आपल्या रानातल्या मोजक्या एरंडी पाहिल्या की नारायण गायकवाडांना त्यांच्या कोल्हापुरी चपलांची याद येते. शेवटची चप्पल वापरून २० वर्षं झाली असतील. “आम्ही कोल्हापुरी चपलेला एरंडीचं तेल चोळायचो. जास्त दिवस टिकायला,” ७७ वर्षांचे नारायण बापू सांगतात. इथल्या जगप्रसिद्ध चपला आणि एरंडीचं काय नातं आहे ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत जातं.

कोल्हापूर जिल्ह्यात एरंडीच्या तेलाचा मुख्य उपयोग म्हणजे कोल्हापुरी चपलांची मालिश. गुरांच्या चामड्यापासून बनवण्यात येणाऱ्या या चपला मऊ व्हाव्यात आणि त्यांचा आकार बिघडू नये म्हणून एरंडीचं तेल चोळलं जायचं. आणि अशी मालिश केली की मग किती तरी वर्षं चपला अगदी मऊसूत रहायच्या.

खरं तर एरंड ( Ricinus communis ) हे काही कोल्हापुरातलं स्थानिक पीक नाही. तरीही या भागात त्याची लागवड केली जायची. बारीक देठ आणि चमकदार हिरवी पानं असलेला एरंड वर्षभर कधीही लावता येतो. जगभराचा विचार केला तर भारतात या तेलबियांचं सर्वात जास्त उत्पादन होतं. २०२०-२१ साली १६.५ लाख टन इतकं उत्पादन झाल्याची नोंद आहे. भारतात गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळ नाडू, ओडिशा आणि राजस्थान या राज्यात एरंडीचं पीक जास्त घेतलं जातं.

“माझे वडील ९६ वर्षं जगले आणि त्यांनी दर वर्षी एरंडी लावल्या,” बापू सांगतात. आपल्या वडलांची ही परंपरा पुढे चालवत तेही आपल्या सव्वा तीन एकरात दर वर्षी एरंडी लावत आले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार त्यांच्या घरात गेली १५० वर्षं एरंडीचं पीक घेण्याची परंपरा सुरू आहे. “आम्ही एरंडीचं हे देशी वाण जतन केलंय. शंभरेक वर्षं जुनं असणार बघ,” बापू सांगतात. वर्तमानपत्रात त्यांनी या बिया नीट जपून ठेवल्या आहेत. “फक्त मी आणि बायको शेवकीण.”

वर्षभर कधीही एरंडी लावता येत असल्या तरी शक्यतो जून महिन्यात लागवड केली जाते आणि चार महिन्यांनंतर बिया तयार असतात. नारायण बापू आणि त्यांच्या पत्नी कुसुम काकी रानातल्या एरंडीपासून घरीच तेल काढतात. त्यांच्या भागात तेलाच्या अनेक मिल झाल्या असल्या तरी ते मात्र आजही हातानेच तेल गाळतात. कितीही वेळ लागला आणि मेहनत घ्यावी लागली तरी. “पूर्वीच्या काळी आम्ही दर तीन महिन्याला तेल काढत होतो,” बापू सांगतात.

Narayan Gaikwad shows the thorny castor beans from his field
PHOTO • Sanket Jain

नारायण गायकवाड आपल्या शेतातल्या काटेरी टरफल असलेल्या एरंडीच्या बिया दाखवतायत

Left: Till the year 2000, Narayan Gaikwad’s field had at least 100 castor oil plants. Today, it’s down to only 15 in the 3.25 acres of land.
PHOTO • Sanket Jain
Right: The Kolhapuri chappal , greased with castor oil, which Narayan used several years back
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः २००० सालापर्यंत नारायण गायकवाड यांच्या शेतात एरंडीची किमान १०० झाडं होती. आज सव्वा तीन एकरात केवळ १५ झाडं उरली आहेत. उजवीकडेः अनेक वर्षांपूर्वी नारायण बापू वापरत असलेली कोल्हापुरी चप्पल जिला एरंडेल लावून मालिश केलं जात असे

“माज्या लहानपणी जवळ जवळ प्रत्येकाच्या रानात एरंडी होत्या आणि प्रत्येक जण तेल काढायचा. आता मात्र कुणीच एरंडी लावत नाहीत. सगळ्यांनी फक्त ऊस लावायला सुरुवात केली आहे,” कुसुम काकी सांगतात. तेल कसं काढायचं ते आपल्या सासूकडून शिकल्याचं त्या सांगतात.

२००० सालापर्यंत गायकवाड कुटुंबाच्या सव्वा तीन एकर रानात शंभरहून अधिक एरंडी होत्या. आता मात्र केवळ १५ झाडं राहिली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या जांभळीतलं हे कुटुंब एरंडीचं पीक घेणाऱ्या अगदी मोजक्या शेतकऱ्यांपैकी एक आहेत. अख्ख्या जिल्ह्यातच एरंडीच्या बीचं उत्पादन इतकं घटलंय की “आता चार वर्षातून एकदा तेल काढता आलं तर पुष्कळ,” बापू म्हणतात.

कोल्हापूरी चपलांच्या मागणीतही अलिकडच्या काही वर्षांत घट झालीये आणि त्याचाही एरंडीच्या उत्पादनावर घातक परिणाम झाला आहे. “कोल्हापुरी चप्पल महाग असते. आजकाल २,००० रुपयांवर भाव गेलाय,” बापू सांगतात. चांगल्या चपलेचं वजन दोन किलोपर्यंत भरतं. आजकाल शेतकरी या चपला वापरेनासे झालेत. त्यापेक्षा स्वस्त आणि वजनाने हलक्या असणाऱ्या रबरी चपलांना सगळ्यांची पसंती आहे. आपल्या रानात एरंडी का कमी झाली हे सांगताना बापू म्हणतात, “माझ्या पोरांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लावायला सुरुवात केली.”

बापू १० वर्षांचे होते तेव्हा पहिल्यांदा एरंडीचं तेल कसं काढायचं ते शिकले. “जा झाडून सगळं बी घेऊन ये,” त्यांच्या आईने रानात पडलेल्या एरंडीच्या बीकडे बोट दाखवत बापूंना सांगितलं होतं. चारेक किलो बी होतं ते. एरंडी लावल्यावर तीन-चार महिन्यात फळ धरतं. बिया काढून उन्हात तीनेक दिवस वाळवल्या जातात.

वाळलेल्या बियांपासून तेल काढण्याची प्रक्रिया फार मेहनतीची असते. “आधी आम्ही पायात चपला घालून हे बी तुडवतो. त्यानंतर काटेरी टरफल काढून टाकायचं आणि आतल्या बिया गोळा करायच्या,” बापू सांगतात. त्यानंतर मातीच्या चुलीवर बी शिजत घालायचं.

बी शिजलं की तेल काढण्यासाठी कुटून त्यांचा लगदा करावा लागतो.

Left: A chuli , a stove made usually of mud, is traditionally used for extracting castor oil.
PHOTO • Sanket Jain
Right: In neighbour Vandana Magdum’s house, Kusum and Vandana begin the process of crushing the baked castor seeds
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः मातीच्या किंवा विटांच्या चुलीवर तेल काढण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पातेल्यात पाणी उकळत ठेवलंय. उजवीकडेः कुसुम काकी शेजारी त्यांच्या नात्यातल्या वंदना मगदूम हिच्या घरी एरंडीचं बी कुटायला आल्या आहेत. त्या आणि वंदनाताई उखळात बी टाकून मुसळाने ते चांगलं लगदा होईपर्यंत कुटून घेतात

बापू दर बुधवारी आपल्या आईला, कासाबाईंना बी कुटायला मदत करायचे. “आम्ही रविवार, सोमवार, मंगळवार रानातलं काम करायचो. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रानातला माल आसपासच्या आठवडी बाजारात विकायचो,” ते सांगतात. “बुधवार तेवढा रिकामा असायचा.”

आणि आजही, साठ वर्षांनंतरही बापूंच्या घरी एरंडीचं तेल फक्त बुधवारी गाळलं जातं. ऑक्टोबर महिन्यातल्या एका बुधवारी सकाळी कुसुम काकी शेजारी त्यांच्या नात्यातल्या वंदना मगदूम हिच्या घरी एरंडीचं बी कुटायला आल्या आहेत. त्या आणि वंदनाताई उखळात बी टाकून मुसळाने ते चांगलं लगदा होईपर्यंत कुटून घेणार.

काळ्या पाषाणाचं हे उखळ जमिनीत बसायच्या खोलीत जमिनीत पक्कं रोवलेलं आहे. कुसुम काकी जमिनीवर बसतात आणि सागवानी लाकडाचं अडीच फुटी मुसळ हाताने वर उचलतात. वंदनाताई उभं राहून जोरात उखळातलं बी कुटते.

“पूर्वी काय मिक्सर होते का?” कुसुम काकी विचारतात. आणि उखळ आणि मुसळ किती उपयोगी होतं ते सांगतात.

अर्धा तास सलग कुटल्यानंतर तेल सुटायला लागतं ते दाखवतात. “आता याचा रबडा होतो,” त्या म्हणतात आणि आपल्या अंगठ्याला लागलेला काळा चिकट लगदा दाखवतात.

दोन तास उखळात कुटल्यानंतर त्यातला सगळा लगदा त्या एका भांड्यात काढून घेतात आणि उकळत्या पाण्यात मिसळतात. दोन किलो लगदा असेल तर पाच लिटर उकळतं पाणी पाहिजे, त्या सांगतात. अंगणातल्या चुलीवर हे सगळं मिश्रण उकळलं जातं. धूर आणि वाफेमुळे काकींना डोळे उघडे ठेवणं मुश्किल होऊन जातं. “आम्हाला याची सवय पडून गेलीये,” खोकत खोकतच त्या म्हणतात.

Left: Ukhal – a mortar carved out of black stone – is fitted into the floor of the hall and is 6-8 inches deep.
PHOTO • Sanket Jain
Right: A musal made of sagwan wood is used to crush castor seeds.
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः वंदनाताईंच्या घरी बसायच्या खोलीत जमिनीत उखळ रोवलेलं आहे. उजवीकडेः एरंडीच्या बिया कुटण्यासाठी सागवानी लाकडाचं मुसळ वापरलं जातं

Kusum points towards her thumb and shows the castor oil’s drop forming.
PHOTO • Sanket Jain
She stirs the mix of crushed castor seeds and water
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः कुसुम काकी आपल्या अंगठ्याला लागलेला लगदा आणि त्यातून तयार होऊ लागलेला तेलाचा थेंब दाखवतयात. उजवीकडेः कुसुम काकी एरंडीच्या कुटलेल्या बियांचा लगदा पाण्यात घालून चांगलं ढवळून शिजवून घेतायत. चुलीतून धुराचे लोट येतायत

हा सगळा रबडा उकळत असताना काकी पटकन माझ्या शर्टाचा एक गोरा काढतात आणि पातेल्यात टाकतात. “कोण बाहेरचं आलं तर त्याचं चिंदुक घेऊन टाकायचं, नाही तर ते तेल घेऊन जातं,” त्या सांगतात. ते बघून बापू पटकन म्हणतात, “अंधश्रद्धा आहे सगळी. पूर्वीच्या काळी लोक घाबरायतं की बाहेरचं कुणी येऊन तेल घेऊन जाईल म्हणून. त्यामुळे ही दोरा टाकायची रीत आली.”

काकी दोन तास हा एरंडीच्या बियांचा लगदा डावाने हलवत रटरट शिजू देतात. त्यानंतर तेल सुटतं आणि त्याचा तवंग वरती यायला लागतो.

“आम्ही तेल कधीच विकलं नाही. फुकट देऊन टाकायचं,” बापू म्हणतात. जांभळीच्या पंचक्रोशीतले लोक त्यांच्या घरी एरंडीचं तेल घ्यायला यायचे ते आजही त्यांच्या लक्षात आहे. “गेल्या चार वर्षात एक बी कुणी तेल न्याया आलं नाही,” काकी म्हणतात. आणि सोढण्यातनं (गाळणीतून) तेल गाळून घ्यायला सुरुवात करतात.

अगदी आजच्या घडीलाही चार पैसे कमवावे या हेतूने एरंडीचं तेल विकावं असं काही या दोघांच्या मनात आलेलं नाही.

तसंही एरंडीचं उत्पादन घेऊन फायदा काहीच होत नाही. “शेजारच्या जयसिंगपुरातले व्यापारी एरंडीच्या बीला किलोला २०-२५ रुपये भाव देतात,” काकी सांगतात. अनेक उद्योगांमध्ये कोटिंग, वंगण, मेण आणि रंगांमध्ये एरंडेल वापरलं जातं. साबण आणि सौंदर्य प्रसाधनांमध्येही त्याचा वापर केला जातो.

“आजकाल लोकांना हाताने तेल काढाया वेळ नाही. लागेल तेव्हा बाजारात जाऊन तयार तेल घेऊन यायाचं,” काकी सांगतात.

Left: Crushed castor seeds and water simmers.
PHOTO • Sanket Jain
Right: Narayan Gaikwad, who has been extracting castor oil since the mid-1950s, inspects the extraction process.
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः कुटलेल्या एरंडीच्या बियांचा लगदा उकळत्या पाण्यात रटरट शिजतोय. उजवीकडेः १९५० पासून एरंडीचं तेल काढत असलेले नारायण गायकवाड पातेल्यातलं मिश्रण ढवळतायत आणि तेल सुटण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत

After stirring the castor seeds and water mixture for two hours, Narayan and Kusum separate the oil floating on top from the sediments
PHOTO • Sanket Jain
After stirring the castor seeds and water mixture for two hours, Narayan and Kusum separate the oil floating on top from the sediments
PHOTO • Sanket Jain

सगळा माल दोन तास शिजल्यानंतर वरती तेलाचा तवंग जमा होतो. नारायण बापू आणि कुसुम काकी अगदी निगुतीने ते तेल पातेल्यात काढून घेतात

असं असतानाही गायकवाड दांपत्याने मात्र एरंडीचे फायदे माहित असल्याने ती जतन करणं सोडलेलं नाही. “डोक्यावर एरंडी ठेवल्याने डोकं शांत राहतं,” बापू सांगतात. “न्याहरीच्या आधी एक थेंब एरंडीचं तेल प्या तुम्ही. पोटातले सगळे जंतू मरून जातात.”

“शेतकऱ्याची छत्रीच आहे हे झाड,” बापू म्हणतात. निमुळत्या पानांकडे बोट दाखवत ते सांगतात. एप्रिल ते सप्टेंबर जेव्हा इथे जोरदार पाऊस असतो तेव्हा तर नक्कीच. “एरंडीचं बी कुटून घातलं तर फार चांगलं जैविक खत आहेत,” बापू सांगतात.

पूर्वीपासून इतक्या सगळ्या प्रकारे वापरात असूनही, इतके फायदे असूनही कोल्हापुरातल्या शेतशिवारातून एरंडी हद्दपार झाली आहे.

उसाची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तशी एरंडीची लागवड घटत गेल्याचं आपल्याला दिसतं. महाराष्ट्र सरकारच्या गॅझेट विभागाच्या नोंदींनुसार १९५५-५६ साली कोल्हापुरात ४८,६३१ एकर जमिनीवर उसाची लागवड करण्यात आली होती. गेल्या साठ वर्षांमध्ये यामध्ये प्रचंड वाढ होऊन २०२२-२३ साली ४.३ लाख एकरहून जास्त क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

Kusum filters the castor oil using a tea strainer. 'For the past four years, no one has come to take the oil,' she says
PHOTO • Sanket Jain
Kusum filters the castor oil using a tea strainer. 'For the past four years, no one has come to take the oil,' she says
PHOTO • Sanket Jain

कुसुम काकी गाळणीतून तेल गाळून घेतात. ‘गेल्या चार वर्षात एक बी कुणी तेल न्याया आलं नाही,’ काकी सांगतात

' A castor plant is a farmer’s umbrella,' says Narayan (right) as he points towards the tapering ends of the leaves that help repel water during the rainy season
PHOTO • Sanket Jain
' A castor plant is a farmer’s umbrella,' says Narayan (right) as he points towards the tapering ends of the leaves that help repel water during the rainy season
PHOTO • Sanket Jain

‘शेतकऱ्याची छत्रीच आहे हे झाड,’ नारायण गायकवाड म्हणतात. पावसाळ्यात पानांच्या निमुळत्या आकारांमुळे त्यावर पाणी ठरत नाही ते दाखवतात

“अहो, माझी स्वतःची पोरं सुद्धा एरंडी लावायला आणि त्यापासनं तेल काढायला शिकली नाहीत की,” बापू सांगतात. “त्यांच्यापाशी वेळ कुठे?” ४९ वर्षीय मारुती आणि ४७ वर्षीय भगत सिंग दोघंही शेती करतात आणि उसासह इतर बरीच पिकं घेतात. त्यांची लेक, मीनाताई, वय ४८ गृहिणी आहे.

एरंडीचं तेल हाताने काढण्याच्या सगळ्या प्रक्रियेत काय अडचणी आहेत असं विचारल्यावर बापूंचं उत्तर खास असतं. ते म्हणतात, “काहीच अडचण नाही. आम्हाला चांगला व्यायाम घडतो.”

“मला ही झाडं जतन करायला आवडतात. म्हणून मी दर वर्षी एक एरंडीचं झाड लावतोच,” ते अगदी ठामपणे सांगतात. या सगळ्यासाठी जे काही कष्ट येतात त्याचा म्हणावा तर काहीच मोबदला बापू किंवा काकींना मिळत नाही. तरीही त्यांना ही परंपरा पुढे सुरू ठेवायची आहे.

आणि म्हणूनच दहा फुटी उसाच्या रानातही नारायण बापू आणि कुसुम काकींनी एरंडीची साथ काही सोडलेली नाही.

संकेत जैन लिखित ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेसाठी मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.

Sanket Jain

Sanket Jain is a journalist based in Kolhapur, Maharashtra. He is a 2022 PARI Senior Fellow and a 2019 PARI Fellow.

Other stories by Sanket Jain
Editor : Dipanjali Singh

Dipanjali Singh is an Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also researches and curates documents for the PARI Library.

Other stories by Dipanjali Singh
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale