"उन्हाळा हातचा चाललाय हो! [बहुतेक] माठ विकायचा खरा हाच मौसम, पण आम्हाला जास्त काहीच विकता आलं नाही," रेखा कुंभकार म्हणतात. त्या आपल्या घराबाहेरच्या आव्यात माठ भाजण्यापूर्वी त्यावर रंगाचा हात देतायत. टाळेबंदीच्या काळात त्या आपल्या घरीच माठ बनवत होत्या, क्वचित कधी घराबाहेर पडत होत्या.

एरवी मार्च ते मे दरम्यान बाजारात विकली जाणारी  लाल मडकी कुम्हारपाडा या छत्तीसगढच्या धमतरी शहरातल्या कुंभारवाड्यात घरांबाहेर मांडून ठेवली आहेत. "जसं भाजीवाल्यांना सकाळी ७:०० ते १२:०० मध्ये भाज्या विकू देतात, तसं आम्हाला पण माठ विकू द्यायला पायजे, नाय तर आमची पंचाईत होईल," रेखा म्हणाल्या होत्या.

तेवढ्यातच भुबनेश्वरी कुंभकार आपल्या डोक्यावर रिकामी बांबूची दुरडी घेऊन कुम्हारपाड्यात परतल्या. त्या म्हणाल्या, "पहाटेपासनं शहरातल्या पुष्कळ वस्त्यांमध्ये माठ विकायला गेली होती. तिथं आठ विकले अन् परत येताना वाटेत आणखी आठ. पण लवकर परत यावं लागलं कारण दुपारच्याला लॉकडाऊन परत सुरू होईल. आम्हाला बाजारात जाऊ देत नाहीत म्हणून जास्त काही विकता येईना. सरकारनं दिलेले ५०० रुपये अन् तांदळावर अख्ख्या परिवाराचं कसं भागावं?"

कुम्हारपाड्यातली सगळी कुटुंबं इतर मागासवर्गीय कुम्हार समाजाची आहेत. ते ५०-७० रुपयाला एक माठ विकतात. मार्च ते मे  हा खरा विक्रीचा हंगाम कारण तेव्हाच लोक पाणी साठवायला आणि थंड करायला माठ विकत घेतात. या काळात प्रत्येक कुटुंब २०० ते ७०० माठ बनवतं. घरातील किती जण कामात मदत करतात त्यावर माठांची संख्या अवलंबून असते. उरलेल्या मोसमांत कुंभार सणावारांना लहान मूर्ती, दिवाळीत पणत्या, लग्न समारंभासाठी सुगडी इत्यादी वस्तू तयार करतात.

त्यांचं काम पावसाळ्यात, जूनचा मध्य ते सप्टेंबरच्या अखेरीस, थांबतं कारण तेव्हा चिकणमाती वाळत नाही आणि घराबाहेर काम करणं शक्य नसतं. या काळात काही कुंभार रू. १५०-२०० रोजंदारीवर शेतमजुरी करतात (एकाही कुटुंबाच्या मालकीची जमीन नाही).

PHOTO • Purusottam Thakur

भुबनेश्वरी कुंभकार (वरची रांग) टाळेबंदी सुरू होण्याआधी काही माठ विकण्याच्या घाईत होत्या. ‘लॉकडाऊनमुळं आमचं काम रखडलंय,’ सूरज कुंभकार म्हणाले (खालून डावीकडे). रेखा कुंभकार (खालून उजवीकडे) आव्यात माठ भाजण्यापूर्वी रंगाचा हात देत होत्या

छत्तीसगढमधील सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दरमहा ७ किलो तांदूळ मिळतो. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक कुटुंब जास्तीचे पाच किलो, तसंच एका खेपेला दोन महिन्यांचं राशन नेऊ शकत होतं – भुबनेश्वरी यांच्या कुटुंबाला मार्च अखेरीस ७० किलो आणि मे मध्ये आणखी ३५ किलो तांदूळ मिळाला. कुम्हारपाड्यातील रहिवाशी कुटुंबांना मार्च ते मे दरम्यान प्रत्येकी रू. ५०० मिळाले. "पण ५०० रुपयांत काय होतंय?" भुबनेश्वरी यांनी विचारलं. "म्हणून घर खर्चासाठी मला रस्त्यावर माठ विकत फिरावं लागतंय."

"मी उशिरा काम सुरू केलंय [आम्ही भेटलो त्याच्या एक दिवसा अगोदर]," सूरज कुंभकार म्हणतात, "कारण माझी बायको अश्विनी [गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी एका खासगी रुग्णालयात, कर्ज काढून] भरती होती. हे आम्हा कुटुंबाचं काम आहे अन् ते करायला एकापेक्षा जास्त लोक पाहिजेत." सूरज आणि अश्विनी यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत, वय वर्षे १० ते १६ मधील. "लॉकडाऊनमुळं आमचं काम रखडलंय. दिवाळीपासनं हवामान  खराब आहे [अधून मधून येणारा पाऊस], त्यामुळे माठ बनवणं कठीण झालंय," सूरज म्हणाले. "अन् दुपारला पोलीस येऊन बाहेरचं काम अडवतात. आमच्या पोटावरच पाय आलाय."

आम्ही भेटलो तेव्हा सूरज मोठे दिवे तयार करत होते. दिवाळी दरम्यान हे प्रत्येकी रू. ३०-४० ला विकल्या जातात. पणत्या आकाराच्या हिशेबाने प्रत्येकी रू.१ ते २० ला विकल्या जातात. हे कुटुंब दुर्गा पूजा, गणेश चतुर्थी आणि इतर सणांसाठी मूर्तीदेखील घडवतात.

सूरज यांच्या अनुमानानुसार कुम्हारपाड्यातील अंदाजे १२० कुटुंबांपैकी साधारण ९० कुटुंबांची माठ किंवा इतर वस्तूंमधून कमाई होते, तर उरलेले शेतमजुरी, सरकारी नोकऱ्या आणि इतर उपजीविकेच्या साधनांवर अवलंबून आहेत.

PHOTO • Purusottam Thakur

पूरब कुंभकार (वरून डावीकडे) यांनी या अक्षय्य तृतीयेला फारच थोड्या नवरा-नवरीच्या बाहुल्या विकल्या आहेत. टाळेबंदीमुळे कुम्हारपाड्यातील पुष्कळ कुंभारांना उन्हाळ्यात माठ विकता आले नाहीत

एप्रिलच्या अखेरीस आम्ही जुन्या मंडीलाही भेट दिली होती जिथे धमतरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी ७:०० ते दुपारी १:०० पर्यंत एक भाजी बाजार भरत होता. काही कुंभारांना मातीची खेळणी (बहुतेक करून बाहुला - बाहुली) तसंच काही माठ विकताना पाहून आम्हाला बरं वाटलं. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या आठवड्यांत इथे कुंभारांना परवानगी नव्हती – केवळ भाज्यांसारख्या जीवनावश्यक वस्तू विकण्याची परवानगी होती.

हिंदू पंचांगानुसार पवित्र मानण्यात येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भारतातील बऱ्याच भागांमध्ये शेतकरी पीक घ्यायला सुरू करतात, आणि छत्तीसगढमधील पुष्कळ जण बाहुला-बाहुलीचा (पुत्र आणि पुत्री) पारंपरिक लग्न सोहळा साजरा करतात. "माझ्याकडं ४०० जोड्या तयार आहेत, पण आतापर्यंत फक्त ५० विकल्या गेल्या," पूरब कुंभकार म्हणाले, ते प्रत्येक जोडी रू. ४० ते ५० या भावाने विकतात. "मागल्या वर्षी या वेळपर्यंत मी रू. १५,००० चा माल विकला होता, पण यावर्षी जेमतेम रू. २,००० आलेत. बघू… आणखी दोन दिवस आहेत.. [सणाचे]. या लॉकडाऊनमुळं आमचं फारच नुकसान झालंय, साहेब."

कुम्हारपाड्यातील बहुतांश कुटुंबांतील मुलं शाळा-कॉलेजमध्ये जातात – अर्थात शिक्षण शुल्क, पुस्तकं, गणवेश यांचा खर्च आलाच. कुंभारांकरिता उन्हाळा हा जास्तीचे पैसे कमावण्याचा महत्त्वाचा काळ असतो, जो पुढे वर्षभर वापराला येतो.

"पण दर काही दिवसांनी पाऊस पडतोय त्यामुळे माठ विकले जात नाहीयेत," पूरब सांगतात. "उन्हाळ्यात गरमी असली की लोकांना माठ लागतात. हा मौसम अन् ह्या लॉकडाऊनमुळं आम्हाला जिणं मुश्किल झालंय."

मे महिन्याच्या मध्यापर्यंत छत्तीसगढमधले टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होऊ लागले, तसं धमतरीतील कुंभारांना रोजच्या तसंच इतवारी बाजारात विक्रीसाठी जाता येऊ लागलं. रोजचा बाजार सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत भरतो. पण, मे महिन्याच्या मध्यापर्यंत उन्हाळ्यासोबत कुंभारांचा धंद्याचा हंगामही सरून गेला होता – आणि या नुकसानाचे पडसाद येत्या वर्षभर कुंभारांच्या आयुष्यावर उमटणार आहेत.

अनुवादः कौशल काळू

Purusottam Thakur

Purusottam Thakur is a 2015 PARI Fellow. He is a journalist and documentary filmmaker and is working with the Azim Premji Foundation, writing stories for social change.

Other stories by Purusottam Thakur
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo