त्यांच्यापैकी एकजण वगळता इतर सगळे करोनाच्या चाचणीत निगेटीव्ह आढळून आले, पण त्याने काहीही फरक पडला नाही. गावकऱ्यांच्या संमतीने सरपंचांनी एक हुकूम काढला. या कुटुंबाला महिनाभर घराच्या बाहेर पडता येणार नाही – जरी क्वारंटाईनचा अनिवार्य कालावधी १४ दिवसांचाच असला तरीही. त्यांच्यापैकी एकाला विषाणूची लागण झाली होती.

दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय, उस्मानाबाद जिल्ह्यात आढळून आलेली ही पहिलीच घटना होती. आणि तो तबलिघी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन पानिपत, हरियाणा येथून परतला होता.

एकीकडे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद येथील उमरग्याच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते पण  त्याच्या कुटुंबियांना मात्र एक प्रकारे नजरकैदेतच ठेवण्यात आलं होतं. "आम्हाला पिकं काढता आली नाहीत," ३१ वर्षीय मोहम्मद सलमान (नाव बदललेलं) सांगतो. "कापणीला आलेलं पीक वाया चाललं होतं तरी आम्हाला घरातच राहावं लागलं. काही पिकाची जनावरांनी नासधूस केली, अन् उरलेलं वाळून गेलं. आम्ही काहीच वाचवू शकलो नाही. ५०,००० रुपयांचं नुकसान झालं."

२४ मार्च रोजी सलमान पानिपतहून परतला होता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कोविड-१९ चा प्रसार थांबवण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली होती, त्याच दिवशी. त्याच आठवड्यात दिल्लीतील अधिकाऱ्यांना १९२६ साली स्थापन झालेल्या शहरातील जुन्या इस्लामी संघटनांपैकी एक असलेल्या तबलिघी जमातच्या मरकझ निझामुद्दिन या मुख्यालयात सुमारे २,००० लोक वास्तव्याला असल्याचं आढळून आलं. ते दिल्लीत १३ ते १५ मार्च दरम्यान झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यायला आले होते, जी संसर्गाचा हॉटस्पॉट बनली होती. या घटनेनंतर या संपूर्ण समुदायाला बदनाम करण्याची एक काळी मोहीम सुरू झाली.

Mohammad Salman’s mobile phone shop. Several who did business with him pre-corona have stopped taking his calls.
PHOTO • Mohammad Salman
The government hospital at Osmanabad’s Umarga taluka, where he recovered
PHOTO • Narayan Gosawi

डावीकडे: मोहम्मद सलमान यांचं मोबाईल फोनचं दुकान. करोनापूर्वी त्यांच्या व्यवसायात भागीदार असणारे बरेच जण आता त्यांचा फोनही उचलत नाहीत. उजवीकडे: उस्मानाबादेतील उमरगा तालुक्यातील शासकीय रुग्णालय, जिथे ते आजारातून बरे झाले

सलमान आणि त्याची पत्नी त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते की नाही, याच्याशी कोणाला घेणंदेणं नव्हतं. "गावातील लोक माझ्या पाठीमागे बोलू लागले," ते म्हणतात. "मला कुठलीच लक्षणं नव्हती. तरी ग्राम पंचायतीने आम्हाला चाचणी करून घ्यायला सांगितलं. त्यांना कुठलीच जोखीम घ्यायची नव्हती. भारतभर करोना पसरवला म्हणून मुसलमानांवर खापर फोडलं जात होतं. माझ्या गावातील लोक माझ्याकडे संशयित नजरेने पाहत होते."

लवकरच गोष्टी बिघडू लागल्या. २ एप्रिल रोजी सलमान करोना चाचणीत पॉझिटीव्ह आढळून आला. "नशीब, घरचे इतर सगळे निगेटिव्ह आले," तो सांगतो. "पुढल्या दिवशी मला हॉस्पिटलला नेण्यात आलं."

मात्र, व्हायचं ते नुकसान झालंच होतं. "उस्मानाबादेत करोना आणला म्हणून लोक माझ्या घरच्यांना नावं ठेवू लागले," तो सांगतो. "सरपंच म्हणाले महिनाभर आम्हाला घराच्या बाहेर निघता येणार नाही. शेजारच्या काही भल्या माणसांनी आम्हाला अन्नधान्य मिळेल याची सोय केली, हे नशीब. पण, मागील सहा महिने आम्ही घाम गाळून जोपासलेल्या रब्बीच्या पिकावर मात्र आम्हाला पाणी सोडावं लागलं."

सलमान याची त्याच्या गावाहून तीन किलोमीटरवर ४.५ एकर शेती आहे. हे आठ जणांचं कुटुंब – सलमान, त्याची पत्नी, दोन मुलं, भाऊ आणि त्याचे आईवडील. सगळ्यांनी मिळून खरिपात सोयाबीन व मूग, तर रब्बीत ज्वारी आणि हरभरा पीक घेतला. "आम्ही कापणीला मजूर बोलावून पाहिले पण आमच्याकडे काम करायला कोणीच तयार नव्हतं," ते म्हणतात. "आमच्या शेतावर दोन बोअरवेल आणि एक विहीर आहे. तरीही, शेत कोरडं पडलं, कारण आमच्याशी कोणाला घेणंदेणंच नव्हतं."

महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४.८ लाखांवर गेलीय. पण टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात भीतीचं प्रचंड सावट पसरलं होतं. भविष्य भयावह वाटत होतं. फारशी माहितीच नसल्याने भरपूर घबराट होती.

"लॉकडाऊनचा सगळ्यांनाच फटका बसला होता," सलमान म्हणतो. "शेतकऱ्यांना अडतीवर आपला माल विकणं कठीण होऊन गेलं. आमचं नुकसान झालं त्याची चिंता तर होतीच, वरून विषाणूची लागण होते की काय याची भीती. असं वाटलं आपल्या समाजाला त्यांच्या दुःखाचा दोष द्यायला एक खलनायक हवा होता. आणि मुसलमान टीकेचं लक्ष्य बनले."

By the time Shilpa and Tanuj Baheti of Jalna district tested positive for Covid-19, Maharashtra had crossed 1.5 lakh cases
PHOTO • Courtesy: Tanuj Baheti
By the time Shilpa and Tanuj Baheti of Jalna district tested positive for Covid-19, Maharashtra had crossed 1.5 lakh cases
PHOTO • Courtesy: Tanuj Baheti

जालना जिल्ह्यातील शिल्पा आणि तनुज बाहेती कोविड-१९ चाचणीत पॉझिटीव्ह आढळून आले, तोवर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १.५ लाख एवढी झाली होती

सलमान यांच्या मते वृत्त वाहिन्यांनी मुसलमानांचा छळ झाला त्याला फूस लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. "लॉकडाऊनमध्ये लोक रिकामे होते, म्हणून ते मोबाईलवर दिवसभर बातम्या पाहत बसायचे. आणि बातम्यांमध्ये मुसलमानांचीच बदनामी केली जायची."

एका मराठी वृत्त वाहिनीने तर सलमान पॉझिटीव्ह आढळून आल्यावर त्याचा फोटो दाखवला होता. "ती क्लिप व्हॉट्सॲपवर 'व्हायरल' झाली," तो म्हणतो. "तालुक्यातील प्रत्येकाने ती क्लिप पाहिली असेल. लोक माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. आम्हाला मान खाली घालावी लागेल, अशा तऱ्हेने वागू लागले. आम्ही खजिल झालो होतो."

रुग्णालयात परिस्थिती बरी होती. सलमान भरती झाला तेव्हा साथीची सुरुवात होती त्यामुळे डॉक्टर जातीनं लक्ष देत असत, असं त्याला वाटतं. शिवाय, तेव्हा रुग्णालयात रुग्णांच्या संख्येला ऊत आला नव्हता. "माझी नियमित तपासणी व्हायची," तो सांगतो. "माझा वॉर्डही कायम स्वच्छ आणि टापटीप असायचा. मला २० दिवस उपचार देऊन जेव्हा सुटी मिळाली, तेव्हा त्यांनी एक छोटा समारंभ केला होता कारण बरे झालेल्या रुग्णांपैकी मी पहिलाच होतो."

या बाबतीत शिल्पा आणि तनुज बाहेती यांचं नशीब मात्र फार बलवत्तर नव्हतं. जूनच्या शेवटच्या आठवड्यात जालना जिल्ह्यातलं हे दांपत्य कोविड-१९ पॉझिटीव्ह आढळून आलं, तोवर महाराष्ट्रतील रूग्णसंख्या १.५ लाखांवर गेली होती. करोना आता केवळ शहरी भागांपुरता मर्यादित राहिला नव्हता. आणि ग्रामीण भागातल्या आधीच मरणासन्न आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढला होता.

उस्मानाबादहून २२० किलोमीटर दूर जालन्यातील रहिवाशी शिल्पा आणि तनुज यांनी पहिले दोन दिवस जिल्ह्यातील सिव्हिल रुग्णालयात काढले आणि त्यानंतर आठवडाभराने एका तात्पुरत्या क्वारंटाईन केंद्रात. ते ज्या प्रकारे या दोन ठिकाणी पोहोचले, तेच विचित्र होतं.

Tanuj and Shilpa with their discharge papers, outside the quarantine centre
PHOTO • Courtesy: Tanuj Baheti

तनुज आणि शिल्पा क्वारंटाईन केंद्राबाहेर हातात तिथून सोडल्यानंतरची कागदपत्रं

तापाने फणफणत असलेले तनुज आपल्या सोसायटीतील इतरांना कळू नये म्हणून रूग्णवाहिका न बोलावता आपल्या दुचाकीवर स्वार होऊन रुग्णालयात गेले. "सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर मला चांगलं ओळखतात," ते म्हणतात. "मी दिरंगाई करणार नाही आणि थेट त्यांच्याकडे येईन, हे त्यांना ठाऊक होतं. माझ्या बायकोने रिक्षा केली."


जेंव्हा हे दांपत्य पॉझिटीव्ह आढळून आलं, तेव्हा त्यांनी आपल्या १३ वर्षांच्या मुलीला जालन्यातल्याच तिच्या आजीच्या घरी पाठवून दिलं. ती निगेटिव्ह होती.

"आम्हा दोघांना १०२ डिग्री ताप होता," शिल्पा, वय ४०, सांगतात. त्या शासन अनुदानित जालना शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. "रुग्णालयात दोन दिवस घालवल्यावर आम्हाला एका शेजारच्या इमारतीत हलवण्यात आलं कारण त्यांना गंभीर रुग्णांसाठी जागा करून द्यायची होती." जालना जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्या इमारतीत एक क्वारंटाईन केंद्र बनवण्यात आलं होतं.

जेव्हा रुग्णांना दुमजली क्वारंटाईन केंद्रात हलवण्यात आलं, तेव्हा तनुज, वय ४२, यांना आपलं सामान घेऊन चालत जावं लागलं होतं. "आम्ही आजारी होतो. खूप ताप होता. थकवा होता. क्वारंटाईन केंद्रात पोहोचल्यावर आम्हा दोघांना राहता येईल, अशी एखादी खोली द्या, म्हणून मी विनंती केली," ते म्हणतात. "तळमजल्यावर एक कॉमन वार्ड होता, पण आम्हाला दुसऱ्या मजल्यावर एक खोली मिळाली. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा त्या खोलीत धूळ व घाण होती. त्या मजल्यावरच्या शौचालयाकडे पाहून तर किळस वाटायची, लाईट नाहीत, अन् पाणी वाया जात होतं."

त्याच मजल्यावर राहणाऱ्या आणखी एका रुग्णाने – जे जालन्यात डेटॉलची उत्पादनं विकतात – तनुज यांना सांगितलं की त्यांना दिलेल्या खोलीची अवस्था कित्येक दिवस अशीच होती. "मी कलेक्टरकडे तक्रार केली, वारंवार फोन लावले – तेव्हा कुठे २-३ दिवसांनी ती स्वच्छ करण्यात आली," ते म्हणतात. "मी त्याचा एक व्हिडिओ काढला तो सोशल मीडियावर व्हायरल झाला."

अस्वच्छ शौचालय खासकरून महिलांसाठी अधिकच त्रासदायक ठरतात, शिल्पा नोंदवतात. "पुरुष कसं तरी निभावून नेऊ शकतात," त्या म्हणतात.

त्या क्वारंटाईन केंद्रात आठवडाभर राहून रुग्णाची मनोवस्था खालावू शकते, तनुज म्हणतात. "अशा ठिकाणी मिळणारं जेवणसुद्धा वाईट प्रतीचं असतं. माझ्या एका मित्राला मिळालेल्या सुक्यामेव्यात अळ्या निघाल्या. रूग्ण मानसिकदृष्ट्या झगडत आणि चिंतित असताना त्यांना निदान बरं वाटेल, असा प्रयत्न करायला हवा. करोनासंबंधी बरेच गैरसमज आहेत. लोक तुमच्याकडे असं पाहतात जसं काही तुम्ही पाप केलंय."

Tanuj Baheti outside his shop that sells Dettol. He  has benefited from the lockdown – the demand for Dettol has never been higher
PHOTO • Courtesy: Tanuj Baheti

तनुज बाहेती आपल्या दुकानाच्या बाहेर , जिथे ते डेटॉल विकतात. टाळेबंदीचा त्यांना फायदा झाला – डेटॉलची मागणी कधी नव्हे इतकी वाढली होती

दोघांनीही क्वारंटाईन केंद्रातील त्रास सहन केला आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ते घरी परतले. "डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यानंतर आठवडाभर घराच्या बाहेर पडलो नाही," तनुज म्हणतात.

गंमत पहा, त्यांना टाळेबंदीचा फायदाच झाला – कारण ते डेटॉलचे वितरक आहेत. वारंवार हात धुण्याला महत्त्व आल्याने डेटॉलची मागणी जालन्यात कधी नव्हे एवढी वाढली होती. "करोनापूर्वी जर माझी महिन्याची कमाई रू. ३०,००० असेल, तीच आता रू. ५०,००० एवढी वाढली आहे. फक्त मी काम करू शकत नव्हतो तेवढा एक महिना सोडला, तर माझं मस्त चाललंय." त्यांच्या कुटुंबाला शिल्पा यांच्या शासकीय महाविद्यालयातील नोकरीचाही आधार होता.

"दोन आठवडे होऊन गेलेत आणि आता आमचं आयुष्य पूर्ववत होऊ लागलंय. आमच्या भोवतालच्या लोकांनाही आम्ही परतलो याचा आनंद झाला," तनुज म्हणतात.

सलमान यांच्या वाट्याला हे सुख नाही. बरं होऊन तीन महिने होऊन गेले तरीही ते रस्त्याने चालत जाताना त्यांच्याकडे लोकांच्या तिरकस नजरा वळतात. "ते [इतर गावकरी] स्वतः सगळीकडे मास्क न लावता फिरतात – पण माझ्या घरासमोर मात्र ते तोंड झाकून घेतात," ते म्हणतात. "ते अजूनही माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. माझ्यानंतर बरेच कामगार मुंबई आणि पुण्यातून उस्मानाबादेत व्हायरस घेऊन आलेत. त्यांना माझ्यासारखी निंदा सहन करावी लागली नाही. मला मात्र अजून करावी लागतेय."

सलमान यांनी आपलं मोबाईलचं दुकान मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू केलं होतं. "दिवाळी होती," ते म्हणतात. "नवं काही सुरू करायला चांगला काळ होता." टाळेबंदी अगोदर त्यांना महिन्याला चांगला रू. २०,००० नफा व्हायचा. जून महिन्यात त्यांनी दुकान पुन्हा उघडलं तेंव्हा लोक त्यांच्या दुकानातून खरेदी करायला कचरत होते, ते म्हणतात. करोनापूर्वी त्यांच्या व्यवसायात भागीदार असणारे बरेच जण आता त्यांचे फोनही उचलत नाहीत.

ते म्हणतात की त्यांनी इतर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आपला प्लाझ्मा दान केला होता, ह्याची कोणी दखलही घेतली नाही. "मी दोन आठवडे आपल्या दुकानात बसून होतो," ते म्हणतात. "पण कोणी दुकानाजवळ फिरकत नव्हतं. मी रहदारी पाहत तसाच एका जागी बसून राहायचो, अन् संध्याकाळी घरी परतायचो. दोन आठवडे झाल्यावर मी आशा सोडली. मला दुकान बंद करावं लागलं."

शीर्षक चित्र : अंतरा रामन, हिने नुकतीच सृष्टी कॉलेज ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, बेंगळूरु येथून व्हिजुअल कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतली आहे. सर्व प्रकारच्या विचारात्मक कला आणि कथाकथन यांचा तिच्या कलाकुसरीवर मोठा प्रभाव आहे.

अनुवादः कौशल काळू

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo