“फक्त कठपुतळ्या किंवा त्यांचा खेळ इतकंच नाही हे,” चाळीस वर्षांहून अधिक काळ थोलपावकोथ शैलीच्या छाया-पुतळ्यांचा खेळ सादर करणारे रामचंद्र पुलवर म्हणतात. केरळच्या मलबार प्रांतातील धार्मिक समन्वयाच्या संस्कृतीची मुळं वेगवेगळ्या समाजाच्या सूत्रधारांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये आहेत असं त्यांना वाटतं.

“आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं हे काम आहे. थोलपावकोथमधून आम्ही सांगतो त्या गोष्टींचा अर्थ फार खोल आहे. या गोष्टी ऐकून, पाहून तुम्हाला चांगलं माणूस बनण्याची प्रेरणा मिळू शकते,” ते पुढे म्हणतात.

थोलपावकोथ म्हणजे छाया-पुतळ्या वापरून नाटक किंवा गोष्ट सांगण्याचा पारंपरिक कलाप्रकार. मलबार प्रांतातल्या भारतपुला (नीला) नदीच्या किनारी वसलेल्या गावांमध्ये ही कला आढळून येते. पुतळ्यांचे सूत्रधार वेगवेगळ्या जाती आणि समाजाचे असून सगळे जण मोकळेपणी आपल्या गोष्टी सादर करू शकतात.

थोलपावकोथचे खेळ मंदिराच्या प्रांगणातल्या 'कूथमादम' या नाट्यगृहांमध्ये सादर केले जातात. त्यामुळे सगळे लोक इथे येऊन या खेळाचा आनंद घेऊ शकतात. भद्रकाली देवीच्या देवराईत दर वर्षीच्या जत्रेत हे खेळ सादर व्हायचे. रामायणातल्या राम आणि रावण युद्धाचा प्रसंग सादर केला जायचा. पण खेळांच्या कथा केवळ रामायणातल्या धार्मिक कथा नाहीत. लोककथांचाही त्यात समावेश झाला आहे.

सूत्रधार नारायणन नायर म्हणतात, “आमच्या खेळांसाठी पैसा आणि पाठिंबा असं दोन्ही मिळवायची धडपड सुरू असते. अनेकांना थोलपावकोथचं मोल समजलेलं नाही. ही कला जतन करायला हवी या दृष्टीने ते विचार करत नाहीत.”

अनेक अडचणींवर मात करत या छाया-पुतळ्यांचा खेळ सादर करणारे सूत्रधार बालकृष्ण पुलवर, रामचंद्र पुलवर, नारायणन नायर आणि सदानंद पुलवर यांची आपली भेट या चित्रफितीतून होते.

व्हिडिओ पहाः हा खेळ सावल्यांचा

मृणालिनी मुखर्जी फौंडेशनच्य फेलोशिपअंतर्गत हे वार्तांकन करण्यात आले आहे.

Sangeeth Sankar

Sangeeth Sankar is a research scholar at IDC School of Design. His ethnographic research investigates the transition in Kerala’s shadow puppetry. Sangeeth received the MMF-PARI fellowship in 2022.

Other stories by Sangeeth Sankar
Text Editor : Archana Shukla

Archana Shukla is a Content Editor at the People’s Archive of Rural India and works in the publishing team.

Other stories by Archana Shukla