२०२३ साली जून महिन्याच्या मध्यावर औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर अझीम शेख सलग पाच दिवस उपोषणाला बसला होता.

उन्हाच्या काहिलीतही २६ वर्षांच्या अजिमने पाणी सोडून पाच दिवस अन्नाला स्पर्शही केला नाही. पाच दिवस सलग उपोषण केल्यानंतर तो पूर्ण गळून गेला होता, अंगात कसलीच ताकद उरली नव्हती, गरगरत होतं. सरळ रेषेत चालणंही त्याच्यासाठी अवघड झालं होतं.

त्याच्यावर ही वेळ का आली? त्याला पोलिसात एक तक्रार नोंदवायची होती. बस्स. पण इथून ८० किलोमीटरवर असलेल्या शेजारच्या जालना जिल्ह्यातल्या त्याच्या गावी पोलिस तक्रार लिहूनच घ्यायला तयार नव्हते.

१९ मे २०२३ रोजी त्याच्याच गावातल्या मराठा जातीच्या सोनावणे कुटुंबातले काही लोक रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अजिमच्या घरात घुसले आणि त्याच्या घरच्यांना काठ्यांनी आणि दगडानी मारहाण केली. त्याचा भाऊ आणि आई-वडील या हल्ल्यात जखमी झाले. “माझी आई म्हातारी आहे. तिला दवाखान्यात दाखल करावं लागतं. बेकार हल्ला केला त्यांनी,” तो सांगतो. “आमच्या घरातून रोकड आणि दागिने मिळून दीड लाखाचा ऐवज चोरलाय त्यांनी.”

नीतीन सोनवणे देखील या हल्ल्यात सामील होता असं अजिमचं म्हणणं आहे. त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने या विषयावर काहीही बोलायला नकार दिला आणि म्हणाला, “मला या प्रकाराबद्दल काहीही माहित नाही.”

जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या पळसखेडा मुर्तड गावापासून दोन किलोमीटर अंतरावर अजिमची आठ एकर शेती आहे आणि तिथेच रानात त्याचं घर आहे.

“आडवाटेला आहे आणि रात्री एकदम सुनसान असतंय,” तो सांगतो. “मदतीसाठी बोलावणार तर कुणाला?”

On May 19, 2023, Ajim and his family members were assaulted at their home in Palaskheda Murtad village of Jalna district
PHOTO • Parth M.N.

१९ मे २०२३ रोजी अजीम आणि त्याच्या घरच्यांवर जालन्याच्या त्यांच्या पळसखेडा मुर्तड गावात घरी घुसून हल्ला करण्यात आला

अजीमच्या अंदाजानुसार हा हल्ला धंद्यातल्या वैमनस्यातून झाला असावा. या गावात जेसीबी चालवणारी ही दोनच कुटुंबं आहेत. “इथे जवळच [जुई] धरण आहे,” अजीम सांगतो. “शेतकरी धरणातला गाळ काढून रानात माती घालतात. जमिनीचा कस वाढतो म्हणून. धरणाच्या तळाची माती म्हणजेच गाळ काढून त्यांच्या शेतात टाकायचा हा आमचा व्यवसाय आहे.”

दोन्ही कुटुंबं शेतकऱ्यांकडून या कामासाठी तासाला ८० रुपये घेतात. “मी आमचा दर ७० केला आणि मला जास्त काम मिळायला लागलं,” अजीम सांगतो. “त्यानंतर त्यांनी मला धमकावलं होतं. पण मी काही रेट वाढवला नाही आणि त्यानंतरच त्यांनी आमच्या घरावर हल्ला केला. समोर जेसीबी लावला होता त्याचीही मोडतोड केली.”

दुसऱ्या दिवशी सकाळी अजीम भोकरदनला पोलिस चौकीला गेला. त्याचं गाव याच तालुक्यात येतं. पण पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून घ्यायला नकार दिला. उलट, “पोलिसांनी मलाच धमकावयला लागले,” तो सांगतो. “त्या लोकांच्या विरोधात तक्रार केली तर मीच गोत्यात येईन असं ते म्हणाले. त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत.”

तक्रार नोंदवायचीच आहे असा आग्रह धरला तेव्हा तर पोलिसांनी चक्क त्याला सांगितलं की दुसरी पार्टी त्याच्यावर अनेक साऱ्या केसेस टाकेल आणि त्याला गावातून हाकलून देईल.

“ही कसली लॉ अँड ऑर्डर?” तो विचारतो. “त्यांनी ठरवून आमच्यावर हल्ला केला आणि धुमाकूळ घातला. आम्ही अजून सावरलो नाहीत. भयंकर हल्ला होता.”

अजीमसाठी हा खरं तर तत्त्वाचा मुद्दा आहे. स्वतःच्या प्रतिष्ठेचाही. एखाद्या मराठा कुटुंबाने असं कुकर्म करावं आणि त्यांना साधा ओरखडाही उठू नये हे त्याला अजिबात पटलं नाहीये. “मी माघार घेतलीच नाही. एफआयआर नोंदवून घेईपर्यंत मी त्यांच्या मागेच पडलो.”

अखेर पोलिस मानले, पण त्यांनी अजीमला सांगितलं की एफआयआरमध्ये सगळे तपशील घातले जाणार नाहीत. काही गोष्टी वगळल्या जातील. “त्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले हे एफआयआरमध्ये नोंदवायला त्यांनी चक्क नकार दिला. मला ते मान्यच नव्हतं,” अजीम सांगतो.

When Ajim first went to file an FIR at the station, he was warned by the police. 'They said I would get in trouble for complaining against that family. They are politically connected'
PHOTO • Parth M.N.

अजीम पोलिसात तक्रार द्यायला चौकीला गेला तेव्हा पोलिसांनी त्याला आधीच सांगून टाकलं की ‘त्या लोकांविरोधात तक्रार केलीस तर गोत्यात येशील. त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत’

म्हणून मग तो ग्राम पंचायतीत गेला आणि त्याने आपली केस गावातल्या जाणत्या मंडळींसमोर मांडली. अजीमच्या कुटुंबाच्या किती तरी पिढ्या या गावात राहिल्या आहेत. गावातले लोक त्याच्या बाजूने उभे राहतील याची त्याला खात्री होती. “गावातल्यांबरोबर आमचे फार चांगले संबंध आहेत,” तो सांगतो. “लोक माझ्या बाजूने उभे राहतील याची मला खात्री होती.”

अजीमने जे काही झालं त्याबद्दल एक निवेदन छापून घेतलं आणि गावातल्या सगळ्यांना पाठिंबा म्हणून त्यावर सह्या करण्याचं आवाहन केलं. त्याला औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांपर्यंत हे प्रकरण न्यायचं होतं.

मात्र त्या पत्रावर फक्त २० जणांनी सह्या केल्या – सगळे मुस्लिम. “काहींनी मला खाजगीत सांगितलं की त्यांचा पाठिंबा आहे पण ते उघड कुणाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत म्हणून.”

त्या क्षणी त्याला पुरतं कळून चुकलं की आपलं गाव धर्माचा मुद्दा आला की अजिबात गुण्यागोविंदाने विचार करत नाही. “माझं गाव धर्माचा प्रश्न आला की कसं दोन गटात विभागलंय ते आतापर्यंत माझ्या लक्षातच आलं नव्हतं,” अजीम सांगतो. हिंदू धर्माच्या काही जणांनी थेट बोलायला नकार दिला, जे बोलले त्यांनी याला धर्माचा काही आधार आहे, त्यामुळे ते पाठिंबा देत नाहीत हे अमान्य केलं.

काही हिंदू शेतकऱ्यांनी मात्र सांगितलं की त्यांना होणाऱ्या परिणामांची भीती होती. बदला घेतला गेला असता. परिस्थिती स्फोटक झालीये आणि त्यांना त्या कात्रीत सापडायचं नाहीये.

६५ वर्षीय भगवान सोवनणे गेली २० वर्षं या गावाचे सरपंच आहेत. ते सांगतात किंवा या घटनेनंतर धार्मिक तणाव वाढला होता मात्र आता परिस्थिती निवळली आहे. “आता वेगवेगळ्या धर्माच्या घरांमध्ये भांडण लागलं की त्याचा परिणाम अख्ख्या गावावरच होतो ना,” ते म्हणतात.

“या प्रकरणात अजीमची काहीच चूक नव्हती. पण लोकांनी विचार केला आपण बरं नी आपलं काम बरं. कशाला या फंदाच पडा?” सोनवणे म्हणतात. ते स्वतः मराठा आहेत. पंधरा वर्षांपूर्वी असंच हिंदू-मुस्लिम तंटा झाला असल्याचं ते सांगतात. “अलिकडे सगळं ठीकठाक चाललं होतं, आणि मग हे प्रकरण झालं.”

जालना जिल्ह्यात इतरत्र आणि खरं तर महाराष्ट्रात सर्वत्रच धार्मिक असंतोष खदखदतोय. पळसखेडा मुर्तड हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल.

Saiyyad Zakir Khajamiya was attacked by men in black masks who barged into the mosque and beat him when he refused to chant Jai Shri Ram.
PHOTO • Courtesy: Imaad ul Hasan
At his home (right) in Anwa village
PHOTO • Courtesy: Imaad ul Hasan

डावीकडेः तोंडाला काळं कापड बांधलेल्या काही जणांनी मशिदीत घुसून सय्यद झकीर खाजामियावर हल्ला केला कारण त्याने जय श्री राम म्हणायला नकार दिला. उजवीकडेः अन्वा गावात आपल्या घरी खाजामिया

२६ मार्च २०२३. जालन्याच्या अन्वा गावी धर्माचे अभ्यासक सय्यद झकीर खाजामिया मशिदीत शांतपणे कुराण वाचत होते. “अचानक तीन अनोळखी लोक मशिदीत घुसले आणि मला म्हणाले, जय श्री राम बोल,” २६ वर्षीय खाजामिया पोलिसांना सांगतात. “मी नकार दिला तर त्यांनी मला छातीत लाथा मारल्या, मारहाण केली आणि माझी दाढी देखील खेचली.”

त्यांच्या सांगण्यानुसार तोंडाला काळं कापड बांधलेल्या या तिघांनी खाजामिया बेशुद्ध होईपर्यंत त्यांना मारहाण केली. इतकंच नाही, त्यांची दाढी काढून टाकली. सध्या औरंगाबादमध्ये एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्यांच्यासोबत घडली ती आगळिक नाही ही चिंतेची बाब आहे. शेजारच्याच गावाचे प्रमुख अब्दुल सत्तार म्हणतात की परिस्थिती फार तणावपूर्ण झालीये. “मुस्लिम समुदायाला आश्वस्त करण्यासाठी पोलिसांनी काहीही केलेलं नाही,” ते म्हणतात. “या गोष्टींची कुणी वाच्यता करत नाहीये, पण आमच्यासाठी मात्र हे रोजचं संकट झालंय.”

१९ जून २०२३ रोजी जालना पोलिसांनी १८ वर्षांच्या तौफिक बागवानवर “जाणीवपूर्वक आणि वाईट हेतूने धार्मिक भावना दुखावल्याचा” आरोप ठेवला. शेतकरी कुटुंबातल्या तौफिकने आपल्या पोनवर औरंगजेबाचा फोटो ठेवला होता.

त्याचा मोठा भाऊ २६ वर्षीय शफीक सांगतो की त्यांच्या हस्नाबाद गावातल्या हिंदुत्ववादी गटाच्या लोकांनी तौफिकनी अपलोड केलेल्या स्टोरीचे स्क्रीनशॉट काढले आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. “पोलिसांनी इतर कुणी कुणी हा फोटो टाकलाय ते तपासण्यासाठी तौफिकचा फोन ताब्यात घेतला,” तो सांगतो. “माझा भाऊ फक्त १८ वर्षांचा आहे. तो हादरून गेलाय आणि अस्वस्थ झालाय.”

हस्नाबाद देखील भोकरदन तालुक्यात आहे. अजीमचं गावही याच तालुक्यात येतं. समाजमाध्यमावर टाकलेल्या एका पोस्टबद्दल पोलिसांनी सतर्कतेने केलेली कारवाई आणि सहकार्य एकीकडे तर अजीमवर हल्ला झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात केलेली चालढकल दुसरीकडे.

It was only after Ajim's protest in front of the DC's office in Aurangabad, and his meeting with the Jalna SP, that the Bhokardan police finally filed an FIR
PHOTO • Parth M.N.

औरंगाबादला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अजीम उपोषणाला बसला, जालन्याच्या पोलिस अधीक्षकांना जाईन भेटला तेव्हा कुठे भोकरदन पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली

पोलिसांनी अजीमला सांगितलं की ते तक्रार नोंदवून घेतील पण त्यामध्ये काही गोष्टी घालणार नाहीत. त्याने गावातल्या २० मुस्लिम रहिवाशांच्या सह्या असलेलं निवेदन औरंगाबाद विभागीय आयुक्तांना दिलं. गावातले इतर काही मुस्लिम शेतकरी अजीमसोबत औरंगाबादला उपोषणाला बसले. “असं वाटालयंय की आमची कुणाला गणतीच नाहीये. अधिकाऱ्यांना आम्ही दिसतो की नाही असलीच शंका यायला लागलीये,” अजीम म्हणतो.

पाच दिवसांनंतर विभागीय आयुक्तांनी अजीम आणि इतर आंदोलकांची भेट घेतली आणि कारवाईचं आश्वासन दिलं. जालन्याच्या पोलिस अधीक्षकांना भेटायला सांगितलं.

औरंगाबादला आंदोलन केल्यानंतर अजीन जालन्यात पोलिस अधीक्षकांना जाऊन भेटला. आणि हल्ल्यासंबंधीचं निवेदन त्यांनाही दिलं. त्यांनी भोकरदन पोलिस ठाण्याला फोन केला आणि या प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश तिथल्या पोलिसांना दिले.

अखेर, १४ जुलै रोजी भोकरदन पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. घटना घडून गेली त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी. त्यामध्ये पोलिसांनी १९ जणांची आरोपी म्हणून नावं घातली त्यातला एक होता नीतीन. आरोपांमध्ये बेकायदेशीररित्या जमा होणे, दंगल घडवणे, हत्यारांचा वापर करून इजा करणे, रु. ५० किंवा त्याहून अधिक मूल्याच्या मालमत्तेचे नुकसान आणि धाकदपटशा या कलमांचा समावेश आहे.

इतकं होऊनही रोकड आणि दागिन्यांची चोरी झाल्याचा उल्लेख अजूनही प्राथमिक माहिती अहवालात केलेला नाही.

“खरं तर तक्रार नीट नोंदवून घेतली नाही म्हणून पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे,” अजीम म्हणतो. “पण ही फारच मोठी अपेक्षा झालीये. जर एखादा मुसलमान आरोपी असता तर मात्र चित्र पूर्णपणे वेगळं असतं.”

भोकरदन पोलिस स्टेशन येथील फौजदारांशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

Parth M.N.

Parth M.N. is a 2017 PARI Fellow and an independent journalist reporting for various news websites. He loves cricket and travelling.

Other stories by Parth M.N.
Editor : Priti David

Priti David is the Executive Editor of PARI. She writes on forests, Adivasis and livelihoods. Priti also leads the Education section of PARI and works with schools and colleges to bring rural issues into the classroom and curriculum.

Other stories by Priti David
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale