आज १ मे, कामगार दिन, पण बंगळूरू मेट्रो प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांना मार्चपासून त्यांचं वेतन मिळालेलं नाही आणि ते भयभीत होऊन जगत आहेत. खेदाची बाब म्हणजे या मेट्रोला म्हणतात, नम्म मेट्रो (आपली मेट्रो) (आज प्रदर्शित होणारा) सबूत/ एव्हिडन्स हा १३ मिनिटांचा बोधपट टाळेबंदी दरम्यान शहरातील मेट्रो कामगारांचा प्रवास दाखवतो. पर्यायाने, स्थलांतरित कामगारांच्या राहण्याची व कामाची दशा अधोरेखित करतो.

"भीती वाटतेय. घरी मेलो तर काही हरकत नाही. इथे जीव गेला, तर आमची कोणीच देखभाल करणार नाही," एक कामगार म्हणतो. आपलं गाव सोडून त्याला सात महिने झालेत. त्यात टाळेबंदीमुळे त्याचं आपल्या कुटुंबाला भेटणं लांबणीवर पडलंय. त्याच्या बहुतेक सहकाऱ्यांना असंच वाटतं. सगळे टिनाच्या घरांमध्ये, एका खोलीत १०-१५ जण मिळून राहतात. त्यातच सामाजिक अंतर पाळण्याचा प्रयत्न करतात.

'सबूत/ एव्हिडन्स' हा बोधपट पाहा

पण त्यांच्या या दशेला केवळ ही महामारी कारणीभूत नाहीये. त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांकडून नियमाला धरून सहाय्य न मिळणं, मुकादमांकडून होणारी पिळवणूक, आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष या सगळ्यांमुळे या कामगारांची गत ना घर का ना घाट का अशी झाली आहे.

२४ मार्च रोजी टाळेबंदी जाहीर होताच कर्नाटकात (बँगलोर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे) मेट्रो रेलच्या येलो लाईनचं बांधकाम एका रात्रीतून थांबवण्यात आलं .

कंत्राटी कामगारांना पूर्वसूचना न देताच बांधकामावरून जायला सांगण्यात आलं. टाळेबंदीमुळे त्यांना आपल्या गावी परत जाण्याची साधनं मिळाली नाहीत. "गेल्या १५ दिवसांत एकदाही आमचा मालक आमची चौकशी करायला फिरकला नाहीये," एक कामगार म्हणतो.

२९ एप्रिल रोजी गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार अडकून पडलेल्या प्रवासी श्रमिकांना घरी परतण्यासाठी कर्नाटक शासनाने ३० एप्रिल रोजी सोय करून देण्याचं घोषित केलं. पण अजून एकानेही मेट्रो कामगारांशी संपर्क साधला नाही.

हा बोधपट कामगारांनी स्वतः कथन केलाय. कोरोना व्हायरसपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आपले चेहरे मास्कने झाकले आहेत. पण सामाजिक, आर्थिक आणि वैयक्तिक संकटांचं काय? या बोधपटात हाच प्रश्न मांडण्यात आलाय: त्यांना या संकटापासून कोण वाचवणार, आणि कसं?

लेखन व दिग्दर्शन:  यशस्विनी व एकता
सहभाग: बंगळूरू मेट्रोचे कामगार
छायांकन व संकलन: यशस्विनी

Yashashwini & Ekta

Yashaswini is a 2017 PARI fellow and a filmmaker, who recently completed an artist-in-residence term at the Rijksakademie van Beeldende Kunsten, Amsterdam. Ekta is a filmmaker and co-founder of Maraa, a media and arts collective in Bengaluru.

Other stories by Yashashwini & Ekta
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo