“ही यंत्रं जरा आधी आणली असती तर माझ्या लेकरांचे पापा त्यांना सोडून गेले नसते. मला आता त्यांचा काहीही उपयोग नाही, पण इतर स्त्रियांसाठी ती कामी येतील. त्यांचे पुरुष तरी नाल्यात आणि गटारांत मरणार नाहीत. मी जे भोगलंय ते कुणाच्याच वाट्याला येऊ नये.” असं म्हणत दुःखाचा आवेग सहन न होऊन राणी एकदम गप्प झाली.

गेल्या वर्षी मी पहिल्यांदा राणीला भेटले तेव्हा सफाई कर्मचारी आंदोलनाने आयोजित केलेल्या एका परिषदेला ती आली होती आणि पायऱ्यांवर बसली होती. माणसांकडून मानवी मैला सफाईच्या पद्धतीचं निर्मूलन व्हावं आणि वारंवार गटारात सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंना आळा बसावा यासाठी ही संघटना काम करते. या कार्यक्रमादरम्यान, माणसांनी अशी सफाई करण्यास पर्याय ठरू शकणारी अनेक तांत्रिक उपाय प्रदर्शित करण्यात आले होते.

पायऱ्यांवर बसल्या बसल्याच राणीने प्लास्टिकच्या पिशवीतून एक फोटो बाहेर काढला. तिचा जोडीदार, ३० वर्षीय अनिल कुमार. आपल्या जीर्णशा सफेद ओढणीने तिने तो पुसला आणि ती अस्वस्थ झाली. सात वर्षांची लक्ष्मी आणि ११ वर्षांचा गौरव, कडेवर २.५ वर्षांची सोनम या आपल्या लेकरांना घेऊन ती पायऱ्यांवर वर खाली करू लागली.

एखाद्या स्त्रीचं घरचं एखादं कुणी जेव्हा गटारामध्ये मरण पावतं तेव्हा त्या दुःखाचा सामना करत असतानाच तिला न्याय आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी झगडावं लागतं आणि आपलं कुटुंब कसं तगून राहील याचाही घोर असतोच. राणीची परिस्थिती तर आणखीच बिकट आहे. नैऋत्य दिल्लीच्या डाबरी या वसाहतीतल्या तिच्या घरी आम्ही एकमेकींशी बरंच काही बोललो. 

Rani holds her son in one hand and a frame of her and her husband on the other.
PHOTO • Bhasha Singh
PHOTO • Bhasha Singh

एखाद्या स्त्रीचं घरचं एखादं कुणी जेव्हा गटारामध्ये मरण पावतं तेव्हा त्या दुःखाचा सामना करतानाच तिला न्याय आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी झगडावं लागतं आणि आपलं कुटुंब कसं तगून राहील याचा घोर असतोच. राणीचं कायद्याने अनिलशी लग्न झालं नव्हतं, त्यामुळे तिची परिस्थिती आणखीच बिकट आहे

“मी त्याची लग्नाची बायको नाही, पण मी त्याचं सारं काही होते. आणि तो माझा प्रियकर होता. त्याने मला प्रेम आणि आदर दिला आणि माझ्या लेकरांना आपलं मानलं,” ती सांगते. आपल्या आधीच्या नवऱ्याबद्दल, लेकरांच्या बापाबद्दल जास्त काही बोलण्याची तिची इच्छा नाही. तो फार हिंसक होता असं तिच्या बोलण्यावरून आणि हातापायावर अजूनही दिसणाऱ्या चटक्यांच्या खुणांवरून जाणवतं. तो आता दुसऱ्या शहरात गेलाय. “मी आणि अनिल [गेल्या ३-४ वर्षांपासून] एकत्र रहायला लागलो, आमची मनं एकरुप होती, पण आमचं लग्न झालं नव्हतं. माझं आधी एक लग्न झालेलं होतं, पण अनिल अविवाहित होता. आमचं नातं काही कुणापासून लपून राहिलेलं नव्हतं, सगळ्यांना माहित होतं की आम्ही नवरा बायकोसारखंच राहतो ते. माझ्या लेकरांना पहिल्यांदाच बापाचं प्रेम मिळालं होतं. आम्ही गरिबीत, पण सुखात होतो.”

१४ सप्टेंबर २०१८ रोजी डाबरीतल्या आपल्या घरापासून जवळ असणाऱ्या मुख्य रस्त्यावरच्या पालिकेच्या गटारात अनिल मरण पावला. संध्याकाळचे ७ वाजले होते – असं स्थानिक पोलिस ठाण्याच्या प्राथमिक माहिती अहवालात तरी नोंदवण्यात आलं आहे. राणी आणि शेजारपाजाऱ्यांचं म्हणणं आहे की अनिलला ५.३० वाजता फोन आला आणि तो कामासाठी बाहेर पडला. एफआयआरमधील साक्षीदाराच्या साक्षीनुसार एका स्थानिक मुकादमाने अगदी बारीक दोरी बांधून अनिलला एकट्याला गटारात खाली उतरवलं. दोरी तुटली.

त्या संध्याकाळी राणी घरी अनिलची वाट पाहत बसली होती आणि अनिल फोन उचलत नाही म्हणून तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं होतं. ती त्याला शोधायला रस्त्यावर गेली. मग तिला कुणी तरी सांगितलं की एक माणूस गटारात पडलाय म्हणून. ती त्या ठिकाणी धावत गेली आणि तिच्या नजरेला फक्त त्याचे बूट दिसले. अनिलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, मृतावस्थेत.

गेल्या १५ वर्षांपासून तो गटारं आणि नाले साफ करत होता. त्याच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीच्या तोंडाशी त्याने स्वतःचा फोन नंबर लिहून नाले सफाई सुविधेचा एक बोर्ड लावला होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तो बोर्ड काढून टाकला. 

एफआयआरमधील साक्षीदाराच्या साक्षीनुसार, एका स्थानिक मुकादमाने अगदी बारीक दोरी बांधून अनिलला एकट्याला गटारात खाली उतरवलं. दोरी तुटली

व्हिडिओ पहाः ‘गटारातून बुडबुडे येत होते. अनिल त्यात खाली पडला होता’

त्याला यासाठी काम किरकोळ असेल तर रु. २००-३०० किंवा मोठी गटारं किंवा नाले साफ करायचे असतील तर रु. ५००-१००० दिले जायचे. सरासरी, दर महिन्याला अनिल रु. ७,००० कमवायचा. पावसाळ्याच्या आधीच्या आठवड्यात त्याचं काम फार वाढायचं आणि मग जी काही कमाई होत होती तीदेखील. राणी ३-४ घरांमध्ये फरशी पुसायचं काम करायची आणि महिन्याला रु. २५०० कमवायची. पण तिची कायमची अशी कामं नव्हती, ती सांगते. कारण मुलं लहान असल्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी तिला घरी थांबावं लागायचं. तिची मोठी मुलगी लक्ष्मी, तिचे पाय फेंगडे आहेत, कदाचित तीव्र कुपोषणामुळे असेल, ती नीट बोलूही शकत नाही. धाकटी सोनम, आधाराशिवाय चालूही शकत नाही. त्यामुळे अनिलबरोबर रहायला लागल्यानंतर राणीने कामं बंद केली.

राणी आणि अनिल दोघंही उत्तराखंडच्या हरिद्वारच्या कांखाल या उपनगरातले आहेत. तिचे आई-वडील आता हयात नाहीत, तिचं कुटुंब म्हणजे, ती म्हणते, केवळ तिची मुलं. अनिलच्या मृत्यूच्या १० दिवस आधीच तिचा आणि अनिलचा चार महिन्यांचा मुलगा न्यूमोनिया होऊन वारला होता.

अनिल गेला तेव्हा राणी इतकी कोलमडून गेली की तिला स्वतःचं जीवन संपवण्याची इच्छा झाली होती. “एक दिवस मला असं वाटू लागलं की या कहाणीचा अंतच करून टाकायला पाहिजे,” ती म्हणते. “मी तरी किती गोष्टींना तोंड देऊ? मला अनावर राग आला, मी घरात कपडे गोळा केले आणि पेटवून दिले... घरमालक पळत आला आणि आग विझवली. मी रडत होते, मला संताप अनावर झाला होता आणि मी फार वेदनेत होते.”

पोलिसांनी अनिलच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला पकडायचं सोडून तिच्या आणि अनिलच्या एकत्र राहण्याबद्दल टिप्पणी करायला सुरुवात केली. ­“ते विचकट हसले आणि म्हणाले, ‘काय माहित ही अजून किती जणांबरोबर झोपली असेल, असे तिचे किती नवरे असतील. कोण जाणे उद्या ती कोणाबरोबर संसार मांडेल? हिचं काय ऐकायचंय?’ आता तुम्हीच मला, सांगा मी काय करायला पाहिजे?”

Children on bed
PHOTO • Bhasha Singh

राणी आणि तिची तीन मुलं – दोघी मुली इतक्या कुपोषित आहेत की त्या कशाबशा चालू शकतात – डाबरीत भाड्याच्या छोट्या, कोंदट आणि अंधाऱ्या खोलीत राहतात, अनिलच्या मृत्यूनंतर या सगळ्यांनी फार हाल सोसले

काही आठवडे डाबरीत भाड्याच्या छोट्या, कोंदट आणि अंधाऱ्या खोलीत राहणाऱ्या राणी आणि तिच्या तिन्ही मुलांनी फार हलाखीत दिवस काढले. तिला भाडं भरणं पण मुश्किल व्हायला लागलं. सावकार – राणी आणि अनिलने आतापर्यंत काही कर्जं काढली होती – तिला येऊन त्रास देऊ लागले. गौरवने शाळेत जाणं बंद केलं, गटारातल्या या मृत्यूनंतर त्याला वर्गातल्या मुलांना तोंड दाखवणं शक्य झालं नाही.

सफाई कर्मचारी आंदोलनाने २००३ साली दाखल केलेल्या याचिकेवर २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गटार साफ करत असताना मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना रु. १० लाख नुकसान भरपाई म्हणून देणं बंधनकारक आहे. अनिलवर ‘अवलंबून’ असल्याने आणि त्याच्यासोबत एका छताखाली एकत्र राहत असल्यामुळे राणी ही भरपाई मिळण्यास पात्र आहे. “सुरुवातीला सगळे जण म्हणले की हे १० लाख मिळवून द्यायला आम्ही मदत करू म्हणून,” ती सांगते. “पण सगळ्यांनी शब्द फिरवला आहे, आणि प्रत्येकाने काही ना काही कारण सांगितलंय. माझ्या मुलांचं आणि माझं या यंत्रणेच्या दृष्टीने काही अस्तित्वच नाहीये.”

 कारण हे दोघं एकत्र राहत होते आणि राणी त्याबद्दल उघडपणे सांगते, ती म्हणते, “सगळ्यांनी आमचं नाव टाकलं.” ज्या संघटनांनी सुरुवातीला मदत करण्याचा शब्द दिला होता त्याही काचकूच करू लागल्या. त्यानंतर मात्र काही सेवाभावी संस्थांनी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा केला – रु. ५० लाख – आणि हा निधी गौरवच्या नावाने १० वर्षांच्या मुदत ठेवीत जमा केला आहे. तो अजून सज्ञान नसल्याने राणी या खात्याचा कारभार करू शकते आणि येणाऱ्या व्याजातून घरखर्च भागवू शकते. काही वैयक्तिक स्वरुपाच्या देणग्या – सगळ्या मिळून रु. ५०,००० – अनिलच्या मृत्यूनंतर लगेचच खात्यात जमा करण्यात आल्या.

PHOTO • Bhasha Singh
At the India SaniTech Forum, women who have lost family members
PHOTO • Bhasha Singh

डावीकडेः राणीचा मुलगा गौरवने वर्गातल्या मुलांना तोंड कसं द्यायचं या भीतीने गौरवने शाळेत जाणं बंद केलं. उजवीकडेः इंडिया सॅनिटेक फोरम येथे, ज्यांनी घरातलं माणूस गमावलं आहे अशा स्त्रियांनी गटारं साफ करण्यासाठी त्यांच्या घरातल्या माणसांऐवजी यंत्रं आणली जावीत अशी मागणी केली

सफाई कर्मचारी आंदोलनाव्यतिरिक्त वस्तीतल्या इतर काही जणांनीही मदत करण्याचा प्रयत्न केला. वीरेंद्र सिंग, अनिलचा सहकर्मचारी, राणीला बॅंकेतली कागदपत्रं भरण्यात मदत करतो आणि आंदोलनाच्या बैठकांना तिच्या सोबत जातो. त्याच्या सांगण्यानुसार, दिल्लीमध्ये त्यांच्या वाल्मिकी समाजाचे अनेक पुरुष अविवाहित आहेत – जसा अनिल होता. “आम्हाला पक्की नोकरी नाहीये त्यामुळे गावीदेखील आमचं लग्न होत नाही. माझंही वय तिशीच्या पुढे आहे आणि आपलं लग्न होईल ही आशा मी सोडून दिलीये. मी राणीला मदत करतोय कारण हा समाज आणि पोलिस तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतील.”

आमच्या गप्पा झाल्यानंतर राणी तिच्या तिन्ही मुलांना घेऊन डाबरीच्या गल्लीच्या टोकापर्यंत माझ्या सोबत आली. “मी तरुणपणीच फार हाल सोसलेत, मारहाण सहन केलीये. पण अनिलसोबत पहिल्यांदाच मी आनंद काय असतो तो अनुभवला. आणि एकदा असा आनंद माहित झाल्यानंतर परत एकदा हे दुःखमय जीवन जगणं फार कठीण आहे. एकटी बाई या गिधाडांच्या समाजात फार असहाय्य असते. मी या लेकरांसाठी जगतीये आणि जगत राहीन, भले माझं काहीही होवो. आम्ही जेव्हा ही [गटार साफ करणारी] यंत्रं चालवू ना तेव्हा लोकांना आमच्यात काय क्षमता आहेत ते समजेल. ही यंत्रं तुम्ही लवकरात लवकर वापरात आणली पाहिजेत...”

इंडिया सॅनिटेक फोरम, जिथे मी पहिल्यांदा पायरीवर बसलेल्या राणीला भेटले होते, तिथे अनेक प्रकारची यंत्रं प्रदर्शित केली होती. त्यामध्ये होता एक सफाई करणारा रोबो – बॅण्डीकूट, केरळमध्ये पथदर्शी प्रकल्पात त्याचा वापर सुरू असल्याचं बोललं जात आहे. अजून एक नाविन्यपूर्ण यंत्र म्हणजे जोरदार पाण्याचा फवारा आणि कटरचा वापर करून मैला साफ करणारा स्यूअरक्रॉक. आणखी एक म्हणजे ३६० अंश फिरून गटाराच्या आतलं चित्र बाहेरच्या संगणकावर पाठवणारा कॅमेरा. तिथे एक वायू तपासणी यंत्र होतं जे गटारात किंवा नाल्यात विषारी गॅस असल्यास सतर्क करतं, याच कारणापायी गटारात आणि टाक्यांमध्ये किती तर जण मरण पावलेत. आणि जर का मानवी हस्तक्षेपाशिवाय कामच होऊ शकणार नसेल तर या प्रदर्शनात कामगारांसाठी संरक्षक असा ‘स्यूअर-सूट’ किंवा ‘गटारी पोषाख’ मांडण्यात आला होता. या तांत्रिक उपाययोजनांचा उपयोग सुरू करण्यासाठी दिल्ली सरकारसह अनेक सरकारांसोबत बोलणी चालू असल्याचं सांगण्यात येत आहे.

राणीसोबत या प्रदर्शनात दिल्ली, हरयाणा, पंजाब, राजस्थान, तेलंगण आणि इतर राज्यातल्या इतर १० जणींनी आपलं मनोगत मांडलं. त्यांनी आपला नवरा किंवा कुटंब सदस्याचा कसा अंत झाला ते सांगितलं. त्यांनी आपला संताप आणि आपल्या चिंता सगळ्यांसमोर मांडल्या. विविध भाषांमध्ये बोलणाऱ्या या सगळ्या जणींनी त्यांच्या दुःखाचं जे समान मूळ आहे त्याच्यावर उपाय योजण्याची इच्छा व्यक्त केली. बहुतेक सगळ्या जणींनी सांगितलं की ही सगळी यंत्रं, उपकरणं चालवायला त्या शिकू शकतात आणि त्यांच्या घरची मंडळी नाही ही यंत्रं या देशातली गटारं साफ करू शकतात.

अनुवादः मेधा काळे 

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

Bhasha Singh

भाषा सिंग या स्वतंत्र पत्रकार आणि लेखिका आहेत. त्यांचं ‘अदृश्य भारत’ (हिंदी), (‘अनसीन’ इंग्रजी, २०१४) हे पुस्तक २०१२ साली पेंग्विनने प्रकाशित केलं. उत्तर भारतातील शेती संकट, अणुप्रकल्पांचं राजकारण आणि प्रत्यक्षातलं वास्तव, दलित, स्त्रिया आणि अल्पसंख्याकांचे हक्क यावर त्यांच्या पत्रकारितेचा भर राहिला आहे.

Other stories by Bhasha Singh