं मोठं संकट ठरू लगले आहेत,” फादर जॉन सांगतात. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी किंवा अवर्षण या दोन्हीमुळे वेगवेगळ्या वर्षी उत्पादनात किती चढ उतार होतायत हे शेतकऱ्यांकडून समजत होतं.

PHOTO • Vishaka George
PHOTO • Noel Benno

ऑगस्टीन वडकील आणि त्यांची पत्नी वल्सा (डावीकडे) कॉफीसोबत रबर, काळी मिरी, केळी, भात आणि सुपारी ही पिकं घेतात. मात्र वाढत्या उष्णतेचा कॉफीप्रमाणेच इतर पिकांवरही परिणाम व्हायला लागला आहे

लहरी पाऊसमानामुळे शेतं तहानलेली आहेत. “वायनाडच्या शेतकऱ्यांपैकी केवळ १० टक्के शेतकरी,” फादर जॉन अंदाज बांधतात, “दुष्काळ किंवा अवेळी पावसावर बोअरवेल किंवा मोटर वापरून मात करू शकतात.”

मात्र त्या मोजक्या लोकांपैकी वडकील नाहीत. ऑगस्ट २०१८ मध्ये वायनाड आणि केरळच्या इतर भागात आलेल्या महापुरात त्यांच्या कृषी पंपाचं नुकसान झालं. सध्याच्या बिकट काळात तो दुरुस्त करण्यासाठी लागणारे १५,००० रुपये त्यांच्यासाठी मोठी रक्कम आहे.

त्यांच्या इतर दोन एकरांत वडकील आणि वल्सा रबर, केळी, भात आणि सुपारीचं पीक घेतात. पण वाढत्या तापमानाचा या सगळ्याच पिकांना फटका बसू लागला आहे. “पंधरा वर्षांपूर्वी आम्हाला जगण्यासाठी काळी मिरी पुरेशी होती. मात्र [तेव्हापासून] ध्रुतवाट्टम (Quick Wilt - मर) रोगामुळे जिल्ह्यात एकरच्या एकर पीक वाया गेलं आहे.” मिरी हे वर्षभराचं पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचं अमाप नुकसान झालं आहे.

“जसजसा काळ चाललाय, असं वाटायला लागलंय की फक्त छंद म्हणूनच शेती करावी. माझ्यापाशी ही जमीन आहे, पण माझी हालत काय झालीये पाहताय ना,” वडकील म्हणतात. “सध्या तर अशी वेळ आहे की फक्त मिरच्या वाटायचं काम आहे. कारण भाताबरोबर दुसरं काही परवडणारंच नाही,” ते हसत हसत म्हणतात.

“सुरुवात झाली ती १५ वर्षांपूर्वी,” ते सांगतात. “कालावस्था अशी बदलतीये तरी का?” लक्षणीय गोष्ट म्हणजे मल्याळममध्ये कालावस्था म्हणजे वातावरण, तापमान किंवा हवामान नाही. वायनाडच्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला वारंवार हा प्रश्न विचारलाय.

खेदाची बाब ही की या प्रश्नाचं उत्तर थोडंफार गेल्या अनेक दशकांमध्ये शेतकऱ्यांनी ज्या प्रकारची पिकं घेतली त्यात दडलं आहे.

PHOTO • Vishaka George
PHOTO • Noel Benno

मानंथावडीमधल्या आणि इतर मोठ्या कॉफी मळ्यांना (डावीकडे) पाऊस कमी झाला तरी कृत्रिम तळी आणि मोटर बसवणं परवडणारं आहे. मात्र वडकील यांच्यासारख्या (उजवीकडे) छोट्या शेतकऱ्यांना मात्र पाऊस किंवा विहिरीच्या अपुऱ्या पाण्याचाच काय तो आधार असतो

“आमचं असं म्हणणं आहे की शेताच्या एकेका तुकड्यात वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणं हे सध्याच्या एक पीक पद्धतीपेक्षा नक्कीच जास्त चांगलं आहे,” सुमा टी. आर. सांगतात. वायनाड येथील एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात त्या शास्त्रज्ञ आहेत आणि गेली १० वर्षं त्या जमीन वापरात होणाऱ्या बदलांबाबत काम करत आहेत. एक पीक पद्धतीमुळे कीड आणि रोगांना आमंत्रणच मिळतं आणि मग त्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकं आणि खतांचा वापर सुरू होतो. हळूहळू ही खतं भूजलात किंवा हवेत मिसळल्याने प्रदूषणात वाढ होते – आणि कालांतराने पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं.

सगळ्याची सुरुवात, सुमा सांगतात, इंग्रजांनी केलेल्या जंगलतोडीपासून झाली. “त्यांनी लाकडासाठी जंगलं साफ केली आणि उंच पर्वतरांगांचं मळ्यांमध्ये रुपांतर केलं.” वातावरणातल्या बदलांचा संबंध अजून एका गोष्टीशी आहे, त्या पुढे म्हणतात, “[१९४० पासून या जिल्ह्यात] मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने इथलं सगळं चित्रच बदलून गेलं. त्या आधी वायनाडचे शेतकरी सरकती/फिरती शेती करत होते.”

त्या काळात, इथलं मुख्य पीक होतं खाचरातला भात, कॉफी किंवा मिरी नाही – वायनाड शब्दाचा उगमही ‘वायल नाडू’ किंवा खाचरांचा प्रदेश असा झाला आहे. ही खाचरं या प्रदेशाच्या – आणि केरळच्या – पर्यावरण आणि परिसंस्थांसाठ फार मोलाची होती. मात्र भात लागवडीखालचं क्षेत्र – १९६० मध्ये सुमारे ४०,००० हेक्टर – आज कसंबसं ८,००० हेक्टरवर आलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार ते जिल्ह्यातील लागवडीखालच्या एकूण क्षेत्राच्या ५ टक्के इतकं आहे. आणि आता वायनाडमध्ये कॉफीच्या मळ्यांनी ६८,००० हेक्टर क्षेत्र व्यापलं आहे. केरळच्या कॉफीखालच्या क्षेत्राच्या एकूण ७९ टक्के – आणि १९६० साली, जेव्हा वडकील जन्माला आले – तेव्हा संपूर्ण भारतात जेवढी रोबुस्ता कॉफीची लागवड होती त्याहून ३६ टक्के जास्त.

नगदी पिकांसाठी जमिनी साफ करण्याऐवजी “शेतकरी डोंगरदऱ्यांमध्ये नाचणीसारखी पिकं घेत होते,” सुमा सांगतात. शेतं परिसंस्थांसाठी पोषक होती. मात्र स्थलांतर वाढलं आणि धान्यपिकांपेक्षा नगदी पिकांना प्राधान्य मिळू लागलं. आणि १९९० मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर लोक काळ्या मिरीसारख्या नगदी पिकांवर पूर्णपणे विसंबून राहू लागले.

‘उत्पादन कमी झालंय कारण वातावरणात होणारे बदल वायनाडच्या कॉफी लागवडीसमोरचं मोठं संकट ठरू लगले आहेत,” आम्ही भेटलो ते शेतकरी चढ-उतारांबद्दल बोलतात

व्हिडिओ पहाः ‘छंद म्हणूनच आता शेती करावी अशी गत आहे’

“आज शेतकऱ्याला एक किलो साळीसाठी रु. १२ आणि कॉफीसाठी रु. ६७ दर मिळतो. मिरीला मात्र किलोमागे रु. ३६० ते ३६५ भाव आहे,” वायनाड सोसायटीचे माजी प्रकल्प अधिकारी आणि मानंथवाडी शहरातले एक जैविक शेतकरी असणारे ई. जे. जोस सांगतात. भावात एवढा प्रचंड फरक असल्यामुळे शेतकरी अर्थातच भात सोडून कॉफी किंवा मिरीच्या मागे पळतो. “सगळे जण सध्या सगळ्यांना नफा मिळवून देणारी पिकं घेतायत, काय गरजेचं आहे ती नाही. [आता] भात कमी होत चाललाय, खरं तर या भातामुळे पावसाळ्यात पाणी धरून ठेवलं जातं आणि जमिनीखालची पाण्याची पातळी राखली जाते.”

राज्यातली भातशेती मोठ्या प्रमाणावर बांधकामांसाठीही वापरली जाऊ लागली आहे. भातशेतीत कुशल असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे पुरेसं काम मिळत नाहीये.

“या सगळ्या बदलांमुळे वायनाडचं सगळं चित्रच बदलत चाललंय,” सुमा म्हणतात. “एक पीक पद्धतीमुळे मातीचा कसच निघून गेलाय. लोकसंख्या वाढतीये [१९३१ च्या जनगणनेपर्यंत १,००,००० हून कमी ते २०११ मध्ये ८,१७,४२०] आणि जमिनीचे छोटे तुकडे पडत चाललेत. थोडक्यात काय तर वायनाड तापत चाललंय यात आश्चर्य करण्यासारखं फारसं काही नाही.”

जोस यांनाही असंच वाटतं की बदलत्या शेतीचा आणि तापमानातील वाढीचा जवळचा संबंध आहे. “शेतीतल्या बदलांचा पाऊसमानावर परिणाम झाला आहे,” ते म्हणतात.

जवळच्याच थाविनल पंचायतीत, आपल्या १२ एकर शेतात आम्हाला घेऊन जाता जाता ७० वर्षीय एम. जे. जॉर्ज म्हणतात, “कधी काळी ही शेतं काळ्या मिरीने इतकी लखडलेली असायची की प्रकाशाचा किरणही आत शिरू शकायचा नाही. गेल्या काही वर्षांत मिरीच्या उत्पादनात टनावारी घट झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे मर रोगासारखे (Quick Wilt) रोग वाढायला लागले आहेत.”

फायटोफथोरा बुरशीमुळे येणाऱ्या मर रोगामुळे जिल्ह्यातल्या हजारोंची उपजीविका धोक्यात आली आहे. हा रोग दमट हवेत फैलावतो आणि “गेल्या १० वर्षांत वायनाडमध्ये आर्द्रता लक्षणीय प्रमाणात वाढली आहे,” जोस सांगतात. “पाऊस आता लहरी झाला आहे. रासायनिक खतांचा वाढता वापर या किडीच्या पथ्यावर पडला आहे, कारण या बुरशीचा मुकाबला करणारे ट्रायकोडर्मासारखे जीवाणू या खतांमुळे मरतायत.”

PHOTO • Noel Benno ,  Vishaka George

डावीकडे वरतीः एम. जे. जॉर्ज म्हणतात, ‘आम्ही आमच्या पावसासाठी प्रसिद्ध होतो.’ वरती उजवीकडेः ‘या वर्षी सर्वात कमी कॉफी उत्पादन झालं आहे,’ सुभद्रा बालकृष्णन सांगतात. खाली डावीकडेः याची सुरुवात इंग्रजांनी केलेल्या जंगलतोडीपासून झाली, शास्त्रज्ञ सुमा टी. आर. सांगतात. उजवीकडे खालीः ‘सगळ्यांना नफा मिळवून देणारी पिकं घ्यायची आहेत, काय गरजेचं आहे ते नाही,’ ई. जे. जोस म्हणतात

“पूर्वी वायनाडमध्ये वातानुकुलित वातावरण होतं, आता नाही,” जॉर्ज म्हणतात. “पाऊस, जो पूर्वी सगळ्या मोसमात नेमाने पडायचा, गेल्या १५ वर्षांत कमी कमी होत चालला आहे. आम्ही आमच्या पावसासाठी प्रसिद्ध होतो...”

तिरुवनंतपुरमच्या भारतीय वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, वायनाडमध्ये १ जून ते २८ जुलै २०१९ या काळात त्या काळातल्या सरासरीपेक्षा ५४ टक्के कमी पाऊस झाला आहे.

हा अतिवृष्टीचा प्रदेश असून वायनाडच्या काही भागात काही वर्षी ४००० मिमि इतका पाऊस झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्याच्या सरासरी पाऊसमानात प्रचंड बदल होत आहेत. २०१४ साली ३,२६० मिमि त्यानंतर पुढची दोन वर्षं प्रचंड घट, अनुक्रमे २२८३ आणि १३२८ मिमि. मग २०१७ मध्ये २१२५ आणि २०१८ साली, जेव्हा केरळमध्ये पूर आला तेव्हा ३८३२ मिमि.

“गेल्या काही दशकांमध्ये दर वर्षीच्या पाऊसमानात चढउतार होत आहेत, आणि खास करून १९८० पासून सुरुवात होऊन १९९० नंतर या बदलांनी वेग पकडला,” डॉ. चोलयिल सांगतात. ते थ्रिसूर येथील केरळ कृषी विद्यापीठात वातावरण बदल शिक्षण आणि संशोधन अकादमीत वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम करतात. “आणि अतिवृष्टीच्या घटना, मॉन्सून दरम्यान आणि मॉन्सून नंतर, केरळच्या सर्व भागात वाढल्या आहेत. वायनाड काही याला अपवाद नाही.”

वडकील, जॉर्ज आणि इतर शेतकऱ्यांच्या निरीक्षणाला यामुळे पुष्टीच मिळतीये. त्यामुळे जेव्हा हे शेतकरी पाऊस ‘कमी’ झाल्याचं दुःख करतात – आणि मोठ्या कालमानासाठी सरासरीत खरंच घट झाल्याचं सूचित होतं – त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की त्यांना हवं त्या काळात आणि दिवसांमध्ये पाऊस पडेनासा झालाय. आणि हे जास्ती किंवा कमी पावसाच्या वर्षांमध्ये होऊ शकतं. पावसाचे दिवस कमी झालेत मात्र त्याचा जोर वाढलाय. वायनाडमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये धुंवाधार पाऊस बरसू शकतो मात्र इथल्या पावसाचा मुख्य काळ जुलै महिना आहे. (आणि २९ जुलै रोजी भारतीय वेधशाळेने वायनाड आणि इतर काही जिल्ह्यांसाठी सावधानतेची ‘केशरी सूचना’ जारी केली म्हणजेच ‘जोरदार’ किंवा ‘अति जोरदार’ पावसाचा इशारा.)

PHOTO • Vishaka George
PHOTO • Vishaka George

वडकील यांची वायनाडमधली माडं आणि केळीच्या बागांना आता लहरी हवामानामुळे उतरती कळा लागली आहे

“पीकपद्धतीत बदल, जंगलाचं आच्छादन कमी होणं, जमीन वापराचे प्रकार... या सगळ्याचा, सोबत इतर घटकांना इथल्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे,” डॉ. चोलियल म्हणतात.

“गेल्या वर्षीच्या पुरात माझं सगळं कॉफीचं पीक वाया गेलं. या वर्षी वायनाडमध्ये कॉफीचं सगळ्यात कमी उत्पादन झालं आहे,” मानंथावडीमध्ये प्रेमाने ‘टीचर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुभद्रा सांगतात. शेतकरी असणाऱ्या ७५ वर्षांच्या सुभद्रा बालकृष्णन पुढे म्हणतात, “या वर्षी वायनाडमध्ये कॉफीचं सर्वात कमी उत्पादन झालं आहे.” त्या एडवाका पंचायतीतल्या त्यांच्या कुटुंबाच्या २४ एकर रानात कॉफी, भात, नारळ आणि इतर शेती पाहतात. “आताशा बरेचसे वायनाड [कॉफी] शेतकरी [उत्पन्नासाठी] त्यांच्या पशुधनावर विसंबून आहेत.”

‘वातावरण बदल’ असे शब्द वापरले नसले तरी आम्ही भेटलो त्या सगळ्याच शेतकऱ्यांना त्याच्या परिणामांची चिंता लागून राहिली आहे.

आमचा शेवटचा थांबा – एडन व्हॅली, सुलथन बेथरी तालुक्यातल्या पूथडी पंचायतीतला ८० एकर कॉफीचा मळा. तिथे गेली ४० वर्षं शेतमजूर म्हणून काम करणारे गिरिजन गोपी आम्हाला भेटतात. त्यांची कामाची मधली सुट्टी झालीये. “रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसा भयंकर उष्मा असतो. कोणास ठाऊक नक्की काय चाललंय,” ते म्हणतात. जेवायला जाता जाता ते स्वतःशीच पुटपुटतातः “देवाचीच करणी असणार. नाही तर या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा?”

शीर्षक छायाचित्रः विशाखा जॉर्ज

आपला मोलाचा वेळ आणि सहकार्याबद्दल संशोधक नोएल बेन्नो यांचे आभार.

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Vishaka George

Vishaka George is Senior Editor at PARI. She reports on livelihoods and environmental issues. Vishaka heads PARI's Social Media functions and works in the Education team to take PARI's stories into the classroom and get students to document issues around them.

Other stories by Vishaka George

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale