पोलिसांच्या लाठ्यांचा हिंसक मारा झाला नसता तर उत्तर प्रदेशातील बाघपत जिल्ह्यात आंदोलन करणारे शेतकरी २७ जानेवारी रोजी आंदोलनाच्या ठिकाणाहून हललेच नसते. “आंदोलन सुरू होऊन ४० दिवस झालेत,” ५२ वर्षीय ब्रिजपाल सिंह म्हणतात. ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्या बरौत शहरातले ते एक ऊस शेतकरी आहेत.
“ते तर रास्ता रोको आंदोलनही नव्हतं. आम्ही शांततापूर्वक आमचा लोकशाही हक्क बजावत होतो. २७ जानेवारीच्या रात्री पोलिसांनी आम्हाला अचानकच मारहाण करायला सुरुवात केली. आमचे तंबू फाडले, अन् आमची भांडी व कपडे घेऊन गेले. लहानमोठ्याचा विचारही केला नाही,” ब्रिजपाल पुढे सांगतात. बरौतमध्ये त्यांच्या मालकीची पाच एकर शेती आहे.
जानेवारीतल्या त्या रात्रीपर्यंत अवघ्या जिल्ह्यातून जमलेले जवळपास २०० शेतकरी बरौतमधील बाघपत-सहारनपूर महामार्गावर नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत होते. केंद्र शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये तीन नवी कृषी विधेयके पारीत केली तेव्हापासून देशभरात लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्यापैकीच हे होत.
बाघपत आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागांतील शेतकरीसुद्धा हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी २६ नोव्हेंबर, २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या – मुख्यतः पंजाब आणि हरियाणाच्या – शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत.
“आम्हाला धमक्या मिळाल्या, फोन आलेत,” ब्रिजपाल म्हणतात. ते बाघपत प्रदेशातील तोमर वंशाच्या देश खाप नावाच्या केवळ पुरूष सदस्य असणाऱ्या खाप पंचायतीचे स्थानिक नेतेदेखील आहेत. “जिल्हा प्रशासनाने आमच्या शेतात पाणी सोडू म्हणून आम्हाला धमकावलं. काहीच चाललं नाही तेव्हा पोलिसांनी आम्ही रात्री झोपलो असताना आमच्यावर लाठीमार केला. आम्हाला तर धक्काच बसला.”




