"कदलिले राजव तिमिंगलम अन्नेनकिलुम नजम्माले, मीनपणिक्करे राजव मतियान."

[जर समुद्राचा राजा डॉल्फिन असेल तर आमचा, मच्छीमारांचा राजा, ऑइल सार्डिन आहे]."

बाबू (नाव बदललं आहे) केरळमधील वडकरा शहरातील चोंबाल मासेमारी बंदरात मासळी उतरवणे आणि चढवण्याचं काम करतात.  गेली कित्येक दशकं ते जास्त करून ऑइल सार्डिन म्हणजेच  तेल्या टारली (सार्डिनेला लाँगिसेप्स) चढवणं आणि उतरवण्याचं काम करतायत.

बाबू सकाळी ७ च्या सुमारास बंदरावर पोहोचतात आणि कामासाठी वेगळे ठेवलेले कपडे घालतात - एक निळं मुंडू , टी-शर्ट आणि चप्पल. ४९ वर्षांचे बाबू मग गुडघाभर गढूळ पाण्यातून समुद्राकडे बोटीपर्यंत जातात. “आम्ही सर्व [लोडर्स] या कामासाठी वेगळ्या चपला आणि कपडे ठेवतो, कारण पाण्याला एक वास येतो,” ते सांगतात. संध्याकाळी बंदरावर सामसूम होते तेव्हा उशीरा ते घरी परततात.

डिसेंबर महिन्यातल्या सकाळी मी बाबूंशी बोलत होते. हवेत गारवा होता. बाबू बंदरावरील गजबजाटामध्ये कामात गुंतले होते. लांब मानेचे, पांढरे पाणकोळी पक्षी, मासे चोरण्याच्या आशेने,  बांबूच्या टोपल्यांवर घिरट्या घालत होते. माशांनी भरलेली जाळी जमिनीवर पडली होती. बंदरामध्ये वाटाघाटी करणाऱ्या लोकांचा आवाज गुंजत होता.

Babu is a fish loader at the Chombal Fishery Harbour. He estimates roughly 200 sellers, agents and loaders work here. He says, ' If the king of the ocean is the dolphin, our king, the fisherfolk’s king, is the oil sardine'
PHOTO • Mufeena Nasrin M. K.
Babu is a fish loader at the Chombal Fishery Harbour. He estimates roughly 200 sellers, agents and loaders work here. He says, ' If the king of the ocean is the dolphin, our king, the fisherfolk’s king, is the oil sardine'
PHOTO • Mufeena Nasrin M. K.

बाबू चोंबाल मत्स्य बंदरावरील फिश लोडर आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, सुमारे २०० विक्रेते, एजंट आणि लोडर येथे काम करतात. ते म्हणतात, 'जर सागराचा राजा डॉल्फिन असेल तर आमचा,मच्छिमारांचा राजा, ऑइल सार्डिन आहे'

ग्राहक, विक्रेते, एजंट आणि बाबूंसारख्या लोकांनी गजबजलेल्या या बंदरात विविध आकाराच्या बोटी ये जा करत होत्या. त्यातले मासे बंदरावर आणि वेटिंग टेम्पोमध्ये उतरवले जात होते. सुमारे २०० लोक येथे काम करतात असा बाबूंचा अंदाज आहे.

दररोज सकाळी, बाबू बंदरावर पोहोचल्यावर सर्वात पहिले त्यांचं कामाचं साहित्य एका उंचच्या उंच बदामाच्या झाडाखाली सावलीत ठेवतात. साहित्य काय तर एक केशरी प्लास्टिकची पाटी, टोपलं किंवा खोका, पाण्याची बाटली, चपला  आणि थेरुवा, प्लॅस्टिक शीटने झाकलेली छोटी गोलाकार कापडाची किंवा दोरीची चुंबळ. डोक्यावर थेरुवा ठेवून व त्यावर माश्याची पाटी ठेवायची.

आज बाबू चार लोकांची क्षमता असलेल्या आऊटबोर्ड इंजिन बोटीतून मासे उतरवतायत. बंदरातल्या सगळ्यात लहान बोटींपैकी ही एक. ते फक्त ट्रॉलर नसलेल्या बोटींवरच काम करतात, कारण व्यावसायिक ट्रॉलर त्यांच्याकडच्या लोडर्सना काम देतात. ते सांगतात, “हे मच्छीमार एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ मोठ्या बोटी घेऊन समुद्रात जातात, त्या बोटी बंदरात येऊ शकत नसल्याने अजून दूर [नांगरल्या] आहेत. मच्छीमार आमच्यासाठी या छोट्या बोटींतून मासे आणतात.”

बाबू एका छोट्या जाळ्याने, ज्याला माल म्हणतात, टारली त्यांच्या पाटीत टाकतात. आम्ही बंदराकडे परत जात असताना टोपलीतील लहान छिद्रांमधून पाणी टपकत राहतं. ते सांगतात, “या महिन्यात [डिसेंबर २०२२] आम्हाला भरपूर टारली घावली आहे”. एक पाटी मासळी उतरवली की बोट मालक किंवा स्थानिक बाजारपेठेत मासे खरेदी करून बाहेर विरणाऱ्या एजंटकडून ४० रुपये मिळतात.

Babu has been loading and unloading mostly oil sardine fish (right) from non-trawler boats for a few decades now
PHOTO • Mufeena Nasrin M. K.
Babu has been loading and unloading mostly oil sardine fish (right) from non-trawler boats for a few decades now
PHOTO • Mufeena Nasrin M. K.

बाबू काही दशकांपासून ट्रॉलर नसलेल्या बोटीतून बहुतांशी तेल्या टारली (उजवीकडे) चढवत आणि उतरवत आहेत

“आम्ही एका दिवसात किती पाट्या ने-आण करतो हे सांगणं कठीण आहे, कारण किती मासळी येते यावर सगळं अवलंबून असतं,” बाबू सांगतात. कधी कधी एका दिवसात  त्यांची २००० रुपयांपर्यंत कमाई होते. "भरपूर टारली घावली, तरच मी इतका पैसा कमवू शकतो."

*****

बाबूंनी अगदी किशोरवयात मासेमारीच्या धंद्यात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते मासेमारी करायचे. गेल्या काही वर्षांपासून ते बंदरावर मासळी उतरवण्याचं काम करतायत. अरबी समुद्रातून बोटी कोळिकोड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर परतायला लागल्या की त्यांचं चोमाडू पनी किंवा रोजंदारीवरचं लोडींगचे काम सुरू होते.

गेल्या दशकामध्ये तेल्या टारलीच्या संख्येमध्ये चढ उतार पाहिले आहेत.

“जेव्हा [तेल] टारली कमी असते, तेव्हा आम्ही [लोडिंगचे] काम एकमेकांमध्ये विभागण्याचा प्रयत्न करतो,” तो सांगतो, “जर तिथे आणखी रिकाम्या बोटी आल्या, तर मग आम्ही उमजून घेतो की सर्वांना किमान थोडं तरी काम मिळेल अशा प्रकारे कामाची विभागणी करायला पाहिजे.”

Loaders use a plastic basket and theruva , a small round shaped flat bundle of cloth or rope covered with plastic sheet, for their work of loading and unloading
PHOTO • Mufeena Nasrin M. K.
Loaders use a plastic basket and theruva , a small round shaped flat bundle of cloth or rope covered with plastic sheet, for their work of loading and unloading
PHOTO • Mufeena Nasrin M. K.

मासळी उतरवण्यासाठी किंवा लादण्यासाठी प्लास्टिकची पाटी आणि थेरुवा, म्हणजेच प्लॅस्टिकच्या कागदाने  झाकलेली कापडाची किंवा दोरीची चुंबळ वापरतात

Loaders pack the fish after unloading from the boats (left) and bring them back to the harbour where they will be taken for sale
PHOTO • Mufeena Nasrin M. K.
Loaders pack the fish after unloading from the boats (left) and bring them back to the harbour where they will be taken for sale
PHOTO • Mufeena Nasrin M. K.

लोडर बोटीतून उतरल्यानंतर मासळीचं पॅकिंग करतात (डावीकडे) आणि बंदरात परत आणतात, जिथून ते विक्रीसाठी नेले जातात

आई, पत्नी आणि दोन मुलगे आणि ते स्वतः अशा पाच जणांच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असलेले बाबू सांगतात  की किती मासळी मिळेल यातल्या अनिश्चिततेमुळे बंदरामध्ये दैनंदिन मजुरी करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था, कोची (CMFRI) द्वारे प्रकाशित “मरीन फिश लॅण्डिंग्स इन इंडिया २०२१” प्रमाणे, २०२१ मध्ये केरळमध्ये ३,२९७ टन टारली घावली होती. १९९५ पासून ही सर्वात कमी आहे. “गेल्या दहा वर्षांत, आम्ही टारलीत घट पाहिली आहे आणि हा मासा केरळच्या किनारपट्टीपासून आणखी दूर जात असावा असं निरीक्षणास आलं आहे,” CMFRI मधील एक शास्त्रज्ञ सांगतात. त्यांनी आपलं नाव न सांगण्याची इच्छा दर्शवली. हवामानातील बदल, तेल्या टारलीची चक्रीय वाढ, ला निनो प्रभाव आणि समुद्रात जेलीफिशच्या वाढत्या वावरामुळे टारलीच्या संख्येवर विपरित परिणाम झाला असल्याचंही ते म्हणतात.

हँडबुक ऑफ फिशरीज स्टॅटिस्टिक्स २०२० नुसार पश्चिम किनारपट्टीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत केरळमध्ये तेल्या टारलीची संख्या सर्वाधिक म्हणजेच ४५ हजार टन असल्याचं आढळतं.

बाबू सांगतात, तेल्या टारली हा केरळमध्ये सर्रास मिळणारा, पौष्टिक आणि स्वस्त माशांपैकी एक आहे. पूर्वी हा मासा सुकवूनही खाल्ला जात असल्याचं ते सांगतात. मँगलोर आणि आसपासच्या भागात कुक्कुटपालनासाठी अन्न आणि फिश ऑइल बनवण्याच्या गिरण्यांमध्ये हे मासे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात असं दिसून आलं आहे. "इथे इतर माशांपेक्षा तेल्या टारलीची आवक खूप जास्त आहे, त्यामुळे आम्ही टोपल्या भरभरून मासळी लादू शकतोय."

Student Reporter : Mufeena Nasrin M. K.

Mufeena Nasrin M. K. is a final year MA Development student at Azim Premji University, Bengaluru.

Other stories by Mufeena Nasrin M. K.
Editor : Riya Behl

Riya Behl is Senior Assistant Editor at People’s Archive of Rural India (PARI). As a multimedia journalist, she writes on gender and education. Riya also works closely with students who report for PARI, and with educators to bring PARI stories into the classroom.

Other stories by Riya Behl
Translator : Tanvi Mainkar

Tanvi is a graduate from Mumbai University and works as a Software Engineer.

Other stories by Tanvi Mainkar