सरकार, तू जबाब दे!
सरकार, तू जबाब दे!
जबाब दे!
का चालतेय गरोदर बाई
हजारो मैल घाई घाई
पायाखाली ऊन
आणि पोटामध्ये बाळ घेऊन?

हे गाणं गातोय दुलेश्वर टांडी. "मी या रॅप मधून आपला मनस्ताप अन् राग व्यक्त केलाय," त्याने लिहिलेल्या आणि गायलेल्या 'सरकार, तुई जबाब दे' या रॅप विषयी तो म्हणतो.

"भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आलं तेंव्हा देशातील गरीब माणसाचे हाल होऊ लागले," तो म्हणतो. "मजूर आपलं काम गमावून बसले, बेघर झाले आणि कित्येक दिवस उपाशी राहिले. हजारो लोकांना आपल्या गावी परत जायला भर उन्हात अनवाणी चालावं लागलं. सरकारला हे सगळं थांबवून या लोकांना मदत करता आली नसती, अशातला भाग नाही – उलट, त्यांनी या देशातील गरिबांना वाऱ्यावर सोडून दिलं. हे सगळं पाहून वाईट वाटतं अन् जीव कासावीस होतो. आता सरकारला सवाल करायला हवा.."

हे गाणं कोसली (किंवा संबलपुरी) भाषेत आहे. आपल्या चाहत्यांना रॅपर डूल रॉकर या नावाने माहीत असलेला दुलेश्वर हिंदी आणि इंग्रजीतूनही गातो. पण त्याचा कोसली रॅप ओडिशातील तरुणांमध्ये खास लोकप्रिय आहे.

दुलेश्वर, २७, कलाहांडी जिह्यातील बोरडा गावचा आहे. त्यानी आपल्या गावाहून अंदाजे ४५ किमी दूर असलेल्या भवानीपाटणा येथील शासकीय महाविद्यालयातून बी. एस्सी. पदवी घेतली आहे. त्याचं कुटुंब डोम या अनुसूचित जातीचं आहे. घरी केवळ दुलेश्वर आणि त्याच्या आई प्रमिला राहतात. त्या शेती करतात आणि सरपण गोळा करतात, शिवाय त्यांना दरमहा रू. ५०० ची वृद्धत्व पेन्शन मिळते. त्याचे वडील नीलमणी तांडी, शेती करायचे आणि स्थानिक पोलिस स्थानकात सहाय्यक होते. ते तीन वर्षांपूर्वी मरण पावले.

'कदाचित सरकारला मदतच करायची नाहीये – गरिबांना गरीबच राहू देत, नाहीतर सरकारला कोणीच पाठिंबा देणार नाही'

व्हिडिओ पाहा: स्थलांतरितांचा रॅप – सरकार, तुई जबाब दे

त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची दोन एकर जमीन आहे, दुलेश्वर म्हणतो, पण २०१४ साली त्याला विशाखापट्टणम् मधील इस्पितळात आईची शस्त्रक्रिया करावी लागली तेव्हा त्याने ती तारण म्हणून बँकेतून ५०,००० रुपयांचं कर्ज काढलं. आता व्याजासकट ती रक्कम रू. १ लाख एवढी झालीय, तो म्हणतो.

"जमीन गहाण असली तरी आम्ही तिच्यावर भातशेती करतो. आमच्याकडे बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील] राशन कार्ड आहे," तो सांगतो. कमाई करण्यासाठी दुलेश्वर बोरडामध्ये शिकवण्या घेतो आणि आसपासच्या बांधकामांवर काम करतो.

कॉलेजमध्ये असताना त्यानी रॅप करायला सुरुवात केली. "मी कथाकथन स्पर्धा अन् कवी संमेलनात भाग घेऊ लागलो," तो सांगतो. "माझं लिखाण सर्वांना आवडायचं, लोक म्हणायचे माझं लिखाण जमिनीवरचं, प्रामाणिक आहे. याने मला हुरूप आला अन् मी लिहीत राहिलो. माझ्या कविता, कथा मासिकांमध्ये छापून येऊ लागल्या तेंव्हा फार आनंद वाटायचा. याशिवाय, मी नाटक आणि लोकाचं मनोरंजनही करायचो. यातूनच पुढे रॅप गाणी लिहू लागलो."

Rapper Duleshwar Tandi: ''Many have liked my songs'
PHOTO • Duleshwar Tandi

रॅपर दुलेश्वर टांडीः 'अनेकांना माझी गाणी आवडतायत'

दुलेश्वरने स्वतःदेखील मजूर म्हणून स्थलांतर केलंय. पदवी मिळाल्यानंतर २०१३ साली तो रायपूरला गेला. "तिथे आधीच काही मित्र काम करत होते, म्हणून मी पण [महिन्याला रू. ३,००० पगारावर] हॉटेलात टेबल साफ करू लागलो. हॉटेल बंद झाल्यावर आम्हाला जेवण अन् राहायला जागा मिळायची, तेवढ्यावर माझ्यासारख्या फिरस्त्या माणसाचं भागायचं. मी काही काळ पेपर देखील टाकलेत."

इतर काम करत असताना, तो म्हणतो, "मी माझी आवड कायम जपली – रॅप. वेळ आणि संधी मिळेल तसा मी सराव करायचो. मी आपल्या गाण्यांचे व्हिडिओ टाकू लागलो आणि लोक ते पाहायला लागले. एक दिवस [२०१४ मध्ये] चंडीगढ मधून मला फोन आला, [एका रॅप गायन स्पर्धेसाठी] मला आमंत्रण द्यायला. हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. तिथे आमचा रॅपर्सचा एक गट होता आम्ही खूप ठिकाणी आमची कला सादर केली, स्पर्धांमध्ये भाग घेतला – खूप शिकायला मिळालं."

२०१५ मध्ये दुलेश्वर भुवनेश्वरला आपलं नशीब आजमावून पाहायला गेला. "मी स्टुडिओ, चॅनलना भेट दिली अन् बऱ्याच जणांना भेटलो – पण सगळीकडून नकारघंटा ऐकू आली," तो म्हणतो. २०१९ मध्ये तो आपल्या गावी परतला. आता तिथेच तो फावल्या वेळेत रॅप गाणी लिहितो आणि गाऊन पाहतो.

"लॉकडाऊन लागू झाल्यावर जेंव्हा स्वतः एक मजूर म्हणून मी मजुरांचे हाल पाहिले तेंव्हा हे गाणं लिहिलं, गायलं आणि [२१ मे रोजी] फेसबुकवर पोस्ट केलं, जिथे मी लोकांसोबत लाईव्ह चॅटदेखील करत असतो," तो म्हणतो. "पुष्कळ जणांना माझी गाणी आवडतात आणि त्यांना मी आणखी गावं असं वाटतं. ओडिशा व्यतिरिक्त छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील लोकही माझ्या संपर्कात आहेत." दुलेश्वरने नुकतंच यूट्यूबवर आपली गाणी अपलोड करायला सुरुवात केलीये.

"कदाचित सरकारला मदतच करायची नाहीये – गरिबांना गरीबच राहू देत, नाहीतर कोणीच सरकारला पाठिंबा देणार नाही," तो म्हणतो. "पण आपल्याला सत्तेतील लोकांविरुद्ध आवाज उठवावाच लागेल. हा गरिबीचा, आपल्या जगण्याचा प्रश्न आहे."

नुकतंच, काही स्थानिक स्टुडिओंनी दुलेश्वरची गाणी मुद्रित करण्याची इच्छा व्यक्त करून त्याला बोलावून घेतलंय. "लॉकडाऊननंतर हे काम होईल, ही आशा आहे..." तो म्हणतो.

शीर्षक छायाचित्र: आलेख मांगराज

अनुवादः कौशल काळू

Purusottam Thakur

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker and is working with the Azim Premji Foundation, writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo